Tuesday, March 27, 2018

माझ्या मोबाईल इनबॉक्सची व्यथा..!!!

 माझ्या मोबाईल इनबॉक्सची व्यथा..!!!

सोनियाताईंच्या माहेरची साडी घालून,शर्मांची लेक कोहलींची सून झाली,

क्रिकेट आणि बॉलिवूड ची 'मैत्री' पुन्हा 'रिश्तेदारी'मध्ये बदलली.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या जोडप्याच्या नावे झाला...

आयपीएलच्या बाजारात पुन्हा एकदा विकले गेले खेळाडू.

परदेशी लोकांना हाती घेऊन, परराज्याला नमावायला सज्ज झाले खेळाडू

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या कोट्याधीश खेळाडूंच्या नावे झाला...

'झुमर झुमर' म्हणत भंसाळींची पद्मावती आली

थेटरात पोचेपर्यंत तिची पार रया निघून गेली.इतिहास आणि स्वातंत्र्य याच्या नावाखाली उहापोह झाला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या खिलजी-पद्मावतीच्या नावे झाला…

शाळेतल्या मुलीने मारलेला डोळा संबंध देशाला लागला.

समोरचा मुलगा तर जाऊचदे,त्याचा धक्का इतर अनेकांनी उपभोगला

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या अल्लड मुलीच्या नावे झाला...

लोकांचे पैसे घेऊन देश सोडणाऱ्यांच्या रांगेत 'मोदी' उभा राहिला.

सामान्य माणूस तसाच हतबल,सहिष्णू आणि कायदेशीर कारवाईचा अजेंडा तितकाच 'नीरव' राहिला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या सालस,सोबर आणि सदाचारीच्या नावे झाला...

स्वतःच्या काकांचा हात सोडून दुसऱ्या काकांना जाणून घेणाऱ्या इंजिनाची शिट्टी सर्वांनीच अनुभवली.

आधी दिल्ली कि आधी महाराष्ट्र या चर्चेतच ती संध्या मावळली.

गप्पांच्या फलिताचे तर्क लावण्यात सामान्य बुडून गेला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या काका-पुतण्यांच्या नावे झाला...

'बिजली गिराने में हू आई' म्हणणारी खऱ्या अर्थाने बिजली टाकून निघून गेली.

तांब्या आणि बादलीने अंघोळ करणाऱ्यांना सुद्धा आज टबबाथ मध्ये बुचकळून गेली.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र दारू,मोगरा आणि तिरंग्याच्या नावे करून गेली...

गावागावातून बळीराजा अनवाणी चालत आला.

कोणाला न्याय,कोणाचा स्वार्थ या गोष्टी तेवढ्या गुलदस्त्यातच राहिल्या.

राजकारण किती आणि वस्तुस्थिती काय याचा अंदाज लावत सामान्य पुन्हा चर्चेत रंगला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र त्या अनवाणी आणि आशाळभूत बळीराजच्या नावे झाला..

अपंगत्वावर उभेराहून 'कृष्णविवरावर' सिद्धांत मांडणारा ब्रिटिश अवलिया त्याच अनंतात विलीन झाला.

सापेक्षतावाद आणि किरणोत्सर्जन या शब्दांशीही संबंध नसणार्यांनी श्रद्धांजलीत दिवस खर्ची पडला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र त्या खुर्चीतल्या आजोबांच्या नावे झाला...

फेसबुक मधून माहितीची चोरी होते याचा बोभाटा विश्वाने अनुभवाला.

निषेध नोंदवायला पुन्हा त्याचाच सहारा घेतला.

झुक्याच्या माफीने सामान्य तेवढा समाधानी झाला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र 'कुठल्या पोस्ट टाका कुठल्या पोस्ट काढा' च्या सूचनांच्या नावे झाला...

लंकेसमोर डोलणारा नाग शेवटी वेटोळे करून टोपलीत शिरला.

मोरावरच्या कार्तिकात देशाने गारुडी शोधला.

पहिले पाढे पंचावन्न म्हणत नागोबा तेवढा विसावला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र विजयाच्या जल्लोषापेक्षा अद्दल घडवल्याचा आनंदात ओथंबला...

शेवटचा 'पांढरा गेंडा' गेला म्हणून सर्वांनीच गळा काढला.

गेल्याचे दुःख नक्कीच होते पण असा प्राणी होता हे त्या जातीतला शेवटचा जीव गेल्यावर कळावे या सारखा विरोधाभास जास्त मजेशीर होता

चित्ता म्हणजेच बिबट्या आणि लांडगा म्हणजेच कोल्हा अशी समजूत असणाऱ्या सर्वांच्या श्रद्धांजलीने तो जीवही अनंतात विलीन झाला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र त्या 'पांढऱ्या गेंड्याच्या' नावे झाला…

'मी नाही त्यातली,कडी लावा आतली' चा आव आणणाऱ्या जंटलमन लोकांना आज चांगलाच हिसका बसला.

बॉल घासून गुळगुळीत करण्याचा नादात सगळा संघच रुतला.

तंत्रज्ञानासमोर उघड पडला चिडक्यांचा खोटेपणा.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र 'चड्डीत घातलेल्या हाताने' हसला...

पहिल्या तीन महिन्यातच माझा मोबाईलचा इनबॉक्स इतका थकला.

अजून काय जिरवावे लागेल याच चिंतेने ग्रासला.

चार टप्प्यातील पहिला टप्पा आता कुठे संपला.

सगळा इनबॉक्स क्लियर करेपर्यंत कोकणचा राजा येऊन ठेपला... ☺

- हृषिकेश पांडकर

 

No comments:

Post a Comment