Friday, February 14, 2020

वॅलेंटाईन

 पहिल्या दुधापासून ते आज सकाळच्या चहापर्यंतच्या प्रत्येक क्षणात सोबत असणारी आई तर वॅलेंटाईन आहेच..

पण अयोग्य वेळी घरी अवतरण्यापासून ते सणासुदीला,आनंदात,दुःखात एक कुटुंब म्हणून उभ्या असलेल्या सर्व नातेवाइकांकडूनही खूप प्रेम मिळाले…

खुर्चीला धरून उभे राहण्यापासून ते स्वबळावर दोन्ही पायांवर उभे रहायला शिकवणारे बाबा तर वॅलेंटाईन आहेतच..

पण दिवाळीच्या आदल्या रात्री फटाक्यांची योग्य वाटणी करण्यापासून ते वेगसच्या कसिनो मध्ये 'हे घे लाव अजून पैसे' म्हणणाऱ्या भावाकडूनही खूप प्रेम मिळाले...

नवरा-बायकोच्या विनोदावर तितक्याच सहजतेने हसणाऱ्या आणि आमच्या चौकोनी कुटुंबात बेमालूम मिसळलेली बायको तर वॅलेंटाईन आहेच..

पण भाऊबीज,रक्षाबंधनाला नेमाने हफ्ते घेण्यापासून ते 'दादा मला एक वाहिनी आण' या आणि इथून पुढल्या प्रवासातही एक स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या लाडक्या बहिणींकडूनही खूप प्रेम मिळाले…

सहलीची बस हाय-वे ला लागल्यावर मोठ्या आवाजात गाणी लावून आमच्या सोबत नाचणारे आमचे सर माझे वॅलेंटाईन आहेतच..

पण शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभे केल्यावर चोरून फुटाणे देणाऱ्या आणि सुट्टीची बातमी आणणाऱ्या शिपाई काकांकडूनही खूप प्रेम मिळाले…

'सुसंस्कार' या परिघाबाहेरही जग आहे याची जाणीव करून देणाऱ्या आणि यश,अपयश,प्रगती,अधोगती या आणि अशा सर्व प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभे असलेले मित्र तर वॅलेंटाईन आहेतच..

पण निंदकाचे घर असावे शेजारी या बाण्याला तंतोतंत जागलेल्या निंदकांकडूनही खूप प्रेम मिळाले…

विमानातून प्रवास करताना लाघवी सौन्दर्यात कमालीचे अगत्य दाखविणाऱ्या एअर-होस्टेस तर वॅलेंटाईन आहेतच..

पण लाल डब्यातून जात असताना कडक उन्हातही खिडकीतून काकडी सरकविणाऱ्या आज्जींकडूनही खूप प्रेम मिळाले…

वानखेडेवरवर जाऊन सचिनची शेवटची कसोटी बघणे ही गोष्ट वॅलेंटाईन आहेच..

पण गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन किट-कॅट बॉलच्या 'हाप्पीच' मॅचकडूनही खूप प्रेम मिळाले…

दिल्लीत राजपथावर जाऊन पाहिलेली स्वातंत्र्यदिनाची शिस्तपूर्ण परेड तर वॅलेंटाईन आहेच..

पण 'राष्ट्रीय झंडे को सलामी दो' म्हणल्यावर शाळेतल्या तिरंग्याला वंदन करून ताठ मानेने राष्ट्रगीत म्हटलेल्या स्वतंत्रदिनाकडूनही खूप प्रेम मिळाले…

दोन फुटी लेन्स लावून पक्षांची पिसं आणि वाघाच्या भुवया मोजण्या पर्यंत केलेली फोटोग्राफी तर वॅलेंटाईन आहेच..

पण फक्त वरचे गोल बटन फिरवून ओळीने येणाऱ्या ठरलेल्या पंधरा किल्ल्यांचे फोटो दाखवणाऱ्या वीतभर कॅमेऱ्याकडूनही खूप प्रेम मिळाले…

बर्फाच्छादित हिमशिखरांनी नटलेला उत्तरेचा हिमालय,हिरवा शालू नेसलेला दक्षिण भारत, सात बहिणींचे सौन्दर्य आणि ओरिसा कलकत्त्याच्या पारंपरिक कलेने मढलेला पूर्व भारत तर वॅलेंटाईन आहेच..

पण अरबी महासागराला थोपवून धरलेल्या आणि ताम्हिणी,आंबोली,वरंधा सारख्या निसर्गाने ओतप्रोत भरलेल्या सह्यादीकडूनही खूप प्रेम मिळाले...

सहज डोक्यात येणाऱ्या प्रत्येक प्रेमळ व्यक्ती,वस्तू आणि प्रसंग वॅलेंटाईन आहेतच..

पण नकळत प्रेम लुटणाऱ्या आठवणी खऱ्या अर्थाने वॅलेंटाईन आहेत आणि राहतीलही...

ज्या सर्वांकडून जे काही प्रेम मिळाले त्या सर्वांना वॅलेंटाईन डे च्या मनापासून शुभेच्छा...

हॅपी वॅलेंटाइन्स डे…

हृषिकेश पांडकर

१४.०२.२०२०

 

No comments:

Post a Comment