Tuesday, April 12, 2011

' क्रिकेट ' ... फक्त ३ अक्षरी शब्द ...

साहेब १५० वर्ष राज्य करून झाल्यावर खिशातून पाकीट पडावे असे क्रिकेट येथे विसरून गेले ...आणि त्या पाकीटामधून पुढे इतक्या गोष्टी बाहेर येतील असे त्यांच्या देखील ध्यानी मनी नसावे ...२००३  विश्वकरंडक final आम्ही घरच्यांनी एकत्र पहिली होती...ऑस्ट्रेलियानी एकहाती जिंकली...आणि करोडो भारतीय हळहळले..लोकांच्या उत्साहाचा पारा पहिल्या इंनिंग नंतरच खाली आला होता...पण अवकाळी पावसाने आशा निर्माण केली आणि क्षणार्धात आलेल्या उन्हाने आशेवर पाणी घातले....संपूर्ण मनोरा रचून झाल्यावर हंडीचा स्पर्श होऊन मनोरा पडण्यासारखे हे होते ...हाता तोंडाशी  आलेला कप बघता बघता ponting च्या हातात गेला आणि भारतीयांच्या स्वप्नाचा पालापाचोळा...तेव्हा match झाल्यावर आई म्हणाली होती कि "१९८३ साली आपण जिंकलो  होतो तेव्हा आम्ही सर्वजण रस्त्यावर आलो होतो...आता परत कधी चान्स मिळणार देव जाणे...पण आम्ही मात्र एकदा अनुभव घेतला आहे. " हे ऐकून तेव्हा खूप वेगळेच वाटले होतेआमच्या  नशिबी विश्वकरंडक नाहीच का  ?
त्यानंतर २००७ साल चा विश्वकरंडक असाच गेला शुष्क आणि निरस...तो कप कोणी जिंकला हे समजा विचारले तर आठवण्यात वेळ जातो….किती दिवस कपिल ने उचलेला तो Prudential Cup आम्ही बघायचा ?..तोच शेवटचा LBW तीच लॉर्डस वर पळत आलेली लोक...प्रत्येक वेळी विश्वकरंडक जवळ आला कि त्याच Golden moments...किती दिवस हे बघायचेआता इथून पुढे हे 'पणबघायचे.....कारण आता कपिलच्या सोबतीला धोनी देखील आला आहे...
समजा आयुष्यातील एक दिवस हे वहीचे एक पान आहे असे समजून जर मी  त्यावर काही लिहित गेलो तर  एप्रिल चे पान इतके रंगीत आणि कोरून लिहिले आहे कि पुढच्या पानावर आलो तरी त्या पानाचे ठसे मला स्पष्ट पणे दिसत आहेत….उन्हातून चालत असताना अचानक एखादा पाण्याचा tanker शेजारून जावा आणि त्यातील पाणी आपल्यावर उडावे यासारखा तो विश्वकरंडक स्पर्धेचा शेवटचा आठवडा ...Match पाहताना इतक्या थराची मजा येऊ शकते असे माहित होते पान आपणही हि मजा करू शकतो असे खरच वाटले नव्हतेफेसबुक,ट्वीटर,मोबाईल,टीव्ही,वर्तमानपत्रे या गोष्टी फक्त क्रिकेट मुळेच चालतात कि काय असे वाटेपर्यंत क्रिकेट ने आम्हाला ग्रासले होतेफेसबुक ला लॉगीन झाले कि USB port,CD ROM यांच्या रिकाम्या खाचेतून निळा रंग बाहेर येतोय कि काय अशी भीती  वाटण्याइतपत लोकांनी Bleed Blue ला आपलेसे केले होतेअर्थात पहिले काही सामने रडतखडत जिंकल्यामुळे त्या सोन्याच्या कपसाठी अजून वाट पहावी लागणार हा विचार  देखील करायची इच्छा नाहीशी झाली होतीआणि नंतर चांगले खेळून पुन्हा फायनल ला पोहोचल्यावर २००३ च्या आठवणीने  एप्रिल ची रात्र जागून काढली...या गोष्टी मागे वळून पाहिल्यावर आम्ही क्रिकेट खेळतो कि क्रिकेट आम्हाला खेळवते याचा हिशोब करण्या इतका वेळच नाहीये माझ्याकडेक्रिकेट हि अशी एकमेव गोष्ट आहे जीच्यामुळे खऱ्या अर्थाने भारत इतका एकत्र झाल्याचे मी माझ्या आयुष्यात पहिले.
अर्थात आफ्रिकेची match हरल्यावर झालेली टीका वाचताना खूप वाईट वाटले पण पाकिस्तान ची Match जिंकल्यावर त्याच लोकांच्या पोस्ट वाचून असे वाटत होते कि २२ यार्डाची जमीन एवढ्या लोकांना   आठवड्यात इतके कसे बदलू शकते  ?? क्रमाक्रमाने  वाढत  जाणारी मजा अनुभवण्याची मजा वेगळीच असते हे आता व्यवस्थित कळून चुकले आहे .पहिले ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हा साधारण मोजता येतील इतकी लोक एफ.सी रोड वर होती...पाकिस्तान च्या match नंतर साधारण चालताना पायातली चप्पल तुटणार नाही इतकी गर्दी होती...आणि फायनल  जिंकल्यावर पुण्याची लोकसंख्या खरच वाढली आहे यावर माझे शिक्कामोर्तब झाले...प्रश्न फक्त गर्दीचा नाहीये पण गणपती मिरवणूक आणि ३१ डिसेंबर ची रात्र या दोन्ही रात्रींना लाजवेल अशी रात्र अनुभवता आली एवढे मात्र नक्की.
पाकिस्तान ची match जिंकल्यावर..."आता बास..आम्ही विश्वकरंडक जिंकला..आमच्यासाठी हीच match महत्वाची होती " असे म्हणणारे आमच्या ऑफिस मधले लोक शनिवारी सुट्टी चा अर्ज देताना खेळण्याच्या दुकानात आलेल्या लहान मुलासारखी दिसत  होती ..
एखाद्या पिक्चर प्रमाणे सर्व गोष्टी जुळून  याव्यात त्याप्रमाणे सगळा कसं जुळून आलं होता...सचिन चा शेवटचा  विश्वकरंडक,आमची तरुणाई,मित्राचा रिकामा flat ,शक्यतो सुटीचे दिवस ,जास्त  डोक्याला त्रास नाही ( लग्न वगरे  )..आणि सगळेच ... फायनल match ला players पेक्षा लोकांची तयारी निश्चितच जास्त होती...काही वेळेला तर मला असा वाटते कि केवळ लोकांची तयारी वाया जाऊ नये यासाठीच भारतने  विश्वकरंडक जिंकला असावा.World cup मिळत राहतील पण लोकांची तयारी वाया जाता कामा नये .
भारताचा झेंडा विकत कुठे मिळतो हे मला माझ्या २६ वर्ष्यात माहित नव्हते हे या world cup ने  तासात शिकवलेरंगपंचमी चा रंग चेहर्या वरून गेला नाही म्हणून  दिवस शाळा बुडवली...पण World Cup ला चेहेर्यावर काढलेला तिरंगा गेला नाही म्हणून ऑफिस बुडवावेसे वाटले नाहीजेव्हा क्रिकेट match आहे म्हणून खरेदीची यादी करावी लागते तेव्हा ती match फक्त मनोरंजन म्हणून बघितली जात नाहीइतके दिवस match म्हणजे शिव्या ,हसणे ,आरडा ओरडा या गोष्टी पहिल्या होत्या पण या वेळेस डोळ्यातले पाणी देखील अनुभवले . आत्ता पर्यंत अनेक जिंकलेल्या फायनल matches पहिल्या natwest,sharjah, 20-20 WC etc या वेळी त्या त्या वेळेनुसार आणि मर्यादेनुसार मजा पण केली .पण परवाच्या  matches ची सर  त्याला येईल असे वाटत नाही.
कोण जिंकणारकोण हरणारआधीचे रेकॉर्ड्सतारखांचे खेळप्लेयर्स चा फॉर्मबक्षिसांच्या रकमा या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे यथासांग पार पडल्या...पण WC च्या विजयाचे वर्णन मी आत्तापर्यंत कुठेच वाचले नव्हते  त्यामुळे दुसर्यादिवशी पेपर मध्ये काय येणार या कुतूहलानेच रविवारी जाग आली ...आणि बदाबदा वाहणाऱ्या नळाखाली भरलेली कळशी जशी वाहते त्याप्रमाणे २२ पानी सकाळ आणि त्याच्या पुरवण्या ११ लोकांच्या कौतुकाने वाहत होत्या .....जशी सकाळ ची तशी सर्व पेपर ची गत होती ...वाचण्यासाठी काही नव्हतेच कारण आधीचा दिवसच त्याच्यात घालवला होता ...पेपरवाले कधी लिहायचे थांबतील हे मला माहित नाही पण १०० कोटी लोक मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतील हे सांगण्यासाठी मला आता रेफरल घ्यायची गरज नाहीये..
आज मी आईला सांगू शकतो ...मी पण World Cup जिंकताना पाहिला ...आम्ही पण रस्त्यावर आलो होतो..
आज मी तेंडूलकर ला विश्वकरंडक उंचावताना पहिले ....

-- हृषीकेश पांडकर   
(१२ एप्रिल २०११)