हरीण म्हणलं की डोळ्यासमोर येते ते नाजूक,लाजाळू,चपळ आणि प्रचंड घबराट जनावर.पण त्या हरणाच्या जातीला देखील बरेच प्रकार आहेत.
आधी सांबर,चितळ,काळवीट,चौसिंगा,नीलगाय हे सगळे लोक एकच वाटायचे.कालांतराने रंग,आकाराने साधारण अंदाज येवू लागला.तरी देखील या सर्वांमध्ये मुख्यत्वे दोन भिन्न कुटुंबांचा समावेश असतो हे वेळेनुरूप समजले.हरीण म्हणजेच मृग अशी समजूत होती. मात्र थोडे खोलात शिरल्यावर मृग आणि हरीण ही भिन्न कुटुंब पद्धती आहे हे उमगले.
ज्यांची शिंगे झाडांच्या फांद्यांप्रमाणे एकात एक असतात ते म्हणजे हरीण (डियर) आणि ज्यांची शिंगे अशी एकात एक नसतात ते म्हणजे मृग (अँटेलोप).चितळ,सांबर,भेकर, बारासिंघा इत्यादी हे हरीण जातीचे उपप्रकार.तर चिंकारा,काळवीट,चौसिंगा हे मृगाचे प्रकार.
प्रत्यक्ष पाहिल्यावर या गोष्टी नव्याने समजत गेल्या आणि त्या मागचे बारकावे उलगडत गेले. भारतातील जंगलात हे दोन्ही प्रकार आणि त्यांचे सगळे उपप्रकार पहायला मिळतात हे आपले भाग्य.
ही मृग प्रस्तावना लिहायचे कारण म्हणजे हा फोटो.हा फोटो आहे हरीण जातकुळीतील 'बारासिंघा' या प्राण्याचा. दिसायला काहीसा आपल्या ठिपक्या ठिपक्याच्या हरणासारखाच असतो मात्र याची खासियत आहे ती वेगळे पण जपणाऱ्या शिंगांच्या रचनेत.'बारासिंघा' या नावाला जगणारा हा प्राणी. डोक्यावर बारा टोकांचा मुकुट घालणारा हा जीव सहसा सगळी कडे पहायला मिळत नाही.
मध्य भारतातील कान्हा अभयारण्यातील हा फोटो. हा प्राणी केवळ इथे पहायला मिळू शकतो. मुद्दाम संरक्षण देऊन आणि काळजी घेऊन या प्राणायची संख्या वाढविण्यात आली.मात्र या व्यतिरिक्त इतर कुठेही हा प्राणी नजरेस येत नाही.
हिवाळ्यातील पहाटे कोवळ्या सोनेरी उन्हात कान्हाच्या माळ रानावर चालणारे बारासिंघा आणि त्यांच्या शिंगात अडकलेले हे गवत क्षणात लक्ष वेधून घेते. शिंगात अडकलेले गवत/शेवाळे मादीला आकर्षित करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे कळपातील नराच्या शिंगावर हे दृश्य पहायला मिळू शकते.
पिवळ्या चट्ट्या पट्ट्यांच्या ओढीने जर कान्हा ला जाणार असाल तर नक्कीच जा पण जेव्हा जाल तेव्हा फक्त इथेच पहायला मिळणार हा 'हार्ड ग्राउंड बारासिंघा' नक्की पहा.आपापल्या परीने जंगलाचे सौन्दर्य वाढवणारे हे जीव प्रत्यक्षदर्शी खरंच खूप सुंदर दिसतात आणि हा बारा तुऱ्यांचा मुकुटधारी तर फक्त इथेच पहायला मिळू शकतो.
हृषिकेश पांडकर
१३.०२.२०२०
Kanha National Park | India | January 2020
No comments:
Post a Comment