Friday, May 4, 2018

भाऊ रंगारी

 दुपारी साधारण सव्वाचा प्रहर होता.रस्त्यावरच डांबर जळणाऱ्या मेणबत्तीच्या वितळणाऱ्या मेणाप्रमाणे वितळेल आणि त्यात माझा पाय रुतेल कि काय या भीतीने मी अप्पा बळवंत चौकातून दगडूशेठकडे चाललो होतो.पूना बेकरीकडे जाणाऱ्या शक्य तितक्या अरुंद रस्त्याच्या कोपऱ्यावर वडापाव,भजी आणि पाव पॅटिस विकणाऱ्या काकूंचा गाडा उभा होता.काळ्या ठिक्कर कढईतले तेल उन्हाने उकळतंय आणि खाली धग्धगणारा विस्तव फॅशन म्हणून लावलाय अस वाटावं इतका तो लोहगोल आग ओकत होता.


 

एक मे ची सुट्टी होती खरी पण रस्त्यावर शांततेचा मागमूस नव्हता.सिग्नलला तुंबलेल्या गाड्या आणि फरासखान्यासमोरून गाड्या चुकवत वाट काढणारे पादचारी हे दृश्य पाहून गर्दीला बगल देण्याच्या हेतूने मी वाकडी वाट केली आणि थेट भाऊ रंगारी गणपतीच्या गल्लीत शिरलो.

रखरखीत उन्हात त्या निमुळत्या गल्लीत तुरळक वर्दळ होती.स्वातंत्र्य लढ्यात वापरलेली प्राचीन शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी इथे यायचो.अजूनही ठेवलेली आहेत.

भाऊसाहेब रंगारी यांचे निवासस्थान.रंगारी वाडा,पुण्यातील एक वारसास्थान.आणि त्या शेजारी विराजमान असलेली हि कागदाच्या लगद्यापासून बनविलेली लंबोदराची मूर्ती.मंदिराचे बाहेरचे दार बंद असल्याने मूर्तीवर तितकासा प्रकाश नव्हता मात्र यामुळे मूर्तीचे तेज जराही झाकोळले जात नव्हते.

गजाननाची प्रसन्न मूर्ती आपण नेहमीच पाहतो.पण असे रागीट भाव धारण केलेली हि मूर्ती क्वचितच पहायला मिळते.अश्याच उत्कट भावाची प्रतिमा हत्ती गणपतीची देखील आहे.पुण्यातील काही मंडळांच्या देखाव्यापेक्षा त्यांच्या विनायकाच्या रेखीव आणि कोरीव मुर्त्या जास्त लक्षात राहतात त्यापैकी हि एक.

शनिवारवाडा,लालमहाल,मंडई या गोष्टी जवळून पाहण्याचा कधी योग आलाच तर हि वेगळ्याच धाटणीची मूर्ती आवर्जून पहा.आणि त्याच बरोबर शेजारील वाड्यात मांडलेली प्राचीन शस्त्रे देखील.'सार्वजनिक गणेशोत्सव' या विचित्र वादामुळे चर्चेत आलेल्या भाऊ रंगारी मंडळाचे हे रूप खूपच सुंदर आहे.

 

No comments:

Post a Comment