Tuesday, August 28, 2012

गारठलेले चार तास .. ( भाग - १ )


           महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेला असलेले महत्वाचे राज्य आहे.महाराष्ट्र आणि कोकण यांच्या मध्ये संपूर्ण सह्याद्रीची रांग पसरलेली आहे.महाराष्ट्रात कळसुबाई हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ५४०० फुट इतकी आहे.महाराष्ट्राला ७०० कि.मी चा समुद्र किनारा लाभला आहे.

       
पांडकर ...धडा वाचणे चालू असताना आपले लक्ष कुठे आहे...न वाचता सांग बरं... कळसुबाई शिखराची उंची किती आहे ते ?...
           परवाच्या रविवारी हाच २० वर्षापूर्वीचा भूगोलाचा तास डोळ्यासमोरून तरळून गेला...मात्र त्या प्रसंग नंतर मी कळसुबाई ची उंची कधीच विसरलो नव्हतो.कारण त्या उंचीचे एक अप्रूप वाटायचे.

         
प्रसंग सांगण्याच्या मागे पर्वाचा रविवारच कारणीभूत आहे.काही प्रसंग किव्वा व्यक्ती अश्या प्रकारे समोर येतात कि त्या क्षणापासून ती व्यक्ती किव्वा तो प्रसंग विसरणे हे केवळ अशक्य होऊन जाते.त्या दिवसाची पण हीच गत.साधारण सकाळी ११ च्या सुमारास मी आणि माझा मित्र आमच्या एका मित्रकडे गेलो होतो.रविवारची सकाळ होती.आमचा मित्र घरीच होता.आणि त्याच्याकडे त्याचा एक मित्र आधीपासून येऊन बसलेला होता.त्यानी आमची एकमेकांना ओळख करून दिली.आम्ही गप्पा मारत बसलो.
          
खरे तर गप्पा मारत बसलो हे म्हणणे चुकीचे  आहे कारण जे संभाषण चालू होते ते एक मार्गी होते.इथे फक्त तो बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो.या मुलाचा थोडक्यात तुम्हाला परिचय देतो.हा मुलगा मागच्या महिन्यात एव्हरेस्ट शिखर सर करून आला होता.आणि बोलता बोलता त्याने त्याचे अनुभव कथन करणे सुरु केले होते.
           
मी सहज त्याला म्हणालो कि  " अरे असे मधूनच एखादा अनुभव सांगण्यापेक्षा पहिल्या पासून सगळा सांग ना...म्हणजे सगळे संदर्भ व्यवस्थित लागतील.अर्थात तुला तेवढा वेळ असेल तर.." माझा परीक्षेत पहिला नंबर आला" हे आपल्या आई बाबांना सांगताना जेवढा आनंद आणि उत्सुकता लहान मुलाच्या चेहेर्यावर असते तेवढीच उत्सुकता त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती..त्याने हसूनच संमती दिली..आणि त्याने आमचा ताबा घेतला....
           मोहिमेच्या पैशाची तजवीज,त्यासाठी केलेली धावपळ,लोकांनी केलेली मदत,घरच्यांच्या भावना,शारीरिक आणि मानसिक तयारी या गोष्टी ऐकताना एक वेगळेच कुतूहल निर्माण झाले होते.मी मन लाऊन ऐकत होतो.हे सगळे सांगत असताना एक विचार मनात डोकावून गेला कि यांनी एवढे पैसे उभे केले आणि शिवाय जीवावर उदार होऊन मोहीम आखली ते फक्त एव्हरेस्ट सर करण्यासाठी ? इतके काय असू शकते त्या शिखरात ? पण तूर्तास हा प्रश्न बाजूला ठेऊन मी ऐकत होतो.
           
मोहिमेला सुरुवात झाली तीच मुळात पुणे स्टेशन वरून.या वेळी त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पालकांची मित्रांची आणि नातेवाईकांची मनस्थिती काय असू शकेल याचा अंदाज लावणे मला त्या वेळी कठीण जात होते.कदाचित तुम्हाला पण अंदाज लावणे अशक्यच आहे.या नंतर त्याने पुढे सांगायला सुरुवात केली आणि तो थेट दिल्लीला येऊन पोहोचला.आणि जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज मिळतो जो आपल्याला शिखरावर नेण्यासाठी दिलेला असतो आणि हाच राष्ट्रध्वज शिखरावर फडकतो हे त्याने सांगितले तेव्हा अंगावरच्या शहर्याला जाग आली.आपल्या देशाचा झेंडा जगाच्या सर्वोच शिखरावर घेऊन जाणे आणि फडकावणे या सारखा मोठा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येणे शक्य नसते.
            आता खर्या अर्थाने एव्हरेस्ट कडे निघायची वेळ आली होती.दिल्ली वरून काठमांडू आणि काठमांडू वरून 'लुक्ला' असा विमान प्रवास पार करून एव्हरेस्ट च्या कुशीत पोहोचलो.असे तो म्हणाला पण खरे तर आम्ही देखील तेथे पोहोचलो होतो.या नंतर चालत एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जावे लागते.
हे ऐकायच्या आधी एव्हरेस्ट बेस कॅम्प म्हणजे माझा असा समज होता कि मस्त छोटेसे वसलेले गाव असेल.छोट्या छोट्या बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत ते गाव असेल.कश्मीरी तरुण्या दिसू शकतील.आणि मान वर करून पहिले कि एव्हरेस्ट दिसत असेल.हो असेच काहीसे चित्र एव्हरेस्ट बेस कॅम्प बद्दल चे माझ्या डोळ्यापुढे होते.मात्र प्रत्यक्षात यातील एकही गोष्ट इथे नव्हती.म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प हा संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे.आणि त्यातल्या त्यात सपाट जागेवर आपला तंबू लावणे आणि आपला कॅम्प उभा करणे हीच मुळात बेस कॅम्प ची कल्पना आहे.आता हे ऐकल्यावर माझ्या मित्रांनी त्याला विचारले कि "जागा शोधणे म्हणजे काय..तिथे जागा नसते का ?"..या वर तो म्हणाला कि जागा असते पण जो बर्फ जमा झालेला असतो ती आधी एक नदी असते आणि ती नदी गोठून जो पृष्ठभाग तयार होतो त्यावर आपला कॅम्प लावायचा असतो.मात्र कदाचित काही वेळेस तो पृष्ठभाग इतका बारीक असतो कि त्यावर पाय दिला तर संपूर्ण बर्फ खाली जाण्याची शक्यता असते.तंबू लावणे तर दूरच...." यावर आम्ही फक्त एक उसासा टाकला आणि पुढे ऐकू लागलो. 


              त्यानंतर अगदी खर्या चढाईच्या आधी मोहिमेतील सर्वांनी मिळून तिथे शिवरायांच्या पुतळा उभा केला आणि मग चढाईला सुरुवात केली.किती अभिमानाचा क्षण असू शकतो.म्हणजे सुमारे १७६०० फुटांवर शिवरायांचा पुतळा उभा करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन सर्वोच्च माथ्याकडे प्रस्थान करणे.या गोष्टी ऐकतानाच खूप रोमांचकारी वाटत होत्या.म्हणजे मी इथे बसून फक्त त्या वातावरणाचा अंदाज लावत होतो.शिवरायांचा ४ फुटी पुतळा, पाठीमागे दिसणारा अभेद्य सागरमाथा,ताज्या बर्फावर परावर्तीत झालेल्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेला संपूर्ण बेस कॅम्पचा प्रदेश आणि महाराजांच्या घोषणेने आलेला अभिमानाचा शहरा...मी फक्त २ घोट पाणी प्यायले आणि पुन्हा त्याच्याकडे पाहू लागलो.

    गिर्यारोहकांनी बेस कॅम्प सोडल्यानंतर बेस कॅम्प ला कदाचित नासा चे स्वरूप येत असावे कारण,वायरलेस फोनचा सतत होणारा आवाज,विविध देशांच्या हवामानशाळेचे  अंदाज वर्तवणारे फोन,गिर्यारोहकांच्या नातेवाईकांचे फोन,देशभरातील मिडियाचे बातम्या मिळवण्यासाठीचे फोन , एक वेगळाच माहोल तिथे बनत असावा असे त्याच्या बोलण्यावरून सतत जाणवत होते.
             
तो म्हणाला आता आमच्या दृष्टीने खरी चढाई सुरु झाली होती.आणि हे सांगताना तो देखील थोडा सावरून बसला.तो म्हणाला एव्हरेस्ट च्या मार्गावरील 'one of the toughest part ' म्हणजे 'खुंबू आईस फॉल' .त्यानंतर सुमारे अर्धातास आम्ही खुंबू मध्ये होतो.ऐकताना जाणवणारी भीषणता प्रत्यक्षात कुठल्या थराची असेल याची कल्पना न करणे यावर मी ठाम झालो.तो सांगत होता... 'खुंबू आईस फॉल' हा असा प्रदेश आहे कि नद्या गोठून एक बर्फाचा थर जमा होतो.आणि त्या थराच्या जाडीचा अंदाज आपल्याला पाय ठेवताना लावणे शक्य नसते त्यामुळे कदाचित पुढे टाकलेले पाऊल भसकन बर्फात जाऊन तो संपूर्ण बर्फाचा थर च्या थर काही हजार फुटांपर्यंत खाली कोसळू शकतो.किव्वा आपण चालत असताना वर असलेले बर्फाचे अर्धवट उरलेले मोठे थर कोसळण्याची सदैव असलेली भीती सोबतीला असते.मी मुद्दाम टांगती तलवार म्हणत नाहीये...याने कदाचित त्या बर्फाच्या थराला तलवार म्हणून कमी लेखण्यासारखे वाटले.


म्हणजे बर्फातून चालताना जिथे श्वास घेण्याइतपत ऑक्सिजन देखील नसतो अश्या ठिकाणी या भीतीची सोबत किती भयंकर असू शकेल.मी फक्त मागे ठेवलेली उशी पुढे घेतली...आणि  'खुंबू आईस फॉल' मध्ये परतलो. 'खुंबू आईस फॉल' हा एव्हरेस्ट च्या वाटेवरील 'Death Zone ' म्हणून ओळखला जातो..हे तो शेवटी म्हणाला...         
दुभंगलेल्या बर्फामधून चालत असताना बर्फाची भेग पार करून जाण्यासाठी शिडी चा वापर करावा लागतो.दोन बर्फाच्या पृष्ठ्भागामध्ये तयार झालेली भेग काही हजार फुट खोल असू शकते.अश्या वेळी ती शिडी आडवी टाकून त्यावरून तो टप्पा पार करणे प्रचंड अवघड आणि एकाग्रतेचे काम असते.कदाचित यामुळेच डेथ झोन हे नाव खुंबू आईस हे नाव अतिशय सार्थ आणि समर्पक आहे...
 अर्थात पाठीमागे दिसणारे शिखर या भीतीवर पांघरून घालत असावे.


               एव्हरेस्ट चढणे म्हणजे एकदा सुरु केले कि एक मार्गी शिखरापर्यंत जाणे इतके सोपे नसते.कारण तुम्हाला प्रत्येक कॅम्प वरून पुन्हा बेस कॅम्प ला यायचे असते आणि मग पुढच्या कॅम्प वर जायचे असते.हे ऐकल्यावर मी माझा अतिशय बाळबोध प्रश्न केला..."अरे याची काय गरज आहे ?...ज्या कॅम्प वर पोहोचतो तिथे रहायला काय हरकत आहे ? यावर तो म्हणाला कि कॅम्प-२ च्या पुढे कोणत्याही कॅम्प वर राहायला परवानगी नाहीये .किव्वा रहाताच येत नाही.प्रत्येक पाउलागणिक वाढणारी अनिश्चितता आणि दडपण अनुभवाने हा थरारक अनुभव होता. हे त्याला आत्ता सांगायला काय जात होते म्हणा...
               
हे सगळे चालू असताना माझ्या मित्राने त्याला विचारले कि " हे सगळे चालू असते तेव्हा तुम्हाला रस्ता कसा सापडतो ?" यावर तो हसून म्हणाला कि आम्हाला रस्ता शोधायची गरज नसते कारण प्रत्येकाबरोबर एक शेरपा असतो.त्यामुळे रस्ता शोधणे वगरे प्रकार नसतो.कारण आधीपासूनच चढाईचा मार्ग ठरलेला आहे.कारण तो एकच मार्ग आहे.या वर आम्ही एकदा एकमेकांकडे पहिले पुढे ऐकायला सुरुवात केली.


               तो सांगत होता कि जेव्हा आम्ही चढत असतो तेव्हा एक 'common rope ' असते जिची दोन्ही टोकं फिक्स केलेली असतात.आणि त्या rope ला आपापले anchor लाऊन चालायचे असते.यावर माझा मित्र पुन्हा म्हणाला कि "अरे मग हे तसे सोपे आहे.म्हणजे त्या मुख्य rope ला आपले लूप लावायचे आणि त्या rope प्रमाणे चालायचे."यावर पुन्हा तो हसला आणि म्हणाला कि “हो ते ऐकायला मलाही सोपे वाटले असते.पण मजा अशी असते कि चालत असताना वेगाने वाहणाऱ्या वार्याच्या झोताबरोबर आपल्यासाहित आपल्या rope ला असलले ६/८ जितके लोक आहेत ते सगळे जण १५-२० फुटांवर उडून पडतात.म्हणजे वारा येतो.. rope वर असलेल्या सर्वांना उचलून २० फुटांवर फेकून देतो.मग आम्ही परत तिथून उठायचे,आपल्या मूळ मार्गावर येऊन पोहोचायचे आणि पुढे चालायला सुरुवात करायची.थोबाडीत मारल्यासारखे तोंड करून आम्ही पुढचे ऐकायला लागलो...तर असे पुढे टाकलेले पाऊल बर्फावर टिकेल कि नाही याची शाश्वती नसताना आणि वरून काही निसटून पडणार नाही याची स्वतःलाच खात्री पटवून देताना पुढे जाणारा तो आणि पर्यायाने आम्ही, कॅम्प एक वर येऊन पोहोचलो होतो....


               कॅम्प १ ला पोहोचल्यावर पुन्हा बेस कॅम्प ला यावे लागते.वातावरणात वेगाने होणारा बदल हे याला प्रमुख कारण आहे असे समजले.पुन्हा बेस कॅम्प ला यायचे म्हणजे पुन्हा 'खुंबू आईस फॉल' पार करायचा आलाच.पण त्याला पर्याय नसतो.हे सांगत असताना मी पुन्हा एक प्रश्न विचारला कि "एवढी थंडी,कमी ऑक्सिजन, आणि एकाकीपण या गोष्टींवर मात करण्यासाठी तुम्ही काय करायचात" यावर तो शांतपणे  म्हणाला कि मी शक्यतो वाचन करायचो किव्वा गाणी ऐकायचो.कारण मनात कायम चढाईचा विचार केला तर मानसिक दबाव वाढण्याची भीती असते.तेव्हा मला जाणीव झाली होती केवळ शारीरिक बळावर तुम्ही शिखर सर करू शकत नाही.. तर किंबहुना शारीरिक तयारी पेक्षा मानसिक तयारी जास्त महत्वाची आहे.अर्थात शारीरिक तयारी पण तितकीच महत्वाची असते हे मला नंतर समजले.काही किलोचा तो ड्रेस,ऑक्सिजन सिलिंडर,सामान भरलेली मोठी 'haver sack' असे सुमारे १५/२० किलोचे सामान वाहून न्यायची वेळ येते तेव्हा खरा शारीरिक कस लागतो.ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे शावासोछ्वासाला त्रास होतो.आणि त्यामुळे शरीरातील उर्जा झपाट्याने कमी होत असते.अश्या परिस्थितीत दर ३ पाऊलानंतर १५ सेकंद विश्रांती हे समीकरण ऐकून मी एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा ऐकू लागलो.एव्हाना आम्ही पुन्हा बेस कॅम्प ला येऊन पोहोचलो होतो....
              
कॅम्पवर पोहोचल्यावर त्याची विश्रांती जरी वेगळ्या पद्धतीची होती तरी मी मात्र प्रत्येक कॅम्प वर २ घोट पाणी पीत होतो..जेणेकरून अचंब्याने गोठलेला घसा आपल्या पुण्याच्या पाण्याने उबदार व्हावा ...
              
                                                                                   - क्रमश: