रक्त ? अहो तुमचा आर्डरली पान खाऊन पचापच थुंकलाय !
डिसेंबरचे सुरवतीचे हे दिवस होते. जूनच्या सुरवातीला लागलेला पाऊस दिवाळी संपली तरी ओसरत नाही त्याप्रमाणेच या वर्षाच्या सुरवातीपासून जगाच्या मानगुटीवर बसलेला करोना गेला का नाही या संभ्रमात संपूर्ण विश्व गांगरून गेले होते.
वर्क फ्रॉम होमला कंटाळलेले,वर्षभर ट्रीपा,बाहेरचे खाणे,मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याविना कंटाळलेले पुणेकर आता जरासे मोकळे वाटत होते.
दिवस तसा नेहमीचाच होता. लोकडाऊन चा संभ्रम..वर्क फ्रॉम होम.. लस आलीये की नाही ..बरं आलीये तर कोणाला मिळेल..कोणाला नाही ? फ्री मिळेल की महाग..एकदा होऊन गेला असेल तर परत होईल का ? लग्नसराई आहे तर छोटस गेटटूगेदर चालेल का ? या आणि अशा अनंत प्रश्नांवर चपखल उत्तर नसताना आलेली ही आजची सकाळ होती. इतक्यात व्हाट्सएपच्या खिडकीत गवा गवा गवा असा कोलाहल कानावर आला. पुण्याच्या रस्त्यावर गवा नांदतोय अशी ती बातमी..
ही प्रस्तावना काहीशी कानावर पडलेली नक्की असणार नाही का..?
अशीच सुरुवात होती पुलंच्या 'म्हैस' या विनोदी कथाकथनाची. त्यांचा शेवट गोड होता. इथे प्रत्यक्षात मात्र काहीच गोड झाले नाही तो भाग वेगळा.
संदर्भ घ्यायचे कारण इतकेच की कथेचा गाभा असलेले पात्र एकाच जातकुळीचे. पण लोकांच्या गदारोळात भाईंची चांदी सुखरूप निसटली तर इथल्या लोकांच्या गदारोळात त्या गव्याने मात्र कायमचे देह टेकला.
असो, चूक कोणाची,दोषी कोण , शिक्षा काय असावी आणि कोणी भोगावी यावर पोटभर उहापोह दोन दिवसात पुष्कळ झाला आहेच त्यामुळे त्यावर बोलण्यात मजा नाही.
या निबिड अरण्यातील लाजाळू गव्याने पुण्यासारख्या शहरात भर सकाळी लोकवस्ती गाठली हीच मुळी आश्चर्याची बाब.मागे एकदा कर्वे रस्त्यावर बिबट्या पळत आला होता. परवा हा गवा आज काय तर म्हणे रानमांजर दिसली. उद्या सिग्नलला शेजारी पट्टेरी वाघ जरी आला तर अगदीच धक्का बसेल अस वाटत नाहीये.
लोक हल्ली सफारीच्या नावाखाली या गोष्टी पैसे आणि वेळ खर्चून करतात तर काही लोक या गोष्टी दाखविण्यासाठी पैसे घेतात त्यांच्या पोटावर पाय आल्यासारखाच झाल की राव हे..असच चालू राहील तर कोथरूड परिसराला अभयारण्याचा दर्जा मिळू शकेल अर्थात मुक्या प्राण्यांना मात्र यात कुठेही अभय नसेल. ते प्राणी फक्त पहायला मिळतील मात्र त्यांचे संरक्षण हा मुद्दा दुर्दैवाने इथे गौण असेल कदाचित.
गवा जाण्याचे कारण काहीही असो आणि कोणीही असो पण आपण ज्यांच्या घरी आगंतुकपणे पाहुणे म्हणून त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांच्या पाहुणचारात ते कणभरही कमी पडत नाही पण अनावधानाने आपल्याकडे आलेल्या त्याच पाहुण्याचे आपण केलेले आदरातिथ्य सर्वात बुद्धिमान प्राणी अशी ओळख असलेल्या आपल्या मानवजातीला किती शोभनिय आहे हा प्रश्न तितकाच अनुत्तरित राहतो..
अतिउत्साह,बेजबाबदारपणा आणि कॅमेऱ्यात टिपण्याची घाई या नादात आपण मुकं जनावर हकनाक गमावलं याच वाईट जास्त वाटतं
- हृषिकेश पांडकर
११.१२.२०२०
No comments:
Post a Comment