Saturday, September 5, 2020

शिक्षक दिन

 भोवतालच्या व्यक्ती,निसर्ग,प्राणी,पक्षी,वस्तू आणि प्रसंग या सर्वांकडून नेहमीच शिकलो,शिकतोय आणि यापुढे देखील शिकेन या सर्वांचा कायमच ऋणी आहेच... पण..

एकदा करून बघुयात असे वाटून खटपट करणाऱ्या माझ्या स्वतः मध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन...

सगळं काही 'स्पून फीड' होणार नाही असे सांगितल्यावर मेहनत घेण्याची इच्छा दाखवणाऱ्या माझ्या स्वतः मध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन...

'घोड्याला तळ्याच्या काठापर्यंत नेता येते पाणी पिण्याचे काम त्याला स्वतःलाच करावे लागते' तर प्रत्येक वेळी हे पाणी पिण्याचे काम करण्याची तयारी दाखवणाऱ्या माझ्या स्वतः मध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन..

अनुभव हाच खरा गुरू असतो असे मानले तर प्रत्येक वेळी स्वानुभवातून अनंत गोष्टी शिकविणाऱ्या माझ्या स्वतः मध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन..

'या गोष्टी शिकवून येत नसतात त्या स्वतःलाच शिकाव्या लागतात' या सदरात मोडणाऱ्या गोष्टी अव्याहतपणे शिकविणाऱ्या माझ्या स्वतः मध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन..

अंगभूत कला जिद्द,चिकाटी आणि मेहनतीने स्वबळावर जोपासण्यास नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या स्वतः मध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन..

श्वासोच्छ्वास, तहान-भुक,थंडी,उकाडा तसेच सात रस या आणि अशा अनंत जाणीवा वेळोवेळी नव्या रुपात शिकवणाऱ्या माझ्या स्वतःमध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन..

आणि हो..

कोणीही मागे धरले नसताना मधल्या दांड्याच्या खालून पाय मारत खऱ्या अर्थाने सायकल शिकविणाऱ्या माझ्या स्वतःमध्ये दडलेल्या शिक्षकाला वंदन.. 🙂

शिक्षक दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा

हृषिकेश पांडकर

०५.०९.२०२०

 

No comments:

Post a Comment