Tuesday, June 18, 2013

वेड लावी 'कान्हा'


      सहलीला जाणे किव्वा पर्यटनाला जाणे या विधानांच्या व्याख्या वयानुसार आणि आवडीनुसार बदलत जातात हा माझा अनुभवाने तयार झालेला समज आहे. आणि थोडा विचार केला तर यात तथ्य देखील आहे अशी माझी खात्री होत चालली आहे. कारण आगर्याचा ताजमहाल एकदा पाहिल्यावर पुन्हा एकदा पाहण्याच्या माझा अट्टाहास कधीच नव्हता. पण दोन वेळा पाहिलेले जंगल तिसर्यांदा पाहण्याचा मोह मला आवरता आला नाही. कारण आवडीनुरूप आकर्षण बदलते.

     
पुन्हा जंगल पुन्हा मध्यप्रदेश या मध्ये नव्याने येणारा कुठलाच मुद्दा जाणवत नाही. पण जंगल म्हणजे ताजमहाल नाहीये ज्याचा शुभ्र रंग तसाच्या तसा पाहायला मिळतो.अर्थात मानवनिर्मित प्रदूषणाने काळानुरूप  काळा होत असलेला संगमरवर हाच काय तो बदल डोळ्याला दिसतो हे दुर्दैव आता मानवनिर्मित प्रदूषणाने होणारा बदल जर डोळ्याला स्पष्ट दिसत असेल,तर निसर्गाच्या तीन ऋतुंमध्ये रंगासाहित सर्वस्वी बदलणारे जंगल पाहणे हि संधी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जंगलामधील हाच बदल माझे जंगला बद्दलचे आकर्षण वेळोवेळी वाढवत नेतो. प्रस्तावना करण्यासाठी एवढी वस्तुस्थिती पुरेशी आहे.  

     तर मुद्दा असा होता कि मध्यप्रदेशातील उन्हाळा आणि जंगलातील पाऊस या दुभाजकावर उभे राहून जंगलाचा आनंद घ्यायचा या परम उद्देशाने मी पुणे सोडले. जंगलात पाऊस झाला तर प्राणी दिसणार नाहीत या माहितीमुळे रेल्वे मधून बाहेर दिसणारा पाऊस थेंबागणिक  शिव्या खात होत.गाडीने महाराष्ट्र सोडला आणि पावसाने आपला हट्ट.निरभ्र आकाश आणि लाही करणारे ऊन यांनी जबलपूर स्टेशन वर आमचे स्वागत केले.कडाक्याच्या उन्हातही पाऊस नसल्याच्या आनंदाचा ओलावा टिकून होता.   
 
    
स्टेशन वरून बाहेर पडलो ते भेडाघाटच्या दिशेने. नर्मदेच्या घाटावर यायची हि दुसरी वेळ. पण निसर्गाच्या समोर आपण नेहमीच नव्याने जातो याची जाणीव पदोपदी होत होती. कारण निसर्गाची सवय होत नसते.कॅलेंडर मध्ये छापलेले ऋतू जरी सवयीचे असले तरी निसर्ग नेहमीच नव्याने दर्शन देतो.घाट उतरत असताना कानावर पडलेले पहिले वाक्य होते,"परसो हलकी बारीश हुई ,पानी  थोडा बढा  है." या वाक्याने आमच्याच उत्साहाला नजर लागली कि काय असे वाटून मी बोटीत बसलो. 

     सकाळची वेळ ,नर्मदेचे विस्तीर्ण पात्र,घाटावर असलेली तुरळक गर्दी,आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले संगमरवर या सर्व गोष्टी कॅमेर्यात कधीच बंद होत नाहीत हा कायमचा अनुभव घेऊन मी आणि पर्यायाने बोटीने किनारा सोडला.शांत आणि अथांग पात्रात दोन संगमरवरी खडकांमधून जाणारी बोट,लयीत हलणारी चार वल्ही आणि त्याच लायीत सुरु असलेले आमच्या गाईड चे धावते समालोचन.पाण्याची गंभीरता आणि खडकांची विस्तीर्णता अनुभवल्यावर वेळ होती ती पाण्याची रौद्रता अनुभवायची अर्थात 'धुवांधार' पाहण्याची.
   


       नैसर्गिक कड्यांवरून कोसळणारे आणि पुढे कपारीमधून वेगाने वाहत जाणारे नर्मदेचे फेसाळ पाणी पाहताना हेच पाणी पुढे इतके शांत कसे होते याचे कोडे पडते. १५ फुटांवरून ते दृश्य पाहताना वेगाचा अंदाज येतो पण भीषण खोलीचा थांगपत्ताही लागत नाही.कडक उन्हात देखील धबधब्यामधून उडणारे तुषार न्हाऊ घालत होते. कोसळणार्या पाण्याचा आवाज थक्क करणारा होता.आवाज हळू हळू नाहीसा होत गेला.आणि आम्ही जबलपूर सोडले.

     चार तासाच्या कडाक्याच्या उन्हातून प्रवास केल्यावर समोर दिसणारी 'कान्हा राष्ट्रीय उद्यान' हि पाटी सुखावणारी होती. या आधी जंगल पाहिले होते,पण पुन्हा नव्याने आत जातोय असा भात होत होता. गाडीने जंगलात प्रवेश केला आणि उंच असलेल्या साल च्या झाडांनी मानवंदना द्यावी त्याप्रमाणे दुतर्फा गर्दी केली. गडद झाडांच्या रांगेतून जाणारा एकमेव रस्ता हिरव्या शेवाळ्यावर नखाने ओरखडा मारावा तसा दिसत होता. पक्षांचा किलबिलाट सोडला तर फार काही आवाज नव्हते. पाऊस नाही या आनंदात आम्ही राहण्याच्या ठिकाणी येउन पोहोचलो.  

     पुढचे दोन दिवस आपण इथेच राहणार आहोत हा विचारच जास्त सुखावह होता.

     जेवण आणि इतर आवर आवरी या शुल्लक बाबी उरकल्यावर वेळ आली होती ती सफारीची.जीप मध्ये बसलो.वाघाची ओढ तर असतेच पण कान्हा बद्दल वाचलेले संदर्भ आणि प्रत्यक्षात असलेले कान्हा याची तुलना होवू लागली.सुर्य पश्चिमेला कलला होता,डोळ्यावर येणारी तिरपी उन्हे अडविण्याच्या प्रयत्नात सुरुवातीला नकोसे वाटत होते. पण जसे जसे पुढे गेलो तसे जादूच्या पिशवीतून एक एक गोष्ट बाहेर यावी त्याप्रमाणे एक एक प्राणी नजरेस येऊ लागले. विस्तीर्ण पसरलेल्या गवताच्या मैदानावर चरत असलेला गव्यांचा कळप लांबूनच लक्ष वेधून घेत होता. गुडघ्यापर्यंत पांढर्या शुभ्र रंगाचे मोजे घातले आहेत कि काय असा भास व्हावा इतकी पद्धतशीर रंगसंगती  पाहून त्यामागे असलेल्या कलाकाराचे कौतुक वाटले.पंधरा वीस गव्यांमध्ये असलेला नर गवा फिकीर नसल्याप्रमाणे उगीचच गावातला तोंड लावून पुढे जात होता.सुमारे १३०० किलो वजन सहज असेल अशी माहिती कानावर आली.

    

       
        तिथून थोडे पुढे गेल्यावर सालाच्या उंच झाडावर बसलेला गरुड दृष्टीक्षेपात पडला.पायात लटकणारा साप आणि तीक्ष्ण नजर हि पक्षांच्या अन्नसाखळीत आपण सर्वात वर आहोत याची साक्ष देत होती.सजावट  करण्यासाठी फुले वापरावीत तशी जागोजागी हरणे दिसत होती.आणि त्याच फुलांभोवती घुटमळणाऱ्या  माश्या किव्वा इतर निरुपयोगी जीवाप्रमाणे असंख्य माकडे जागोजागी हजर होती.केवळ वाघांचे पोट भरावे या एकमेव कारणासाठी हरणांनी जन्म घेतला आहे अशा थाटात दबकून चालणारी भित्री हरणे मजेशीर वाटत होती. 

     आमची जातच मुळात हलकट आहे असे ज्यांच्या फक्त रुपावरूनच कळते असे कोल्ह्याचे कुटुंब सावधपणे कसलातरी शोध घेत फिरत होते.अंगाने लहान पण चाणाक्ष नजर आपणच जंगलाचे धूर्त जनावर आहोत हे सांगत होती. 
     
पक्षांचे असंख्य आवाज आणि स्थलांतरित पक्षांचे ओळीने आणि लयबद्ध उडणारे थवे पाहिल्यावर माणूस या जातीला सोडून सर्वांना शिस्त आहे याची खात्री पटली.

     
सुमारे साडेतीन फुट असलेली मुंग्यांची वारुळे एखाद्या लांब आवारात ठराविक अंतरावर मांडून ठेवलेल्या कुंड्या वाटत होत्या. अस्वलाचे प्रमुख खाद्य असणाऱ्या त्या मुंग्या वारुळातून कुठल्यातरी अनामिक घाईने हालचाल करताना दिसत होत्या पाऊस पडल्यावर त्या वारुळाचे काय होत असेल असा विचार येउन मी वारुळाचा नाद सोडला. 

     प्रत्येक नजर नवीन गोष्ट दाखवत होती. प्रत्येक आवाज नवीन होता.पश्चिमेच्या टोकावरचा सुर्य दोन झाडांमधून शक्य तितकी किरणे जमिनीवर सोडत होता.या वेळी खेळ खरच सावल्यांचा होता कारण जमिनीवर ऊन पोहोचणार नाही याची खबरदारी झाडे यथायोग्य घेत होती. दिवसभराच्या उन्हानंतर मोकळी झालेली रस्तावरची माती गाडी गेल्यावर उडत होती आणि क्षणार्धात स्थिरावत होती. गवताची मैदाने,गर्द झाडांची दाटी,मोठे पाणवठे,सडसडीत वाढलेली बांबूची झाडे,रेषेत असलेली साल ची झाडे,मधूनच येणारा टेकडी सदृश्य प्रदेश या सर्व गोष्टींमुळे एक परिपूर्ण आणि रम्य असलेले जंगल पंचतंत्रातील वर्णनाला चपखल बसत होते.
       
  



      प्रकाशाची तीव्रता झपाट्याने कमी होत होती.इतका वेळ येणारा पक्षांचा आवाज कमी होत होता.गाडी परतीच्या मार्गावर होती. मगाशी दिसणारी माकडे मंदावलेली जाणवत होती.संधिप्रकाश आणि अंधार यांचा पाठशिवणीचा खेळ चालू होता,आणि यात अंधाराचा विजय जवळपास निश्चित झाला होता. घाबरत हरणे कळपाने स्तब्ध झालेली दिसत होती.पक्षांचा दिवस केव्हाच संपला होता.आमची रात्र झाली होती.वेळ झाली होती ती वाघ आणि बिबट्या यांच्या जंगल सफारीची. 

     जंगलातील रात्र जागून अनुभवणे हि माझी पहिलीच वेळ होती.जेवणानंतर खोलीबाहेरील खुर्चीवर बसलो होतो.झाडांच्या दाटीवाटीने अंधार द्विगुणीत झाला होता.निरभ्र आकाश असूनही चांदणे प्रखर नव्हते.किर्रर्र जंगल म्हणजे काय याचे प्रत्यंतर येत होते.शेजारी झालेली पानांची सळसळ अंगावर काटे आणत होती.रात्रीच्या वेळी गुरख्याच्या शिट्टीचा आवाज जसा एका नियमित वेळाने येतो
त्याप्रमाणे येणारे सांबर आणि हरणांचे 'Mating Calls' आणि 'Alarm Calls' , आमच्याच battery च्या प्रकाशात चमकणारे हरणांचे डोळे आणि प्रकाश पडल्यावर दचकणारी हरणे.पालापाचोल्यावर चालताना होणारा आवाज शांततेची खोड काढत होता.

     
संपूर्ण जंगल निपचित पडल्याचे जाणवत होते.काळोखाची सावली अधिकच भीषण दिसत होती. 

               
उद्याचा सूर्योदय काय घेऊन येतो या ओढीने मी निद्राधीन झालो.

     सकाळी जाग आली तीच मुळात मित्राच्या हाकेने … 'कोणाला साप बघायचा आहे ?' अंथरूण भिरकावून त्याच्या पाठीमागे गेलो.संडासाच्या दारात एक फुट अजगराचे पिल्लू शांतपणे बसले होते.मागच्या खिडकीची एक काच नव्हती.  

     
ज्या दिवसाची सुरुवातच अशी आहे त्या दिवसाच्या पुढचा प्रवास कसा असेल या विचारात मी दात घासण्याचे मनावर घेतले. 

     रात्रीचे जंगल उजाडले होते.कालच्या भीतीची जागा पुन्हा एकदा कुतूहलाने घेतली होती.आता वेळ होती ती पहाटेचे जंगल पहायची.जीप ने पुन्हा एकदा जंगलात प्रवेश केला.अंधुकसे उजाडले होते.वातावरणातील गारवा सुसह्य होता.पक्षांचा दिवस लवकर सुरु होतो या सवयीला ते अपवाद नव्हते. हरणांचे प्रसन्न कळप दृष्टीक्षेपात पडत होते.माकडांना पण जाग आली होती.फांद्यांवर उडी मारताना त्यावर तयार झालेले दवाचे पाणी आमच्या अंगावर पडत होते.रात्रीच्या दवाने मातीचा रस्ता ओला झाल्याचे जाणवत होते.आणि त्यावर गाडीच्या टायरचे तयार झालेले चाप मागे पडत होते.नुकताच जाग आलेला सांबरांचा कळप हनुवटी वर करून पाहत होता.पाहते आपल्या घरासमोरून एखादा परदेशी नागरिक गेल्यावर आपली जी प्रतिक्रिया असेल तशीच साधारण   त्यांची देखील होती. गाडी पुढे गेल्यावर त्यांनी गवतात तोंड घातले. 

     तिथून पुढे गेल्यावर राजेशाही थाटात चालत असलेला हत्ती नजरेस आला.जंगलात कोणाचे काय चालू आहे याचे या प्राण्याला फार कौतुक नसावे.आपल्या बापाचे काय जाते या अविर्भावात त्याचे पदक्रमण होते.त्याच्या शेजारून गाडी गेल्याची पण त्याला कल्पना नसावी अशी माझी खात्री आहे.
     
पुढे लांबवर ५/६ गाड्या गर्दी करून थांबलेल्या दिसत होत्या.आम्ही तिथे पोहोचलो.नंतर माहिती समजली की ५० फुटावरील गवतामध्ये एक वाघीण आणि तिचे २ बछडे बसलेले आहेत.एवढी माहिती आम्हाला तिथे खिळवून ठेवायला पुरेशी होती.पुढची दहा मिनिटे वाट पाहण्यात गेली.जीप मधील सर्वजण कॅमेरे सरसावून बसले होते.इतके प्राणी पहिले तरी वाघ म्हणजे वाघ होता. आणि त्याची वाट पाहण्याची काही वेगळीच मजा आम्ही घेत होतो.आमच्या प्रतीक्षेचे फळ आम्हाला मिळाले.सुमारे सात ते आठ महिन्याचे पिल्लू गवतातून बाहेर आले ऐटीत चालत एक फेरी मारून पुन्हा गवतात नाहीसे झाले.जंगल सफारी यशस्वी होण्यासाठी असलेले सगळे सोपस्कार आता सर्वार्थाने पूर्ण झाले होते.इतकावेळ रोखलेले कॅमेरे आता शांत झाले होते.गवतातून बाहेर आलेल्या वाघाचा फोटो वानखेडेच्या ड्रेसिंगरूम मधून बाहेर पडणाऱ्या सचिनचा फोटो घ्यावा त्या प्रमाणे लोकांनी टिपून घेतला होता. 

     'Indian Roller','Drongo','Hornbill' या सारखे पक्षी सुंदर मुली ramp वर चालतात त्याप्रमाणे मार्गाक्रमण करताना दिसत होते.फोटो काढण्यासाठी कॅमेरा सरसावला कि Allergy असल्यासारखे उडून जात होते.टीटव्या आणि साळुंक्या या सुंदर पक्षांमध्ये बिचार्या वाटत होत्या.त्या मुकाट्याने आपली दिनचर्या सांभाळण्यात मग्न दिसत होत्या.

     
थोडे पुढे गेल्यावर संपूर्ण पिसारा फुलविलेला मोर प्रथमच पाहण्याचा योग आला.रंगाच्या पेटीमध्ये  देखील असा रंग कधी तयार होऊ शकणार नाही तसा रंग त्याच्या पिसार्याचा होता.मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचतो हे वर्णन अतिशय साजेसे वाटत होते.मोराचा पिसारा पुढून जितका आकर्षक असतो त्याप्रमाणेच तो मागूनही सुंदर असतो. ज्या पिसार्याने लांडोर आकर्षित होते तिथे आपली काय गत.आणि केवळ कॅमेर्यासाठी उभे राहावे यास तो समोर उभा होता.कॅमेरा भरून फोटो काढल्यावर शेवटी आम्हीच तिथून हाललो.
       
     

       
      एव्हाना सकाळचे धुके आणि गारवा सूर्याने जप्त केला होता.व्यवस्थित उजाडले होते.कोवळे ऊन प्रसन्न वाटत होते.गाडी पुढे एका तळ्याकाठी येवून उभी राहिली.डाव्याबाजूला माळरानावर २०/२५ बारासिंघा शांतपणे चरत होते.हरणा सारखा दिसणारा हा प्राणी अतिशय दुर्मिळ असणारा वैशिष्ट्यपूर्ण बारासिंघा राजकुमारच्या थाटात चरत असलेले दिसत होते.डोक्यावर बारा टोकांचा मुकुट परिधान केलेले बारासिंघा नैसर्गिक असामान्यत्वाचे उदाहरण देत होता.

        
जंगल कसे असावे याचा तंतोतंत नमुना आम्ही अनुभवत होतो.वेलवेटच्या कापडावरून हात फिरवावा तसे झपाट्याने वातावरण बदलत होते.इतका वेळ वाढत असलेले ऊन झपाट्याने नाहीसे होत होते.सुर्य केव्हाच ढगाआड गेला होता.इतकावेळ सकाळच्या उन्हात वावरणारे असंख्य प्राणी अडोशाच्या शोधार्थ पांगले होते.जंगलाची हद्द संपत आली होती.दोन दिवसाच्या सुखद प्रवास पावसाच्या हलक्या शिडकाव्याने संपत होता.  


     राहण्याच्या जागेवरून सामान उचलून जंगलाकडे पाठ केली.येतानाचा रम्य रस्ता जाताना मात्र उदास वाटत होता.जंगलाची हद्द संपवून गाडी गेट मधून बाहेर आली.
     
फोटो काढण्यासारखे काही शिल्लक नव्हते हातातल्या कॅमेर्याची जागा मोबाईल ने घेतली

        
सहवासाने प्रेम वाढते म्हणतात आणि दुराव्याने देखील…. प्रेमाच्या बाबतीत विरोधाभास देखील अपवाद ठरला होता… 

                                                                                                       हृषिकेश पांडकर
                                                                                                      १८/०६ /२०१३