'घासाघाशीच्या' प्रकरणानंतर काल चार आजोबांमध्ये झालेला संवाद जसाच्या तसा तुमच्यासमोर ठेवतोय कुठेही 'ध' चा 'मा' केलेला नाही.
'विनाशकाले विपरीत बुद्धी' हो दुसरं काय आणि हो 'करावं तसं भरावही लागत' म्हणलं.इतकी चांगली बॅटिंग,भारी कॅप्टनशिप पण म्हणतात ना 'दैव देते आणि कर्म नेते'.बघा ना 'तेल गेले तूपही गेले आणि धुपाटणेही' गेल्यातच जमा आहे.आधीच मालिकेत पिछाडीवर पडले होते त्यात हि ब्याद आली.'दुष्काळात तेरावा महिना' दुसरं काय.मैदानावर लपून चोरी करणाऱ्याला अगदी 'शेरास सव्वाशेर' व्हिडीयोग्राफर भेटला म्हणायचा.आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहेच त्यात आयपीएल मधला प्रवेशही नाकारला म्हणजे 'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना' अशी अवस्था झाली की.एवढे मोठे विश्वविख्यात खेळाडू पण म्हणतात ना 'नाव मोठे आणि लक्षण खोटे'.ऑस्ट्रेलियन प्रवूत्ती अजून काय वेगळं काय समोर येणार होतं.एवढ्यात मागून जोशीबुवा हळूच म्हणाले 'कडू कारले तुपात तळले,साखरेत घोळले तरी ते कडूच'.
याचा फटका इतर इमानदार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना नक्की बसणार.कसंय तात्या 'ओल्याबरोबर सुकेही जाळायचेच' असो.पण या तिघांच्या बंदीमुळे रिकाम्या झालेल्या जागेवर यायला पोत्यानी लोक उतावळे असतील.कसं सांगू नाना 'एकाची जळते दाढी आणि दुसरा त्यावर पेटवू बघतो विडी' आणि मजा अशी आहे की आता थोडे दिवस जिंका किंवा हरा शिव्या तर तशाही तुम्ही खाणारच कारण 'एकदा का नाव कानफाट्या पडले कि पडलेच'.आणि बरका तात्या आता त्या स्मिथला सांगा, रडून वगरे पण फायदा नाही ओ 'ऋण फिटेल पण हीन फिटत नाही'.
मी तर म्हणतो आता 'आलिया भोगासी सादर झालेले उत्तम' कसे ? (अनुनासिक).उगीच 'फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावत बसायला सांगितलंय कोणी'.अहो आज मी त्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी खेळाडूंचा ट्विट का फिट काहीतरी वाचला या प्रकरणाबद्दल, उगीच आपला शहाणपणा, 'आपले नाही धड आणि शेजाऱ्याचा कढ. पण काही म्हणा नाना त्या प्रकरणामुळे आयपीलचे पैसे सुद्धा बुडाले म्हणायचे यांचे खरंच आहे 'आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी'.आता या प्रकरणातून इतरांनी शिकावे म्हणजे झाल. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा'.दामूकाका वैतागून म्हणाले कशाला पुढचा मागचा करताय अण्णा,यांच्याच टीम ने शंभर वेळा माती खाल्ली पण पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न' ते आहेतच.आधीच चिडके चिडके म्हणून ख्याती होतीच आत तर काय 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास'.लोक अजून काही बाही लिहून जखमेवर मीठ चोळत असतातच.
आणि काय हो अण्णा हे लोक त्या स्मिथची बरोबरी आपल्या कोहली बरोबर करायचे म्हणे.'कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली'.त्या स्मिथ पाठोपाठ तो वॉर्नर निघाला तो बँक्रॉफ्ट निघाला 'यथा राजा तथा प्रजा'.पण हे लोक आयपील मध्ये नाहीत हे बघून त्या राजस्थान आणि हैद्राबाद सारख्या टीमची अवस्था जरा डोलायमान झाली म्हणायची.हे म्हणजे 'असून अडचण नसून खोळंबा'.इतका गुणी खेळाडू पण शेवटी 'वाल्मिकीचा वाल्याकोळी झाला' हो दामूकाका.'तीन तिघाडा काम बिघाडा' झाले म्हणायचे कांगारूंचे.'बुडत्याचा पाय अजून खोलात' जाऊ नये हीच सदिच्छा.
जाऊदे हो आपल्यलाला काय करायचंय ? आपलं चहाच बघू. शेवटी काय 'आपण बरं आणि आपलं काम बरं'...चला..मामा चार चहा द्या बरं..
हृषिकेश पांडकर
No comments:
Post a Comment