Monday, May 28, 2018

एक प्रेमळ बाप

 रेकॉर्ड्स,ट्रॉफ़ीस,फिनिशर,कॅप्टन कुल किव्वा 'धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल' या आणि अश्या असंख्य क्रिकेटच्या सोनेरी क्षणांनी सुवर्णलंकीत असलेल्या एम एस बद्दल आदर आहेच यात तिळमात्र शंका नाही.पण काल झालेल्या आय पी एलच्या अंतिम सामन्यानंतर हा आदर अजूनच वाढला.किंबहुना आदर वाटावा कि अचंबा वाटावा असा तो प्रसंग होता.साठ दिवस चालू असलेल्या आणि जगातील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेल्या तुल्यबळ आणि मानाच्या स्पर्धेच्या विजेतेपदाचा करंडक सहज उचलून त्याच्या पुढच्या क्षणाला तो करंडक दुसऱ्याकडे सोपवून त्या जल्लोषातून बाहेर पडत आपल्या लाडक्या मुलीला आकाशात उडणारे फटाके आणि झिरमिळ्या दाखवणारा एम एस कुठल्या जगातला आहे हा प्रश्न मला राहून राहून वाटत होता.


 

त्याच्या क्रिकेट करियर बद्दल किव्वा त्याच्या आकडेवारीवर मी बोलत नाहीये.एक माणूस म्हणून पण इतका तटस्थ आणि प्रसिद्धी परामुख स्वभाव वयपरत्वे वाढत जातो का ? नक्कीच नाही.हि दैवी देणगी आहे कि कमावलेली स्थितप्रज्ञता देवचं जाणे.कारण दोघांमध्ये पत्त्यांमधील सात-आठ खेळत असताना सुद्धा जरी आपण जिंकलो तरी मिरवायची सवय आपल्याला असतेच.मग इतके मोठे बक्षीस मिरवायचे तर सोडाच पण कॅमेऱ्यासमोर उंचवायची तसदीही न घेता जो मनुष्य तो सोनेरी करंडक आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवून आकाशात उडणाऱ्या कागदी झिरमिळ्यांसोबत आपल्या तीन वर्षाच्या मुली सोबत रमतो त्याचे वर्णन कसे करावे ?

लाखो लोकांसमोर मिरवायची संधी धुडकारून त्या संपूर्ण कोलाहलाच्या पाठीमागे आपल्या चिमुरडी सोबत उभे राहून आणि पुढे सुरु असलेल्या त्या जल्लोषाची जराशीही फिकीर न करता या तीन वर्षाच्या ट्रॉफीला ते फटाक्यांनी गच्च भरलेले अरबी समुद्रावरचे आभाळ दाखवणारा एम एस क्षणभर का होईना निरपेक्ष साधू समान भासत होता.

विजयी कर्णधारापेक्षा काल एक प्रेमळ बाप म्हणून मुलीचे हास्य जपणारा एम एस वेगळाच आनंद देऊन गेला.काल चेन्नईने उचलेल्या कपापेक्षा हा क्षण जास्त स्मरणात राहिला एवढे मात्र नक्की.प्रसंग अगदी किरकोळ आहे पण अशाच लहान गोष्टी जास्त आनंद देतात यावर मी पुन्हा एकदा ठाम होत चाललो आहे.

हृषिकेश पांडकर

 

Friday, May 25, 2018

मेनू कार्ड

 आमच्याकडे काय पदार्थ मिळतात,ते कसे दिसतात आणि त्याची किंमत काय आहे, हे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित सांगणारे कलात्मक मेनू कार्ड जपान मध्ये फिरताना हमखास नजरेस पडणारे दृश्य.पदार्थ कसे दिसतात हे फोटोमधून न सांगता त्या पदार्थाची लाकडी अथवा रबरी प्रतिकृती बनवून दुकानाबाहेर लावणे हा मजेशीर भाग इथे बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतो.


 

अगदी ताट वाढून ठेवावे इतके स्पष्ट आणि भुरळ पाडणारी पदार्थांची सजावट माझ्यासारख्या खाण्याची फारशी आवड नसलेल्या माणसाला देखील तितक्याच ताकदीने आकर्षित करते हेच याचे यश आहे.व्यक्ती अगदी आत जाऊन ते पदार्थ मागेल आणि खाईल अशातला भाग नाही पण कुतूहलापोटी जवळ जाऊन नक्की पाहिलं हि शाश्वती आहे.फक्त खायचेच पदार्थ नाहीत तर वाईन,बियर आणि सॉफ्ट ड्रिंक्स या सारख्या पेयांचे देखील बनावट नमुने पद्धतशीर मांडलेले आढळून येतात.

भातुकलीच्या खेळात मांडलेल्या छोट्या भांड्यांप्रमाणे रचलेली आरास मला कायम लग्नात मांडलेल्या रुखवतासारखी भासत होती.त्यात ठेवलेले रंगीबेरंगी पदार्थ आणि शेजारी तिरकस उभ्या केलेल्या नाव आणि किमतीच्या पाट्या लांबूनच आकर्षित करतात.पट्ट्यांवर लिहिलेली सगळीच अक्षरे वाचता नाही आली तरी उभ्या पद्धतीने असलेली लिखाणाची शैली कायम लक्षात राहते.

शंकू आकाराचा मसाला डोसा किव्वा दोन फुटाचा पेपर डोसा याच्या दिसण्यावरून विकत घेण्याचा कल जास्त आहे. नाहीतर ताटभर मसाला डोसा सुद्धा त्याच चवीचा असतो की.. धूर येणारे आईस्क्रीम चाखणारे त्या धुरामुळेच त्याकडे आकर्षित होतात अगदी त्याच मानसिकतेला धरून हि जपानी मंडळी असे वैशिष्ट्यपूर्ण मेनूकार्ड बनवत असावेत.

असो,प्रत्यक्ष जेवणाला कितपत चव असेल याचा अनुभव घेता आला नाही पण बाहेर असलेले हे मेनू कार्ड मात्र डोळ्यांची भूक नक्कीच भागवून गेले.

 

Friday, May 18, 2018

एक भोजन समारंभ

 निसर्गाचे चक्र किती अजब आहे ना ? एक जण आपली तहान भागवतोय आणि एक जण आपला जठराग्नी विझवायला उभा आहे.आपण पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दुसऱ्याचा घास बनणार आहोत हे कदाचित त्याच्या ध्यानी मनी देखील नसावे.एखाद्याला पोटभर पाणी पिण्यास वेळ द्यावा आणि ते झाल्यावर त्याचाच जीव घ्यावा इतके निर्दयी हे निसर्गचक्र खरंच आहे का ?


 

नक्कीच नाही,कारण हीच तर अन्नसाखळीची मजा आहे.आज जर हे रानडुक्कर इथून निसटले तर त्या जंगली कुत्र्यांच्या पोटावर पाय येईल.त्यामुळे आपापल्या पद्धतीने या साखळीतील कड्यांची भूमिका बजावणारे हे जीव दुपारच्या टळटळीत उन्हात पाहणे हा आनंददायी नाही पण कुतूहल जागवणारा अनुभव होता.

नेहमीच समूहाने हल्ला करणारी हि जंगली कुत्री कधी आपल्या भोवती येऊन ठेपली याचा थांगपत्ता देखील त्या रानडुकराला लागला नाही.एक,दोन नाही तर तब्बल ११ कुत्र्यांनी त्याला घेराव दिला होता.जिप्सीच्या आडव्या दांडयावर गुडघा रोवून शक्य तितकी उंची गाठून मी तो उलगडत जाणारा भोजन समारंभ न्याहाळत होतो.

व्याघ्र प्रकल्पात वाघा व्यतिरिक्तही अनेक अशा गोष्टी घडतात आणि पहायला मिळतात कि वाघ मिळाला नाही याची सल कुठल्याकुठे विरून जाते.नाव जरी 'टायगर रिसर्व' असले तरी बाकीचे प्राणीही तितक्याच गुण्यागोविन्दाने नांदत असतात या पुनःप्रत्यय आला.

नागझिरा अभयारण्यातील अशाच एका दुपारी टिपलेला हा प्रसंग.

हृषिकेश पांडकर

 

Friday, May 4, 2018

भाऊ रंगारी

 दुपारी साधारण सव्वाचा प्रहर होता.रस्त्यावरच डांबर जळणाऱ्या मेणबत्तीच्या वितळणाऱ्या मेणाप्रमाणे वितळेल आणि त्यात माझा पाय रुतेल कि काय या भीतीने मी अप्पा बळवंत चौकातून दगडूशेठकडे चाललो होतो.पूना बेकरीकडे जाणाऱ्या शक्य तितक्या अरुंद रस्त्याच्या कोपऱ्यावर वडापाव,भजी आणि पाव पॅटिस विकणाऱ्या काकूंचा गाडा उभा होता.काळ्या ठिक्कर कढईतले तेल उन्हाने उकळतंय आणि खाली धग्धगणारा विस्तव फॅशन म्हणून लावलाय अस वाटावं इतका तो लोहगोल आग ओकत होता.


 

एक मे ची सुट्टी होती खरी पण रस्त्यावर शांततेचा मागमूस नव्हता.सिग्नलला तुंबलेल्या गाड्या आणि फरासखान्यासमोरून गाड्या चुकवत वाट काढणारे पादचारी हे दृश्य पाहून गर्दीला बगल देण्याच्या हेतूने मी वाकडी वाट केली आणि थेट भाऊ रंगारी गणपतीच्या गल्लीत शिरलो.

रखरखीत उन्हात त्या निमुळत्या गल्लीत तुरळक वर्दळ होती.स्वातंत्र्य लढ्यात वापरलेली प्राचीन शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी इथे यायचो.अजूनही ठेवलेली आहेत.

भाऊसाहेब रंगारी यांचे निवासस्थान.रंगारी वाडा,पुण्यातील एक वारसास्थान.आणि त्या शेजारी विराजमान असलेली हि कागदाच्या लगद्यापासून बनविलेली लंबोदराची मूर्ती.मंदिराचे बाहेरचे दार बंद असल्याने मूर्तीवर तितकासा प्रकाश नव्हता मात्र यामुळे मूर्तीचे तेज जराही झाकोळले जात नव्हते.

गजाननाची प्रसन्न मूर्ती आपण नेहमीच पाहतो.पण असे रागीट भाव धारण केलेली हि मूर्ती क्वचितच पहायला मिळते.अश्याच उत्कट भावाची प्रतिमा हत्ती गणपतीची देखील आहे.पुण्यातील काही मंडळांच्या देखाव्यापेक्षा त्यांच्या विनायकाच्या रेखीव आणि कोरीव मुर्त्या जास्त लक्षात राहतात त्यापैकी हि एक.

शनिवारवाडा,लालमहाल,मंडई या गोष्टी जवळून पाहण्याचा कधी योग आलाच तर हि वेगळ्याच धाटणीची मूर्ती आवर्जून पहा.आणि त्याच बरोबर शेजारील वाड्यात मांडलेली प्राचीन शस्त्रे देखील.'सार्वजनिक गणेशोत्सव' या विचित्र वादामुळे चर्चेत आलेल्या भाऊ रंगारी मंडळाचे हे रूप खूपच सुंदर आहे.