Monday, November 28, 2011

स्वप्नपूर्ती ….


    काही गोष्टी विसरायच्या आहेत म्हणून लक्षात ठेवल्या जातात...आणि मग त्या कायमच्याच अविस्मरणीय होऊन जातात...

       कदाचित वर लिहिलेली ओळ याक्षणी मला किंचित खटकत असेलही..आणि खटकत आहेच..कारण मी ज्या विषयी पुढे लिहिणार आहे ती गोष्ट मला विसारावीशी का वाटत होती याचे आत्ता माझ्याकडे उत्तर नाही...
      एखादी गोष्ट करायची प्रचंड इच्छा असते.आणि त्या गोष्टीची इच्छापूर्ती होणे यासारखे समाधान नाही.
टीव्ही,इंटरनेट,रेडीओ,मासिके,पुस्तके,वर्तमानपत्र या माध्यमातून क्रिकेट अक्षरशः मनगटापासून चाटून पुसून घेतले आहे.
      पण आज पर्यंत एकही टेस्ट match याची देही याची डोळा पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती.India-WI च्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात तो योग होता असे म्हणायला हरकत नाही.सामना मुंबईच्या वानखेडे stadium वर होता.
      उद्या आपली batting येईल या हिशोबाने आदल्या दिवशी मुंबईला गेलो.रात्री ९ ला निघाल्याने पोहोचायला साधारण ११.३० झाले.मुंबईत कमी गर्दीच्या वेळा दाखवणारे घड्याळाच तयार झालेले नाही.त्यामुळे express-way संपल्यावर मुंबई चालू झाली हे सांगण्यासाठी "Navi Mumbai Welcomes you" या सारखे वेगळे बोर्ड लावायची काय गरज आहे असे मला नेहमी राहून राहून वाटते..समुद्राचा खरा वासच खुद्द प्रवेशाला सुवास शिंपडायला आहे.

     तर सांगायचा मुद्दा एवढाच कि आम्ही रात्री ११ .३० ला मुंबई ला पोहोचलो.अर्थात मुक्कामाचे ठिकाण अंधेरी असल्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी एक वेगळा प्रवास करावा लागतो हे हि तितकेच खरे आहे.पण उद्या आपल्याला match पहायची आहे या उत्साहातच मी इतका गुरफटून गेलो होतो कि प्रवासाचा शीण आला आहे हे जाणवायला  माझ्याकडे वेळच नव्हता.
      सकाळी उठणे हा माझ्यासाठी थोडा कठीण प्रकार आहे मात्र कठीणतेची व्याख्या उठून काय करायचे आहे या गोष्टीनुरूप बदलत राहते.आणि उद्या तर साक्षात देवाच्या दर्शनाला जायचे होते आणि तेही देवाच्या सर्वोच व प्रार्थनीय रुपात.त्यामुळे  उठण्याचा कंटाळा,किव्वा लवकर जाग न येणे यांसारखे शुल्लक अडथळे उद्भावायचा संबंधाच नव्हता.
     सकाळी सुमारे ६ वाजता एक अनामिक ओढ आणि कमालीचे औत्सुक्य या दोन गोष्टी sack मध्ये भरून वानखेडे गाठले.तिकीट मिळविण्यापासून सुरुवात होती.डोक्यात फक्त एकाच विचार होता कि तिकीट मिळवणे आणि stadium मध्ये जाऊन बसणे.Marin drive ला असलेल्या गेट no ३  वर बसलेल्या security गार्ड  ला तिकीटा बद्दल विचारले.तर तो म्हणाला कि चर्चगेट च्या पलीकडे incom tax ऑफिस समोर तिकीट मिळतील..तुम्हाला स्टेशन मधून जाता येणार नाही.फिरून जावे लागेल.आम्ही शेवटचे वाक्य पूर्ण होईपर्यंत गाडीत बसून पुढे पण गेलो होतो.२ किमी च्या प्रवासात ६ जणांना विचारून सरतेशेवटी आम्ही तिकीट काउंटर ला पोहोचलो.आमच्या आधी ३०/४० लोक आधीपासून रांगेत उभी होती.आणि काउंटर बंद होते.आम्ही पण गाडी लाऊन रांगेत उभे राहिलो.७ वाजले होते.रस्त्यावरची गर्दी वाढत होती आणि रांगेतली देखील.

        रांगेत उभे राहण्याच्या वयातील विविधता पाहून मुंबई आणि क्रिकेट या दोघांचे नाते इतके जुने आणि
घट्ट का आहे यावर पुन्हा एकदा मानसिक शिक्कामोर्तब करून तिकीट खिडकी कडे मी पाहत होतो.हातात हात घालून आलेल्या प्रेमी युगुलांपासून नातवाच्या हातात हात घालून आलेले आजोबा मी आमच्या रांगेत पहिले.प्रत्येकाच्या चर्चेला एकाच विषय कि..आज batting येईल आणि सचिन century करेल...
       शक्यतो वाट पाहण्यात घालवलेला वेळ नेहमीच जास्त  आणि कंटाळवाणा वाटतो असे म्हणतात पण आज रांगेत उभे राहून वाट पाहण्यात घालवलेला वेळ समोर  दिसणाऱ्या वानखेडेच्या ओढीने कसा गेला काहीच समजले देखील नाही.आम्ही रांगेत उभे होतो तिथून वानखडे चे २  floodlights दिसत होते.आणि क्षणार्धात तो  क्षण आठवला जेव्हा धोनी ने WC '११
फायनल ला सिक्स मारून आमचं आणि सबंध देशाचं स्वप्न पूर्ण केला होतं.
       १० ते १५  मिनिटात ३०/४० लोकांची संख्या ३००/४०० पर्यंत गेली होती.सुमारे अर्ध्या तासांनी MCA चे volunteers आणि security गार्ड तिथे आले.आणि आता तिकीट खिडकी उघडणार या शक्यतेने माझ्या  उत्साहाची पातळी अजून वाढली.पण तरीदेखी माझ्या उत्साहाचा अंत पाहत सुमारे अर्ध्या तासानी खिडकी उघडली आणि तिकीट विक्री चालू झाली.एव्हाना गर्दी प्रचंड वाढली होती.रस्त्यावरची आणि रांगेतली देखील.रांगेबाहेर झेंडे,सिक्स आणि फोर चे बोर्ड्स  विकणार्यांचा वेगळाच गोंधळ चालू होता.बाहेरून जाणार्या taxi आणि बस मधून जाणारे कुतूहलाने आमच्याकडे पाहत होते.मात्र आश्चर्य कोणालाच नव्हते कारण मुंबईकरांच्या रक्तात क्रिकेट आहे हेच खरे.बरोबर ८.१५ वाजता आम्ही तिकिटे मिळवून युद्ध जिंकल्याच्या आनंदात तिथून बाहेर आलो.आता पुढची पायरी होती कि गेट no ५ शोधणे.मात्र या वेळी वेळेने आमची परीक्षा घेतली नाही ..थोडे चालत गेल्यावर अजून एक रांग आम्हाला दिसली जेथून आम्हाला आत जायचे होते.पटकन रांगेत जाऊन उभे राहिलो.लोकांच्या उत्साह आणि तिकीट मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता.

        ५ ठिकाणी पोलिसांच्या चेकिंग नंतर आम्ही आत आलो होतो समोर 'North Stand' असे लिहिलेला मोठा बोर्ड झळकत होता.आणि तिथून चढून गेल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर दिसणार होते त्याची वाट मी गेली २० वर्ष पहात होतो. पायर्या चढून आत गेलो.आणि समोर संपूर्ण वानखेडे दिसत होते.क्षणभर स्तब्ध झालो आणि करोडो वेळा पाहिलेली धोनीची ती सिक्स आणि पळत आलेला सचिन डोळ्यासमोरून जायलाच तयार नव्हता.हीच ती जागा जिथे २२  वर्ष वाट पाहिल्यावर  मिळालेल्या विजयाचा आनंद सचिन ला लपवता आला नव्हता.हीच ती जागा होती जिथे ११ लोकांनी १०० करोड लोकांना स्तब्ध केले होते.हीच ती जागा जिथे भारतचे नाव विश्वकरंडकावर कोरले गेले होते.२ मिनिटे अंगावर कट आला.आणि हातावरून हात फिरवतोय तोच कानावर सचिन च्या नावाचा आवाज येऊन आदळला.संपूर्ण stadium एकाच नावाने ओरडत होते.आम्ही आमच्या व्यवस्थित सावलीची जागा घेऊन बसलो.शेवटी पुणेकर..त्यामुळे दुपारी येणारे उन, संध्याकाळी येणारे उन यांचा भौगोलिक अभ्यास करून खुर्च्या निवडल्या आणि पटकन बसून घेतले.

          एव्हाना stadium भरू लागले होते.WI ची टीम ग्राउंडवर practise करत होती.लोक दिसतील त्याच्या नावाने ओरडत होती.थोडा वेळ ग्राउंड,साईट स्क्रीन ,pavilion,commentary box,सचिन तेंडूलकर stand,गावस्कर stand,गरवारे pavillion या टीव्ही वर दिसणाऱ्या गोष्टी समक्ष पाहण्यात निघून गेला.आणि मग
समोरून एक उंच आणि त्याच्या शेजारी बुटकी अशा दोन व्यक्ती चालत येताना दिसल्या.आणि Natwest Final,सचिन च्या ODI मधील २०० रन्स,Champions Trophy Final,T-20 WC Winning final,WC final अश्या वेळी ऐन क्षणाला commentry करणारा रवी शास्त्री आणि त्याच्या खांद्याला डोकं ( खांद्याला खांदा नाही म्हणता येणार ) लावून चालणारा little master सुनील गावस्कर यांना जवळून बघण्याचा योग आला.टीव्ही मध्ये बघणे किती वेगळे असते हे पदोपदी पटत होते.
       शेजारी असलेल्या A/c रूम मधील टीव्ही मध्ये जाहिराती चालू होत्या.तेव्हा अचानक घरी match सुरु होण्याआधी लागणाऱ्या जाहिरातींची आठवण झाली आणि आणि आज आपल्याला एकही जाहिरात पहावी लागणार नाही याचे समाधान चेहेर्यावर झळकले.समोर नजर टाकतो न टाकतो तोच भारताची भिंत म्हणून
ओळखला जाणारा द्रविड ड्रेसिंग रूम मधून उतरत होता.आणि त्या मागून तलवारी सारखी bat चालवणारा सेहवाग आणि संकट मोचक लक्ष्मण हे तिघेही सरावासाठी येत होते.लोकांनी तिघांच्या नावानी stadium डोक्यावर घेतले होते.
वेगवेगळ्या नेट मध्ये तिघेही batting practise करत होते.आजू बाजूचे लोक बोट दाखवून इतरांना सांगत होते कि त्यांना कोण दिसतंय आणि कोण काय करतंय.

      हे पहात असतानाचा अचानक मोठ्ठा शंखनाद झाला, आम्ही सहज वर पहिले तर वरच्या Stand मध्ये सचिन Fan सुधीर हातात मोठ्ठा शंख डोक्यावर भारताचा नकाशा आणि चेहऱ्यावर तिरंगा रंगवलेला अशा नेहमीच्या वेशात मोठ्ठा तिरंगा घेऊन शंखनाद  करत होता.आता सचिनचा fan शंखनाद करतोय हे लक्षात येताच  मी थेट ड्रेसिंग रूम मधून उतरणाऱ्या पायर्यानाकडे पहिले आणि ज्या साठी केला होता हा अट्टाहास ती गोष्ट डोळ्यासमोर होती अगदी काही फुटांवर.संपूर्ण stadium मध्ये एकाच आवाज होता.सचिन...सचिन ... ती वामन मूर्ती bat आपल्या काखेत ठेऊन पायर्या उतरत मैदानात सरावाला आली.२ मिनिटे WI चे खेळाडू देखील थांबले असतील.
      लोह्चुम्बकाला लोखंडाचे कण जसे चिकटतात त्या प्रमाणे सगळ्यांचे कॅमेरे सचिनच्या  दिशेने रोखले गेले होते.मात्र मोजून १० मिनिटे सराव करून सचिन परत ड्रेसिंग रूम मध्ये परतला.एव्हाना द्रविड,लक्ष्मण  पण गेले होते.ग्राउंड च्या कर्मचाऱ्यांनी सगळी नेट्स काढून नेली.WI चे खेलाडूपण परत वर गेले होते.आता वेळ होती पीच रिपोर्ट ची गावस्कर यांनी नेहमीच्या शैलीत पीच रिपोर्ट दिला.अर्थात आम्हाला तो कळणे शक्यच नव्हता.कारण आज आम्ही मैदानावर होतो.मधला वेळ अत्ता कसा वाटतंय हे घरी आणि मित्रांना फोन करून सांगण्यात उडून गेला.
      आणि एवढ्यात २ अम्पायर stadium मध्ये आले.आणि त्या पाठोपाठ WI चे शेवटचे दोन batsman पण...आणि मग ड्रेसिंग रूम मधून संपूर्ण भारतीय टीम खाली आली आणि T-20 आणि ODI असे दोनही WC उचलून विजयाची सवय लावणारा धोनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मैदानात आला.Stadium आता भरू लागले होते .Match सुरु झाली आणि १०  मिनिटात त्यांची शेवटची विकेट पडली आणि आता आपली batting सुरु होणार या विचारानेच मुंबईकर वेडे झाले.आपली batting आणि सेहवागची तोडफोड सुरु झाली.टीव्ही वरील match आणि Stadium मधली match या दोन भिन्न गोष्टी आहेत याची आता खात्री पटली होती.

        सेहवाग आउट झाला ,आणि राहुल द्रविड मैदानात आला .आपसूकच जागेवर उठून उभे राहिलो आणि फक्त आम्ही नाही तर stadium वरचा प्रत्येकजण उभा होता आणि boundry लाईन ते पीच या चालण्यात संपूर्ण टाळ्यांची सलामी देत त्याचे स्वागत केले..गंभीर  आणि द्रविड ची चांगली जोडी जमली होती. लंच झाला..आम्ही पण खाऊन घेतले..उन डोळ्यावर आले होते.match सुरु झाली ..लोकांची चलबिचल सुरु झाली होती ज्या साठी आपण आलोय ते अजून होत नाही या विचाराने लोकांचा मूड थोडा बदललेला स्पष्ट जाणवत होता.
      आणि तेवढ्यात गंभीर आउट झाला ..आता गंभीर आउट झाला हि बाब भारतीय टीम साठी असेलही कदाचित गंभीर पण लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.गंभीर मान खाली घालून चालत होता बिचारा ,पण stadium मधला प्रत्येक जण सचिन च्या नावाने ओरडत होता....कदाचित या गोष्टीची देखील इतर batsman ला सवयच लागली असेल.गंभीर आत गेला आणि साक्षात देवाने आपल्या संपूर्ण आयुधासाहित दर्शन द्यावे त्याप्रमाणे ती साडेपाच फुटी वामन मूर्ती आपले हेल्मेट सरळ करीत आणि आकाशाकडे पहात मैदानात आली.आणि एकच गजर ग्राउंड वर चालू झाला .लोकांच्या आनंदाला सीमा उरल्या नव्हता.आज Century कर एवढं एकच मागणं प्रत्येक जण करत होता..." तुझ मागतो मी आता ... " अशा अविर्भावात प्रत्येक  भक्त सचिन ला एकच विनंती करत होता.सचिन क्रीज वर पोहोचला आणि ज्या साठी इतक्या लांब आलो ती वेळ आणि व्यक्ती साक्षात समोर उभी होती.

      सगळे रेकॉर्ड्स,प्रसद्धि,मान,पैसा या गोष्टी बाजूला सारून शांतपणे अम्पायर कडे लेग स्टंप मागणारा सचिन टीव्ही वर अनंत वेळा पहिला होता पण आज समक्ष पहिला आणि 'गंगेत घोडा न्हायलं' .....
पहिली ५ मिनिटे त्याला पाहण्यातच गेली,गार्ड मार्क करणे,फिल्डिंग पाहणे,साईट स्क्रीन adjust करणे या गोष्टी होऊन खेळ सुरु होईपर्यंत प्रेक्षकांना उसंत नव्हती .उन्हाचे चटके सोयीस्कर दुर्लक्षित होऊ लागले होते.द्रविड आणि सचिन यांना एकत्रित खेळताना पाहण्याचे स्वप्न डोळ्यासमोर पूर्ण होत होते.बघता बघता दोघांचे अर्धशतक पूर्ण झाले.सचिन ला bat दाखवताना पाहण्याची इच्छा पण एव्हाना पूर्ण झाली होती.एका बाजूला सचिन आणि दुसर्या बाजूला द्रविड हे म्हणजे सिंहगडावर  उभे राहून तोरणा आणि राजगड बघण्यासारखे होते.

     आणि सगळं व्यवस्थित चालू आहे असे वाटत असतानाच द्रविड आउट झाला.८२ रन्स ची ती खेळी बर्याच गोष्टी दाखवून गेली.उभे राहून द्रविड चे अभिनंदन करे  पर्यंत लक्ष्मण मैदानात हजर होता.ऑस्ट्रेलिया ला आपल्या मनगटावर नाचवणारा लक्ष्मण आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिला.आणि हाच तो माणूस ज्याने follow-on घेऊन ऑस्ट्रेलिया ला चीतपट केले.आणि दिवसभर खेळून ऑस्ट्रेलियन bowlers ची पिसे काढली होती. दोघेही व्यवस्थित खेळत होते.आणि बघता  बघता दिवस संपला.सचिन ६७  वर नाबाद होता या आनंदातच मी खुर्चीवरून उठलो.सचिन परत ड्रेसिंग रूम कडे जात असताना फक्त हेल्मेट आणि bat एवढाच नाहीतर १००  करोड लोकांच्या शतकी अपेक्षांचा ओझंच जणू घेऊन चालला होता.

      सचिन ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचेपर्यंत कोणीही आपापली जागा सोडली नव्हती.दोघे आत गेले आणि लोकांच्या चर्चेला आता उत आला होता.तेवढ्यात उद्याच्या तिकिटांची जाणीव होऊन आम्ही त्वरित उद्याची सोय करण्यासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो.......रांगेतला पर्त्येक जण एकच विषयावर बोलत होता.दीड तासानंतर आम्हाला तिकीट मिळवण्यात यश आले.उद्या शतक पाहायला मिळणार या आनंदात पुढचा वेळ कसा गेला हे वेगळे सांगणे आणि लिहिणे न लागो.

दुसर्या दिवाशीचा सूर्य देखील सचिन चे शतक पाहण्यासाठीच उगवला होता...

      आम्ही जमेल तसे आवरून सकाळी ९ ला stadium मध्ये हजर झालो...तिकीट कालच मिळाल्याने आजचे काम त्यामानाने खूपच सोपे होते.आता एकच गोष्टीचा  ध्यास होता आणि ते म्हणजे महाशतक.खेळ सुरु झाला.सचिन ची प्रत्येक धाव लोकांच्या टाळ्यांची धनी होती.२ चौकार आणि एक सिक्स या प्रकाराने ६७ ते ९४ हा 
प्रवास इतका लगेच झाला कि शतकासाठी फार प्रतीक्षा नाही हे निश्चित झाले होते.आपल्याला शतक पाहायला मिळणार हे आता नक्की झाले होते. लोकांना खुर्चीवर बसायची इच्छाच नसावी कदाचित.
आणि rampaul चा खांद्यापर्यंत उडालेला चेंडू backfoot वर येऊन खेळण्याच्या नादात सचिन च्या bat ची कड घेऊन गेला आणि थेट सामी च्या हातात येऊन विसावला ....

       इतक्यावेळ बेभान होऊन नाचणारे वानखेडे stadium क्षणार्धात गलितगात्र होऊन पडले.२ सेकंदापूर्वी टाळ्या शिट्या वाजवणारे हजारो प्रेक्षक डोक्याला हात लावून स्तब्ध झाले.Stadium वर स्मशान शांतता पसरली होती.महाशाताकाची प्रतीक्षा अजून लांबणीवर पडली होती.एवढ्या जवळ पोहोचून देखील यश न आल्याचे दुख  मात्र सचिन च्या चेहेर्यावर तसूभर देखील नव्हते.तो आपली बात काखेत आणि मन खाली घालून ड्रेसिंग रूम कडे परतत होता.लोकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत  नव्हता.इतिहास रचताना पाहण्याचे स्वप्न उध्वस्त झाले होते .निराशा लपवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरत होते.सचिन सीमेरेषेजवळ जवळ पोहोचला तेव्हा त्याने  प्रेक्षकांना bat उंचावून दाखवली आणि इतक्या वेळ असलेली स्मशान शांतता भंग पावली...कर्णकर्कश  आवाजाने पुन्हा एकदा सचिन च्या खेळला सलाम करण्यात  येत होता.सचिन च्या नावाचा गजर झाला.संपूर्ण भारत कदाचित हेच सांगत असावा कि "हरकत नाही..अरे ९९ वेळा जे तू केले तीच गोष्ट अजून एकदा करायला तुला जमणार नाही हे केवळ अशक्य...आज नाही तर पुढल्यावेळी...आम्ही असेच तुझ्या पाठीशी आहोत."सुमारे ५ मिनिटे लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला..

      सचिन आत परतला आणि धोनी मैदानात आला.पण आता match मधला गाभाच संपल्याची जाणीव लोकांना झाली होती.सचिन गेल्यावर stadium मधील लोक परतू लागले.आणि आम्ही देखील काढता पाय घेतला..
बाहेर आल्यावर सगळी कडे एकच हळहळ होती कि इतक्या जवळ जावून होम ग्राउंड वर ते शतक पूर्ण करता आले नाही..आम्ही एव्हाना stadium पासून लांब आलो होतो.मेसेजस मधून येणारे निराशेचे सुर अजूनच त्रासदायक वाटत होते......

खरच आहे .आम्ही पहायला
 गेलो आणि शतक झाले नाही याचे वाईट वाटणे साहजिक आहे.पण याचा अर्थ शतक होणारच नाही असा नक्की नाही..कदाचित हा योग  कांगारूंच्या देशातच असेल.
हरकत नाही आम्ही तयार आहोत .२६ डिसेंबर ..Boxing Day Test..Border Gavaskar Trophy...MCG..
याची खुणगाठ बांधूनच आणि सकाळची मुंबई अंगावर घेत आम्ही कार पर्यंत पोहोचलो...

आणि या दोन दिवसांनी मला काय दिले याचा हिशोब करतानाच कार चे दार बंद केले...
खिडकीतून बघितले तर समोर डौलाने उभे असलेले गेट वे ऑफ  इंडिया होते आणि मागे क्षणिक दुखाने झुकलेले वानखेडे...

हृषीकेश पांडकर
२८/११ /२०११

Tuesday, November 22, 2011

साखरपुडा.....तो.. आणि.. तो...



    मागच्याच आठवड्यातील तो दिवस....सकाळी उठलो तेव्हा ध्यानीमनी देखील नव्हते कि आज रात्री झोपायच्या आधी मला असे दोन एकाच  बांधणीचे पण टोकाचे अनुभव येतील.म्हणजे एखादी व्यक्ती एकाच दिवसात एकाच पद्धतीचे पण प्रचंड विरोधाभास असलेले अनुभव कसे घेऊ शकते या विचारानेच माझी झोप लांबवली..

           अगदी दैनंदिनी लिहायच्या फंदात पडत नाही पण दिवसाचा घटनाक्रम सांगायचा हा खटाटोप.तारीख, वार लिहिण्याचे  सोपस्कार पाडायची फारशी गरज वाटत नाही.पण दिवस चांगलाच असावा...मित्राच्या साखरपुड्याचा मुहूर्त होता.आता खरं  सांगायचे तर अगदी जवळचा मित्र आहे असे म्हणण्याइतपत  जवळचा मित्र नाहीये..पण ऑफिस हि जागाच अशी आहे कि रोज भेटून  भेटून ओळखीला मैत्री म्हणायची वेळ येते.हरकत नाही..आमची ओळख  ४/५ महिन्याच्या पलीकडे जाणारी नव्हती.पण जन्म कोल्हापूर चा असल्याकारणाने साखरपुड्याला नक्की या असे बजावून सांगितले होते.आणि मी पण गेलो होतो.अर्थात साखरपुड्याला पुणे सोडून जाणे, एवढा उत्साह माझ्यात नाही.पण ऑफिस ला सुट्टी आणि तेवढंच फिरण्याचा आनंद या दोन सोयीस्कर गोष्टीनमुळे मी पण जाणार होतो.

आता आम्ही सकाळी ८.३० वाजता गाडीत बसलो आणि ११ .३० वाजता कराड ला पोहोचलो.मजा बघा..तिथे गेल्यावर मित्राला  पुन्हा पत्ता विचारला कि बाबा रे  आम्ही इथे आलोय पुढे कसे जायचे...यावर तो म्हणाला कि कराड पासून थोडे पुढे म्हणजे साधारण ४० km अंतरावर तासगाव नावाचा तालुका आहे तिथे या....आम्ही मुकाट तिथे गेलो...गाडीचा पत्रा आणि डांबर या दोन्ही गोष्टी सहज वितळतील असे छान उन पडले होते...निसर्ग म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येते अशी कोणतीही गोष्ट खिडकीतून दिसत नव्हती.सुमारे तासाभरानंतर आम्ही तिथे पोहोचलो.मग पुन्हा तिथून त्याला फोन केला तर तो म्हणाला कि आता तासगाव पासून अजून १० km अंतरावर शिरगाव नावाचे एक गाव आहे तिथे या आणि फोन करा...आमच्याकडे आता पर्याय नव्हता ..आम्ही तिथे गेलो आणि फोन केला...दुपारचा १ वाजून गेला होता  कुठून इथे आलो मरायला असे वाटण्याइतपत  कंटाळा आला होता...मित्राला फोन केला कि आम्ही आलोय आता कुठे ? तर तो म्हणाला कि ******* हे नाव विचार त्यांच्या घरासमोरच  मांडव  आहे.
         आता घरासमोर मांडव हि कल्पना पटायलाच माझा थोडा वेळ गेला.कारण याआधी अशा ठिकाणी जायची वेळच आली नव्हती.जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडी नेली.आणि केवळ आमचे भाग्य कि मांडव दिसू शकेल अशा ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचू शकलो...


आम्ही गाडीतून उतरलो आणि थेट मांडवात गेलो...दुपारचे १.३० वाजून गेले होते..भुकेने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या...साखरपुडा म्हणल्यावर जे पदार्थ डोळ्यासमोर येतात त्यातील एकही पदार्थ असू शकेल याची शक्यता देखील नव्हती.आम्ही मांडवा पाठीमागे असलेल्या हपाश्यावर हात,पाय,तोंड धुतले..पाण्याची चव या विचायावर लोकांनी आपापली मत मांडली.काहींनी एका शिवीमध्ये विषय हाताबाहेर काढला.नंतर शेजारी असलेल्या पिंपळाच्या पारावर येऊन बसलो आमच्या बरोबरीने गावातील काही वृद्ध मंडळी गप्पा मारत बसले होते...काही जण केवळ जेवणाच्या वेळेची वाट पहात पहुडले होते.मांडवातील दृश्य अतिशय स्पष्ट दिसत होते.विधी जिथे चालू होते त्या चौथर्यावर जितकी लोक होती तितकीच लोक चौथर्याच्या खाली होती.मोजून  ११ खुर्च्या समोर टाकल्या होत्या त्यातल्या ९ रिकाम्या होत्या..एकावर कुत्रे बसले होते...जे नंतर एका आजोबांनी  हटकल्यामुळे पळून गेले....

        कुठेही गोंधळ नव्हता...शांतपणे सगळे चालू होते...रिंग exchange ज्याला आम्ही म्हणतो तो विधी कधी झाला हे सांगण्या इतपत लक्षात नाही...पण मित्रांनी हात वर करून रिंग दाखवली खरी.मांडवाला लागुनच मुलीचे घर असावे.कारण २/३ ठराविक बायका घरातून मांडवाकडे आणि मांडवातून घराकडे अक्षरशः पळत होत्या .विधी झाल्यावर पेढ्याला लागलेल्या मुंग्या पेढ्याला धक्का लागल्यावर जश्या पसरतात त्याप्रमाणे चौथार्यावरची गर्दी पांगली...काही लोक थेट घरी गेले...आता थेट म्हणण्यात मजा नाही कारण ४ पावलांवर घरे होती.त्यानंतर जेवणाची वेळ आली..अर्थात आम्ही पोहोचलो ती सुद्धा जेवणाचीच वेळ होती..पण आता जेवण पण होते.पहिली पंगत बसली जी तब्बल २२ लोकांची .मगाशी पहुडलेले आजोबा, काका सगळे पंगतीत होते...त्यांचे जेवण चालू असताना आम्ही एका tractor वर बसून फोटो काढत होतो.

त्यानंतर आमची जेवायची वेळ आली...आम्ही जाऊन बसलो पत्रावळ्या ठेवल्या द्रोण ठेवले...पाणी मिळाले...भात वाढला आणि शिरा वाढला....दोन्ही पदार्थ अतिशय अप्रतिम झाले होते आणि त्यात भूक आ वासून उभी होती भात आणि शिरा संपला आता मी पोळी or पुरी ची वाट पहात बसलो ...पण असे समजले कि तसलं काही नाहीये.... आता साखरपुड्याच्या जेवणात पोळी किव्वा पुरी नाही हि गोष्ट माझ्यासाठी पहिल्यांदाच होती...आणि याच गोष्टीचा विचार मी हात धुवत असताना करत होतो....आणि मग सहजच विचार डोक्यात आला कि जर पोळी आणि पुरी नाहीये तर बटाट्याची भाजी फक्त भाताबरोबर खायची होती ?...तरी देखील पोटभर जेवलो...

एव्हाना उन कमी झाले होते गार वर सुटला होता...आम्ही जेवून पुन्हा पारावर येऊन बसलो.मधल्या वेळेत मित्र आणि त्याची बायको घरात जाऊन जेवून आले...पुढच्या अर्ध्या तासात सर्वांची जेवणं झाली...


३ वाजले होते. निघायची वेळ झाली होती...तेवढ्यात मित्र म्हणाला कि अरे सगळे स्टेजवर या..आम्ही मुकाट स्टेजवर जाऊन उभे राहिलो...मुलाकडले पाहुणे या नात्याने मुलीकडच्यांनी आम्हाला नारळ टॉवेल आणि टोपी दिली...आता पांढरी टोपी स्टेजवर घालून घ्यायची माझी पहिलीच वेळ.आणि हे सर्व झाल्यावर त्या काकांनी ताकीद दिली कि टोपी अज्जिबात काढायची नाही.मग तसाच स्टेज वरून उतरून आम्ही निघालो.जीन्स घातलेले बहुदा आम्हीच ४/५ जण असू.उगीचच कोणीतरी वेगळे आहोत असे पदोपदी वाटत होते.

           त्यानंतर आम्ही मित्राचे अभिनंदन करायला पुन्हा स्टेजवर गेलो.फक्त दोघेच होते .मित्राला अभिनंदन केले आणि त्याच्या बायकोला पण.कुठेही बडेजाव नव्हता,घाई नव्हती.बारीक आवाजात सनई चालू होती काही लोक मांडव स्वछ करत होते.एका कोपर्यात ओट्या भरणे चालू होते.नवरा बायको घरात hall  मध्ये बसले होते.गावकरी आपापल्या घरी निघाले होते.आणि आम्ही विदुशकासारखे मांडवातून फिरत होतो.एकूण मिळून ६०  लोक पण नसतील...निघायची वेळ आली ...३.३०  वाजले होते.मित्राचा निरोप घेऊन आणि एकूणच गावाचा निरोप घेऊन आम्ही पुण्याला परत निघालो...प्रवासातले सगळे सोपस्कार पार पाडून साधारण ७.००  ला मी घरी पोहोचलो..

         घरी पोहोचतानाच मोबाईल वाजला...आणि unknown नंबर पाहून उगीचच कपाळावर आठ्या आल्या...नाखुशीने फोन उचलला...आणि २ मिनिटानंतर समजले कि  समोरून बोलणारी व्यक्ती इयत्ता ७ वी मध्ये बेंचवर माझ्या शेजारी बसत असे...सध्या अमेरिकेत रहात असून साखरपुड्याकरिता  पुण्यात आलेली आहे आणि आजच त्याचा साखरपुडा आहे आणि मला तिथे जायचे आहे....ज्या दिवशी साखरपुडा त्याच दिवशी पाउण तास आधीचे ते आमंत्रण घेऊन मी अंघोळीच्या तयारीला सुरुवात केली...सकाळचा साखरपुडा संपतो न संपतो तोच समोरचा दत्त म्हणून समोर होता...

        पटापट आवरून बाहेर पडलो...स्थळ होते श्रुती मंगल कार्यालय..आपटे रोड..
आता आपटे रोड म्हणल्यावर साहजिकच वेशभूषा करण्यात थोडा जास्त  वेळ गेला...सकाळी समोरील व्यक्ती कशी दिसत असेल याची काळजी होती...आणि आता आपण कसे दिसत असू याची…..सौंदर्याचे गणित जमवून घाईतच बाहेर पडलो..
१५ मिनिटात कार्यालयात आलो...पहिल्या मजल्यावर कार्यक्रम आहे असे सुचविणारी मोठी इलेक्ट्रोनिक आणि साधी अशा दोन्ही पाट्या खाली लटकविलेल्या होत्या...जाताना जिन्यात असलेल्या आरशात पाहून उगीच formality पूर्ण केल्या.आणि hall मध्ये पोहोचलो...perfume चा घमघमाट पसरला होता....
समोर स्टेजवर विधी चालू होते...पत्रकार परिषदेत पत्रकार ज्या प्रमाणे कॅमेरे धरून उभे असतात त्या प्रमाणे लोकांची photography चालू होती...काही लोक सरळ लावलेल्या खुर्च्या सोयीस्कर फिरवून त्यावर बसून जेवण सुरु होण्याचा वेळेपर्यंत गप्पा मारून टाइमपास करत होते. मुलाची आई आणि नवरी मुलगी यांच्या makeup मधील चढाओढ चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती...

       सनई लावली होती पण ती का लावली आहे याचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला नाही...
मी आणि माझे दोन मित्र मागे बसून गप्पा मारत होतो...मध्ये एकदा उत्सवमूर्ती ला हात केला...hall मध्ये 'मला बघा' या अविर्भावात फिरणाऱ्या मुलींकडे पाहण्यात आमचा वेळ चमच्यावर ठेवलेली maggie जशी हळुवार घसरते त्या प्रमाणे अलगद जात होता.

     काही वेळानंतर 'Ring Exchange ' चा कार्यक्रम चालू झाला...दोघांनी आपापल्या ring एकमेकांना घातल्या...Congratulations चा केक कापला...लोकांनी टाळ्या वाजवल्या मोठा फुगा फुटला त्यातली चमकी नवरा बायको सोडून सगळ्यांवर व्यवस्थित पडली..पेढा भरवणे या प्रकारात नको नको म्हणताना मुलीने ५/६ पेढे सहज  रिचवले….
ज्या साठी त्यांनी मला बोलावले तो कार्यक्रम तर झाला...आता ज्या साठी आम्ही गेलो तो कार्यक्रम सुरु झाला होता...

        खाणे संपेल कि काय या भीतीने लोकांनी बुफेपाशी गर्दी केली...त्यात आम्ही पण होतोच अर्थात...मीठ आणि लिंबू धरून बरोब्बर १७ प्रकार जेवायला होते...जेवताना मधेच जावून घेणार्यानमुळे नवीन डिश घेणाऱ्यांच्या कपाळावरील अठ्यांची संख्या सुरळीच्या वडीच्या थरानपेक्षा जास्त होती.

       जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी washroom मध्ये गेलो...लोकांनी हात धुतल्यावर पुन्हा एकदा आरश्यासमोर उभे राहून चेहेर्याची रंगरंगोटी सुरु केली  होती.
...' कृपया पेपर Napkins येथे टाकू नका' यातील 'कृपया' आणि 'टाकू' या दोन शब्दांवर आधीपासूनच कागद पडलेले होते.
      बाहेर आलो बडीशेप ठेवलेली होती...लहान मुलं बडीशेप मधील खडीसाखर वेचून खात होते.
एव्हाना जवळचे मित्र आणि अगदी जवळचे नातेवाईक एवढेच फक्त hall मध्ये शिल्लक होते.बाकीच्यांचा साखरपुडा केव्हाच संपला होता.आम्ही देखील निघायचे म्हणून मित्राला भेटायला गेलो.अभिनंदन केले स्टेजवर व्हिडीओ कॅमेर्यासमोर खोटे हसलो.’पुन्हा भेटू नक्की’ या विरत्या आश्वासनाने हसत त्याचा निरोप घेतला...
जवळचे नातलग आणि मित्रमैत्रिणी या मध्ये त्यातल्या त्यात उठून दिसणारे चेहरे उगीचच  मागे वळून टिपत आम्ही जिन्यापाशी आलो.मगाशी दारावर लावलेल्या तोरणा मधील फुलाच्या पाकळ्या खाली पडल्या होत्या...मगाशी भरलेला hall आता रिकामा होता.बाहेर काढलेली रांगोळी व्यवस्थित हलली होती आणि hall मधील खुर्च्यांची एक नवीनच रांगोळी तयार झाली होती.

आम्ही मात्र मस्त जेवण चेपून घराकडे परतलो……

         असे खूप कमी दिवस येतात ज्या दिवशी गादीला पाठ लागल्यावर संबंध दिवस आठवावासा वाटतो किंबहुना तो दिवस आपोआपच डोळ्यासमोरून जातो..

       एकाच दिवसातील सूर्योदय आणि सूर्यास्त असे एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवतील असे ध्यानी मनी पण नव्हते.पण एकाच प्रकारच्या दोन समारंभात इतके  भिन्न अनुभव येतील याचा आनंद मला दुसर्यादिवशी मित्रांना सांगताना लपवता आला नाही.अर्थात लिहिण्यामागे कुठेही तुलना करायची मुळीच इच्छा नाहीये.पण ज्या प्रकारे गोष्टी घडतात तश्याच इथे उतरवल्या आहेत.कुठला समारंभ चांगला वाटला असे विचारले तर माझ्याकडे ठाम मत नाही.कारण दोन्ही ठिकाणच्या मजा वेगळ्या आहेत.

       फक्त फरक इतकाच कि विकायची असते काचच...पण काही लोक
थर्मोकोल मध्ये ठेऊन विकतात तर काही लोक गवताच्या भाऱ्या मध्ये गुंडाळून.....

खरच.....अनुभव घेताना choice नसलेलाच बरा असतो.....


                                                                                                                                                                                                                                                            - हृषीकेश पांडकर
                                                                                                                                                                                                                                                             २१ नोव्हेंबर २०११

Sunday, September 4, 2011

माझे आवडते महिने …


        दिवसाचे रुटीन सेट होणं हीच जिथे अवघड गोष्ट आहे...अश्या ठिकाणी वर्षाचं रुटीन सेट होणं  याचं विचार न केलेलाच बरा.पण का कोण जाणे वर्षाचे ढोबळमानाने रुटीन सेट झाले आहे असे मला नेहमी वाटत आले आहे.आणि असे वाटायचे मुख्य   कारण म्हणजे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर हे महिने.तसं पहायला गेलं तर बाकीचे महिने पण आहेतच पण नवीन कोऱ्या शाळेच्या गणवेशातला मुलगा पहिला की पुढेच तीन महिने काय होणार आहे याची कल्पना सहज येते.आणि आता त्याची इतकी सवय झाली आहे की पालखी दिवेघाटात आली या बातमी नंतर विंबल्डन  स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी फेरीत काय झालं हि जर का बातमी नसेल तर चुकचुकल्या सारखे वाटण्या इतपत हे रुटीन माझे सेट झाले आहे.

          शाळेची नवीन खरेदी...पावसाला व्यवस्थित झालेली सुरुवात..रस्त्यावर माणसांनी घातलेले कपडे दिसण्यापेक्षा त्यांनी घातलेले रंगीबेरंगी रेनकोट..याच गोष्टी इतक्या जवळच्या वाटतात की एक वर्ष कोणीच कॅलेंडर जरी छापले नाही तरी व्यवस्थित दिवस ओळखण्याची मी खात्री देतो.मराठी महिने इंग्लिश प्रमाणे धडाधड सांगू शकेन याची मी खात्री देत नाही...पण आषाढ श्रावण आणि भाद्रपद हे महिने गरवारे च्या सिग्नल ला उभे राहून देखील अचूक सांगू शकतो..कारण भाद्रपदातील गणपतीच्या मिरवणुकीची प्रक्टीसे तेथे चालू असते..

         "नागडी लहान मुलं साचलेल्या पाण्यात खेळत आहेत..आणि पाऊस पडत आहे"पहिल्या पावसानंतर सालाबादप्रमाणे छापत आलेला सकाळ चा हा फोटो समजा एखाद्या वर्षी त्यांनी छापला नाही तर यंदा पावसाळा नाही असे वाटून चातक पक्षी देखील आत्महत्या करेल की काय असे वाटते."हवामानातील बदल" या गोंडस कारण खाली आजारी पडून सुट्टी घ्यायचे धंदे या काळात जोर धरतात.

         पहिले काही दिवस भरपूर पाऊस पडल्यावर पुण्यातील धरणांची पातळी,मुंबईच्या  रेल्वे ट्रॅकवर झालेला स्विमिंग टॅंक..ताम्हिणी  मधील कुठलाही एखादा फोटो "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे  चोहीकडे" या शीर्षकाखाली छापलेला, पुणेकरांची अवेळी पावसाने उडालेली धांदल या सगळ्या रुटीन गोष्टी वर्तमानपत्र  वाले कधीच मिस करत नाहीत आणि मी देखील...  

         आषाढी एकादशीची सुट्टी आणि शाळेतील गुरुपौर्णिमा या दोन गोष्टी शालेय वर्षातील प्रवासाचा पहिला मैलाचा दगड ठरतो.कॉलेजेस नुकतीच सुरु झालेली असतात त्यामुळे "सध्या लेक्चर्स नसतातच..फक्त प्रॅक्टिकल होतात" अशी टिपिकल वाक्य कानावर पडतात.

         पेपर मधील फोटो आणि वर्षासहल यासारख्या गोष्टींचा इतका प्रभाव आमच्यावर पडतो की...नागपंचमी ला सुट्टी मिळाली नाही याचे दुख विसरता विसरता १५ ऑगस्ट ला भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षा १३-१४-१५ किव्वा १५-१६-१७ अश्या जोडून आलेल्या सुट्टीमुळे आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद आम्हाला जास्त होतो..आणि ऑगस्ट सुरु व्हायच्या आधीच कनेक्टिंग हॉलिडेज चे प्लॅन ठरवले जातात.

        शाळेतील मुलांचे मात्र वेगळेच असते...पहाटे उठून शाळेचा धुतलेला आणि इस्त्री केलेला युनिफोर्म घालून प्रत्येक चौकात लावलेली देशभक्तीपर गाणी ऐकत शाळेत जाणे...झेंडावंदन करून घरी येणे यात  काडीमात्र बदल नसतो...पण शाळेतून लवकर घरी येणे क्रमप्राप्त असते कारण चाचणी परीक्षा दुसर्या दिवसावर आलेली असते...वर्षातील पहिलीच परीक्षा असल्याने सिरीयसनेस जास्त असावा कदाचित.

        शाळेचे दिवस दुर्दैवाने संपले...त्यामुळे सकाळी राखी बांधायला बहिणीकडे जाऊन तिथेच जेवायचे दिवस पण संपले..पण आता सकाळच्या ऐवजी रात्री एवढाच फक्त काय तो बदल झाला बाकी सर्व तेच...आणि हो "आपकी फरमाईश " या विविध भारती च्या कार्यक्रमात "फुलोसा तारोसा " हे गण देखील तसेच..बदलला तो फक्त रेडीओ..

        शाळेतली पालखी,शाळेतली दहीहंडी या गोष्टी संपल्या पण दहीहंडी मनोरा,आणि दिवेघाटातील पालखी...या दोन गोष्टींचे वर्तमान पत्रातील फोटो तितकाच आनंद देऊन जातात...लग्नाचा season नुकताच चालू झालेला असतो.त्यामुळे हॉल मधल्या फोन शेजारी २/३ लग्न पत्रिका हमखास पडलेल्या असतात.

       ऑगस्ट पण संपत आलेला असतो..आधी फक्त संध्याकाळी पडणारा पाऊस आता सकाळी आणि मध्यरात्री देखील पडायला सुरुवात झालेली असते..पण पावसाचा जोर पहिल्यासारखा नसतो...पावसाचीही सवय होते..आणि पाकीट रुमाल या गोष्टींप्रमाणे रेनकोट ,छत्री देखील बरोबर घेतली जाते.याच सुमारास श्रावणाला सुरुवात होते...शाळेतील मुले "श्रावण" माझा आवडता महिना .यावर  निबंध लिहितात..मात्र खरच श्रावण का आवडतो याचे प्रत्यंतर मला आत्ता पर्यंत आलेले आहेच. 

       ऑगस्ट संपण्याची सुरुवातच मुळात दहीहंडीच्या होर्डींग्स ने होते ..ऑफिस मधून घरी येताना प्रत्येक सिग्नलवर किमान २  होर्डींग्स तरी हमखास दिसतात..आणि समजा तुमचे ऑफिस लकडी पुलाच्या पलीकडले असेल तर त्या दोनाचे ४ व्हायला वेळ लागत नाही..बक्षिसांची रक्कम हंडीच्या उंचीला 'directly proportionate '   असते...आणि होर्डिंग च्या देखील...

      आई बाबा ठाण्यात ( मुंबई ) मध्ये चाललेली दहीहंडी  टीव्हीवर बघतात...आणि आम्ही बाहेरच्या पाहतो..उंच दहीहंड्या कधीच ठरवलेल्या उंचीवर फुटत नाहीत...दरवर्षी त्या खाली घेऊन फोडण्यात येतात...दर  वर्षी एखाद्या वयस्कर माणसाचा हंडी पाहताना हार्ट अटॅक  येऊन मृत्यू होतो..आणि एखाद्या तरुणाचा मनोर्यावरून पडून...आकडे फक्त कमी जास्त होतात पण फोटोसकट तीच बातमी आम्ही पेपर मध्ये वाचतो...

      दहीहंडी संपल्यावर पण होर्डींग आठवडाभर तशीच असतात...आणि ती लटकविलेला दोरखंड पण..एव्हाना गरवारेचा चौक,म्हात्रे पूल,नदीकाठचा रोड या  ठिकाणी येणारे ढोल ताशांचे आवाज तीव्र झालेले असतात...कारण प्रॅक्टिस अंतिम टप्प्यात आलेली असते..वाजवणारे लोक दिसतच नाहीत..फक्त पहायला आलेल्या लोकांची गर्दी आणि ठेकेबद्ध आवाज...पुण्याचे गणपती जवळ आलेले असतात...
      आता गणपतीची चाहूल पेपरवाल्यांना आधीच लागते ...कारण गणपती च्या आकर्षक आणि सुबक मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचा फोटो पेपर मध्ये आलेला असतो...

      शाळेच्या चाचणी परीक्षा झालेल्या असतात ..मुलांना गणपतीचे वेध लागलेले असतात...कॉलोनी मधील उत्साही कार्यकर्ते नियमित भेटणे चालू करतात..मंडळांचे वार्षिक अहवाल पुन्हा प्रिंट केले जातात.
भर रस्त्यात मांडवासाठी खड्डे खणले जातात...त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते...काही दिवसांनी त्यामध्ये खांब उभारले जातात आणि रिकाम्या मांडवाखाली सोयीस्कररित्या रिक्षा आणि आपली वाहने पार्क केलेली दिसतात... जसे गणपती जवळ येतात तसे त्या खांबांवर पत्रे टाकून  मांडव पूर्ण होतो...आणि कार्यकर्ते देखाव्यासाठी तयारी ला लागतात...आत्ता पर्यंत साध्या ट्यूब्स आणि बल्ब लावलेली जनरल स्टोअर आता गणपतीचे  डेकोरेशन साहित्याने लखलखीत होतात..."आमच्या येथे पेणचे सर्वांग सुंदर श्रींच्या मूर्ती मिळतील" हे बोर्ड्स दिसू लागतात.

      गणपतीचे १० दिवस घरी गणपती नसताना देखील किती भारी जाऊ शकतात हे जाणून घ्यायचे असेल तर हे वर लिहिलेल्या व्यक्तीलाच विचारा. ११ व्या दिवशी विसर्जन मिरवणूक होते..आणि ३/४ दिवस आधी पाहिलेले मांडव रिकामे रिकामे आणि भकास वाटू लागतात...आताही  त्या मांडवात रिक्षाच उभ्या असतात...आणि पेपर मध्ये मांडवामुळे वाहतुकीला कसा अडथळा होतो याचे फोटोसहित वर्णन आलेले असते..

      शाळा पूर्ववत चालू होतात...चाचणी परीक्षांचे पेपर्स मिळालेले असतात..ऑफिसेस सुद्धा पूर्ववत होतात..घरचे डेकोरेशन साहित्य माळ्यावर गेलेले असते...लक्ष्मीरोड वर गुलालाचा थर दिसत असतो...आणि रस्त्याच्या कडेला तुटलेल्या चपला पडलेल्या असतात....लकडी पुलावरून पाण्यात तरंगत असलेले निर्माल्य दिसत असते..

      श्रावण तर संपलाच..पण भाद्रपद पण संपत आलेला असतो आणि सप्टेंबर पण...पाऊस पूर्णपणे ओसरलेला असतो...रोज ३ वेळा पडणारा पाऊस आता ३  दिवसातून एकदा पडत असतो...

      शाळा, कॉलेज आणि ऑफिसेस व्यवस्थित सुरु असतात..पुढच्या सुट्टीची वाट बघत....आणि बोगद्यातून पलीकडचा उजेड दिसावा त्याप्रमाणे कॅलेंडर वर दसरा डोकावत असतो...

हृषिकेश पांडकर

Saturday, August 13, 2011

पराभवाच्या निमित्ताने...



" मावळत्या दिनकरा...अर्घ्य जोडूनी तुझं दोन्ही करा... "
या ओळीचा विसर पडलाय आमच्या लोकांना....
इथे आता फक्त उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते...
त्यामुळे..जिंकला असेल तुम्ही World Cup...पण तो आता भूतकाळ झालाय....

                क्रिकेट आमच्या रक्तात आहे..आमचा दिवस क्रिकेट ने चालू होतो आणि त्यानेच संपतो...
पानाच्या टपरी पासून कॉर्पोरेट ऑफिसच्या cubical पर्यंत सगळी कडे आम्हाला २२  यार्डाची खेळपट्टीच दिसते..
घरच्यांना आलेल्या खोकल्यापेक्षा सचिन ला झालेला खोकला आम्हाला लवकर कळतो....
प्रत्येक धाव, प्रत्येक ball , प्रत्येक wicket प्रत्येक विजय, प्रत्येक पराभवाची नोंद facebook,twitter,
ओर्कुट, G+ या ठिकाणी आम्ही स्वतंत्र्यरित्या ठेवतो...

                मला अजूनही स्पष्ट आठवतंय..
४ महिन्या पूर्वीचीच गोष्ट आहे...याच ११ लोकांसाठी सबंध भारत रस्त्यावर उतरला होता...फोटोला
पाया पडण्यापासून चेहेर्यावर मुखवटा घालण्या पर्यंत सगळे सोपस्कार पार पडले होते...
सचिन च्या शतकानंतर मोबाईलचा फुल झालेला inbox मी कित्येकदा अनुभवला आहे...ponting नी
घेतलेला एक टप्पा कॅच कोट्यावधी लोकांच्या शिव्या कॅच करून गेला...

                आम्हाला फक्त विजय हवा...आम्हाला पराभव खपत नाही...आणि आम्ही तो खपवून पण घेणार नाही....
हे आमच्या संघाचे ब्रीदवाक्य नाही...हा आमचा क्रिकेट पाहतानाचा दृष्टीकोन आहे...
आणि त्यात म्हणजे आमची टीम नंबर वन आहे...आता नंबर वन टीम हरणे म्हणजे आमच्या सारख्यांनी कोणाकडे
बघायचे ...तुम्ही काहीही करा...मरा तिकडे...पण विजय आपलाच झाला पाहिजे...पैसे मिळतात त्याचे तुम्हाला...
आणि समजा तुम्ही हरलात तर..
आम्ही तुमची घरे फोडणार...आम्ही तुमचे पोस्टर जाळणार..आम्ही social networking साईटस वर तुम्हाला शिव्या
घालणार....एवढा मात्र प्लीज सहन करा...म्हणजे काही पर्याय नाहीये तुम्हाला...

                सरडा देखील इतके रंग बदलू शकणार नाही तितक्या झटपट आम्ही आमचे टीम विषयीचे मत बदलतो...
सेहवागच्या शतकाचे कौतुक आम्ही पुढच्या शून्याने सहज झाकतो...
माणसे असलात म्हणून काय झाला...भारताचे प्रतिनिधित्व करताय..विजय हा हवाच...
४ महिन्यापूर्वी जिंकलेल्या World Cup चा विसर आम्हाला ४ महिन्यानंतरच्या २ टेस्टच्या पराभवाने पडतो...
२ टेस्ट  मध्ये हरल्यावर...हि कसली नंबर वन टीम असे म्हणण्यासाठी आम्ही सहज तयार असतो...कारण क्रिकेट
आमच्या रक्तात आहे...
रैनाच्या हूक शॉट च्या सिक्सवर नाचलेले सगळे...आता त्याला शोर्ट ball खेळता येत नाहीत असे म्हणून मोकळे होतात..
                ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला मात दिल्यावर...आता इंग्लंड कडून हरल्यावर ..भारतात शेर..परदेशात ढेर असा
म्हणायला आमची जीभ चाचरत नाही...कारण क्रिकेट आमच्या रक्तात आहे...
आमच्या  इथे ४ महिन्यापूर्वी mature असलेला सचिन..४ महिन्यानंतर immature होतो ...कारण ऑफ स्टंप च्या बाहेरचा साधा ball  त्याला सोडता येत नाही असे आमच्या जाणकार प्रेक्षकांना वाटते.
World  Cupच्या  matches साठी शाळा, कॉलेजेस,  ऑफिसेस ला सुट्टी टाकून घरी match बघणारे ...आता आमचा क्रिकेट
मधील रस कमी होत चालला आहे...हे जाहीर करून मोकळे होतात....कारण आम्ही पराभव पचवू शकत नाही...
 " काय तुमचा द्रविड, काय तुमचा सेहवाग, काय तुमचा लक्ष्मण...२०० रन्स पण करू शकत नाहीत इतके साधे सोपे आणि सरळ मत नोंदविणाऱ्या लोकांसाठी मी माझ्या हृदयात एक वेगळी जागा तयार केली आहे...
पण सध्या अशी लोक इतकी झालीयेत कि portable हृदय घ्यावं लागेल  कि काय असा वाटायला लागलंय...
स्कोअर काय झाला..असे फोन करून विचारणारे..."अरे काय हरणाऱ्या matches बघता" असे येत जाता सांगायला लागले आहेत..
आणि वर म्हणतात कि काही होऊ शकणार नाही आपल्या टीमचे..हसावे कि रडावे काहीच कळत नाही..
पाकिस्तान विरुद्धची World Cup match पाहताना जिंकावे म्हणून देव पाण्यात ठेवणाऱ्या आजी आज Edjbaston ची
match चालू असताना आपल्या टीमलाच पाण्यात पाहतात.

                " Captain Cool " असणारा आमचा धोनी..साधे Decision पण घेता येत नाहीत म्हणून शिव्या खातो...इतके दिवस धोनीची batting कशी आहे याचा विसर पडलेली तज्ञ मंडळी आज हरलो म्हणून ...batting जमत नाही  म्हणून तोंडसुख घ्यायला मोकळे झाले आहेत.." Batting जमत नसेल तर टीम मध्ये जागा अवघड आहे " हे विधानच खूप बोलके आहे.
इंग्लंड चे लोक सहज रन्स करतात आणि आपल्या लोकांना इतके साधे जमू नये ....???
या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही...कदाचित ते म्हणतात ते बरोबर असेल देखील...पण रन्स करणे हे "इतके साधे " असू शकते का ?
मी प्रतिप्रश्न केला कि आमच्या लोकांनी World  Cup उचलला...इंग्लंड ला एवढे साधे जमू नये ???
२ Match मधल्या पराभवामुळे ४ match ची सिरीज " सहज whitewash " असे भाकीत करणाऱ्या भारतीय चाह्त्यांच्ये टीम ला असलेल्या पाठिंब्याचे आणि विश्वासाचे करावे तेवढे कौतुक कमीच....
परवा एका ठिकाणी वाचले...."भारतीय विजयाचा अश्वमेध इंग्लंड ने रोखला.."...अहो रोखला ???
पळायला सुरुवात तरी करू द्या की...
                ...स्वतः हातात bat देखील न घेतलेली मुल म्हणतात...भारतात जिंकणे ठीक आहे पण भारता बाहेर जिंकून दाखवा ...यांना reply देणे किव्वा या वाक्याला reaction देणे देखील मला अवघड झाले आहे..
" असतील शिते तर जमतील भुते " इथपर्यंत ठीक होता...पण हल्लीच्या भूतांना रोज नवीन खायला पाहिजे...नुसतं शितांनी काम होत नाही असा दिसतंय एकूण ..आणि आधी खाल्लेल्याची कदर पण राहिली नाहीये...
न्यूज Channel वाल्यांची headings बघूनच आश्चर्य वाटते...
"क्या यही ही हमारे World Champions ???"
हा हा हा ...अहो मग World Cup जिंकला तेव्हा यांचेच फोटो दाखवले होते तुम्ही ..का लक्षात नाही का ??
नाही तसं यात त्यांची चूक काहीच नाहीये म्हणा, कारण पाहणारे करोडो लोक विसरू शकतात तर ते बिचारे १० x १० च्या खोकड्यात बसणारे कसे लक्षात ठेवतील ?
                IPL मध्ये jersy विकत आणून आपल्या टीमला support करणारे...IPL मुले injury झाल्या हे स्टेटमेंट आत्ता देतात हे ऐकून फार बरे वाटते...जेव्हा हरतो तेव्हाच कशी injury दिसते काही कल्पना नाही..पण दिल्लीच्या  IPL match ला सेहवाग injured झाला हे Loards वर मुकुंद ओपनिंग ला आल्यावर लोकांना समजले याचे आश्चर्य जास्त...आणि injury नंतर फक्त एक practise match खेळून टेस्ट खेळायला आलेला सेहवाग जेव्हा ० वर आउट झाला तेव्हा ..." हेच करायला इंग्लंड ला गेला होता का ? ..हेच करायचे होते तर त्यासाठी इतके लांब जायची गरजच नव्हती " असे म्हणून मोकळे होणारे लोक आज माझ्या अवतीभोवती आहेत...
...या टेस्ट मध्ये आपला काही खरं नाही आता ..असे पहिल्या दिवशी लंचच्या आधी..१ आउट ८० असताना { आपला (भारताचा ) } म्हणणारी लोक आहेत...हा हा...अहो एवढी दूरदृष्टी जर असेल तर टेस्ट ५  दिवसाची खेळायची काहीच गरजच नाही असे माझे खूप वय्याक्तिक मत आहे.

प्रश्न Support करणे अथवा न करणे याचा अजिबात नाहीये...पण आपले मत मांडताना थोडा प्राथमिक विचार केला तर जास्त उचित होईल असे माझे मत आहे..
पण खरय ..अश्या लोकांच्या सहवासात राहून विजय मिळवणे...आणि पराभव पचवणे म्हणजे काय असते हे फक्त ते ११ खेळाडूच अनुभवत असतील जे मैदानावर खेळतात...
कारण ते अश्या टीम कडून खेळत असतात की जिथे राहणाऱ्या लोकांचे प्रेम आणि द्वेष या मध्ये फक्त एक विजय किव्वा
  पराजय याची बारीक रेघ असते....आणि दोन्ही साठी त्यांना घरच मिळते...जिंकलो तर नवीन ..नाहीतर फोडलेले...

"Yea, I was in good touch today, I was knocking the ball very well, Ball was coming on to the bat nicely,
Wicket was playing good, Viru supported well too...Zak and Bhajji bowled well...MSD took 2/3 sharp n
hard decisions...n outcome is here for us...we managed to win the game......"

Presentation मधील सचिन चे बोल....

पण यानंतर तो जे म्हणाला...की 

" And the most important thing is ...The thousands of people supporting back in India...their good
wishesh and prayers paid off ...Thanks for your support..Hoping for the same support in future...Thank you"

वरच्या ४ वाक्यांनी आपल्याला फरक नसेल पडणार कदाचित ..पण शेवटच्या वाक्याचा एकदातरी विचार
व्हायला काहीच हरकत नाहीये.... कारण क्रिकेट आपल्या रक्तात आहे...

                                                      -   हृषीकेश पांडकर
                                                            १२-०८-२०११

Tuesday, May 10, 2011

पुणे टाईम (मशीन)


अजूनही एखाद्या मंगल कार्याचे यश तेथे असलेल्या जेवणाच्या चवीवर ठरते असे ज्यांचे ठाम मत आहे त्यांच्यासाठी .... 

         " उद्या पासून सकाळी पळायला जायचे "...हे वाक्य आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणणे जेवढे अवघड असते त्यापेक्षा कित्त्येक पटींनी त्याच रात्री म्हणणे अवघड असते....आणि दुसर्या दिवशी सकाळी ते आचरणात आणणे तर त्यापेक्षाही.... 

         पण नवीन वर्षाची  सुरुवात  आणि वाढते पोट अशा दोन्ही गोष्टींची सोबत लाभल्याने पहाटे उठणे तितके अवघड गेले नाही... मे  महिन्याचा उन्हाळा असला तरीही सकाळी ५  ला थंड पाण्यात हात घालणे जीवावरच येते.....आज तर जानेवारी आहे...पण इलाज नाही....पोट बेसिनला टेकतय....
मोठ्या
  कष्टाने आवरून घराबाहेर पडलो..दशभुजा मंदिरापर्यंत तरी जाऊन येऊ असा धाडसी निर्णय घेऊन पळायला सुरुवात केली...मंदिराजवळ  पोहोचलो...छातीचा भाता झाला होता...अजून नीटसे उजाडले देखील नव्हते..तिथेच २ मिनिटे बाकावर बसलो आणि परतायला निघालो....तेवढ्यात मंदिराच्या मुख्य दारातून खाली उतरणारा एक जिना मला दिसला आणि कुतूहलापोटी मी त्या जिन्यावरून खाली उतरून गेलो.


           १० /१२  पायर्या उतरल्यावर असे लक्षात आले कि मागे कुठलाच जिना नव्हता....मागे फक्त अंधार होता....छातीचा भाता देखील आता शांत झाला होता....थोडे चालत पुढे आलो....आता अजिबात थकवा जाणवत नव्हता....हाताची घडी घालून चालावे इतपत थंडी जाणवत होती..तसा शुकशुकाटच पण...बम्बातून येणारा धूर आणि विस्तवाचा धगधग आवाज शांततेचा भंग करत होता....धुक आणि धूर यातील फरक फक्त वासानी जाणवण्याइतपतच  होता...काकड आरती आटपून येणारे लोक शांतपणे परतत होते...लांबून येणारा स्त्रोत्र पठणाचा अस्पष्ट  आवाज चालताना साथ देत होता....पूर्वेला नुकतंच सरलेल धुकं दिवस सुरु झाल्याचे संकेत देत होत....घराभोवती पळणाऱ्या कोंबड्यांचा आवाज आणि हो फक्त कोंबड्याच नाही तर  एका कोंबडीमागे पळणाऱ्या ३/४ पिल्लांचा  पण.....घराच्या सज्जा मध्ये झोपलेले लोक उठून अंथरुणाच्या  घड्या घालताना दिसत होते..काल रात्री लावलेला मारुतीच्या मंदिरातील तेलाचा दिवा विझत आला होता...अगदीच एखाद्या घराच्या खिडकीतून स्वयंपाक  घरात पेटलेली चूल फक्त दिसत होती...दिसत होती कसली .....विस्तवामुळे ती चुलच असावी असा अंदाज....ओसरीला टेकवून उभी केलेली सायकल टायर ट्यूब ने ओसरीच्या खांबाला बांधून ठेवली होती.

            आता बरचसं उजाडलं आहे...समोर पर्वतीवरचे मंदिर आता स्पष्ट दिसत आहे....घरातून मुलांचे श्लोक  म्हणण्याचे लयबद्ध आवाज....नुसत्या आवाजावरून असे वाटावे कि....एक छोटा मुलगा ज्याची नुकतीच मुंज झाली आहे....आणि फक्त एक छोटी शेंडी डोक्यावर आहे...धोतर घातले आहे..आणि देवापुढे मांडी घालून हाताने जानव्याशी खेळत लयबद्ध एखादा गीतेचा अध्याय म्हणतोय...पक्ष्यांची किलबिल थोडी तीव्र झाली आहे ..अगदी चटका नाही..पण अंगावर आल्यावर बरे वाटावे इतपत उन आलेले...मुलांची शाळेत जायची धावपळ...खाकी हाफ चड्डी ,खाकी टोपी,पांढरा सदरा आणि हातात पुस्तक किव्वा कापडी पिशवी..मधूनच शेजारून धूळ उडवत जाणारा टांगा..रस्त्यांना पण जरा जाग आलीये..थोडे पुढे गेल्यावर दिसणाऱ्या घाटावर कपडे धुण्यासाठी जमलेल्या स्त्रिया..आणि आपल्यालाही  पुढे असेच  करायचे आहे  या जाणीवेने आलेल्या  काही लहान मुली...बंबाचा आवाज शमलेला पण धुराचा ओघ तसाच..घराबाहेरील  कट्ट्यावर  मुलीची वेणी  घालत बसलेली आजी..घरातील ओसरीमध्ये असलेल्या लाकडी खांबाला लटकवलेली टोपी..आणि त्याच लाकडी खांबा खाली ठेवलेला तांब्याचा गडू आणि फुलपात्र.. त्याच्या समोरील खांबाला लाटकविलेला कंदील ज्याची काच धुराने काळी ठिक्कर झाली आहे.....शेजारी असलेली रिकामी आराम खुर्ची आणि त्याच्या बाजूला ठेवलेली तपकिरीची आणि पानाची डबी... 

               थोडा पुढे गेल्यावर....सायकल वरून जाणारे गृहस्थ नजरेस पडले....काळी टोपी,शुभ्र पांढरे धोतर...आणि काळा कोट...खांद्याला शबनम...बहुदा मास्तर असावेत..काही मंडळी उन्हाकडे पाठ करून शेकत बसलीयेत गप्पा मारत..मगाशी दिसत असलेली ओसरी आता नवीन शेणानी सारविणे चालू आहे...आणि सारवताना जास्तीचे शेण खाली पडत आहे...त्याच्याच शेजारच्या घरातून घाईने येणारे एक गृहस्थ...हातात ८ आकाराची काठी..डोक्यावर पगडी,काळा कोट..वहाणा म्हणतात तश्या काहीश्या चप्पला...हातात अर्धवट घेतलेली पिशवी..संपूर्ण डोळेदेखील झाकले गेले नसावे इतका पुढे आलेला काळ्या आणि जाड  काड्यांचा मोठा चष्मा ज्याची दोरी दोन्ही कानाच्या मागे गेलेली...कानावरील केस आणि हातावरील केस यांची घनता साधारण सारखीच.... भरभर घराबाहेर येऊन आपल्या सायकल वर बसून क्षणार्धात डोळ्याआड...बहुतेक खालच्या आळीतील वैद्याकडे हिशोबनीसाचे काम करीत असावेत..थोडा पुढे गेलो तर जरा मोठ्या ठिकाणी आलो बहुदा हा चौक असावा..एका बाजूला ५/६ गायी बेमालूम  पणे  रस्त्यात बसल्या आहेत..चौकातील सायकल चे दुकान नुकतेच उघडले असावे कारण जवळून जाताना उदबत्तीचा वास आणि नुकतेच दुकानाबाहेर पाणी शिम्पडल्याचा वास येतोय...सकाळची वेळ असूनही आणि दुकानात असूनही दुकानदार बनियन वरच बसला आहे..आणि हाताखालचा पोर्या आदल्या दिवशी दुरुस्त न झालेल्या सायकल बाहेर आणून ठेवताना दिसतोय...

             तिथून थोडा पुढे आलो..आणि लाल महाल नजरेस पडला..कोणताही पुतळा नव्हता त्यामध्ये..कोणतेही चौथरे बांधलेले नव्हते..फक्त एक रम्य वास्तू होती..ज्याच्या भिंतीवर कोणाचेही नाव नव्हते..ज्याच्या बाहेर शेजारी रहाणार्यांनी सडा शिंपडला होता आणि पायरी वर  दिवे लावले होते...तसाच पुढे आलो...थेट शनिवार वाड्याच्या बुरुजाच्या सावलीत उभा राहिलो...बुरुजाच्या बाजूला गवत उगवले होते आणि गवतावर दवाचे थेंब...त्या दवामुळे पाय ओले होत होते...स्वच्छ    रस्ता होता मातीचा....पेशव्यांच्या गणपती मंदिरात नुकतीच आरती झाल्याचे संकेत मिळत होते..ब्राह्मण सर्व आवरून निघायच्या तयारीत होता...उन्ह डोळ्यावर आली होती..

              तसाच पुढे गेलो..आणि मगाशी दिसणारी नदी पुढ्यात येऊन ठेपली...समोर नदी आणि पाठीमागे शनिवारवाड्याचे भव्य प्रवेशद्वार.....दोन्ही गोष्टी थेट दिसत होत्या ....मगाशी नदीवर जितकी गर्दी होती तेवढी मात्र आता नव्हती....फक्त काही म्हशी डुंबत होत्या...काही ४/५  लोक अंघोळ करत होते..नदीचे पत्र इतके विशाल होते कि मंदिरातून येणाऱ्या पायर्या थेट नदीत जात होत्या...तसाच पुढे आलो..समोर एकाच ओळीत ७/८ टांगे उभे होते..अगदी बग्गी होती अशातला भाग नाही पण ३ लोक व्यवस्थित बसतील अशी व्यवस्था असावी. इथे थोडी गर्दी जाणवत होती..कारण एकाच दृष्ट्क्षेपात ६/७ लोक सहज दिसत होती...शेंगदाणे आणि गुडदाणी विकणाऱ्या काही आज्जी रस्ताच्या कडेला बसल्या होत्या...तसाच पुढे आलो..समोर काही लोक रस्त्यावर बसून केस कापून घेत होते..२ मिनिटे तिथे उभा राहिलो..आणि पुढे सरकलो..सूर्य माथ्यावर आला होता..रस्ते देखील मोकळे जाणवत होते..वर्दळ कमी झाली होती..कुत्री झाडाच्या सावलीत बसली होती..मधूनच एखादा टांगा गेला कि उगीच उठून घोड्यांवर भुंकायचा बिचारा  प्रयत्न करीत होती...आणि पुन्हा येऊन बसत होती.टांग्यामुळे उडालेली धूळ हळू हळू बसत होती..आणि मी पुढे सरकत होतो..जरावेळाने पुढे आलो आणि एका रस्त्याच्या दुतर्फा दुकाने दिसू लागली...

             चांभार, सोनार ,विविध नक्षीच्या टोप्या, लहान मुलांच्या खाकीच्या चड्ड्या,खेळण्याची दुकाने ज्यांच्या बाहेर लाकडी बैलगाड्या,भोवरे,पतंग,आसारी टांगून ठेवलेल्या... कदाचित शाळेची वेळ असावी म्हणून गर्दी नव्हती तिथे...मात्र बाकीच्या ठिकाणी लगबग दिसत होती..तिथून ते पहात पहात पुढे आलो...पुढे रस्तावर मुले गटागटाने चालत होती..बहुदा शाळा सुटल्या असाव्यात..मुलांच्या हातातील चिंचा पहिल्या आणि आपल्याला देखील पोट आहे याची अचानक जाणीव झाली.समोर असलेल्या देवळात गेलो आणि थंड पाणी घेऊन बाहेर पडलो.थोडे चालत गेल्यावर रस्ताच्या कोपर्यावर एका मोठ्या कढईत जिलेबी तळणारा तो अजस्त्र देह माझ्या नजरेतून सुटला नाही....३ विटांवर ठेवलेली कळकट्ट कढई...करवंटीला भोक पाडून त्यातून चक्राकृती येणारे ते पीठ आणि तळल्यावर काढून ठेवण्यासाठी असलेली ती परात या गोष्टी डोळ्यात साठवून मी तिथून निघालो...जेवणाची वेळ टाळून गेली होती...डावीकडे वळल्यामुळे किमान सूर्य डोळ्यावर तरी येत नव्हता..आणि सावल्या लांब होत होत्या..तसाच पुढे चालत होतो..उजवीकडे मान वर करून पहिले कि पर्वती वरचे मंदिर दिसत होते..आणि मान थोडी खाली केली कि वर्तक मंगल कार्यालय,दामले वाडा, सहस्रबुद्धे वाडा, वैद्य कोटणीस... अशा पांढऱ्या रंगाने हाताने लिहिलेल्या पाट्या वाचत मी चालत होतो...सर्व व्यवहार नियमित आणि सुरळीत चालले होते.कुठेही घाई किवा गर्दी नव्हती...थोडे चालल्यावर डाव्या बाजूला एक मोठा वाडा नजरेसमोर आला...दरवाजा सताड उघडाच होता...रस्त्यावरून थेट तुळशी वृंदावन आणि आतील गोठा स्पष्ट दिसत होता...विश्रामबाग वाडा असावा...बाहेर स्वच्छ पांढरे कपडे घातलेले मुनीम बसले होते.."कोण हवंय ??? उगीच रस्त्यात थांबून यायची जायची वाट अडवू नका....कामाचा असेल तर बोला" असा नाकातून काढल्यासारखा आवाज ऐकल्याचा भास झाला आणी मी काढता पाय घेतला... सकाळी घाई घाईत निघालेले सायकलस्वार आता मात्र संथ गतीने घराकडे सायकल मारताना दिसत होते.सावल्या धूसर होत होत्या आणि नाहीश्या झाल्या...मी तसाच चालत होतो..उन्हाचा चटका संपून त्याची  जागा थंड वारा घेत होता....चालण्यात सुसह्यपणा जाणवत होता..

             पर्वतीला वळसा घालून थोडे पुढे गेलो आणि अतिशय रम्य दृश्य नजरेसमोर आले...समोर छोटेसे तळे होते आणि त्याच्या मध्यभागी चौथरा होता ज्यावर गणपतीची मूर्ती होती...आजूबाजूला झाडी होती आणि तळ्यापर्यंत जाण्यासाठी पायवाट होती...तिथूनच नमस्कार केला आणि माघारी आलो..सूर्य अस्ताला जात होता..आणि मी पुन्हा हाताची घडी घालून चालू लागलो.सकाळी एका घरात लटकविलेला कंदील पाहिला होता...आता देखील कंदिलच बघत होतो पण या वेळी तो पेटविलेला होता...रस्त्यावर शांतता होती..एखादी सायकल,एखादा टांगा आणि गुरांना पुन्हा गोठ्यात नेणारा गुराखी यांसारखे काही मधून मधून डोळ्यासमोर येत होते.साधारण सूर्यास्त झाला होता ..अंगणात असलेले तुळशीवृंदावन ओले झालेले दिसत होते..बहुदा तिन्हीसांजेची पूजा नुकतीच झालेली असावी...थोडे पुढे गेलो आणि शुभंकरोती चे अस्पष्ट बोल कानावर पडले...थोडा पुढे जातो तोच पावकी आणि निमकी म्हणल्याचा आवाज स्पष्ट येऊ लागला...मिट्ट काळोख झाला होता...फक्त अंधुकसे कंदील आणि एखाद्या घरातील चुलीचा धूर या खेरीज प्रकाश दाखवणारा कोणीच नव्हतं....असेच थोडे पुढे चालून गेलो  आता गोठ्यातल्या गायी देखील स्तब्ध होत्या..घोड्यांना टांग्यापासून मुक्त बांधले होते...कोंबड्या नाहीश्या झाल्या होत्या...मारुतीच्या देवळातील दिवा तेवढा तेवत होता ..बाकी सर्व अंधार....

                     समोरचे काहीही दिसत नव्हते ..मागे वळून पहिले पण मागेही तसेच....तसाच सरळ चालत गेलो आणि समोर पायऱ्या दिसत होत्या..त्या चढून वर आलो तर ..समोर भरपूर दिवे चमकत होते..खूप गर्दी होती.सिग्नल्स चालू होते..होर्न चे आवाज येत होते ...पोलीस होते...एकदम खाडकन कानाखाली बसावी तसे झाले आणि लक्ख प्रकाश पडला कि आपण खंडोजीबाबा चौकात आलो आहोत...एक रस्ता अलका थियेटर कडे जातो ...एक रस्ता वैशाली कडे जातो...आणि एक रस्ता आपल्या घराकडे...

                            ...आता चालण्याचे त्राण नव्हते..आणि रस्तेही मातीचे नव्हते…..




                                   
                                                                                                     -  हृषिकेश पांडकर