Wednesday, August 28, 2013

पर्यटन विशेषांक - बॉलीवूड



        परवा 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित झाला.दीपिका पादुकोणच्या निमित्ताने माझे पाहणे झाले.सुमारे तीन तासाच्या प्रवासानंतर मी थियेटर मधून बाहेर पडलो.सिनेमाची कथा,गाणी,संवाद या गोष्टींवर नेहमी होते ती चर्चा झाली.सिनेमा कसा आहे, कोणाचा अभिनय कसा आहे इत्यादी पिसे काढून झाल्यावर आम्ही तिथून मार्गस्थ झालो.आता पिक्चर कसा आहे वगरे हे मुद्दे थोडे वादग्रस्त असू शकतात,कारण कोणाला काय आवडावे किव्वा काय आवडू शकेल याचा ताबा आपल्याजवळ नसतो.अर्थात याच वेगवेगळ्या चवी जश्या पाहणार्यांच्या असतात तश्याच त्या दिग्दर्शक गायक आणि लेखक  यांच्या देखील असतातच.त्यामुळे सिनेमा कसा होता याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न नक्कीच नाहीये.

        तर हा आणि असे अनेक सिनेमे पाहिल्यावर कथा,दिग्दर्शन,संवाद,गीते आणि कलाकार हे नियमित निकष तर आपण चित्रपटाचा दर्जा ठरवायला नेहमीच वापरतो असे लक्षात येते.पण या पलीकडे जावून मला अजून एक गोष्ट पक्की समजली आहे की ज्या तर्हेने हे लोक आपल्याला भारत दर्शन घडवतात ते पाहून खरच आपला देश इतका भारी आहे यावर विश्वास बसत नाही.म्हणजे या 'चेन्नई एक्स्प्रेस' ने दक्षिण भारत ज्या पद्धतीने दाखवला आहे ते पाहून आपण निसर्ग बघायला परदेशी का जातो असे वाटण्याइतपत शंका येते.आता याचा अर्थ मी वरचेवर परदेशी जातो अशातला भाग नाही,पण असा दक्षिण भारत बघितल्यावर बाहेर जायची आवश्यकता आहे आहे का ? दुधसागर धबधबा किव्वा रामेश्वरम या गोष्टी जितक्या कॅमेर्याला सुंदर दिसतात तितक्याच त्या आपल्या डोळ्यांना सुंदर दिसू शकतात का ? आणि याच 'चेन्नई एक्स्प्रेस' च्या पार्श्वभूमीवर त्यानंतर प्रदर्शित झालेला 'मद्रास कॅफे' हा त्याच दक्षिण भारताचे सर्वार्थाने वेगळे दर्शन घडवतो.

'रोजा' किव्वा 'मिशन कश्मिर' या चित्रपटात दाखवलेले काश्मीर खरच भारतात तसेच्या तसेच आहे का ? म्हणजे 'कश्मिर कि वादियो मे ' मध्ये वगरे गाडी चालवत असताना खरच मेंढ्यांचा कळप मध्ये येतो या गोष्टी काल्पनिक नाहीयेत ना ? आणि 'माचिस' सिनेमात दाखवलेले काश्मिर हे एकाच ठिकाणी असून वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण का वाटते ? दक्षिणेचा अरबी समुद्र आणि दादर चौपाटीवर उभे राहिल्यावर दिसणारा अरबी समुद्र एकच आहे का ? किव्वा कदाचित कॅमेर्या समोर आल्यामुळे सौंदर्य जास्त खुलत असेल का ? 'दिल चाहता है' मध्ये दाखवलेले गोवा शहर प्रत्यक्षात सुद्धा तितकेच सुंदर आहे का ? किव्वा 'कहानी' मध्ये दिसणारे कोलकाता शहर अगदी दाखवले तसेच असेल तर त्याच्यासारखे वेगळेपण कोणाचेच नसेल.आणि हेच कोलकाता शहर 'युवा' मध्ये पहिले कि त्याचे वेगळेपण नक्की जाणवते. अर्थात 'परिणिता' मध्ये पडद्यावर आलेले पश्चिम बंगाल दोन्ही सिनेमाला छेद देणारे आहे.'सरफरोश' मध्ये दाखवलेले राजस्थान फक्त वाळवंटाखेरीज खूप जास्त गोष्टींचे दर्शन घडवते.'जब वी मेट' मध्ये दाखविलेली हिमाचल प्रदेशातील ठिकाणे आपल्याला थक्क करतात.अनेक सिनेमातून समोर आलेले 'पंजाब' खरच इतके सधन आणि सर्वच बाबतीत मुबलक आहे का ? 'तारे जमीन पर' मध्ये दाखवलेले सिमला खरच इतके स्वच्छ आणि सुबक आहे यावर पाहूनही विश्वास बसत नाही. 'बर्फी' मध्ये दाखवलेले दार्जीलिंग भारतात आहे याचीच मुळात चाहूल लागून देत नाही. म्हणजे तिथे असलेले रस्ते ब्रिटीश कालीन चर्च आणि कायम धुक्याने आच्छादलेले शहर. 'लगान' किव्वा 'हम दिल दे चुके सनम' मध्ये दाखवलेला विजय विलास राजवाडा गुजरात सारख्या ठिकाणी आहे यावर विश्वास बसत नाही.जिथे गरबा या नृत्य प्रकाराशिवाय फारशी माहिती नसताना या सिनेमामुळे अश्या गोष्टी पाहायला मिळत आहेत याचा आनंद जास्त होतो.'अशोका' मधील करीना आणि शाहरुख यांच्या पलीकडे जावून जर बेडाघाट किव्वा अहिल्या फोर्ट बघण्याची इच्छा झाली असेल तर मध्यप्रदेशाची श्रीमंती घरबसल्या बघता येण्यासारखे आहे.'Black' सिनेमा मध्ये पाहण्यासारख्या इतर अनेक गोष्टी असल्या तरी निसर्गरम्य सिमला नजरेतून सुटत नाही.

'गुरु' किव्वा 'रावन' या सिनेमांनी दाखवलेले केरळ तर केवळ अचंबित करणारे आहे. म्हणजे निसर्गाचे वाटप करीत असताना भारताने देवाशी देखील दादागिरी केली असावी असा संशय यावा.जयपूर आणि राजस्थाननी प्रत्येक सिनेमामधील लग्नासाठी आपापले महाल दिले असावेत.प्रत्येक सिनेमात हावडा ब्रिज ज्या पद्धतीने दाखवला जातो त्या आणि तितक्याच पद्धतीने माझे त्याबद्दलचे आकर्षण वाढते.अगदी 'आराधना','मेरा नाम जोकर' पासून ते 'मै हु ना' आणि 'परिणिता' पर्यंत बॉलीवूडने दार्जीलिंग ची साथ सोडली नाही.कारण सौंदर्याला पर्याय नसतो.
‘जोधा अकबर' मध्ये दाखवलेले आग्रा,अजमेर,जयपूर हि ठिकाणे आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासाची उजळणी करीत असतात.'रांझना' मध्ये दाखवलेले 'उत्तर प्रदेश' आणि 'वाराणसी' आधुनिक आणि पारंपारिक भारताची संस्कृती अधोरेखित करतात.पण वाराणसी हे शहर फक्त संस्कृती आणि परंपराच जपते का असा प्रश्नही पडतो कारण प्रत्यक्ष तिथे जावून पाहिल्याशिवाय हे प्रकरण काय आहे हे समजणे अवघड आहे.पण तोपर्यंत बॉलीवूडने मला हेच दाखवले आहे.

        नासा,वाशिंग्टन आणि फ्लोरिडा या गोष्टी पाहून झाल्यानंतर वाई आणि मेणवली घाट हि ठिकाणे पाहणे किती सुखावह असते हे 'स्वदेस' बघताना वाटते.आणि म्हणूनच कदाचित हा सिनेमा जास्त प्रेक्षणीय वाटतो.
        'फना' चित्रपटात दाखवलेले फत्तेपूर सिक्री,दिवाण ए आम,लाल किल्ला या गोष्टी क्वचितच टीव्ही वर पाहिल्या जातात पण हि ठिकाणे या चित्रपटाने अतिशय जवळून आणि योग्य प्रकारे दाखवली आहेत.अर्थात काजोल च्या अस्तित्वात या गोष्टी दुय्यम ठरतीलही कदाचित पण दुर्लक्षित होवू शकत नाही एवढे मात्र नक्की.

        तामिळनाडूच्या निलगिरी टेकड्या तर बॉलीवूडनी दत्तकच घेतल्या आहेत.'दिल से' मधून घडलेले हे तामिळनाडूचे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते.'३ इडियटस' ने दाखवलेले सिमला हे फक्त थंड हवेचे ठिकाण नसून अजून बर्याच गोष्टी पाहण्याचे पर्यटन स्थळ आहे.'सरफरोश' ने दाखवलेले विरप्पनचे जंगल बघितल्यावर या जंगलात लपणे किती सोप्पे आहे असे वाटून विरप्पन सापडला नाही यात तथ्य असल्याचे जाणवते. 'रंग दे बसंती' किव्वा 'दिल्ली ६' ने दाखवलेले दिल्ली हे एकच शहर इतके भिन्न असूच कसे शकते असा संभ्रम निर्माण होतो. मात्र दोन्ही सिनेमे पाहिल्यावर दिल्ली विषयीचे आकर्षण वाढते एवढे मात्र नक्की.कदाचित एखाद्या शहराची नवीन ओळख निर्माण करण्याचे काम बॉलीवूड अनेक वर्ष करीत आल्याचे जाणवायला लागले आहे.

        मुंबई तर बॉलीवूडचे माहेरघर आहे.कारण प्रत्येक सिनेमाची सुरुवात इथे होते आणि पर्यायाने शेवटही.अर्थात रीळातील मुंबई आणि प्रत्यक्षातील मुंबई यात जरी फरक असला तरी जी मुंबई आपण पहिली नाही ती कदाचित सिनेमाने सोप्या भाषेत दाखवली.म्हणजे मुंबई हेच शहर 'कोर्पोरेट','पेज ३' या मधे दिसते तसे 'मुंबई मेरी जान' मध्ये दिसत नाही.किव्वा 'कंपनी' मध्ये दाखवलेली मुंबई आणि 'Fashion' मध्ये दाखवलेली मुंबई यात कमालीची तफावत आढळते.
        भारतात राहून देखील संपूर्ण भारत आपण पाहिलेलाच नाही,असे प्रत्येकवेळी हे असले सिनेमे पाहताना मला कायम वाटते.कदाचित बॉलीवूडचे सिनेमे पाहण्यामागे हाच हेतू प्रबळ होत चालला आहे.प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष जावून पाहता येइलच असेही नाही पण या ७० एम एम च्या पडद्यावरून या गोष्टी पाहण्यात देखील वेगळीच मजा आहे.कदाचित सत्यघटनेवर आधारित सिनेमे जास्त येवू लागल्याने त्या त्या ठिकाणाचा चित्रिकरणाकरिता केला जाणारा वापर वाढू लागला आहे आणि म्हणूनच या जागा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

        सिनेमा बघण्याचे उद्देश पुष्कळ असतात पण नकळत काही गोष्टी डोळ्यासमोर आल्याने नवीन शिकल्याचा किव्वा अनुभवल्याचा भास मला दरवेळी होतो.आणि म्हणूनच कदाचित मला या गोष्टीचे प्रचंड अप्रूप आहे.हिरो किव्वा हिरोइन एखाद्या पिक्चर मधून किती पैसे मिळवतात या बद्दल फारसे आकर्षण नसले तरी चित्रीकरणाच्या निमित्ताने ते ज्या प्रकारे फिरतात या बद्दल हेवा मात्र नक्की वाटतो.

        चित्रीकरणाचे ठिकाण हि गोष्ट सिनेमाच्या यशात किव्वा अपयशात ग्राह्य धरली जात नसेलही पण 'सिनेमा का बघावा ?' या उत्तरात नक्की ग्राह्य धरली जावू शकते. 


                                                                                        हृषिकेश पांडकर
                                                                                        २८ /०८ / २०१३

Friday, August 2, 2013

थेंबभर कंटाळा …



      वेडी लोकं प्रेमात पडतात कि प्रेमात पडल्यावर लोकं वेडी होतात,हा एक प्रश्नच आहे.पण प्रेम आणि पावसाळा यांचा संबंध जोडून,पावसाळा हा Romantic ऋतू आहे असे ज्यांचे मत आहे ती माणसे नक्कीच वेडी आहेत अशी माझी खात्री झाली आहे.कदाचित या वर्षीचा पाऊस हे त्याचे एकमेव कारण असू शकेल.

     
जून हा पावसाळ्याचा पहिला महिना आहे असे आमचे कॅलेंडर सांगते.आणि या हिशोबाने बरोबर एक जूनला पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले.आणि त्या दिवसापासून नळ चालू राहिल्यासारखा सलग टपकतोय.पावसाचे चार महिने आहेत पण म्हणून चार महिन्याचा पाऊस महिन्याभरातच ओतून दिल्यासारखा पडतोय.आज जुलै संपला पण या दिवसात एक दिवस पाउसाविना गेलाय असं नाही.  

      बर पाऊस पडतोय तर सलग तीन तास तुडवल्यासारखा पडतोय असेही नाही.१५-१५ मिनिटांचे हफ्ते भरल्यासारखे थांबून येतोय. म्हणजे माणसाला संपूर्ण भिजवायचं,त्याला वाळायला वेळ द्यायचा आणि कोरडे झाल्यावर परत भिजवायचा असा काहीसा प्रकार चालू आहे.म्हणजे प्रेमात भावनांशी खेळतात तसा हा रंगपंचमी खेळतो. 
     
उत्तर ध्रुवावर सहा सहा महिने सुर्य दिसत नाही म्हणतात, आमच्या पुण्याची पण तीच अवस्था झाली आहे.अगदी सहा महिने नाही पण साधारण दोन महिने आम्ही सुर्य किरणांशिवाय जगत आहोत.आणि यामुळेच घराला धोबीघाटाचे स्वरूप आलेले आहे.कपडे वाळणे तर सोडाच पण  पिळलेले कपडे पुन्हा येणाऱ्या पावसाने भिजायची भीती जास्त आहे.कुठे तो पहिल्या पावसातील मातीचा वास आणि कुठे तो अर्धवट वाळलेल्या जीन्सचा वासकसल डोंबल्याच Romantism.   

      पहिल्या चार पावसातच रस्त्यांनी कात टाकलीये.साठलेल्या पाण्यात गेलेले गाडीचे चाक किती खोल जाईल याची खात्री नाही.आधीच पुण्यातल्या गाड्यांची संख्या जास्त त्यात शिस्तप्रिय वाहनचालक आणि पावसाने ठेवलेला वरदहस्त हे म्हणजे (ओल्या) दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखेच आहे.रस्त्याची झालेली चाळणी आणि महानगर पालिकेचा ठिगळे लावायचा तोकडा प्रयत्न हि सर्कस बघताना आपली होणारी कसरत कसली Romantic हो ?

     
भिजायचे नाही असे खूप ठरवले जाते,पण आपण बाहेर पडायची आणि पाऊस यायची वेळ एकच कशी येते हा योगायोगच माझ्या पचनी पडत नाही.मग भले तासभर आपण एका कामाच्या ठिकाणी असू,बाहेर थेंबभर पाऊस नाही.आणि काम संपवून बाहेर पडलो कि दत्त म्हणून हजर. नखशिखांत भिजलो तर फार त्रास होत नाही पण तेच फक्त जीन्स चा थोडा भाग किव्वा शर्टच्या बाही मधून आत गेलेले पाणी या गोष्टी सहनशीलतेचा अंत बघतात.म्हणजे आता या पावसाने परिस्थिती इतकी वाईट आणून ठेवलीये कि भिजवणार असशील तर पूर्ण भिजव उगीच शिंतोडे उडविल्यासारखे करू नको त्याचा त्रास जास्त होतो.  





 
      बालगंधर्व किव्वा एस एम  जोशी पुलावर असलेला कणीस विकणारा माणूस जर खूप पावसामुळे कणीस विकायलाच आला नाही तर त्या पावसात प्रेमाचा ओलावा कसा असू शकतो ? आणि हीच गत आहे यंदाच्या पावसाची,पाऊसच इतका आहे की त्या पुलावरून पाणी बघायला येणारे देखील सततच्या पावसामुळे दिसेनासे झाले आहेत.मग नदीचे फोटो काय आम्ही दर वर्षीच पेपर मध्ये बघतो.मान्सून सेल मधून खरेदी करण्याचा उत्साहच या पावसामुळे वाहून गेला पण मग यात Romantism कुठले ?

      चष्म्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्याने दृष्टी जितकी धुसर होते त्यापेक्षा जास्त धुसर वातावरण आहे.पावसाचा तिटकारा वाटावा इतक्या पावसाची कदाचित सवय नाहीये.पाऊस म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारे चित्र आणि या वेळेच्या पावसाने रंगविलेले चित्र यात कदाचित विरोधाभास असल्याने पावसाबद्दल इतके कोरडे विचार व्यक्त करायची इच्छा झाली असावी.

   पावसाला विनंती अर्ज लिहिला तरी त्याची शाई पाण्याने पुसली जाईल इतका पाऊस आहे.पण एकच विनंती असू शकेल की श्रावणाच्या उंबरठ्यावर उभे राहूनही मागच्या वर्षी थेंबभर पाऊस नव्हता.पण आता त्याच श्रावणाच्या स्वागताला मागच्या वर्षीची उणीव भरून काढण्याच्या इर्षेने आलेला पाऊस काही काळापुरता तरी विसावलेला पाहायला आवडेल. 

      थोडक्यात काय तर श्रावणातील सणांचा उत्साह पावसाच्या पाण्यात विरघळून जायला नको … आणि ढोल ताशांचा आवाज बसायला नको….

ता. क .  - पाऊस हा अत्यंत गरजेचा असून तो पडणे अत्त्यावश्यक आहे तरी विचार मांडणे गैर नसल्याने लिहिण्याचा खटाटोप.

   


                                                                                               हृषिकेश पांडकर
                                                                                               ०२-०८-२०१३