गोष्ट पहिली :
गोष्ट तशी जुनीच. नेमकं सांगायचं झालं तर १६६३ सालची म्हणजे जुनी म्हणायला हरकत नाहीये. जुनी असली तरी सगळ्यांना अगदी तोंडपाठ. आहेच मुळी तितकी जवकची. तर गोष्ट आहे 'शाहिस्तेखानाची फजिती'. अगदीच ओळखीची गोष्ट. पटकन सारांश देतो. लाल महालात मुक्कामी असलेल्या गाफील खानाला धडा शिकवणाऱ्या आपल्या राजांची ही गोष्ट. रात्रीच्या वेळी शिताफीने महालात घुसून खानाला लक्षात यायच्या आत त्याची बोटं छाटून राजे पसार सुद्धा झाले. खानाच्या सेनेला काय होतंय हे कळायच्या आत राजे सुखरूप निसटले.
या घटनेनंतर खानाने चिडून राजांचा पाठलाग करायची आज्ञा त्याच्या सैनिकांना दिली असणार. बिचारं सैन्य या बेरकी आणि हुशार राजांच्या मागावर निघालं. पण गनिमी कावा कोळून प्यायला असल्याने राजे गनिमाच्या हाती लागले नाहीतच.
मात्र या संपूर्ण प्रकरणात गनिमाची दिशाभूल करण्यासाठी राज्यांनी एक युक्ती केली ती अशी की बैलांच्या शिंगांना दिवे बांधून ते बैल दिवे घाटाच्या मार्गी सोडून दिले जेणेकरून खानाची सेना त्या मार्गी जाईल. राजे स्वतः वेगळ्या वाटेनं सुस्थितीत जातील. झालं काहीस तसंच गनिमच्या सेनेनं माती खाल्ली. आपले राजे सुखरूप परतले.
गोष्ट दुसरी :
ही पण तशी जुनीच पण शिवरायांच्या कथेनंतरची. ही गोष्ट घडली ते साल होते १७२९. बुंदेलखंडाच्या मदतीला बिनशर्त धाऊन गेलेल्या बाजीराव पेशव्यांची.
राजा छत्रसाल यांनी बाजीराव पेशव्यांकडे मोहम्मद खान बंगेश याच्या विरुद्ध मदत मागितली होती. पेशव्यांनी ती कबूल केली. यानंतर बाजीरावांनी 'बंगेश' ला व्यवस्थित गाफील ठेवून शेवटी त्याला शरण येण्यास भाग पाडले.
ही गोष्ट भन्साळी भाऊंनी मोठ्या पडद्यावर दाखवलेली आहे. यात बंगेश खानाला गाफील ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शिंगांना मशाली लावलेले बैल विरुद्ध बाजूने सोडून बाजीरावांनी विरुद्ध दिशेने आपले काम तमाम केले असे दाखवलेले आहे. अर्थात मूळ कथा आणि हे कथानक यात फरक असेलच पण बंगेश ला दुसऱ्याच गोष्टीत गुंतवून ,गाफील ठेऊन त्याला पराभूत केले हा स्वच्छ इतिहास सर्वश्रुत आहे.
या झाल्या दोन भिन्न कालखंडातील दोन भिन्न गोष्टी.
गोष्ट तिसरी :
ही गोष्ट मुळीच जुनी नाही बरका..
या गोष्टीतही एक राजा आहे. ही गोष्ट अशाच एका राज्याची आहे जिथे संपूर्ण जनतेवर मोठं संकट आ वासून उभं ठाकलय. रयतेचा राजा मात्र या संकटाचा सामना करायचा सोडून त्यावर मार्ग काढायचा सोडून त्या पहिल्या दोन गोष्टींप्रमाणे बैलांच्या शिंगांना मशाली लावून जनतेची दिशाभूल करण्यात इतका व्यस्त झालाय की त्यात होरपाळणारी जनता त्याला दिसतच नाहीये बहुदा.
बरोबर ओळखलंत..
ती होरपळणारी जनता म्हणजे तुम्ही आम्हीच आहोत..आणि हे शिंगांना मशाली लावलेले बैल म्हणजे रिया,कंगना, राजकारण,सुशांतसिंग,सीबीआय इत्यादी.
ज्यांचा खरच पाठलाग करायचा आहे किव्वा बंदोबस्त करायचा आहे तो कोव्हीड, ते शिक्षण,ते आरोग्य ,ती अर्थव्यवस्था, ती बेरोजगारी आणि त्या सर्व विस्कटलेल्या गोष्टी तश्याच भिजत पडून आहेत. आपण पळतोय बैलांच्या मागे..शिंगांच्या मशालीचे दिवे पाहून..
तीनही गोष्टीतल्या पात्रांची तुलना होणे दुरापास्तच आहे पण दिशाभूल करण्याच्या तंत्रात आणि त्या फासात सहज अडकणाऱ्या बिनडोक बाबींची तुलना नक्की होऊ शकते.
असो...तर यातून तरी धडा घेऊयात..टीव्ही,विविध माध्यमे यातून बेफाम सुटलेल्या फसव्या बैलांना बळी न पडता आपल्या खऱ्या ध्येयावर आणि गरजेवर लक्ष ठेऊयात कदाचित हे संकट परतवून सुरळीत आयुष्याचा पुनःश्च श्रीगणेशा त्यानेच लवकर साध्य होऊ शकतो..
...बाकी सुज्ञ रयतेला वेगळे सांगणे ते काय !
हृषिकेश पांडकर
१५.०९.२०२०
No comments:
Post a Comment