Thursday, October 2, 2014

कॅमेरोग्राफी



         समोर प्रत्यक्षात घडत असलेली गोष्ट उघड्या डोळ्यांनी न पाहता घरी जावून स्क्रीनवर मोठी करून पाहणे यालाच फोटोग्राफी असे म्हणतात.अर्थात कलेच्या व्याख्येला कुठले तर्कशास्त्रही नसते आणि मर्यादा सुद्धा नसतात.पण फोटोग्राफी या छंदाचा असाच काहीसा अर्थ होत असावा.

        जोसेफ आणि लुईस यांनी मिळून कॅमेराचा शोध लावला.समोर दिसत असलेली अथवा घडत असलेली भौतिक परिस्थिती आहे तशी उचलून पडद्यावर अथवा कागदावर आणणे हा त्या मागचा हेतू.कालांतराने आठवणी जपून ठेवता याव्यात यासाठी फोटो काढणे सुरु झाले.आणि मग राहणीमान,तंत्रज्ञान आणि दृष्टीकोन या तीनही अंगांच्या वय्यक्तिक प्रगतीनुसार यात अमुलाग्र बदल होत गेले.

        अगदी पेनाच्या आकारापासून ते दहा बारा किलोपर्यन्तचे कॅमेरे उपलब्ध असतात.सगळ्यातून सारखाच फोटो येतो.पण कौशल्य आणि कॅमेरा हाताळणी यांच्या एकत्रित मर्यादेवर येणाऱ्या फोटोची गुणवत्ता कमी जास्त होते.आणि हेच कारण आहे फोटोग्राफी हा छंद म्हणूनही ओळखला जाण्याचे.

        रोल असलेल्या कॅमेर्याच्या काळात मी पहिला कॅमेरा पाहीला.अर्थात 'ये उन दिनो कि बात हे' वगरे म्हणण्या इतपत काही मी मोठा नाहीये.पण तरी डिजिटलपेक्षा थोडा आधी म्हणून रोलच्या कॅमेर्यापासून सुरुवात झाली.रोलची किंमत,त्याचा धुलाईचा खर्च आणि वापरायची अक्कल या तीनही आघाड्यांवरील सुवर्णमध्य काढता एका सहलीला एक रोल या हिशोबाने मी फोटोंची लयलूट केली.नीट रोल भरला आहे कि नाही हे पाहण्यासाठी घरात काढलेले दोन फोटो,अतिउत्साहात चालत्या गाडीतून आणि अर्थातच हलत्या गाडीतून उडवलेले तीन चार फोटो आणि पुण्याबाहेर पडताना घाटातून दिसणाऱ्या दरीचे खिडकीच्या काचेतून काढलेले दोन तीन धुसर फोटो अशातूनच त्या छत्तिस फोटोच्या रिळाची सुरुवात होत गेली.मग पुढे जावून कदाचित धक्क्याने हललेले फोटो,पावसात जलबिंदूनी व्यापलेले फोटो यामुळे पाहण्यालायक फोटोची संख्या तशी जेमतेमच हाती यायची.पण त्याचा आनंद वेगळाच होता.कॅमेरा हातात धरायची दोरी मधे आल्याने खराब झालेलया फोटोनी देखील अनंत आठवणी जपून ठेवल्या.कारण तेव्हा फोटो काढणे ही हौसेपेक्षा तो क्षण साठवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग वाटत होता.कारण लिहून ठेवायची सवय अजून वर्गाच्या बाहेर पडलेली नव्हती.तर सांगायचा मुद्दा हा की बहुतेक माझ्या समकालीन सर्वांची कॅमेर्याशी ओळख ही थोड्या अधिक फरकाने अशीच झाली असावी.

       



        रोलचा कॅमेरा म्हणजे भीती वाटायची,तोंडातून निघालेला शब्द आणि क्लिक केलेला फोटो हा एकदा क्रिया पूर्ण झाली कि बदलणे शक्य नसायचे.फोटो कसा आला आहे हे कळायला रीळ धुवून घेणे याखेरीज पर्याय नव्हता.त्यामुळे फोटो पाहणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत असे.त्यानंतर रोलच्या कॅमेर्याची जागा डिजिटल कॅमेर्याने घेतली.हवे तितके आणि हवे तसे फोटो काढा.ओर्कुट,फेसबुकवर टाका.डेव्हलप करायची गरज नाही.आणि रोल संपायची भीती नाही.डिजिटल कॅमेरा आणि सोशल नेटवर्किंग या दोन गोष्टींनी एकत्रित फुगडी घालत संपूर्ण तरुणाई घुसळून काढली.लग्नाच्या मांडवात वऱ्हाडी कोण आणि फोटोग्राफर कोण हे कळणे सध्या अवघड असते.त्यात मोबाईलने भर घातली.आपण काढलेले फोटो लोकांपर्यंत सहजतेने आणि लवकर पोहोचण्याचे मार्ग उपलब्ध असल्याने फोटो काढून पाठवणे हि गोष्ट मेसेज लिहून पाठवण्यापेक्षा सोपी झाली.

        फोटो काढण्याचे काही ठराविक प्रकार आहेत.आणि हे प्रकार सोशल वेबसाईटवर भरभरून पाहायला मिळतात.प्रकार जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येक जण आपली शैली जपून आहे.या डिजिटल एस एल आरच्या जगात फेसबुकवर 'माय फोटोग्राफी' किव्वा तत्सम एखादे पेज काढून त्यावर अहोरात्र फोटो टाकणार्यांची संख्या कमी नाही.
 
        समुद्रकिनारी गेल्यावर सूर्यास्त किव्वा सूर्योदय यांचा फोटो काढणे यासारख्या 'तोच तोचपणाची' सर दुसर्या कशालाच येणार नाही.तीच गणपतीची मिरवणूक,तेच दिवाळीचे फटाके,तेच प्राणी,तेच पक्षी,तेच धबधबे,तीच लग्न सगळे ऑब्जेक्ट आहे तेच आहेत.फक्त कोण किती कल्पकतेने फोटो काढतो यावर आज हि कला शिल्लक आहे असे मला वाटते.

        फोटोग्राफी म्हणजे काय असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर माझे उत्तर असे असेल कि समोर असणारे दृश्य उघड्या डोळ्यांनी जितके स्पष्ट दिसते तितकेच ते फोटो मध्ये उमटविणे याला फोटोग्राफी असे म्हणतात.पण कालानुरूप यात बदल होतोय अशी जाणीव होवू लागली.फोटोग्राफी म्हणजे समोर दिसत असलेली गोष्ट कश्याप्रकारे अजून अर्थपूर्ण आणि आकर्षक दिसू शकेल याचा अंदाज घेवून कॅमेरा चालविणे ( अगदी पु.लंच्या चालविण्याप्रमाणे ) याला फोटोग्राफी असे म्हणतात.जसे दृश्य डोळ्याला दिसते तसेच्या तसे ते फोटोत उतरविणे हा फोटोग्राफीचा एक भाग होऊ शकतो.पण झूम लेन्स या उपकरणाने कदाचित डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी देखील हाती लागू शकतात.हल्ली लोकांचे फोटो पाहून आश्चर्य वाटते.'Aparature','ISO' आणि 'Shutter' या आकड्यांच्या त्रेराशिकात विविधता आणून अनंत प्रकारचे आणि हवे तसे फोटो काढता येवू शकतात हि गोष्ट शिकण्यासारखी आहे.

     फोटोग्राफी हा महागडा छंद मनाला जातो.काल नविन असलेला कॅमेरा आज जुना होतो.पण तुमच्यात असलेली कल्पकता आणि कॅमेर्याच्या आय पीस मधून बघण्याची दृष्टी येणाऱ्या फोटोचे भविष्य ठरविते.उंचीवरून कोसळणारा धबधबा हजारो लोक बघतात आणि फोटो देखील काढतात.पण तेच दृश्य जो वैविध्यपूर्ण टिपू शकतो तोच खर्या अर्थाने हि कला जपतो.कॅमेर्याची तांत्रिक बाजू तर आहेच पण काढणार्याचे कौशल्य आणि पारखता येणाऱ्या फोटोला कारणीभूत ठरते.

        फोटो काढण्याचे पण प्रकार असावेत.कदाचित फोटोमध्ये असणाऱ्या प्रसंगामुळे तो फोटो आवडू शकतो.मग त्या बाबतीत फोटोची गुणवत्ता तितकी चांगली नसेलही.सचिन तेंडूलकर बरोबर काढलेला फोटो थोडासा हललेला असेल तरी तो कायम जवळचाच वाटतो.मग तेव्हा आपण त्याच्या कंपोझिशनला महत्व देत नाही.पण हेच समजा एखाद्या निसर्गाच्या फोटोचे झाले तर ते आपल्याला खटकते.काही फोटोतील संदेश कदाचित आवडतो त्यामुळे तो फोटो आवडतो.काही लोक रस्त्यावर पडलेल्या चपला देखील इतक्या कलेने टिपतात कि कदाचित त्या फोटोत तसे काहीही नसले तरी केवळ कौशल्याच्या बळावर तो फोटो दाद घेवून जातो. एखाद्या मूर्तीचा फोटो समोरून सगळेच काढतात.याचा अर्थ समोरून काढलेला वाईट आहे असे नाही पण एकाच ओब्जेक्टचा जर वेगळा विचार करून फोटो काढला तरी त्याचे नाविन्य वाढविता येते एवढे निश्चित.

        फोटो काढणे हि जर कला असेल तर फोटो पाहता येणे याला देखील एक विशिष्ठ नजर आवश्यक असतेच.शेवटी प्रेक्षक जाणकार असल्याशिवाय सादरकर्त्याला कौतुकाचे किव्वा टीकेचे देखील समाधान मिळत नाही.ज्या लोकांना हललेला फोटो म्हणजे काय हे समजात नाही त्यांना फिरणाऱ्या पवनचक्कीचे फोटो दाखवून उपयोग नसतो.किव्वा ज्यांना 'Motion Blur' म्हणजे काय हेच माहित नसते त्यांना उडणार्या पक्षाचे फोटो दाखवण्यात काय मजा आहे ? जे लोक वाहणाऱ्या पाण्याच्या फोटोला 'किती हलला आहे' असे म्हणणार असतील तर आपण दाखवणारे मूर्ख असा त्याचा अर्थ होतो.याचा अर्थ मला सगळ समजते अशातला भाग नाही.माझी यातली समज अगदीच उथळ आहे फक्त सांगायचा मुद्दा एवढाच कि एखाद्याच्या कलेला दाद देण्याची योग्यता देखील यावी लागते.



        हल्ली विविध सोशल नेटवर्किंग साईटवर हव्या त्या प्रकारचे फोटो बघायला मिळतात.शिकण्यासारख्या गोष्टी चिकार असतात.वन्यजीवांचे फोटो बघून तर अचंबा वाटतो.फटाक्यांचे देखील फोटो इतके सुंदर येतात हे पाहिल्याशिवाय कळत नाही.लग्नाचे फोटो म्हणजे मधे नवरा बायको आणि बाजूला इतर नातेवाईक अशा संस्कारात मी मोठा झालो.पण या सोहोळ्याचे कित्त्येक विविध प्रकारे फोटो येवू शकतात.हे पाहणे म्हणजे मेजवानीच असते.'चमकणाऱ्या विजेचा फोटो कधी काढायचा'? हा प्रश्न येणे किती स्वाभाविक आहे,कारण निमिषार्धात येवून जाणारी वीज कधी कुठे आणि कशी कडाडेल याचा नेम नसतो.आणि तरी देखील अप्रतिम फोटो पाहायला मिळतात.पाहूनच इतक्या गोष्टी शिकायला मिळतात तर हातात कॅमेरा घेतल्यावर शाळाच होईल अशी अवस्था आहे.
        फोटोग्राफीचे एक मात्र निश्चित आहे कि हि गोष्ट छंद आणि व्यवसाय होऊ शकते,किव्वा नुसता छंद होऊ शकतेपण कधीही नुसता व्यवसाय होवू शकत नाही.कारण जिथे कलाकुसर अपेक्षित असते तिथे पाट्या टाकल्या जात नाहीत.आणि जिथे आवड निर्माण होत नाही तिथे पाट्याच टाकल्या जातात.

        तर अशा या अंधार्या खोलीत रुपाला येणाऱ्या कलेबद्दल बोलायचे झाले तर,क्षणार्धात उघडझाप करणाऱ्या शटर मधून जर इतकी चांगली छायाचित्र येत असतील तर सदैव उघड्या असलेल्या डोळ्यांनी काय काय टिपले पाहिजे … 

        फोटो असा यावा कि काढणार्याला कामगिरीचे आणि पाहणार्याला कौतुक करण्याचे समाधान लाभावे.आणि या दोन गोष्टी जमून आल्या कि ती आठवण आपसूकच जपून राहते. 

          आठवणी जपत असताना कलाही जपणाऱ्या या दुधारी तलवारीला माझे नमन … 





हृषिकेश पांडकर
०२-१०-२०१४

Monday, September 22, 2014

तारांगण



    
खेळ म्हटल्यावर ज्यांना ऑलिम्पिक,फुटबॉल,हॉकी,क्रिकेट किव्वा टेनिसपासून ते टूर डी फ्रांस आणि चेसपर्यंतच्या खजिन्यापैकी किमान एक तरी गोष्ट डोळ्यासमोर येते अशा माझ्या सर्व मित्रांना



       आमरस,तांबडा पांढरा रस्सा,जिलेबी,चिकन तंदुरी,अळूची भाजी,मासे,गुलाबजाम किव्वा मटन बिर्याणी हे पदार्थ खाणारे बरेच लोक  असतात.त्यांच विशेष वाटण्यात मजा नाही.पण हे खाऊन आपल्या झालेल्या जेवणाचे जो सर्वार्थाने अस्खलित आणि चोख वर्णन आणि चर्चा करू शकतो न...कौतुक त्याचे आहे...एखादी गोष्ट करण्यापेक्षा त्या गोष्टीबद्दल जो चार चौघात तोंडभर बोलू शकतो तो खरा रसिक..
अगदी हीच व्याख्या तंतोतंत आणि चपखल बसू शकेल ती खेळालाम्हणजे क्रिकेट,फुटबॉल,बॅडमिन्टन किव्वा टेनिस पासून ते परवा परवा संपलेलं कबड्डी.हल्ली खेळण्यापेक्षा खेळ पाहणे,त्यावर आपली मते मांडणे आणि चर्चा करणे यातच खरी रसिकता आहे असा माझा समज बळावत चालला आहे.अर्थात यात काहीही गैर नाही.कोणाचा आनंद कशात असतो आणि कोणी कशाप्रकारे तो उपभोगावा हा सर्वस्वी ज्याचा त्याचा वय्यक्तिक प्रश्न आहे.किंबहुना प्रेक्षकवर्ग असणे हि देखील त्या खेळासाठी प्रेरणाच असते.आणि पु.लंच्या म्हणण्यानुसार क्रिकेट हा खेळण्याचा नाही तर बोलण्याचा विषय आहे.

        आता मधूनच हा विचार डोक्यात यायचे कारण काय ?असा प्रश्न येणे अतिशय स्वाभाविक आहे.या खेळवेड्या देशात राहून खेळापासून अलिप्त वावरणारा अवलिया सापडणे दुर्मिळच.तर अशा या खेळप्रिय देशातील लोकांसाठी माझा एक अनुभव शब्दबद्ध करायची हि एक उठाठेव.
खेळ पाहणे आणि सिनेमा पाहणे या दोन्ही गोष्टी जरी आवडीच्या असल्या तरी कुतूहल आणि आवड जपण्याच्या मर्यादेत कमालीची तफावत आढळते.अर्थात खेळ बघत असताना असलेला उत्साह किव्वा त्यामागची भावना याची पिक्चर काय किव्वा इतर कोणत्याही गोष्टीशी तुलना होवूच शकत नाही.म्हणूनच एखादा खेळ पाहणे याचे महत्व हे फक्त तो खेळ पाहणारा प्रेक्षकच सांगू शकतो.आणि याच खेळ पाहण्याच्या माझ्या अनुभवला लेखणीच्या स्वरूपाने मूर्त रूप देण्याचा हा प्रयत्न.

        'स्पोर्ट्स बार' हि संकल्पना आपल्या कोणालाच नवीन नाही.हि अशी एक जागा असते जिथे खेळ मोठ्या पडद्यावर पाहता येतो आणि जिथे खाण्यापिण्याची सोय असते.थोडक्यात काय तर समविचारी लोकांबरोबर खेळ पाहताना खाण्याचा आनंद पण उपभोगता येणे म्हणजे  'स्पोर्ट्स बार'.प्रत्यक्षात सहज वाटणारी आणि तितकीच सोपी असलेली हि कल्पना अमलात आणणे तसे काही फार अवघड नाही.एक मोठी स्क्रीन,खाण्याची सोय,पिण्याची सोय आणि बसायला जागा या गोष्टींची जमवा जमव झाली कि काम संपते.पण माझा तो अनुभव याच्या कित्त्येक पटींनी पुढचा होता.
 
        प्रसंग तितका जुना नाही.एखादी गोष्ट किती अचूक आणि नाविन्यपूर्ण करता येते याचे अचंबित करणारे प्रात्यक्षिक पाहून मी आलो होतो.राहत्या ठिकाणी एकट्याने क्रिकेटची मॅच पाहण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्याचा आनंद घ्यावा या प्राथमिक विचाराने या अनुभवला सुरुवात झाली.संपूर्ण अज्ञात ठिकाणी जिथे भाषेने देखील हात वर केले होते अशा ठिकाणी या अलीबाबाच्या गुहेत पोहोचल्याचा आनंदमलाझालाहोता.मी त्या चेंडूच्या आकारात असलेल्या जादुई नगरीत प्रवेश केला.बाहेर रखरखीत ऊन पडले होते.आता उन्हाला जर का लक्ख असे म्हटले तर ते प्रसन्नतेचे प्रतिक समजले जाते आणि त्याच उन्हाला जर का रखरखीत म्हटले तर त्या उन्हाचा होणारा त्रास व्यक्त होत असतो.असो,तर बाहेर रखरखीत उन पडले होते,पण त्या गोलाकार वास्तूत मी प्रवेश केला आणि बाहेरच्या जगाशी माझा संपर्क तुटला.

        मी चार पावले आत गेलो समोर मला त्या संपूर्ण गोलाकार इमारतीचा नकाशा दिसला.त्या वास्तुला चार मजले आणि एक गच्ची होती.वास्तविक बाहेरून पाहताना आत असा काही असू शकेल याचा विचार देखील डोक्यात यायची शक्यता नसते.तर या वास्तुला चार मजले आणि एक गच्ची होती आणि प्रत्येक मजला हा एका खेळासाठी समर्पित केला होता.पहिल्या मजल्यावर टेनिस,दुसर्यावर फुटबॉल,तिसर्यावर क्रिकेट आणि चवथ्या मजल्यावर बाकीचे सर्व खेळ.त्यावर असलेल्या गच्चीमध्ये सर्व खेळांच्या सर्व प्रकारच्या गोष्टी विकण्यास ठेवल्या होत्या.थोडक्यात 'एक्झिबिशन कम सेल' प्रकार होता.
                                       
         मी रिसेप्शन काउन्टरवर जावून क्रिकेट खेळाच्या मजल्यावर जाण्याचे सगळे सोपस्कार पार पाडले आणि तिसर्या मजल्याकडे निघालो.पायऱ्या आणि लिफ्ट असे दोन्ही पर्याय उपलब्ध होते.लिफ्टचा दरवाजा फुटबॉलच्या विश्वकरंडक ट्रॉफीच्या आकाराचा होता.जो बंद झाल्यावर आतून टेनिस किव्वा बॅडमिन्टनच्या रॅकेटवर असलेल्या विल्सनचा 'W' तयार होत होता.लिफ्टच्या बटनांना त्या त्या खेळाचे प्रतिनिधित्व करणारे बटन होते.म्हणजे चवथ्या मजल्यावर जाण्यासाठी बॅडमिन्टनच्या शटलच्या आकाराचे बटन तर तिसर्या मजल्यावर जाण्यासाठी स्टंपच्या आकाराचे याप्रमाणे.
        मी तिसर्या मजल्यावर पोहोचलो लिफ्टचे दार उघडले आणि बाहेर आलो.संपूर्ण छतावर क्रिकेट खेळाडूंच्या फोटोचे कोलाज केलेले होते.डाव्या बाजूला लॉर्डस वर असलेल्या 'हॉल ऑफ फेम' प्रमाणे क्रिकेट विश्वातील सर्व मोठ्या स्पर्धांचे विजेते आणि त्यांचे फोटो असलेला मोठा स्क्रीन लावला होता.उजव्या बाजूला हजार ते बाराशे पुस्तके व्यवस्थित रचून ठेवलेली होती.ज्यामध्ये खेळाडूंची आत्मचरित्रे,विस्डेनची नियमावली आणि खेळाचे नियम सांगणारी इतर अनेक पुस्तके या सारखे विविध कप्पे केलेले होते.समोर एक दार होते जे मला प्रत्यक्ष मॅचपाहण्याच्या थियेटरकडे नेत होते.मी आत गेलो.
        आत आल्यावर माझ्यासारखी बरीच लोकं बसली होती.कसोटीसाठी वापरला जाणारा लाल चेंडू अर्धा कापून ठेवलेल्या आकाराची टेबले होती आणि आडव्या ठेवलेल्या बॅटच्या आकाराच्या खुर्च्या.समोर एक भव्य स्क्रीन लावला होता.ज्यावर मॅच दिसणार होती.डावीकडील भिंतीवर तेव्हा होणाऱ्या सामन्याचे सगळे स्टॅटीस्टीक सरकत होते.म्हणजे त्या दोन टीम्सचे आधीचे रेकॉर्ड्स,त्या स्टेडियमची माहिती आणि प्लेयर्सचे रेकॉर्ड्स इत्यादी गोष्टी स्क्रीनवर दिसत होत्या.उजव्या बाजूला चालू असलेल्या सिरीजचे आधीच्या सामन्यांचे ठराविक क्षण डोळ्याखालून जावेत यासाठी ते दाखविणेचालू होते.  

        प्रत्येक टेबलवर मेनुकार्ड ठेवलेले होते.मेनुकार्डच्या शेजारी हेडफोन्स ठेवलेला होता.म्हणजे ज्यांना स्वतंत्रपणे कॉमेंट्री उपभोगायची असेल त्यांच्यासाठी सोय असावी.…हल्ली हर्षा भोगले,गावस्कर यांच्यामुळे कदाचित कॉमेंट्री ऐकणे यापेक्षा उपभोगायला मिळणे असेच म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.
बसायची रचना अशा प्रकारची होती कि कोणालाही उठून बाहेर यायचे असेल तरी स्क्रीन आणि इतर व्यक्ती यांच्या मधून कोणाला जावे लागणार नाही.किव्वा कोणीही मधून जावूच शकणार नाही.बाहेरच्या लॉबीमध्ये उजव्या हाताला कॅन्टीनचे काउन्टर होते.संपूर्ण सेल्फ सर्विस होती.आणून द्यायला किव्वा घेवून जायला येणारी एकही व्यक्ती नजरेस नव्हती. आणि कदाचित त्यामुळेच इतके लोक असूनही लोकांची ये जा जाणवत नव्हती.
त्या खोलीतही तीन भाग केले होते.दोन स्वतंत्र भाग 'Supportar's Den' या नावानी होते तर उरलेला तिसरा एक भाग 'Who Cares' या नावानी होता.म्हणजे तुम्हाला ज्या टीमला सपोर्ट करायचा आहे त्या भागात तुम्ही बसू शकता किव्वा उरलेल्या तिसर्या भागात तुम्ही बसू शकता अशी व्यवस्था केली होती. बरोब्बर चारशे लोक एका खेळासाठी सहज बसू शकतील अशा प्रकारची आसन व्यवस्था होती.मॅच दुसऱ्या दिवशी होती पण या सभोवतालच्या वातावरणाने मला वेगळ्याच दुनियेत नेले होते.परत फिरण्याच्या विचारला फाटा देवून मी इतर मजले बघायचे ठरवले आणि थेट फुटबॉलच्या मजल्यावर येवून पोहोचलो.
       
        संपूर्ण छताला काळे पांढरे पंचकोनअसलेलावॉलपेपर लावला होता.दिग्गज खेळाडूंचे भिंतीत कोरलेले मोठे पुतळे नजरेस येत होते.जागोजागी रेफ्रीच्या हातात असलेल्या शिट्ट्या उलट्या टांगलेल्या होत्या.क्रिकेटप्रमाणेच बाहेरच्या जागेत फुटबॉल संदर्भातील सर्व पुस्तके रचून ठेवलेली होती.विश्वकरंडक आणि इतर सर्व मोठ्या टूर्नामेंटसचे स्टॅटीस्टीक असलेला मोठा LED स्क्रीन डाव्या बाजूला होता.उजव्या हाताला कॅन्टीनची खिडकी होती.संपूर्ण फरशीवर गवताचा गालीचा अंथरला होता,जणूकाही आपण मैदानावरच आहोत.अर्थात गालीचा असल्याने वावरणे सुसह्य होत होते.खेळाडू जास्त माहित नसल्याने मी आजूबाजूच्या भिंती बघण्यात फार वेळ घालवला नाही.आणि थेट समोरच्या व्हिडीओ रूम मध्ये प्रवेश केला. 
 
        फुटबॉल अर्धगोल कापल्यावर जसा दिसतो त्याप्रमाणे मोठी टेबले व्यवस्थित मांडून ठेवली होती.आणि प्रत्यक्ष खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त संघातील इतर खेळाडू ज्या पद्धतीने डगआउट मध्ये बेंचेस वर बसलेली असतात त्या प्रकारची बाकडी खुर्च्या म्हणून मांडून ठेवलेली होती.समोर भव्य स्क्रीन लावलेली होती.तसा सगळी कडे काळोखच होता पण कमी प्रकाशात दिसत असलेले छत अगदी स्टेडीयममध्ये बसल्याची जाणीव करून देत होते.संपूर्ण छतावर गोलाकार स्टेडीयम रंगवलेले होते.
कुठलीतरी मॅच चालू होती,लोक आनंद घेत होते पण कुठेही सावळा गोंधळ नव्हता.आरडा ओरडा जोरात चालू असला तरी गोंधळ कुठेही नव्हता.काही लोक आवाजाकडे दुर्लक्ष करून हेडफोन कानाला लावून शांतपणे बियरचे घुटके घेत सामना पाहत होती.स्क्रीनवर कुठेही स्कोअर अथवा जाहिरात वगरे दिसत नव्हती.स्कोअर किव्वा सामान्यासंदर्भातील इतर सर्व माहिती स्क्रीनच्या वरच्या बाजूला स्वतंत्र ठिकाणी दिसत होती.लोक निवांत रेलून सामन्याचा आनंद घेत होते.खायची,प्यायची कुठलीही कमतरता जाणवत नव्हती. बर इतके पदार्थ,दारू या सर्व गोष्टी असूनही कचरा कुठेही दिसत नव्हता.आणि मुख्य म्हणजे खायला बाहेर जाणारे किव्वा घेवून येणारे या ये जा करणाऱ्या लोकांचा त्रास कोणालाही होत नव्हता.  
     
        खेळ कसा पाहावा किव्वा कसा पाहता यावा याचे स्वप्नवत प्रात्यक्षिक माझ्या डोळ्यासमोर चालू होते.कोणाच्याही आणि कोणत्याही कटकटीशिवाय आणि मित्रांच्या सहवासात आवडता खेळ पाहता येणे यालादेखील हल्ली स्वप्नच म्हणतात.पण इथे ते स्वप्न सत्यात उतरत होते.
संपूर्ण खेळाला वाहून घेतलेली ती वास्तू अंतरराष्ट्रीय खेळाचे जणू प्रतिनिधित्वच करत होती.प्रत्येक खेळाची अथ पासून इतिपर्यंत माहिती व्यवस्थित जपलेली होती.पुढील काळात होणारे सामने कोणते याची सविस्तर माहिती होती. एखाद्या दिवशी त्या खेळाची मॅच नसेल तर त्याच खेळाच्या जुन्या आठवणीतल्या मॅचेस पडद्यावर लावलेल्या होत्या.जणू खेळला अर्पण केलेले मल्टीप्लेक्सच होते.कोणत्यातरी भलत्याच दुनियेत आल्याचा भास पावलागणिक होत होता.अशी एकही जागा सोडलेली नव्हती कि जिथे खेळासंदर्भात कुठलीही गोष्ट नसेल.अगदी वॉशरूम मधील साबणापासून ते कॅन्टीनच्या खिडकीपर्यंत कशालाही अपवाद नव्हता.जिथे या लोकांनी लिफ्ट आणि पायऱ्या सोडल्या नाहीत तिथे बाकीच्या गोष्टींच काय

        सर्वात कमालीची गोष्ट अशी होती कि जगभरात चालूअसलेल्या मॅचेस इथे थेट बघणे शक्य होते.त्यामुळे तुम्ही पहाटे तीन वाजता येवून मॅच बघणार असाल तरी इथे ते सहज शक्य होते.अगदी २४*७ असलेल्या हॉस्पिटलला देखील मध्यरात्री तासभर झोप लागत असेल पण खेळाच्या या महालाला उसंत नव्हती.
विश्वचषक,Champions Legue,EPL,IPL,ऑलिम्पिक,अॅशेस काय वाट्टेल ते सहज बघायची सोय होती.समजा एकाच वेळी एकाच खेळाचे दोन सामने चालू असतील त्या टूर्नामेंट मध्ये असलेल्या रॅन्किंग प्रमाणे जी टीम वर असेल त्या टीमच्या प्रक्षेपणाला प्राधान्य होते. कदाचित टूर्नामेंटचे भवितव्य ठरविणाऱ्या सामन्याचा देखील विचार केला जातो.मॅचेस बघणाऱ्या खेळप्रेमींचे नंदनवनच होते.
        तब्बल नऊ तासांच्या त्या छोट्या फेरफटक्यानंतर मी नाईलाजाने बाहेर पडायचा निर्णय घेतला.काही सामन्यांचा लंच टाइम,काहींचा इंनिंग ब्रेक तर काहींचा हाफ टाइम झाला होता.मधल्या जागेत लोक पाहिलेल्या खेळाचे आणि पुढील निकालावर भाष्य करत होते.

        'आज मॅच एकत्र बघायची का ? या विधानाला आज सकारात्मक होकार मिळाल्याची भावना होती.योग्य व्यक्तींसोबत खेळाचा आनंद घेता येणे यासारखे भाग्य नाही.कारण खेळ हा एकांतात बघण्याचा विषय नाही.आणि त्यावर आपली मते जो मांडत नाही तो कसला आलाय खेळाचा प्रेक्षक.
या नऊ तासाच्या फिरण्यात घड्याळ बघायचे मी साफ विसरून गेलो.आणि भानावर आलो तेव्हा बाहेरील सूर्याची जागा चंद्राने घेतली होती.पण दमल्याचा मागमूस नव्हता.

        पुढची मॅच कुठली बघायची हे ठरवून मी बाहेर निघालो होतो.बाहेर जात असताना रिसेप्शन काउन्टरवर लावलेला 'Thank You'चा बोर्ड देखील कुठल्या चीयर लीडर ने धरला आहे कि काय इतके वाटेपर्यंत मी या खेळाणे भरलेल्या वास्तूशी एकरूप झालो होतो.मी ते काचेचे दर उघडून बाहेर आलो.बाहेर गारठा जाणवत होता.थोडे पुढे चालत जावून रस्त्यावरून पुन्हा पाठीमागे वळून ती वास्तू पहिली. 
कल्पना किती साधी असते पण ती वास्तवात आणायची इच्छाशक्ती आणि कल्पकता किती नाविन्यपूर्ण गोष्टीना जन्म देते याची आज प्रचीती आली होती. 

    सगळ्या प्रकारचे तारे एकाच छताखाली दाखवणारे अंगण पहिले.आज खर्या अर्थाने तारांगण पाहिल्याचे समाधान मिळले होते.

        सुखाच्या व्याख्या वय,आवड आणि परिस्थितीनुरूप बदलतात हे जरी वैश्विक सत्य असले तरी सुखाची व्याख्या मर्जीनुसार बदलायचे संपूर्ण अधिकार प्रत्येकाने स्वतःपाशीच अबाधित ठेवले पाहिजेत.    




हृषिकेश पांडकर
१९.०९.२०१४