Wednesday, September 2, 2020

आजच्या ठळक बातम्या !

विक्रमी सहा तासांच्या अखंड जल्लोषात (?) गणरायाला भावपूर्ण निरोप.. अखेरच्या बाप्पाचे अनंत चतुर्दशीच्याच दिवशी विसर्जन...

रांगेच्या मानापेक्षा मुहूर्ताचे पावित्र्य जपत पुढल्या वर्षी निर्विघ्न येण्याचे वचन देऊन गजानन मार्गस्थ..

लक्ष्मी, टिळक आणि केळकर या तीनही रस्त्यावर मिळून देखील चिमूटभर गुलाल आणि एकही तुटकी चप्पल नजरेस नाही..

वाहत्या मुळा मुठेत अर्धवट तुटलेल्या अवस्थेतील एकही बाप्पाची मूर्ती नाही..

कित्येक वर्षानंतर पोलीस मित्रांनी अनुभवले घरच्या बाप्पाचे विसर्जन..

प्रवासासाठी आता पासची आवश्यकता नसल्याने पासाविना बाप्पा रवाना. मात्र कंटेनमेंट झोन मधून गेल्याने चौदा दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे..

तल्लीन करणारा ढोल ताशाचा गजर तसेच लयबध्द टोल आणि झांजांचा नादाला विघनहर्ता मात्र मुकला. इतकेच नाही तर कासट, मेन्स अव्हेन्यू,कजरी आणि जयहिंद मधील मॅनेक्वीन यांनाही यंदा चुकचुकल्याची भावना स्पष्ट..

भगवे ध्वज आणि केशरी पांढऱ्या वेशाने संपूर्ण अलका चौकाला मांगल्याचे तोरण बांधणाऱ्या तमाम वादकांच्या अनुपस्थितीत बाप्पाने घेतला हळूच निरोप..

ढोल सोडायचे,पानं काढायची,ताशे ढिले करायचे आणि टोल व झांज मोजून ठेवायच्या या नंतरच्या कामातून यंदा मोकळीक असल्याने पुढल्या दिवशी लागलीच वर्क फ्रॉम होम साठी वादक मंडळी सज्ज..

देखावा उतरवून किव्वा लायटिंग उतरवून मांडव काढायचे काम नसल्याने कार्यकर्ते नेहमीच्या दिनचर्येत लगेच एकरूप..

उकडीचे मोदक,मोबाईल फोटो,सोशल मीडिया,घरी असलेला मुबलक वेळ आणि सुगरणगिरी मिरवण्याची योग्य संधी महिला वर्गाने कदापिही न दवडल्यामुळे त्यांच्या जास्तीच्या आग्रहाचे चार मोदक मूषका सोबत स्वतःही पोटभर रिचवून लंबोदर रवाना..

सुंदर मूर्तींचे, नखशिखांत दागिन्यांचे,डोळे दिपावणार्या सजावटीचे,मिरवणुकीत चिमुरड्याच्या हातातील छोट्या बाप्पाचे,ढोल उंचावणार्या ढोल वादकांच्या,परदेशी वादकांचे,खानदानी पेहराव केलेल्या सुंदरीचे आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीने व्यापलेल्या रस्त्यांचे फोटो टिपणार्या सर्व कॅमेऱ्या मागील कलाकारांना चुकवून एकदंत स्वगृही परत..

घरचे विसर्जन उरकून मंडळाचे विसर्जन करायची किव्वा मिरवणूक पहायची घाई नसल्याने प्रत्येक घरी दोन आरत्या जरा जास्तच म्हटल्या गेल्याचे निदर्शनास..

विघ्नविनाशक,गुणिजन पालक,दुरीत तिमिर हारक,सुखकारक आणि दुःख विदारक या बिरुदावल्या सार्थ ठरविण्याचे प्रेमळ आव्हान घेऊन उंदरावर स्वार होऊन ,मास्क बांधून बाप्पाचा निरोप आणि अनोख्या गणेशोत्सवाची सांगता....

हृषिकेश पांडकर

०२.०९.२०२०

 

No comments:

Post a Comment