Monday, October 5, 2015

कोकण - एक गूढ



काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर या रसांमध्ये कुठेही भीतीचे वर्णन का केले नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते.भीती वाटणे हि स्थिती झालेल्या प्रसंगानंतर जास्त परिणामकारक असते.भीती वाटण्यासाठी अनेक कारणे आहेत आणि असतील.पण आज मी जे मांडतोय ती भीती अमानवी घटनांमधून वाटणारी आहे.ज्याला 'Supernatural' असे म्हटले जाते.अर्थात भूत असते नसते,देव असतो नसतो,माझा विश्वास आहे नाही या गोष्टींचा इथे काहीही संबंध नाही.प्रश्न फक्त इतकाच आहे कि प्रसंग आणि सभोवतालची परिस्थिती यांच्या मांडणीमुळे एक मानसिक चंचलता येते त्यालाच भीती वाटणे असे म्हणतात का ?  

हिंदी सिनेमात असलेली भीतीदायक दृश्ये हि विनोदी भासतात हे सत्य आहे.पण याच सिनेमातील कदाचित एखादाच प्रसंग लक्षात राहतो आणि बरोबर अशाच वेळी त्याची आठवण होते आणि भीती या संज्ञेचा हळूहळू उलगडा होतो.मला असा खूप वाटत कि चेहेरे पाहून किव्वा आवाज ऐकून दचकणे याला भीती वाटणे असे म्हणत नाहीत.भीती वाटणे आणि दचकणे या संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत.

वास्तविक भीती हि संकल्पना अतिशय शांत आणि गंभीर स्वरुपाची असते असा माझा समज आहे.कर्णकर्कश्य आवाजाने दचकविणे हा माणसाच्या इंद्रियाने दिलेला तत्पर प्रतिसाद असतो त्याला भीती म्हणता येणार नाही.  

आत्तापर्यंतचे सिनेमे पहिल्यानंतर मला काही प्रश्न पडले होते आणि कालानुरूप मला त्याची उत्तरेही मिळत गेली.भीती वाटण्यासाठी रात्रच असणे बंधनकारक आहे का ? किव्वा एखाद्या विशिष्ट जागेवरच भीती वाटते का ? वगरे वगरे.अर्थात या प्रश्नांची उत्तरे माझ्यादृष्टीने तरी 'नाही' अशीच आहेत.

मराठी,हिंदी अथवा इंग्रजी कुठल्याही भयपटाची व्याख्या काय असावी ? जो सिनेमा कुठल्याही कर्कश्य आवाजाखेरीज किव्वा विकृत चेहऱ्याविना प्रेक्षकांना घाबरवू शकतो तो भयपट.आणि कदाचित याच एका बळावर इंग्रजी चित्रपट हिंदी चित्रपटांना मागे सोडतात. हीच सल मनात ठेवून एखादा मराठी सिनेमा असावा जो कुठल्याही 'Special Effects' शिवाय प्रेक्षकांना खिळवून ठेवेल हि कल्पना सुचली आणि विचारांची जागा कृतीने घेतली.

कथा उगीचच वास्तवाचे भान न ठेवता रेखाटलेली अनाकलनीय नसावी.तर अशी एखादी कथा कशी सुचेल या विचारात त्याच दिशेने माझे पहिले पावूल पडले.माझ्या तीन समविचारी मित्रांना घेऊन कोकणात दोन चार दिवस रहावे आणि काही सुचतंय का हे पहावे यावर आम्ही येवून पोहोचलो.रहायची तजवीज मित्राने केली होती.सुट्टीचा विषय उरकून शुक्रवारी सकाळी आम्ही ताम्हिणी कापत पलीकडे निघालो.

अगदी आतमध्ये कोकणात कुठेतरी वेळणेश्वर मंदिराच्या दिशेने जात असताना एक फाटा उजव्या हाताला थेट गर्द झाडीत घेवून जातो.समुद्राला समांतर जाणारा रस्ता काही वेळाने कारूळ या ठिकाणी येवून विसावला.
गाडी शक्य तितकी घराजवळ उभी केली.काकांनी सांगितल्या प्रमाणे त्यांच्याच नारायण पेठेतल्या घरातून घेतलेली किल्ली खिशातून चाचपून काढली आणि गाडीतले सर्व सामान बाहेर काढून आम्ही चौघे आणि काकांचा पुण्यातला घरगडी चिंतन असे पाचजण घराकडे निघालो.

दहा मिनिटांवर असलेला स्थिर समुद्र.वाडीत उभे राहिले कि दोन पोफळीमधून दिसणारा निळा रंग आणि मुलगा म्हणतो 'आई बाबा आता पुन्हा कशाला जाताय भारतात,इथेच रहा माझ्याजवळप्रशस्त घर आहे कशाची कटकट नाही गर्दी प्रदूषणाचा त्रास नाही' म्हणून आग्रहाखातर परदेशी मुलाकडे स्थित असलेल्या पुण्याच्या साठ्ये काकाचं ते वडिलोपार्जित घर आणि त्या मागची ती ऐसपैस पोफळीची वाडी.आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत वाढलेले तण.वस्तीचा मागमूस नाही.उन्हामुळे पानगळती झालेली झाडे.तीनही दिशांना हेच भकास दृश्य.आणि चौथ्या बाजूला अथांग सागर.नाही म्हणायला आडवाट जिथे हमरस्त्याला मिळते तिथे वडाच्या झाडाचा पार आणि शेंदूर फसलेली एक देवाचा अवतार ओळखता येणारी दगडी मूर्ती तेवढी होती.कोणे एकेकाळी लावलेल्या उदबत्त्या आणि धूपामुळे काळाठिक्कर पडलेला पाषाण.उरुसाच्या वेळी लावलेल्या आणि आता फक्त जीर्ण होऊन शिल्लक असलेल्या दोन तीन पताका तेवढ्या फडफडत होत्या.



बॉलीवूड आणि हॉलीवूड मधले भयपट पाहण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे अशा परिस्थितीत कुठून काय दिसू शकेल याची काल्पनिक समीकरणे मांडून पहिली.ज्याला भीती वाटत नाही अशी व्यक्ती आयुष्यातील अशा क्षणाची मज घेऊ शकत नाही हे अगदी खरे आहे.

' काकांचे दोन्ही भाऊ आणि काका अशा तिघांनीही दुर्लक्ष केले असल्या सोन्यासारख्या जागेकडे' हे वाक्य एका उच्छवासात उच्चारून चिंतनने कुलुपात किल्ली घातली.समोरच्या बाजूला असलेल्या खिडक्यांच्या गजावर कोळ्याने आपले साम्राज्य उभारले होते.मांडीचा आधार घेवून किल्ली कुलुपात फिरवली आणि तेरा वर्षांचा भूतकाळ गंजलेल्या बिजागीर्यांनी पुन्हा उघडला.

जिथे कुलुपाची धूळ तेरा वर्षांनी झटकली गेली तिथे घरातला एखादा दिवा पेटावा या चमत्काराची अपेक्षाच नव्हती.


दरवाजा पूर्ण उघडूच शकत नव्हता.धूळ नसलेल्या भागावर जोर देऊन दरवाजा रेटला आणि आम्ही पाचहीजण आत गेलो.पाचवा आत आला आणि दरवाजा लावून घेतला.आतून तो मोठा कोयंडा निट लागत नव्हता पण तसाच सारून तो घाईने आमच्यात मिसळला.घराच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत छत नसल्याने येणारे उन्हाचे तिरकस कवडसे वाट दाखवत होते.मधल्या चौकोनी परसात मध्यभागी असलेल्या तुळशी वृंदावनात तुळशीचे रोपटे सोडून बाकी सर्व गोष्टी शिल्लक होत्या.पणतीच्या जागेवर चार पणत्या होत्या.पणत्यांचा तळ जळलेल्या तेलाने रापला होता.कधीकाळी काढलेली रांगोळी उन पाऊस आणि थंडीने शिल्लकही राहिली नव्हती.उगीचच राहिलेल्या रंगावरून रांगोळी असावी असा अंदाज लावून मी चिंतनच्या मागून निमुटपणे चालू लागलो.
उतरत्या कौलांचा तो देखावा वर्णनाला सुंदर होता.पण का कोण जाणे एक विचित्र गूढता बोचत होती.बंद असल्यामुळे आणि मुळातच दमट हवेत असल्यामुळे येणारा कुंद वास श्वास घेण्यात बाधा आणत होता.पुढे सरकत असताना कोळ्यांची अनंत जाळी पायदळी तुडवली जात होती.गालीचा अंथरावा त्याप्रमाणे धुळीचा थर साचला होता.छत नसल्यामुळे उघड्या असलेल्या मधल्या चौकोनानेच तेवढे ऋतू पहिले होते.बाकी घर बकाल.मधले अंगण सोडले तर रात्र काय अन दिवस काय सगळं सारखाच.

परसातून थोडा पुढे आलो.डावीकडे दिवाणखाना होता तिकडे डोकावले.फार काही भव्य किव्वा सोफा खुर्च्यांची रेलचेल नव्हती.पण अडगळीला पडलेली आणि डावा हात निखळलेली आराम खुर्ची घराची अवस्था सांगत होती.तिथे घुटमळता पुढे गेलो.त्याच्याच पुढे अजून एक खोली होती.दाराला खालच्या बाजूने तडे गेले होते.उंबरा मात्र मजबूत होता.भक्कम लाकडाचा तो दरवाजा काळाच्या ओघात जीर्ण झाल्याचे दिसत होते.बिजागीरीच्या फटीतून सहज डोकावून पहिले.धूळ आणि अडगळ याखेरीज कशाचाही लवलेश नव्हता.शेजारी मोठे स्वयंपाकघर होते.डाव्या हाताला विस्तवाच्या अर्थात चुलीचा आखाडा होता.कधीतरी जळून कोळसे झालेली काळी ठिक्कर लाकडे आणि त्यावर जमा झालेली धूळ मिश्रित राख याखेरीज स्वयंपाकघर वाटावे अशी कुठलीच खुण शिल्लक नव्हती.शेणाने अर्धवट सारवलेली जमीन आणि बंद असल्याने उडलेले शेणाचे पोपडे यामुळे निर्माण झालेली पोकळी कोकणची दुर्लक्षिलेली श्रीमंती उघडी पाडत होते. वरच्या बाजूला झरोका तेवढा होता.पण तेव्हाच्या तेलकट धुराने आणि आताच्या अखंड धुळीने झारोक्यावरही आता मेणचट पडदा आला होता.एकूण काय तर बंद आणि रुक्ष अशा त्या वस्तूच्या खुणा पदोपदी दिसत होत्या.


प्रवासाचा शीण जाणवत नव्हता.रहस्यमय कुतूहल जागे झाले होते.भूक मात्र मरणाची लागली होती.चिंतन सामान टाकून पाण्यासाठी बाहेर गेला.आम्ही दिवाणखान्यात जरा झटकूनच आमचे सामान टाकले.आणि उगीचच आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळू लागलो.

दुपारचा एक वाजत आला होता.ओहोटी सुरु असल्यामुळे समुद्राची गाज कानावर येत नव्हती.बाहेर टळटळीत उन असूनही ती दगडाची फारशी सुसह्य गार लागत होती.
भिंतीवर ओघळलेले पाण्याचे थेंब.कौलांच्या दोन वास्यांमध्ये अडकलेले गवताचे भारे.खिडकीत ठेवलेल्या म्हणजे उरलेल्या तंबाखू आणि चुन्याच्या दोन डब्या.भिंतीवर उलटा लटकवलेला मोठा कोयता आणि कोपर्यात पडलेले लुगडयाचे बोचके यापलीकडे दिवाणखान्यात काहीच नव्हते.कुतूहल हळूहळू शंकेत बदलू लागले होते.आणि तेवढ्यात चिंतनने शांततेचा भंग केला.

'चला जेवून घेऊ' या वाक्याने आम्ही भानावर आलो.व्हारांड्यात असलेल्या लाल मातीवर वर्तमानपत्र पसरून आम्ही जेवायला बसलो.जेवायचे आधीच मांडून ठेवले होते.ताम्हीणीत खाल्लेल्या पोह्यानंतर आत्ताच खाण्यासाठी तोंड उघडले असल्याने सपाटून भूक लागली होती.अनुभवलेल्या गेल्या तासाभराचा विचार आणि लागलेली भूक यामुळे त्या पंधरा मिनिटाच्या काळात कोणीच काही बोलले नाही.

काय दशा केलीये वाडीची' या चिंतनच्या वाक्याने आमचे जेवण झाले.सोन्यासारखे घर आज बेवारस पडलंय.गेल्या आठ वर्षात काय काय पाहिलंय या भिंतींनी हे यांनाच माहीत.आणि आता तुम्ही आलाय इथे विचार करून भयपटाची गोष्ट लिहायला योगायोग कि नशीबकाय म्हणावं कोण जाणे.एवढं बोलून तो ताटं उचलून घरामागच्या विहिरीला निघाला.चिंतनच्या या शेवटच्या वाक्याने मी सुन्न झालो होतो.इतक्यावेळ असणारी अनाकलनीय गूढता अजूनच गर्द झाली होती. आम्ही शेजारच्या कळशीतून पाणी घेऊन हात धुतले.

दोन वाजून गेले होते.तापलेल्या कौलानमुळे आत देखील गरमी जाणवायला लागली होती.पण बाहेरच्यपेक्षा बरंच सुसह्य होते.केवळ शांतता होती म्हणून आम्ही आपापसात देखील हळूच आवाजात बोलत होतो.वास्तविक हळू बोलायची गरज नव्हती.पण सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव असावा.निरव शांतता होती.अगदी कधीतरीच मागच्या वाडीत एखादा शहाळ्याचा नारळ निसटून पडला तरच त्याचा आवाज होता.टळटळीत दुपार असल्याने पक्षांचा मागमूसही नव्हता एकूण काय तरशुकशुकाट
  
चिंतन भांड्यांच आटपून विहिरी शेजारी असलेल्या पंपाच्या छताखाली पहुडायला गेला.जाताना आवर्जून सांगितले'पोरांनो उगीच भलती सलती कडे भटकू नकाअडनीडी वेळ आहे,जागाही अपरिचित'. मला भर उन्हात शिरशिरी जाणवली.आमच्यातले दोघेजण तिथेच सुस्तावले.तिसरा मोबाईल घेऊन गाडीत झोपायला गेला.आणि मी माझा कॅमेरा घेवून बाकीचे घर आणि मागची वाडी बघायला निघालो.

स्वयंपाकघराच्या समोर असलेली बंद खोली सोडून मी पुढे निघालो.उजव्या हाताला बागकामाची हत्यारे अडगळीला पडली होती. जाणो आत काय काय पाहायला मिळेल.काहीही हलवता मी पुढे गेलो.एक वाट मागच्या वाडीत जात होती.डाव्या हाताला न्हाणीघर होतं.त्याच्या विरुध्द बाजूला भारतीय बनावटीचे संडास होते.ज्याच्या खिडकीतून झाडाची फांदी डोकावत होती आणि  दरवाजाचा पत्ताच नव्हता.न्हाणीघराला लागुनच मोठा पितळी बंब ठेवला होता.चार पायांचा बंब होता ज्याचे मागचे दोन पाय निम्मे जमिनीत घुसले होते आणि तो कलंडला होता.बंबाच्या वर असलेला धूर जाण्याचा काळा दंडगोल कोळ्याच्या जाळ्यांनी व्यापला होता.दोन तीन लाकडाच्या मोळ्या इतस्ततः विखरून पडल्या होत्या.



तिथूनच पुढे वाडी सुरु होत होती.वाडीचे रुपांतर गर्द झाडीत झाले होते.निगा घेतल्याने वेडी वाकडी वाढलेली झाडे आणि त्याला छेद देत आकाशात घुसलेली नारळाची झाडे.फक्त चौकोनी फारश्या घालून केलेला रस्ता तेवढा ओळखू येत होता.बाकी दुतर्फा जंगल.शेजारी पडलेल्या पोफळीच्या लाकडाने माजलेले तण बाजूला सारत फरशीच्या वाटेवरून थोडे वाडीत शिरलो.उजव्या हातात कॅमेरा,डाव्या हातात काठी आणि दमट हवेत असल्याने पाठीमागून चिंब भिजलेला शर्ट अशा अवतारात ,मी पुढे गेलो.साधारण पन्नास पावले आत गेल्यावर क्षितिजावर समुद्राचा पृष्ठभाग दिसू लागला होता.

दिवस मावळतीला झुकला होता.मी मागे फिरलो.वाडीतून बाहेर आलो आणि घरच्या मागून उजव्या बाजूने प्रदक्षिणा सुरु केली.लाल मातीवर वाढलेले तण बाजूला सारत आणि घराचा बाह्यभाग न्याहळत मी पुढे चालत होतो.दणकट गजांच्या खिडक्या.तुटलेली तावदानं,विखुरलेली कौले,शेणाने सारवलेल्या भिंतींचे उडलेले पोपडे आणि जीर्ण झालेल्या लोखंडी दरवाजांच्या कड्याकोयंड्याचे गंजलेले अवशेष याखेरीज पाहण्यासारखे काहीही नव्हते.खिडकीच्या बाहेरच्या बाजूने आलेल्या पाण्याच्या ओघळामुळे तयार झालेल्या काळपट रेषा आणि वर्षानुवर्षे लावलेल्या आकाशकंदीलाची आता फक्त धुळीने माखलेली वायर आणि लटकवलेली तार तेवढी शिल्लक होती.डाव्याबाजूला सरपण म्हणून कोणेएकेकाळी रचलेली लाकडे होती.काही भाग वाळवी लागून भुसा झाला होता.तर काही तशीच शिल्लक होती.त्यातले एखादे जरी लाकूड धक्का लागून हलले तर फुरुसे किव्वा घोणस सरपटत येईल कि काय अशी परिस्थिती.



फिरून मुख्य दारापाशी आलो.झोपलेली लोकं बहुदा उठली असावीत असा समज करून आत जायचे ठरवले.कॅमेरा गुंडाळून ठेवला.

मे महिन्याच्या उत्तरार्धाची संध्याकाळ.साधारण साडेपाच वाजण्याची वेळ.विसावलेली उन्ह.आपसूकच ढगामागे जाणाऱ्या सूर्यामुळे होणारा निमिशार्धाचा काळोख.आणि दिवस संपल्याची जाणीव करून देणारी थकलेली संध्याकाळ.शेवटच्या उन्हाच्या तीरीपेने देखील निरोप घेतला.अंधार आणि समुद्रावरून झेपावणारा थंड खारा वारा यांनी ताबा घ्यायला सुरुवात केली.मी दार ढकलून आत गेलो.
एव्हाना सव्वा सहा वाजून गेले होते.तिन्ही सांजेची वेळ होती.अंधाराने माखलेला संधिप्रकाश सर्वत्र सांडला होता.


आत आलो तेव्हा चिंतन उठला होता.परसात असलेल्या हापशाला पाणी नसणे स्वाभाविक होते.सकाळी कळशीमधून आणलेल्या पाण्याने तोंड धुवून त्याच परसात चिंतनने चूल लावली.'एवढं विस्तीर्ण घर असूनही परसात चूल लावावी लागतीयेकाय दशा झालीये घराची '.चिंतन विस्तवाला वारा घालत पुटपुटला.

बाकीचे पण एक एक करत उठले.पडवीत येवून पाचही जण चहा घेत बसलो.झपाट्याने अंधार पडत चालला होता.आम्ही चौघे आता परिस्थितीला सरावलो होतो असे वाटून जरा विसावलो.चहा झाला.दिसेल ती गोष्ट न्याहाळण्याची सवयच लागून गेली होती.आता जो काही नैसर्गिक प्रकाश शिल्लक होता तो केवळ परसात होता.तसा बाकी सगळा अंधारच.शहराच्या प्रदूषणापासून लांब असल्याने डोक्यावर नक्षत्रांचे देणे होते.सिग्नल नसलेल्या मोबाईल फोनचा उजेड आणि पेटवलेली चूल या दोन प्रकाश स्त्रोतांवर रात्र सरकत होती.

चिंतन आतून कंदील घेवून आला आणि आमच्यात येउन बसला.माझ्या शेजारी बसलेल्या मित्राने सहज विचारले कि 'चिंतन हे एवढं मोठं घर साठ्ये काकांनी दुर्लक्षित का केलंय ?…म्हणजे निदान व्यवस्थित देखभाल तरी' चिंतनने खुणेनेच त्याला थांबवले कंदील खाली ठेवला आणि कपाळावरचा घाम बाहीने टिपत आमच्याकडे पहात राहिला.

'हे असले भलते सलते प्रश्न विचारण्यापेक्षा रात्रीच्या जेवणाला काय करायचं ते सांगालवकर बनवलं तर आवरा आवरीला उशीर नाही व्हायचा.' एवढा बोलून तो पाठमोरा झाला.

आम्ही चौघेही हातातल्या कपासहित स्तब्ध झालो.आमच्या कथेतल्या नायकाची अंधुक होत जाणारी आकृती चुली मागून निमुटपणे लांब गेल्याची जाणीव मला होत होती.

                     कोणीही नाहीये या पेक्षा कोणीतरी आहे याची भीती जास्त वाटत होती…   

हृषिकेश पांडकर
०५.१०.२०१५