Sunday, September 4, 2011

माझे आवडते महिने …


        दिवसाचे रुटीन सेट होणं हीच जिथे अवघड गोष्ट आहे...अश्या ठिकाणी वर्षाचं रुटीन सेट होणं  याचं विचार न केलेलाच बरा.पण का कोण जाणे वर्षाचे ढोबळमानाने रुटीन सेट झाले आहे असे मला नेहमी वाटत आले आहे.आणि असे वाटायचे मुख्य   कारण म्हणजे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर हे महिने.तसं पहायला गेलं तर बाकीचे महिने पण आहेतच पण नवीन कोऱ्या शाळेच्या गणवेशातला मुलगा पहिला की पुढेच तीन महिने काय होणार आहे याची कल्पना सहज येते.आणि आता त्याची इतकी सवय झाली आहे की पालखी दिवेघाटात आली या बातमी नंतर विंबल्डन  स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी फेरीत काय झालं हि जर का बातमी नसेल तर चुकचुकल्या सारखे वाटण्या इतपत हे रुटीन माझे सेट झाले आहे.

          शाळेची नवीन खरेदी...पावसाला व्यवस्थित झालेली सुरुवात..रस्त्यावर माणसांनी घातलेले कपडे दिसण्यापेक्षा त्यांनी घातलेले रंगीबेरंगी रेनकोट..याच गोष्टी इतक्या जवळच्या वाटतात की एक वर्ष कोणीच कॅलेंडर जरी छापले नाही तरी व्यवस्थित दिवस ओळखण्याची मी खात्री देतो.मराठी महिने इंग्लिश प्रमाणे धडाधड सांगू शकेन याची मी खात्री देत नाही...पण आषाढ श्रावण आणि भाद्रपद हे महिने गरवारे च्या सिग्नल ला उभे राहून देखील अचूक सांगू शकतो..कारण भाद्रपदातील गणपतीच्या मिरवणुकीची प्रक्टीसे तेथे चालू असते..

         "नागडी लहान मुलं साचलेल्या पाण्यात खेळत आहेत..आणि पाऊस पडत आहे"पहिल्या पावसानंतर सालाबादप्रमाणे छापत आलेला सकाळ चा हा फोटो समजा एखाद्या वर्षी त्यांनी छापला नाही तर यंदा पावसाळा नाही असे वाटून चातक पक्षी देखील आत्महत्या करेल की काय असे वाटते."हवामानातील बदल" या गोंडस कारण खाली आजारी पडून सुट्टी घ्यायचे धंदे या काळात जोर धरतात.

         पहिले काही दिवस भरपूर पाऊस पडल्यावर पुण्यातील धरणांची पातळी,मुंबईच्या  रेल्वे ट्रॅकवर झालेला स्विमिंग टॅंक..ताम्हिणी  मधील कुठलाही एखादा फोटो "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे  चोहीकडे" या शीर्षकाखाली छापलेला, पुणेकरांची अवेळी पावसाने उडालेली धांदल या सगळ्या रुटीन गोष्टी वर्तमानपत्र  वाले कधीच मिस करत नाहीत आणि मी देखील...  

         आषाढी एकादशीची सुट्टी आणि शाळेतील गुरुपौर्णिमा या दोन गोष्टी शालेय वर्षातील प्रवासाचा पहिला मैलाचा दगड ठरतो.कॉलेजेस नुकतीच सुरु झालेली असतात त्यामुळे "सध्या लेक्चर्स नसतातच..फक्त प्रॅक्टिकल होतात" अशी टिपिकल वाक्य कानावर पडतात.

         पेपर मधील फोटो आणि वर्षासहल यासारख्या गोष्टींचा इतका प्रभाव आमच्यावर पडतो की...नागपंचमी ला सुट्टी मिळाली नाही याचे दुख विसरता विसरता १५ ऑगस्ट ला भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षा १३-१४-१५ किव्वा १५-१६-१७ अश्या जोडून आलेल्या सुट्टीमुळे आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद आम्हाला जास्त होतो..आणि ऑगस्ट सुरु व्हायच्या आधीच कनेक्टिंग हॉलिडेज चे प्लॅन ठरवले जातात.

        शाळेतील मुलांचे मात्र वेगळेच असते...पहाटे उठून शाळेचा धुतलेला आणि इस्त्री केलेला युनिफोर्म घालून प्रत्येक चौकात लावलेली देशभक्तीपर गाणी ऐकत शाळेत जाणे...झेंडावंदन करून घरी येणे यात  काडीमात्र बदल नसतो...पण शाळेतून लवकर घरी येणे क्रमप्राप्त असते कारण चाचणी परीक्षा दुसर्या दिवसावर आलेली असते...वर्षातील पहिलीच परीक्षा असल्याने सिरीयसनेस जास्त असावा कदाचित.

        शाळेचे दिवस दुर्दैवाने संपले...त्यामुळे सकाळी राखी बांधायला बहिणीकडे जाऊन तिथेच जेवायचे दिवस पण संपले..पण आता सकाळच्या ऐवजी रात्री एवढाच फक्त काय तो बदल झाला बाकी सर्व तेच...आणि हो "आपकी फरमाईश " या विविध भारती च्या कार्यक्रमात "फुलोसा तारोसा " हे गण देखील तसेच..बदलला तो फक्त रेडीओ..

        शाळेतली पालखी,शाळेतली दहीहंडी या गोष्टी संपल्या पण दहीहंडी मनोरा,आणि दिवेघाटातील पालखी...या दोन गोष्टींचे वर्तमान पत्रातील फोटो तितकाच आनंद देऊन जातात...लग्नाचा season नुकताच चालू झालेला असतो.त्यामुळे हॉल मधल्या फोन शेजारी २/३ लग्न पत्रिका हमखास पडलेल्या असतात.

       ऑगस्ट पण संपत आलेला असतो..आधी फक्त संध्याकाळी पडणारा पाऊस आता सकाळी आणि मध्यरात्री देखील पडायला सुरुवात झालेली असते..पण पावसाचा जोर पहिल्यासारखा नसतो...पावसाचीही सवय होते..आणि पाकीट रुमाल या गोष्टींप्रमाणे रेनकोट ,छत्री देखील बरोबर घेतली जाते.याच सुमारास श्रावणाला सुरुवात होते...शाळेतील मुले "श्रावण" माझा आवडता महिना .यावर  निबंध लिहितात..मात्र खरच श्रावण का आवडतो याचे प्रत्यंतर मला आत्ता पर्यंत आलेले आहेच. 

       ऑगस्ट संपण्याची सुरुवातच मुळात दहीहंडीच्या होर्डींग्स ने होते ..ऑफिस मधून घरी येताना प्रत्येक सिग्नलवर किमान २  होर्डींग्स तरी हमखास दिसतात..आणि समजा तुमचे ऑफिस लकडी पुलाच्या पलीकडले असेल तर त्या दोनाचे ४ व्हायला वेळ लागत नाही..बक्षिसांची रक्कम हंडीच्या उंचीला 'directly proportionate '   असते...आणि होर्डिंग च्या देखील...

      आई बाबा ठाण्यात ( मुंबई ) मध्ये चाललेली दहीहंडी  टीव्हीवर बघतात...आणि आम्ही बाहेरच्या पाहतो..उंच दहीहंड्या कधीच ठरवलेल्या उंचीवर फुटत नाहीत...दरवर्षी त्या खाली घेऊन फोडण्यात येतात...दर  वर्षी एखाद्या वयस्कर माणसाचा हंडी पाहताना हार्ट अटॅक  येऊन मृत्यू होतो..आणि एखाद्या तरुणाचा मनोर्यावरून पडून...आकडे फक्त कमी जास्त होतात पण फोटोसकट तीच बातमी आम्ही पेपर मध्ये वाचतो...

      दहीहंडी संपल्यावर पण होर्डींग आठवडाभर तशीच असतात...आणि ती लटकविलेला दोरखंड पण..एव्हाना गरवारेचा चौक,म्हात्रे पूल,नदीकाठचा रोड या  ठिकाणी येणारे ढोल ताशांचे आवाज तीव्र झालेले असतात...कारण प्रॅक्टिस अंतिम टप्प्यात आलेली असते..वाजवणारे लोक दिसतच नाहीत..फक्त पहायला आलेल्या लोकांची गर्दी आणि ठेकेबद्ध आवाज...पुण्याचे गणपती जवळ आलेले असतात...
      आता गणपतीची चाहूल पेपरवाल्यांना आधीच लागते ...कारण गणपती च्या आकर्षक आणि सुबक मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचा फोटो पेपर मध्ये आलेला असतो...

      शाळेच्या चाचणी परीक्षा झालेल्या असतात ..मुलांना गणपतीचे वेध लागलेले असतात...कॉलोनी मधील उत्साही कार्यकर्ते नियमित भेटणे चालू करतात..मंडळांचे वार्षिक अहवाल पुन्हा प्रिंट केले जातात.
भर रस्त्यात मांडवासाठी खड्डे खणले जातात...त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते...काही दिवसांनी त्यामध्ये खांब उभारले जातात आणि रिकाम्या मांडवाखाली सोयीस्कररित्या रिक्षा आणि आपली वाहने पार्क केलेली दिसतात... जसे गणपती जवळ येतात तसे त्या खांबांवर पत्रे टाकून  मांडव पूर्ण होतो...आणि कार्यकर्ते देखाव्यासाठी तयारी ला लागतात...आत्ता पर्यंत साध्या ट्यूब्स आणि बल्ब लावलेली जनरल स्टोअर आता गणपतीचे  डेकोरेशन साहित्याने लखलखीत होतात..."आमच्या येथे पेणचे सर्वांग सुंदर श्रींच्या मूर्ती मिळतील" हे बोर्ड्स दिसू लागतात.

      गणपतीचे १० दिवस घरी गणपती नसताना देखील किती भारी जाऊ शकतात हे जाणून घ्यायचे असेल तर हे वर लिहिलेल्या व्यक्तीलाच विचारा. ११ व्या दिवशी विसर्जन मिरवणूक होते..आणि ३/४ दिवस आधी पाहिलेले मांडव रिकामे रिकामे आणि भकास वाटू लागतात...आताही  त्या मांडवात रिक्षाच उभ्या असतात...आणि पेपर मध्ये मांडवामुळे वाहतुकीला कसा अडथळा होतो याचे फोटोसहित वर्णन आलेले असते..

      शाळा पूर्ववत चालू होतात...चाचणी परीक्षांचे पेपर्स मिळालेले असतात..ऑफिसेस सुद्धा पूर्ववत होतात..घरचे डेकोरेशन साहित्य माळ्यावर गेलेले असते...लक्ष्मीरोड वर गुलालाचा थर दिसत असतो...आणि रस्त्याच्या कडेला तुटलेल्या चपला पडलेल्या असतात....लकडी पुलावरून पाण्यात तरंगत असलेले निर्माल्य दिसत असते..

      श्रावण तर संपलाच..पण भाद्रपद पण संपत आलेला असतो आणि सप्टेंबर पण...पाऊस पूर्णपणे ओसरलेला असतो...रोज ३ वेळा पडणारा पाऊस आता ३  दिवसातून एकदा पडत असतो...

      शाळा, कॉलेज आणि ऑफिसेस व्यवस्थित सुरु असतात..पुढच्या सुट्टीची वाट बघत....आणि बोगद्यातून पलीकडचा उजेड दिसावा त्याप्रमाणे कॅलेंडर वर दसरा डोकावत असतो...

हृषिकेश पांडकर