Sunday, May 10, 2020

मदर्स डे

 

सुमारे २ महिन्याच्या लॉकडाऊनचा दांडगा अनुभव पाठीशी..त्यात आज रविवार..मोबाईल, इंटरनेट यांचा वापरून किस पडलेला..सगळंच बंद असल्यामुळे सकाळचा नाष्टा आणि दुपारचे जेवण यांच्यातील वेळेची असलेली अभेद्य दरी..अंघोळीची घाई नाही..पेपर येतच नसल्याने वाचायचे बंधन नाही...आणि त्यात आज 'मदर्स डे'...

शुभेच्छांचा क्रम लक्षात घ्या बरका..ते महत्वाचं आहे..

व्हाट्सएप ग्रुप वर फोटो सहित शुभेच्छा..एक फोटो जन्मदात्री सोबत..मग जोडीदाराची आई..स्वतःचे मूल असेल तर अजून एका फोटोची भर..मग येणार एखादं वाक्य..उदा. आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आणि तत्सम...ज्याचा फोटो जितका जुना तितक्या शुभेच्छा घट्ट...आपला लहानपणीचा आईसोबत फोटो असेल तर मग हुकमाचा एक्का.. (सासूबाईंसोबत लहानपणीचा फोटो असायची शक्यता तशी कमीच )

व्हाट्सएपच्या स्टेटस सेक्शन मध्ये एकदा गेलो की मग पहिले आपल्याला कळणार वाह काय गोड दिसायची आपली मैत्रीण लहानपणी..( फोटो भले मरणाचा ब्लर असला तरीही )..कधी-कधी फोटो लग्नातील असायची दाट शक्यता कारण धोधो वाहणाऱ्या कळशी सारखा मेकअप..माय लेकींचा...पुढे येणार सासूबाई ..अच्छा यांच्या घरी दिली होय हिला..बर बर..मग पुढे आपली मैत्रीण येणार दोन विहिणींच्या मध्यात..माय टू पिलर्स वगरे...मग समजा अपत्य असेल तर मग गगनच ठेंगणे..लिटिल मंचकीन..माय वर्ल्ड या नावाखाली फोटोंचा ढीग..हे सगळं झालं की मग आपला ड्रेस चेहेरा पोज आणि हास्य ज्यात चांगले तो ग्रुप फोटो.. 'टू ऑल लव्हली मदर्स'...इथे संपतो एक अध्याय..आणि मग पुढच्या व्यक्तीचे स्टेटस...

आत्ता साधारण सकाळचे अकरा होतायत..सुदैवाने अजूनतरी 'मदर्स डे चायलेंज' अजून सोशल मीडियाच्या क्षितिजावर यायचंय..( किव्वा मला माहित नाहीये )

एकूणच काय..हे सगळं करण्यात गैर अस काहीच नाही..मात्र दुर्दैवाने

माझे स्वतःचे फोटो सुमार येत असल्याने भोवताल पहाण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय उरत नाही..मग यातूनच मनोरंजन करून घ्यायचे..आपल्याला तरी कधी कळणार इतरांची वंशावळ....नाही का ..

'सो आम्ही' तिन्ही जगांचे आई विना भिकारी...हेच खरंय

मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा

-हृषिकेश पांडकर

१०-०५-२०२०

 

Saturday, May 2, 2020

सुट्टी म्हणवत नाही..

 माझ्या उभ्या आयुष्यात शाळा सुरू झाल्यापासून एवढी सुट्टी कधीच अनुभवली नाही..

सुट्टी असूनही त्याला सुट्टी म्हणवत नाही..

एप्रिल महिना झाला पण परीक्षा नाही..

आंबे आले पण नेहमीचा गोडवा नाही..

स्विमिंग शिकणाऱ्यांची जत्रा,क्रिकेट कोचिंग क्लासेस,उन्हाळी सुट्ट्यांची शिबिरे यांचा साधा मागमूसही नाही..

सुट्टी असूनही त्याला सुट्टी म्हणवत नाही..

शाळेभोवती तळे साचून एक दिवस सुट्टीची अपेक्षा करणारे सगळे चिमुरडे याच सुट्टीच्या कचाट्यात सहज अडकून पडले...

भोलानाथ बापडा तरी काय करील या प्रश्नाचे उत्तर त्यालाही न उमगले..

टीव्ही,इंटरनेट आणि मोबाईल यात आई बाबा ताई दादा अन आजी आजोबाही रमले..

आमचं ग्राउंड,सुट्टीच्या सहली,भाऊ बहिणींचा सहवास आणि किमान मित्र मैत्रिणीबरोबरचा धुडगूस हाच सुटीचा श्वास असलेले बालचमू चार भिंतीतच कोंडले...

त्या वयाला काय समजते हो लोकडाऊन,पॅनडेमिक अन सोशल डिस्टनसिंग..

आपण फक्त सांगायचे नो शाळा,नो ट्रिप,नो मित्र,नो खेळ आणि नथिंग..

'सुट्टी आहे तर बागेत तरी जाऊयात ना' या निरागस इच्छेला माझ्याकडची उत्तरे तरी संपली...

'नाहीतर मला आजीकडे तरी सोड' या मागणीने पोरंही आता थकली...

'एक दिवस सिनेमाला तरी जाऊ न'..या त्यांच्या साहजिक मागणीला देखील मी आता मनोमन घाबरतो..

'तोच सिनेमा तुला टिव्हीवर दाखवतो' हे उत्तरं द्यायलाही आता सपशेल ओशाळतो...

सुट्टी म्हणल्यावर पायाला भोवरा बांधणारी मुल आज इतकी संयमित कशी याचा काही केल्या हिशेब लागेना..

आश्चर्य,कौतुक की असहायता यातील नक्की कोणते भाव चेहेऱ्यावर मिरवावेत हेच काही केल्या कळेना..

या दिवसात तुमच्या देखील नक्की लक्षात आले असेल पोरांनी आजारी पडल्याचे देखील निमित्त काढले नाही..

कदाचित या संकटाचा सामना करण्याची बुद्धी आणि शक्ती परमेश्वराने यांना थोडी जास्तच दिली....नाही ??

या लढ्यात अग्रस्थानी असलेल्या डॉक्टर,पोलीस,सफाई कर्मचारी आणि सर्व यंत्रणांचे कौतुक आभार आहेतच...

पण त्याच संयमाने आणि धीराने साथ देणाऱ्या या चिमुरड्यांचे कौतुक निसटता कामा नये...

एखादा पुरस्कार मिळाल्यावर 'आई-वडिलांना' जसे श्रेय देणे स्वाभाविक अन साहजिक आहे..

अगदी तसेच या करोना दिव्यातून बाहेर पडल्यावर या चिमुरड्यांच्या संयमाचे श्रेय देखील अधोरेखित करूयात..

आपल्या घुसमटीला फुंकर घालायला आणि मनोरंजन करून घ्यायला तसे भरपूर पर्याय आहेत..

प्रश्न फक्त या बालचमुंचा उरतो ज्यांना या सुट्टीची कारणेच मुळात अनभिज्ञ आहेत...

स्टे होम स्टे सेफ..

- हृषिकेश पांडकर

०२.०५.२०२०