Thursday, October 2, 2014

कॅमेरोग्राफी



         समोर प्रत्यक्षात घडत असलेली गोष्ट उघड्या डोळ्यांनी न पाहता घरी जावून स्क्रीनवर मोठी करून पाहणे यालाच फोटोग्राफी असे म्हणतात.अर्थात कलेच्या व्याख्येला कुठले तर्कशास्त्रही नसते आणि मर्यादा सुद्धा नसतात.पण फोटोग्राफी या छंदाचा असाच काहीसा अर्थ होत असावा.

        जोसेफ आणि लुईस यांनी मिळून कॅमेराचा शोध लावला.समोर दिसत असलेली अथवा घडत असलेली भौतिक परिस्थिती आहे तशी उचलून पडद्यावर अथवा कागदावर आणणे हा त्या मागचा हेतू.कालांतराने आठवणी जपून ठेवता याव्यात यासाठी फोटो काढणे सुरु झाले.आणि मग राहणीमान,तंत्रज्ञान आणि दृष्टीकोन या तीनही अंगांच्या वय्यक्तिक प्रगतीनुसार यात अमुलाग्र बदल होत गेले.

        अगदी पेनाच्या आकारापासून ते दहा बारा किलोपर्यन्तचे कॅमेरे उपलब्ध असतात.सगळ्यातून सारखाच फोटो येतो.पण कौशल्य आणि कॅमेरा हाताळणी यांच्या एकत्रित मर्यादेवर येणाऱ्या फोटोची गुणवत्ता कमी जास्त होते.आणि हेच कारण आहे फोटोग्राफी हा छंद म्हणूनही ओळखला जाण्याचे.

        रोल असलेल्या कॅमेर्याच्या काळात मी पहिला कॅमेरा पाहीला.अर्थात 'ये उन दिनो कि बात हे' वगरे म्हणण्या इतपत काही मी मोठा नाहीये.पण तरी डिजिटलपेक्षा थोडा आधी म्हणून रोलच्या कॅमेर्यापासून सुरुवात झाली.रोलची किंमत,त्याचा धुलाईचा खर्च आणि वापरायची अक्कल या तीनही आघाड्यांवरील सुवर्णमध्य काढता एका सहलीला एक रोल या हिशोबाने मी फोटोंची लयलूट केली.नीट रोल भरला आहे कि नाही हे पाहण्यासाठी घरात काढलेले दोन फोटो,अतिउत्साहात चालत्या गाडीतून आणि अर्थातच हलत्या गाडीतून उडवलेले तीन चार फोटो आणि पुण्याबाहेर पडताना घाटातून दिसणाऱ्या दरीचे खिडकीच्या काचेतून काढलेले दोन तीन धुसर फोटो अशातूनच त्या छत्तिस फोटोच्या रिळाची सुरुवात होत गेली.मग पुढे जावून कदाचित धक्क्याने हललेले फोटो,पावसात जलबिंदूनी व्यापलेले फोटो यामुळे पाहण्यालायक फोटोची संख्या तशी जेमतेमच हाती यायची.पण त्याचा आनंद वेगळाच होता.कॅमेरा हातात धरायची दोरी मधे आल्याने खराब झालेलया फोटोनी देखील अनंत आठवणी जपून ठेवल्या.कारण तेव्हा फोटो काढणे ही हौसेपेक्षा तो क्षण साठवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग वाटत होता.कारण लिहून ठेवायची सवय अजून वर्गाच्या बाहेर पडलेली नव्हती.तर सांगायचा मुद्दा हा की बहुतेक माझ्या समकालीन सर्वांची कॅमेर्याशी ओळख ही थोड्या अधिक फरकाने अशीच झाली असावी.

       



        रोलचा कॅमेरा म्हणजे भीती वाटायची,तोंडातून निघालेला शब्द आणि क्लिक केलेला फोटो हा एकदा क्रिया पूर्ण झाली कि बदलणे शक्य नसायचे.फोटो कसा आला आहे हे कळायला रीळ धुवून घेणे याखेरीज पर्याय नव्हता.त्यामुळे फोटो पाहणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत असे.त्यानंतर रोलच्या कॅमेर्याची जागा डिजिटल कॅमेर्याने घेतली.हवे तितके आणि हवे तसे फोटो काढा.ओर्कुट,फेसबुकवर टाका.डेव्हलप करायची गरज नाही.आणि रोल संपायची भीती नाही.डिजिटल कॅमेरा आणि सोशल नेटवर्किंग या दोन गोष्टींनी एकत्रित फुगडी घालत संपूर्ण तरुणाई घुसळून काढली.लग्नाच्या मांडवात वऱ्हाडी कोण आणि फोटोग्राफर कोण हे कळणे सध्या अवघड असते.त्यात मोबाईलने भर घातली.आपण काढलेले फोटो लोकांपर्यंत सहजतेने आणि लवकर पोहोचण्याचे मार्ग उपलब्ध असल्याने फोटो काढून पाठवणे हि गोष्ट मेसेज लिहून पाठवण्यापेक्षा सोपी झाली.

        फोटो काढण्याचे काही ठराविक प्रकार आहेत.आणि हे प्रकार सोशल वेबसाईटवर भरभरून पाहायला मिळतात.प्रकार जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येक जण आपली शैली जपून आहे.या डिजिटल एस एल आरच्या जगात फेसबुकवर 'माय फोटोग्राफी' किव्वा तत्सम एखादे पेज काढून त्यावर अहोरात्र फोटो टाकणार्यांची संख्या कमी नाही.
 
        समुद्रकिनारी गेल्यावर सूर्यास्त किव्वा सूर्योदय यांचा फोटो काढणे यासारख्या 'तोच तोचपणाची' सर दुसर्या कशालाच येणार नाही.तीच गणपतीची मिरवणूक,तेच दिवाळीचे फटाके,तेच प्राणी,तेच पक्षी,तेच धबधबे,तीच लग्न सगळे ऑब्जेक्ट आहे तेच आहेत.फक्त कोण किती कल्पकतेने फोटो काढतो यावर आज हि कला शिल्लक आहे असे मला वाटते.

        फोटोग्राफी म्हणजे काय असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर माझे उत्तर असे असेल कि समोर असणारे दृश्य उघड्या डोळ्यांनी जितके स्पष्ट दिसते तितकेच ते फोटो मध्ये उमटविणे याला फोटोग्राफी असे म्हणतात.पण कालानुरूप यात बदल होतोय अशी जाणीव होवू लागली.फोटोग्राफी म्हणजे समोर दिसत असलेली गोष्ट कश्याप्रकारे अजून अर्थपूर्ण आणि आकर्षक दिसू शकेल याचा अंदाज घेवून कॅमेरा चालविणे ( अगदी पु.लंच्या चालविण्याप्रमाणे ) याला फोटोग्राफी असे म्हणतात.जसे दृश्य डोळ्याला दिसते तसेच्या तसे ते फोटोत उतरविणे हा फोटोग्राफीचा एक भाग होऊ शकतो.पण झूम लेन्स या उपकरणाने कदाचित डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी देखील हाती लागू शकतात.हल्ली लोकांचे फोटो पाहून आश्चर्य वाटते.'Aparature','ISO' आणि 'Shutter' या आकड्यांच्या त्रेराशिकात विविधता आणून अनंत प्रकारचे आणि हवे तसे फोटो काढता येवू शकतात हि गोष्ट शिकण्यासारखी आहे.

     फोटोग्राफी हा महागडा छंद मनाला जातो.काल नविन असलेला कॅमेरा आज जुना होतो.पण तुमच्यात असलेली कल्पकता आणि कॅमेर्याच्या आय पीस मधून बघण्याची दृष्टी येणाऱ्या फोटोचे भविष्य ठरविते.उंचीवरून कोसळणारा धबधबा हजारो लोक बघतात आणि फोटो देखील काढतात.पण तेच दृश्य जो वैविध्यपूर्ण टिपू शकतो तोच खर्या अर्थाने हि कला जपतो.कॅमेर्याची तांत्रिक बाजू तर आहेच पण काढणार्याचे कौशल्य आणि पारखता येणाऱ्या फोटोला कारणीभूत ठरते.

        फोटो काढण्याचे पण प्रकार असावेत.कदाचित फोटोमध्ये असणाऱ्या प्रसंगामुळे तो फोटो आवडू शकतो.मग त्या बाबतीत फोटोची गुणवत्ता तितकी चांगली नसेलही.सचिन तेंडूलकर बरोबर काढलेला फोटो थोडासा हललेला असेल तरी तो कायम जवळचाच वाटतो.मग तेव्हा आपण त्याच्या कंपोझिशनला महत्व देत नाही.पण हेच समजा एखाद्या निसर्गाच्या फोटोचे झाले तर ते आपल्याला खटकते.काही फोटोतील संदेश कदाचित आवडतो त्यामुळे तो फोटो आवडतो.काही लोक रस्त्यावर पडलेल्या चपला देखील इतक्या कलेने टिपतात कि कदाचित त्या फोटोत तसे काहीही नसले तरी केवळ कौशल्याच्या बळावर तो फोटो दाद घेवून जातो. एखाद्या मूर्तीचा फोटो समोरून सगळेच काढतात.याचा अर्थ समोरून काढलेला वाईट आहे असे नाही पण एकाच ओब्जेक्टचा जर वेगळा विचार करून फोटो काढला तरी त्याचे नाविन्य वाढविता येते एवढे निश्चित.

        फोटो काढणे हि जर कला असेल तर फोटो पाहता येणे याला देखील एक विशिष्ठ नजर आवश्यक असतेच.शेवटी प्रेक्षक जाणकार असल्याशिवाय सादरकर्त्याला कौतुकाचे किव्वा टीकेचे देखील समाधान मिळत नाही.ज्या लोकांना हललेला फोटो म्हणजे काय हे समजात नाही त्यांना फिरणाऱ्या पवनचक्कीचे फोटो दाखवून उपयोग नसतो.किव्वा ज्यांना 'Motion Blur' म्हणजे काय हेच माहित नसते त्यांना उडणार्या पक्षाचे फोटो दाखवण्यात काय मजा आहे ? जे लोक वाहणाऱ्या पाण्याच्या फोटोला 'किती हलला आहे' असे म्हणणार असतील तर आपण दाखवणारे मूर्ख असा त्याचा अर्थ होतो.याचा अर्थ मला सगळ समजते अशातला भाग नाही.माझी यातली समज अगदीच उथळ आहे फक्त सांगायचा मुद्दा एवढाच कि एखाद्याच्या कलेला दाद देण्याची योग्यता देखील यावी लागते.



        हल्ली विविध सोशल नेटवर्किंग साईटवर हव्या त्या प्रकारचे फोटो बघायला मिळतात.शिकण्यासारख्या गोष्टी चिकार असतात.वन्यजीवांचे फोटो बघून तर अचंबा वाटतो.फटाक्यांचे देखील फोटो इतके सुंदर येतात हे पाहिल्याशिवाय कळत नाही.लग्नाचे फोटो म्हणजे मधे नवरा बायको आणि बाजूला इतर नातेवाईक अशा संस्कारात मी मोठा झालो.पण या सोहोळ्याचे कित्त्येक विविध प्रकारे फोटो येवू शकतात.हे पाहणे म्हणजे मेजवानीच असते.'चमकणाऱ्या विजेचा फोटो कधी काढायचा'? हा प्रश्न येणे किती स्वाभाविक आहे,कारण निमिषार्धात येवून जाणारी वीज कधी कुठे आणि कशी कडाडेल याचा नेम नसतो.आणि तरी देखील अप्रतिम फोटो पाहायला मिळतात.पाहूनच इतक्या गोष्टी शिकायला मिळतात तर हातात कॅमेरा घेतल्यावर शाळाच होईल अशी अवस्था आहे.
        फोटोग्राफीचे एक मात्र निश्चित आहे कि हि गोष्ट छंद आणि व्यवसाय होऊ शकते,किव्वा नुसता छंद होऊ शकतेपण कधीही नुसता व्यवसाय होवू शकत नाही.कारण जिथे कलाकुसर अपेक्षित असते तिथे पाट्या टाकल्या जात नाहीत.आणि जिथे आवड निर्माण होत नाही तिथे पाट्याच टाकल्या जातात.

        तर अशा या अंधार्या खोलीत रुपाला येणाऱ्या कलेबद्दल बोलायचे झाले तर,क्षणार्धात उघडझाप करणाऱ्या शटर मधून जर इतकी चांगली छायाचित्र येत असतील तर सदैव उघड्या असलेल्या डोळ्यांनी काय काय टिपले पाहिजे … 

        फोटो असा यावा कि काढणार्याला कामगिरीचे आणि पाहणार्याला कौतुक करण्याचे समाधान लाभावे.आणि या दोन गोष्टी जमून आल्या कि ती आठवण आपसूकच जपून राहते. 

          आठवणी जपत असताना कलाही जपणाऱ्या या दुधारी तलवारीला माझे नमन … 





हृषिकेश पांडकर
०२-१०-२०१४