'पिकतं तिथं विकत नाही' आणि 'गाढवाला गुळाची चव काय' या वास्तविक दोन भिन्न अर्थाच्या म्हणी आहेत.पण सद्य परिस्थिती पाहता काही अंशी या दोन्ही म्हणी आपल्याला चपखल बसतात.
आज शिव छत्रपतींची जयंती. एकाच व्यक्तीची जयंती एकाच वर्षात एक पेक्षा जास्त वेळा साजरा करणारा कदाचित भारत हा पहिलाच देश असेल.
शिवरायांची मूल्य,कर्तृत्व,विचारधारा,किल्ले आणि तत्सम असंख्य वास्तू या सर्व खजिन्याचा वारसा सोडून आपण इतर नको त्या गोष्टी पुढे घेऊन आलो हे आपले दुर्दैव.राजकारणासाठी राजांचे नाव,शक्ती प्रदर्शनासाठी राजांचे नाव,स्मारक बांधणी आणि गडांच्या डागडुजीसाठी निधीसंकलनापुरते महाराजांचे नाव,तुटपुंज्या मतांसाठी महाराजांचे नाव आणि या दोन जयंत्यांच्या दिवशी 'जाणता राजा' लिहिलेला भगवा मिरवण्यापुरतेच आपले छत्रपती आपल्यात शिल्लक आहेत का ?
हा वर टाकलेला फोटो ऍमस्टरडॅम मधील 'Rijksmuseum' या संग्रहालयातील आहे. वेळेअभावी या संग्रहालयात जाऊन हे चित्र प्रत्यक्ष पाहता आले नाही पण या संग्रहालयाच्या प्रवेशदारा शेजारी असलेल्या लॉबीमध्ये याच चित्राचे छोट्या आकाराचे छायाचित्र लावलेले आहे ते पाहिले.'Rijksmuseum' हे डच राष्ट्रीय संग्रहालय आहे. युरोपातील इतर भव्य संग्रहालयांच्या तुलनेत काहीसे लहान. कला आणि इतिहास येथे जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथे हे चित्र पहायला मिळते.
कागदावर जलरंगात रेखाटलेले हे चित्र. मुख्यत्वे सोनेरी,काळा आणि पांढरा हे रंग यात वापरलेले आहेत.कलाकाराच्या नावाचा उल्लेख येथे नाहीये किव्वा तितकी माहिती उपलब्ध नाहीये.पण चित्र नीट पाहिल्यावर समजते कि २/३ ओळींचे चित्राबद्दलचे वर्णन डच भाषेत खाली लिहिलेले आहे.
हे सांगायचा मुद्दा एवढाच कि यूरोपातील कोणत्या एका छोट्या शहरातील तश्याच काहीश्या लहान संग्रहालयात हे छत्रपतींचे चित्र जतन करून ठेवले आहे. आता ही गोष्ट घराच्या गच्चीवरून सिंहगड,तोरणा आणि हाकेच्या अंतरावर लाल महाल असणाऱ्यांना किती अभिमानाची असेल आणि असायलाच हवी.
कधीही कोणाचे सहजासहजी कौतुक न करणारे गोरे लोक जर कौतुकाने आदराने महाराजांचा फोटो आपल्या संग्रहालयात ठेवत असतील तर त्या राज्याचे मोठेपण काय असले पाहिजे.आणि असा राजा आपला होता हे आपले भाग्य किती थोर.
पण दुर्दैवाने आज लाल महाल आपण नीट जतन करू शकलो नाही किव्वा तोरणा,सिंहगड,पुरंदर,राजगड रायगड यांसारख्या अभेद्य स्मारकांना ऐतिहासिक वारशाचे तितकेसे महत्व देऊ शकलो नाही.
चूक कोणाची,जबाबदारी कोणाची त्यामागचे राजकारण,समाजकारण आणि अर्थकारण हा मुद्दा इथे घ्यायचाच नाहीये पण सोन्यासारखा इतिहास आणि छत्रपतींसारख्या राजाचे छत्र लाभलेला आपला महाराष्ट्र आज त्यांच्याच आठवणी जपण्यात अपयशी ठरला ही खंत या फोटोकडे बघताना येत राहते.
राजांविषयी अभ्यासपूर्ण लिहिणारा किव्वा बोलणारा यात मी कुठेच नाही. पण एक भारतीय म्हणून सातासमुद्रापार जेव्हा आपण असे अनुभव घेतो तेव्हा ही सल प्रकर्षाने बोचते एवढे नक्की. म्हणूनच कदाचित 'पिकतं तिथं विकत नाही' आणि 'गाढवाला गुळाची चव काय' या दोन्ही म्हणी आपल्यालाच तंतोतंत लागू होतात याचा प्रत्यय येतो.
'राजे तुम्ही परत या' असे आपण मोठ्या आवेशात म्हणतो तेव्हा राजांचेच असलेले तेव्हाचे सुराज्य आणि साम्राज्य त्याच राजांसमोर आपण तेवढ्याच अभिमानाने दाखवू शकू का हा प्रश्न तेवढाच अनुत्तरित राहतो..
शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा !!!
हृषिकेश पांडकर
१९.०२.२०२०