Monday, October 1, 2012

विघ्नहर्त्याचा हवापालट

      
       दहा दिवस सुट्टीसाठी सहलीला यावे तसेच काहीसे गणपती पुण्याला येतात,त्यांना मिळणाऱ्या सुट्टीप्रमाणे कोणी ओव्हर नाईट राहतात,कोणी बहिणीबरोबर परतात,कोणी आठवड्याभरात जातात, तर कोणी संपूर्ण सुट्टी एन्जॉय करून..
 
"अतिथी देवो भवं" या उक्तीचा तंतोतंत विरोधाभास आचरणारे पुणेकर या पाहुण्याच्या आदरातिथ्यात मात्र कुठेही आखडता हात घेत नाहीत असेच या दहा दिवसात जाणवते..
पुण्याचे दोन प्रकार आहेत,गणपतीच्या पंधरा दिवसातले पुणे आणि उरलेल्या साडेतीनशे दिवसातले पुणे.
फुटलेली दहीहंडी खाली यायच्या आधीच मांडवाचे खड्डे करायची सुरुवात होते.कधी कधी तर मला असे वाटते की, रिले शर्यती प्रमाणे श्रीकृष्ण आपल्या हातातले Batten घेऊन स्वर्गात जातो..ते batten गणपतीच्या हातात देतो आणि मग गणपती धावत खाली येतो की काय..श्रावण संपल्यावर पुणेकरांना उसंत नसते एवढे मात्र  नक्की.
पहाता पहाता मांडव देखील बांधून होतात, आणि गणपतीच्या पद्धतशीर रांगेने मांडलेल्या मूर्ती रस्त्यांवर दिसू लागतात.विविध आकाराच्या आणि नक्षीकामाच्या त्या प्रसन्न मूर्ती म्हणजे या दहा दिवसाची नांदीच असते.काही मूर्तीवर  लावलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या त्यांच्या बुकिंगची साक्ष देत असतात.काही लोकांचे गणपती  विकायचे आणि गणपती बसवायचे मांडव एकच असतात.
         एव्हाना ढोल पथकांच्या सरावाची सुरुवात झालेली असते, पुण्याच्या संस्कृतीचा ओलावा जपणारी मुठा नदी आपल्याच पात्रात विविध पथकांचा सराव घेताना आढळते.कारण पुनवडी आणि पुणे यांचे विभाजन करणाऱ्या या नदीवर बांधलेल्या कोणत्याही पुलावरून जाताना ऐकू येणारा ढोल ताशाचा गजर गणेशोत्सवाची तयारी स्पष्ट करीत असतो.कर्णकर्कश्य आवाजात लावलेली गाणी ऐकण्यापेक्षा ठेका आणि लय यांचा गंध असलेला ढोल ताशाचा तालबद्ध आवाज ऐकणे सध्या पर्वणीच ठरलेली  असते.शाळा,कॉलेज,ऑफिस किव्वा इतर कुठलेही उद्योग सांभाळून संध्याकाळी न चुकता सराव करणारे ग्रुप नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले असतात.वाढत असलेली ढोल पथके कदाचित सुसंकृत आणि पारंपारिक पुण्याची प्रतिमा अधोरेखित करण्याचे काम करीत असावेत हि एक समाधानाची बाब.
गणेशोत्सवाची  चाहूल एव्हाना वर्तमानपत्र आणि बाजारपेठ यांना देखील लागलेली प्रकर्षाने जाणवू लागते.इतके  दिवस ठेवलेल्या गणेश मूर्तींच्या बरोबरीने सजावटीचे साहित्य देखील दिसू लागते.वर्गणीच्या निमित्ताने आलेले मंडळाचे कार्यकर्ते हातात पावतीपुस्तक घेऊन गटागटाने फिरताना दिसतात.आधी माणिकचंद ,मग एअरटेल मग आयडिया आणि आता वोडाफोन अश्या काळानुरूप बदललेय पुरस्कर्त्यांच्या कमानी रस्त्यावर फुटपाथच्या बरोबरीने उभ्या राहतात.
         आणि याच उत्साहाच्या लयीत गणेश चतुर्थीचा दिवस उजाडतो.मानाचे गणपती, त्यांच्या मिरवणुका,त्यांच्या पूजेचा घटनाक्रम याने पुण्याचे वर्तमानपत्र उतू जात असते.आपण निवडलेली मूर्ती घरी आणण्यासाठी झालेली गर्दी शिगेला पोहोचलेली असते.मुहूर्ताचे भान ठेऊन किमान घरचे गणपती तरी प्रतिष्ठापित होत असावेत.कारण मानाचे गणपती आणि प्रतिष्ठित काही मोठे गणपती सोडले तर बाकीची सार्वजनिक मंडळे गणेश चतुर्थीचा संपूर्ण दिवस हाच मुहूर्त मानत असावेत.
सगळी दुकाने बंद असून देखील गर्दीने न्हाऊन निघालेला लक्ष्मी रोड पुढच्या दहा दिवसाची रंगीत तालीम घेत असतो.ज्यांच्या घरी गणपती असतात त्यांच्या घरात एक ठराविक सुवास दरवळत असतो, कदाचित धूप,कापूर,फुले,उदबत्ती यांचा मिश्रित सुगंध असावा.तबकाच्या शेजारी वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या दुर्वा आणि त्या दुर्वांमुळे ओला झालेला तो वर्तमानपत्राचा कागद...हेच दृश्य घराघरात असावे.जेवणातील पदार्थात गोड काय आहे हा प्रश्न तर केवळ बावळटपणाचा आणि निरर्थक असतो..
          गणेश चतुर्थीचा दिवस त्याच उत्साहात संपतो, आणि दुसर्या दिवशी ओव्हर नाईट           स्टे साठी आलेल्या गणेशाला निरोप द्यायची वेळ आलेली असते..काल आलेल्याला आज निरोप देणे जड जात असणे स्वाभाविक असावे.पण एव्हाना सार्वजनिक मंडळांचे देखावे चालू झालेले असतात,नेहमीच्या रस्त्यांवर प्रवेश बंदचे बोर्ड आलेले असतात,वर्षभर नसलेले खेळण्याचे,खाण्याचे आणि इतर विविध stall ठाण मांडून बसलेले नजरेस पडतात..गर्दी प्रचंड म्हणण्याइतकी नसते, कदाचित लोक अजून सणाला सरावलेले नसावेत..घरच्या गणपतीचे करण्यात रमलेले अजून सार्वजनिक मंडळांकडे वळलेले नसावेत.
एव्हढ्यातच वेध लागतात ते गौरीचे..आता गणेशाच्या जोडीला गौरीचे आगमन झालेले असते,सजावट,जेवण,पूजा या गोष्टी वेळच्या वेळी या होताच राहतात.वर्तमान पत्राच्या 'गणेशोत्सव ऑफर' ने सजलेल्या पुरवण्या आकर्षक असल्या तरी उपयोगी कितपत असतात या बद्दल अजूनही शंकाच आहे.५० फुटी मूर्ती,थर्मोकोलची मंदिराची प्रतिकृती,प्राण्यांनी केलेली गणेशाची आरती हे देखावे सालाबादप्रमाणे आलटून पालटून चापून येतात.पण अप्रूप कायम तसेच असते.प्रत्यक्ष पाहिलेले देखावे वर्तमानपत्रात पाहताना येणारी मजा मला अजूनही वेगळीच वाटते.दगडूशेठ समोरील अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम असो किव्वा पुणे फेस्टिवल असो दरवर्षी असूनदेखील उत्साहातील तफावत अजिबात दिसत नाही.
सहाव्या दिवशी बहिणीबरोबर जाणारे बाप्पा मार्गस्थ होतात.आणि कौटुंबिक पूजा प्रपंचामधून मोकळे झालेले लोक आता मोठ्या संख्येने बाहेर पडतात."आता गर्दी होईल..गौरी गणपतीचे विसर्जन झाले ना.."या वाक्याचा चावून चोथा झालेला असतो.आणि त्याचाच प्रत्ययही येतोच.
        गणपती उशिरापर्यंत पाहण्याचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे.मात्र त्याची नवलाई आहे तशीच आहे.आम्ही मोठे झालो म्हणून रस्त्यावर कोळशाने काळे करून त्यावर रेखाटलेल्या छापाच्या रांगोळ्याचे अप्रूप मात्र तेवढेच आहे.दगडूशेठच्या बाहेर दानपेटीतील पैसे मोजणारे लोक पहिले की वाटणारे आश्चर्य तेवढेच.आणि एकटे चालणे शक्य नसताना आपल्या मुलांना डोक्यावर घेऊन चालणाऱ्या लोकांबद्दलचा अचंबाही तेवढाच.
हाच दिनक्रम पुढचे तीन दिवस तसाच असतो,चौकात वाजणारी गाणीही आता ओळखीची झालेली असतात.....'मंडळ यंदा सदर करीत आहे' या वाक्याची पारायण होत असतात.आदल्या दिवशीच्या गर्दीचा फोटो दुसर्या दिवशीचे पहिले पान व्यापतो.अर्थात उत्साहाची पातळी ही आवाजाच्या पातळीवरच अवलंबून असते या विधानाला दोन वर्षात यशस्वी तडा गेल्याचे दिसून आले आहे हीच आनंदाची गोष्ट.
        आता गणेशोत्सव उत्तरार्धात येऊन पोहोचलेला असतो.मांडवाच्या मागील रिकाम्या जागेत विसर्जन मिरवणुकीच्या रथाची सजावट पूर्ण झालेली दिसत असते.अनंत चतुर्दशी आदला दिवस का कोण जाणे पण मनाला चटका लाऊन जातो.गणपती परत चालले याची सर्वात जास्त जाणीव आदल्या दिवशी होते.सकाळ पासून पूजा असल्यामुळे मांडव उघडेच ठेवलेले असतात.कार्यकर्त्यांचे लक्ष विसर्जन मिरवणुकीकडे असते.इतके दिवस नदीकाठी असलेली ढोल ताशाच्या सरावाची जागा आता विसर्जनाची तयारी करीत असते..इतके दिवस 'गणपती बाप्पा मोरया' चे फलक पाहत असतो..आता नदीकाठी जाणार्या रस्त्यांवर 'पुढच्या वर्षी लवकर या' चे फलक झळकत असतात...
अखेर तो दिवस उजाडतो...निरोपाची वेळ येते..वाजत गाजत आलेले पुन्हा वाजत गाजत आपल्या गावी निघालेले असतात.कसबा गणपतीची मंडईत आरती होते...आणि पुणेकरांच्या परमोच्च आनंदाची सुखद यात्रा सुरु होते.इतके दिवस सुरु असलेला ताल वाद्यांचा सराव लयबद्ध ठेक्यात लक्ष्मी रस्त्यावर उलगडत असतो.शिस्तबद्ध वादन आणि बघ्यांची कौतुकाची थाप यामुळे झालेला माहोल वर्णन करणे केवळ अशक्य.चुंबकाच्या पट्टीला लोखंडाचे कण आकर्षित व्हावेत तसेच काहीसे बघणारे लोक लक्ष्मी रस्त्यला आकर्षित होतात.कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि वादकांचा उत्साह खूप वरच्या थराला पोहोचलेला असतो.स्पीकर च्या भिंतीपुढे थिरकणारी पावले पारंपारिक वाद्यांपुढे झुकलेली असतात.वर्षभर स्तब्ध उभे असलेले लक्ष्मी रस्त्यावरील कपड्यांच्या दुकानातील पुतळे ठेका धरतील की काय असा एक विचार मनाला चाटून जातो.दोन आवर्तनामध्ये घेतलेल्या विश्रांतीच्या काळात मुखातून येणारा 'पुढच्या वर्षी लवकर या' चा आवाज उगीचच भावनिक करून जातो.फुटपाथ ला असलेले कठडे,दुकानांच्या पायऱ्या,दुतर्फा इमारती या पैकी कोणतीही जागा रिकामी दिसत नसते.दोन मंडळामधील पडलेले अंतर लोक रस्ता ओलांडण्यासाठी वापरतात असतात.
           दगडूशेठ,मंडई उशिरा का होईना पण अगदी राजा सारखे विराजमान होऊन दाखल होतात..डोळे आणि कॅमेरा या गोष्टी जितके साठवून ठेवता येईल तितके क्षण टिपून घेतात.हे गणपती पुढे सरकतात आणि आम्ही मागे..पुन्हा त्याच पावली परत येताना दहा दिवसात असलेले खेळणी विकणारे,खाण्याच्या गाड्या यांचा धंदा मंदावलेले स्पष्टपणे दिसत असतो.ढोल ताशाचा आवाज हळू हळू कमी होत असतो..लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमधून आपली गाडी काढणे आता जिकीरीचे वाटत असते..पोलीस आपले काम चोख बजावत असतात.मिरवणुकीवरून परतताना, पु लं नच्या नारायण सारखी अवस्था पोलिसांची झाली आहे की काय असे मला नेहमी वाटते.दहा दिवस अहोरात्र काम करणारे पोलीस कायम दुर्लक्षिलेले राहतात की काय असा उगीच समज होतो.
रात्रभर रस्त्याला झोप नसते...दुसरा दिवस उजाडतो..दुपारी केव्हातरी शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाल्याची बातमी कानावर येते..आणि मिरवणुकीची सांगता होते..विसर्जन झाल्यावर हे रिकामे रथ आणि झाकलेल्या मूर्ती पुन्हा आपल्या ठिकाणी कशा येतात हे मी कधीच पाहिलेले नाही.पण ते पाहण्याची इच्छा देखील कधी झाली नाही..
दहा दिवस नटलेला लक्ष्मी रस्ता विसर्जनाच्या दुसर्या दिवशी उदास वाटत राहतो.दोन्ही बाजूला पडलेल्या चपलांचा खच,दुतर्फा शिल्लक राहिलेले फलकांचे बांबू आणि रिकामे असलेले रस्त्यावरील स्वागत कक्ष नकोसे वाटायला लागतात..बाकी मंडळांचे मांडव आणि निर्जीव देखावे अजूनच निर्जीव वाटू लागतात.

बाप्पा परतलेले असतात पण पुढच्या वर्षी येण्याचे वचन देऊनच....

       पुण्याचा गणेशोत्सव हा कॅलेंडर मधील दहा दिवसांचा सण नसून ही एक आनंदयात्राच असते.गणेशाला विद्येची देवता मानले जाते आणि म्हणून पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात असे कोणाला सांगितले तर यावर विश्वास न ठेवण्यासारखे काहीच नसावे असाच समज होतो...

         खरच ..तुळशी बागेसारख्या ठिकाणी दिमाखात विराजमान झालेले बाप्पा ही थोर...आणि भर मंडईत प्रेमाने पाय चेपून देणाऱ्या शारदा ही ...
                                            मंगल मूर्ती मोरया ..दर वर्षी लवकरच या... !!!

                                                                                                                 हृषिकेश पांडकर
                                                                                                                 ०१.१०.२०१२