Saturday, June 17, 2017

सोमवारचा इनबॉक्स

 कोण म्हणतंय सोमवार त्रासदायक असतो ? हा बघा माझा सोमवारचा इनबॉक्स.किती प्रोत्साहन ,किती समाधान,किती सकारात्मकता,किती प्रसिद्धी,किती लाभ सगळं किती प्रसन्न आणि आनंददायी आहे.कोण म्हणताय या जगात दुःख आहेत,काळजी आहे. सगळं झूठ.


 

अहो लोक मला फुकट परदेशवाऱ्या घडवतायेत.काय गरज आहे मला सांगा पैसे कमवायची.एवढं असूनही माझा क्रेडिट स्कोअर उत्तम आहे.माझी सगळी लोन मंजूर होतायेत.पण मी लोन काढतोच कशाला हे मला समजत नाहीये.मला ५०००० पौंडाची लॉटरी लागलीये.माझ्या पुढच्या पिढ्या तंगड्या वर करून जरी घरी बसल्या तरी सुखाने नांदतील इतके पैसे मला मिळतायेत.

कोण म्हणतंय आय.टी. मध्ये रिसेशन आलय ? कोणाचे जॉब जातायेत ? पुण्यात याक्षणाला माझ्यासाठी १९००० जॉब्स आहेत. म्हणजे मी रोज एक जॉब या हिशोबानी जरी नोकरी बदलली तरी इथून पुढे किमान ५० वर्ष मला काळजी नाहीये ते सुद्धा रविवार धरून.माझ्याकडे मोटोरोला मोबाईल असुआनही सॅमसंगवाले मला लॉटरी लागल्याचं सांगतायत या पेक्षा नशीबवान कुबेर तरी आहे का मला सांगा.

लग्नाची मागणी किती आहे बघा मला.मुली हात धुवून मागे लागल्यात.सरळ सरळ ईमेल करून सांगतायत कि मला तू आवडतोस वगरे.'हे प्रेम नाही तर काय आहे ? लोकं 'लग्नाचा आहेस का' वगरे उघड उघड विचारून मोकळी झालीयेत.

हि लोकं मला लंडन,स्वीझर्लंड या सारख्या ट्रिपा फुकट घडवायचं म्हणतायेत आणि मी इथे कोकण आणि ताम्हिणी फिरत बसलोय तेही पदरचे पैसे खर्च करून. हे वाचूनच माझा सभोवताल सुगंधी झालाय आणि त्यातही हि लोक मला सुगंधी अत्तर,डियोडरन्ट,रूमफ्रेशनर यासारख्या गोष्टी फुकट देतायेत.किती..किती ते कौतुक माझं.श्रीमंती श्रीमंती म्हणतात ती हीच का.किव्वा वैभव वैभव म्हणतात ते हेच का ?

अशा गोष्टी मला बऱ्याच वेळा सकाळी ऑफिसला धावपळीत आल्यावर मेलबॉक्स उघडल्या कि बघायला मिळतात.काय नशीब काढलय मी.मला माझाच हेवा वाटतो.असा मेलबॉक्स पहिला कि पडणारी स्वप्न सुद्धा यापुढे फिकी वाटायला लागतात.स्वप्नात तरी एखादीच गोष्ट येते इथे तर सगळ्याच बाजूंनी लक्ष्मी आणि सरस्वती पाणी भारतायेत.

असाच सुजलाम सुफलाम मेलबॉक्स मी तितक्याच शिताफीने नेहमीच रिकामा करतो आणि या सर्व सुखांवर पाणी सोडून पुन्हा ‘सगळ्याचा त्याग करून अलिप्त राहणाऱ्या’ साधू संतांप्रमाणे माझ्या नेहमीच्या कामाला सुरुवात करतो कारण शेवटी कसंय... इदम् न मम्..

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।

बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।

करोमि यद्यत्सकलं परस्मै ।

नारायणयेति समर्पयामि ॥

- हृषिकेश

 

Thursday, June 15, 2017

Leopard

 वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |

सहज हवन होते नाम घेता फुकाचे |

जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह |

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ||


 

पावसाने क्षणिक उघडीप घेतल्यामुळे वातावरणात गारवा जाणवू लागला होता.वयात आलेल्या मुलाला मिसरूड फुटावी त्या प्रमाणे रणरणत्या उन्हाळ्यात शुष्क आणि पर्णहीन झाल्यानंतर ४-५ पावसात न्हाऊन निघालेल्या मध्य भारतातील जंगलाला हिरवी पालवी फुटू लागली होती.

रस्त्याच्या उजव्या बाजूला मोठे हरीण मरून पडलेले स्पष्ट दिसत होते.पोटाचा निम्मा भाग फाडलेला जाणवत होता.अंगावर माश्या घोंगावत होत्या.शिकार असावी याची पक्की खात्री होती पण शिकारी गायब होता.थोडा वेळ वाट पहावी कोण जाणे शिकारी न्याहरीला येईल आणि दर्शन देईल; असा अंदाज लावून गाडी थांबवली.अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर लांबून चालत येणार शिकारी नजरेस पडला आणि धरलेल्या धीराचे सार्थक झाले.क्षणाचाही विलंब न लावता त्याने आपले भक्ष्य ओढत नेण्यास सुरुवात केली.पानात वाढलेले अन्न खाण्यापूर्वी भरलेली थाळी पाहून एक सात्विक समाधान मिळते तीच हि समाधानी मुद्रा.

दुसऱ्याच्या पानात डोकावून पाहू नये असे म्हणतात खरे.पण अन्नसाखळीत सर्वात वर स्थित असलेल्या मोजक्या प्राण्यांपैकी एक अशा या चुणचुणीत बिबट्याला अशा मुद्रेत पाहण्याचा आनंद आणि अनुभव कायमच विलक्षण होता.

Hunting is not a sport. In a sport, both sides should know they're in the game.

Leopard | Pench Tiger Reserve | June 2017