ज्याच्या नावातच त्याच्या सौन्दर्याचा उल्लेख आहे असा हा नवरंग.आपल्या वीतभर आकारात नऊ विविध रंग धारण करणारा हा जीव पहायला जितका मनोहारी वाटतो तितकाच तो शोधायला अथवा पहायला मिळणे अवघड आहे.
अतिशय चुणचुणीत आणि चंचल असा हा नाजूक जीव.पश्चिम घाटावर मिळणार नवरंग आणि पूर्वेच्या किनाऱ्यावरील खारफुटीवर मिळणार 'मॅन्ग्रूव्ह पिट्टा' या मध्ये दिसायला जरी साम्य असले तरी दोघांची विभागणी करण्याइतका फरक नक्कीच आहे.'पिट्टा' हे या पक्षाचे इंग्रजी नाव.
बोटीतली सफारी पूर्ण करून झाल्यावर सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास आम्ही त्या खारफुटीच्या कोरड्या पायवाटेवरून जात असताना, डाव्या अंगाला पसरलेल्या झाडीत हा नजरेस आला.थोडासा चिखल गाळ काही ठिकाणी वाळलेला घट्ट झालेला गाळ आणि त्यातून तोंड वर केलेली असंख्य बारीक काठ्यांसारखी मुळे.त्या दाटीवाटीत उड्या मारणारा हा रंगीबेरंगी वीतभर नवरंग आपले खाद्य शोधत बागडत होता.
उन्हाची तिरीप आणि आड न येणारी फांदी यांची प्रतीक्षा करून आम्ही आपापले क्षण टिपत होतो.रंगीत असल्यामूळे एवढ्या काट्याकुट्यातही हा पक्षी आपला वेगळेपण सिद्ध करतो.समोरून पाहण्यापेक्षा मागून किव्वा एका बाजूने पाहताना याच्या अंगावरील सर्वांच्या सर्व नऊ रंग व्यवस्थित पाहता येतात.
पायाखाली आलेल्या कोरड्या पानांचा आवाज टाळून आणि शक्य तितक्या सावधपणे हालचाल करून हा फोटो टिपण्यासाठी केलेल्या अट्टाहासातच या फोटोचे समाधान दडलेले आहे.चिखलात राहणारे पक्षीही सुंदर दिसू शकतात यावरही आता शिक्कामोर्तब झाले.
Odisha,India | January 2018
No comments:
Post a Comment