Friday, September 16, 2016

लोकमान्य..

 तुम्हीच शेंगा खाल्ल्या आहेत लोकमान्य...टरफले पण तुम्हीच उचलायला या !...

विघ्नहर्त्याला दहा दिवस बोलावून सार्वजनिक उत्सवाचा घाट घातलात खरा, पण उरलेल्या वर्षभरात वर कधी या गजाननाला जाता येता भेटलात तर एकदा विचारून घेत जा काय अवस्था झालीये तुमच्या या हेतुपूर्ण उत्सवाची.किव्वा जमल्यास एकदा वरून डोकावून तरी पहा.अगदीच काही नाही तरी रस्ता झाकणारे मांडव आणि भक्तिरसाने ओथंबून वाहणारे डीजे नक्की ऐकू येतील.विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पायाखाली येणाऱ्या अर्धवट तुटलेल्या लंबोदराच्या मुर्त्या दिसणार नाहीत कदाचित तुम्हाला वरून,पण आम्ही ते अनुभवतो.मिरवणुकीतील वाढत्या पथकांची संख्या,शिस्तीचा अभाव या मुळे होणारी पोलीस कर्मचाऱ्यांची ओढाताण या गोष्टी तुम्ही कदाचित गृहीतही धरल्या नसाव्यात लोकमान्य.. !

दहा दिवस लाडका बाप्पा,नवसाचा बाप्पा,सुखकर्ता दुःखहर्ता म्हणून पुजलेल्या विनायकासमोर दारू पिऊन नाचायचे कसब आज लोकांकडे आहे.सणाचे 'So Called' पावित्र्य टिकावे म्हणून निसर्गाच्या पावित्र्याला सुरुंग लावायचे सगळे अधिकार आज आम्ही आमच्याच कडे अबाधित ठेवले आहेत...चूक तुमची नाहीये बाळगंगाधरराव पण आता हि चूक निस्तरायची इच्छा कोणाला दिसत नाहीये हे दुर्दैव..'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' हे कोणाला विचारू ?

तुम्हीच शेंगा खाल्ल्या आहेत लोकमान्य...टरफले पण तुम्हीच उचलायला या !...

येताना जपून या ...कर्वे,लक्ष्मी,केळकर, आणि टिळक हे रस्ते बंद आहेत !