Wednesday, May 15, 2019

The landed eagle !!!

 वाघाच्या ओढीपायी बाकीचे वन्यजीव नजरेच्या ओंजळीतून काहीसे निसटत का ? याचे उत्तर व्यक्तिनुरूप बदलू शकते आणि बदलतेच. वाघ पाहण्याची तीव्र इच्छाशक्ती असणे यात वावगे काहीच नाही.पण फक्त वाघ पाहण्यासाठी जंगल फिरणे आणि तो न दिसल्यास निराश होणे या सारखा दुर्दैव अट्टाहास नाही.


 

पोटभरून वाघ पाहिल्यावर अशी वक्तव्य करणे सोपे आहे याची कल्पना मलाही तितकीच आहे परंतु 'टायगर रिझर्व' असे नाव धारण केलेले जंगल हे फक्त त्या पिवळ्या पट्टेरी जीवामुळेच नाही तर इतर असंख्य वन्यजीवांनी समृद्ध झालेले आहे हे पदोपदी पटते आणि हीच होत असलेली जाणीव निसर्गाची ओढ आणि अप्रूप वाढवत राहते.

पक्षांच्या अन्नसाखळीत वाघाप्रमाणेच अढळस्थानी असलेला हा पक्षी.जंगलातील पहाटेची लगबग सूर्याच्या चढत्या कमानीसोबत विसावत जाते.त्यात विदर्भातील दुपार म्हंटल्यावर आनंदच कारण मुळात उन्हाळ्यातील तिथली सकाळ तशी नावालाच.सकाळचे सोपस्कार पार पडल्यावर उन्हापासून आसरा शोधात प्राणी आणि पक्षी थंड आडोश्यात नाहीसे होत असतात आणि साधारण याच वेळेत हे शिकारी पक्षी अन्नाच्या शोधार्थ फिरताना पहावयास मिळतात.

अशाच एका उंच आणि गर्द झाडाच्या खालच्या बुंध्यावर उन्हात बसलेले हा Crested Serpent Eagle अर्थात 'तुरेवाला सर्पगरुड'.उन्हाची तिरीप अंगावर झेलत भक्ष शोधार्थ मग्न असलेली हि त्याची मुद्रा. उंच आकाशात असताना आकाराचा अंदाज तितकासा येत नाही मात्र जवळून पाहताना रूपाची भव्यता आणि देखणेपणा शिकारी पक्षी कसा असावा याची ओळख पटवून देत राहतो.

भक्ष्याचा वेध घेण्यासाठी असलेली तीक्ष्ण नजर.सापडलेले भक्ष चपळाईने टिपण्यासाठी असलेले मजबूत आणि अणकुचीदार पंजे आणि सोयीस्कर उदरभरण करण्यासाठी असलेली बाकदार चोच डोळ्याचे पारणे फेडत राहते.

या आणि अशा अनंत जीवांनी श्रीमंत असलेले जंगल आणि पर्यायाने निसर्ग अनुभवायची संधी कधीच सोडू नका कारण जंगलचा राजा जितका सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारा आहे तितकीच त्याची प्रजा देखील विलोभनीय आणि नेत्रदीपक आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय जंगलाचा निरोप घेता येणे केवळ अशक्य.

हृषिकेश पांडकर

१५.०५.२०१९

The landed eagle !!!

Crested Serpent Eagle | TATR | May 2019

 

Thursday, May 2, 2019

Beauty with the beast !

 नळावरची भांडण आपल्याला नविन नाहीत. किंबहुना आपल्याकडे नळावरच सर्वात जास्त भांडण होतात. पिण्याच्या पाण्याचा नळ असो किव्वा कपडे धुण्याचा इथली भांडण कोणाला चुकली नाहीत.इतकेच काय तर नद्यांचे पाणी अडवून पाण्याच्या प्रश्नावरून रंगलेले राजकारण देखील आपल्याला नविन नाही. यातच भर म्हणजे तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल असे म्हटले जाते. पाण्याच्या हक्कांवरील वाद इतका विकोपाला जातोय हे किमान या फोटोवरून तरी वाटत नाही आणि कदाचित हाच निसर्गाचा निष्पापपणा किव्वा अलिखित नियम इथे अधोरेखित होत राहतो हे पाहताना सुसह्य वाटत राहते.


 

मध्य भारतातातील मे महिन्यातील भर दुपारची हि वेळ.तापमानाचा पारा ४६ अंशावर येऊन टेकलेला. पानझडी होऊन पर्णविरहित झाडांच्या वाळक्या फांद्यातून मार्गक्रमण करत पाण्याच्या शोधार्थ असलेले वन्यजीव हक्काने येतात असा हा पाणवठा.नुसता मोर किव्वा नुसता वाघ आधी पाहण्याचा योग्य आला होता. मात्र नजरेच्या एका टप्प्यातच हि दोन राष्ट्रीय आकर्षणे उभी राहतील असे कधी वाटले नव्हते.

एका बाजूला सौन्दर्याचा मानंदांड असलेला देखणा मोर आणि त्याच्याच समोर कर्तृत्वाने राजपद सिद्ध केलेला रुबाबदार असा जंगलाचा राजा वाघ.एक भारताचा राष्ट्रीय पक्षी आणि दुसरा भारताचा राष्ट्रीय प्राणी.दोघेही तहान भागविण्यासाठी पाणवठ्यावर आले तेव्हाचा हा फोटो.फोटो जरासा नीट लक्ष देऊन पाहिलत तर पाण्यात असलेली मगर देखील दिसू शकते.त्यामुळे भूचर,उभयचर,जलचर आणि हवेत उडणारे अशा चारही जीवांनी एकाच ठिकाणी दर्शन दिले.

जंगलातून फिरत असताना अर्थातच मोरापेक्षा वाघ दिसण्याचे आकर्षण जास्त असते यात शंकाच नाही आणि याला कारणेही तशीच आहेत. मात्र या मुळे मोराचे महत्व तसूभरही कमी होण्याचे कारण नक्कीच नाही. म्हणूनच हि दोन्ही राष्ट्रीय अभिमानाची प्रतीके एकाच ठिकाणी पाहणे हा अनुभव कायमच स्मरणीय राहील एवढे निश्चित.

हृषिकेश पांडकर

०२.०५.२०१९

Beauty with the beast !

Tadoba | India | May 2019