Tuesday, May 2, 2017

Sachin - A billion dreams

'क्रिकेटच्या अलीकडे आणि पलीकडे देखील खूप गोष्टी आहेत.क्रिकेट आयुष्यात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे मात्र जी गोष्ट शेवटपर्यंत राहणार आहे ते म्हणजे आपण एक माणूस म्हणून कसे आहोत'. या केंद्रबिंदू भोवती रेखाटलेली हि कारकीर्द.अनंत वेळा वाचलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टी पुन्हा एकदा तश्याच स्वरूपात जगणे तितकेसे उत्साहित करणारे नसते.आणि पुन्हा एकदा सचिन याला अपवाद ठरतो.१९८९ ते २०१३ या चोवीस वर्षाच्या कालखंडात ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी आहेत तश्याच मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहता पाहता सचिन कडून त्या बाबतीत ऐकणे हा अनुभव खूप वेगळा आणि मजेशीर आहे.


 

सिनेमा संपल्यावर थियेटर मधून बाहेर पडताना अनंत आठवणी,सगळ्या भावना आणि सरलेले सोनेरी दिवस पुन्हा एकदा डोकावून जातात.कारण सचिनचे चोवीस वर्षाचे करियर हे फक्त त्याचेच नाहीये.संपूर्ण भारताचा मूड एका लाकडी फळकुटाने सांभाळणारा अवलिया त्याच्याच तोंडून जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा माझ्या बालपणीच्या आणि तारुण्याच्या संपूर्ण प्रवासातले आठवणींचे बुकमार्क आज एकदा नीट तपासून परत खोवले जातात.सिनेमाचे कथानक शूटिंगच्या जागा किव्वा प्रत्येक बारीक गोष्ट माहित असूनही पाहण्याची ओढ असणे यातच सिनेमाचे यश आहे.किंबहुना हा सिनेमा नसून सचिननेच त्याची हि चोवीस वर्ष आपल्या समोर उघडली आहेत.यात अशी एकही गोष्ट नाहीये जी आपल्याला माहित नाहीये.नवीन पहायला मिळेल या आशेने जाण्यापेक्षा जुने आणि जपून ठेवलेले आठवणीतले दिवस उलगडण्यासाठी जाणार असाल तर नक्की सिनेमाला जा.

शारदाश्रम,साहित्य सहवास, शिवाजी पार्क इथं पासून ते अगदी “Dhoniiiiiiiiiii……….finishes off in style…..a magnificent strike into the crowd…..India lift the world cup after 28 years….the party starts in the dressing room…'' पर्यंतचा प्रवास आणि शेवटी त्याच २२ यार्डला पाणावलेल्या डोळ्यांनीही नमस्कार करणारी हि वामन मूर्ती पाहताना नकळत आपल्या पापण्या देखील ओलसर होतात.आणि हेच या दोन तासाचे आणि पर्यायाने चोवीस वर्षाचे फलित आहे.

वडिलांचे खंबीर मार्गदर्शन,आईचे वात्सल्य,काळजी,अंजलीची मोलाची साथ,आचरेकर सरांचे कडक शिक्षण,सावली म्हणून वावरणारा अजितसारखा वडील भाऊ,दोन गोंडस आपत्य,प्रवासातील अडथळ्यांच्या वेळी खंबीरपणे पाठीशी ठाकलेले कुटुंब आणि मित्रपरिवार आणि 'सचिन सचिन' या एका मंत्राने घट्ट बांधले गेलेले कित्त्येक करोड भारतीय या सर्वांच्या साक्षीने घडलेला सचिन त्याच्याच तोंडून व्यक्त होताना देवाच्या मूर्तीमधील आपल्यातलाच हाडामासाचा मध्यमवर्गीय सचिन आपल्यात बेमालूम मिसळून जातो.

पोर्ट एलिझाबेथ मधील 'बॉल टेम्पेरिन्ग',मुलतान मधील ते 'डिक्लेरेशन' या गोष्टी कटाक्षाने टाळल्याचे निदर्शनास येते.पण अर्थातच २४ वर्ष विवादापासून लांब राहिलेला हा तेंडल्या आजही यापासून चार हात लांब राहिला आहे.

कर्णधारपदावरून हटवल्याचे शल्य,बाबांच्या अकस्मित जाण्याने झालेली पोकळी व्यक्त करणारा सचिन,कुटुंबाला वेळ देता आला नाही हि खंत न लपवू शकलेला सचिन आणि त्याच बरोबर या करोडो चाहत्यांना आणि २२ यार्डला उद्देशून बोलताना गहिवरून आलेला सचिन पाहताना कुठेतरी आपण भावुक होतो एवढे मात्र निश्चित.

कोणताही सिनेमा पाहण्याचे अनेक पैलू असू शकतात.कोणाला सिनेमा का आवडावा अथवा का आवडू नये हा सर्वतोपरी प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे.सचिन विषयीचे प्रेम हे सिनेमा बघण्याचे एकमेव कारण असू शकते ते यथार्थ आणि सक्षम देखील आहे.सचिन कसा घडला यात आता खाजगी असे काही शिल्लक नाहीये कारण त्याच्या कारकिर्दीतले सगळे चढ उतार हे आपण आपल्या डोळ्यांनी आणि कानांनी अनुभवले आहेत.फक्त चित्रपट म्हणून पाहताना याचा बालपणातील काळ आणि काही घरातले आणि मित्रांसमवेत असलेले क्षण पाहताना सचिनला अजून आपल्यातला बनवतात एवढे नक्की.

हर्षा,रवी,गावस्कर, ब्रॅडमन,रिचर्ड्स,लारा,वॉर्न पासून ते अगदी धोनी,कोहली,गांगुली,द्रविड पर्यंत सगळ्यांनी मांडलेले सचिन बद्दलचे मत आदरयुक्त प्रेम व्यक्त करते.आणि हे समक्ष पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो.

सर्वांनीच हा सिनेमा अगोदर पाहिलेला आहे फरक फक्त इतकाच आहे कि आपण सर्वांनी तो २४ वर्षात विभागून पाहिलाय आणि आता यावेळेस तो सलग दोन तासात आपल्यासमोर उलगडत जातो.बाकी यात तसूभरही फरक नाहीये.पण काही गोष्टी कधीही आणि कितीही वेळा पहिल्या तरी त्यातली नवलाई आणि अप्रूप संपत नाहीत.

खऱ्या अर्थाने 'बायोपिक' म्हणता येणार नाही कदाचित.पण करोडो भारतीयांच स्वप्न पूर्णत्वाला नेणाऱ्या या अवलियाच्या कष्टाची आणि पर्यायाने यशाची गाथा त्याच्याच तोंडून ऐकण्याची संधी सोडू नका कारण 'क्रिकेटवेड्या भारतातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नसते त्याला फक्त आणि फक्त सचिन तेंडुलकरच व्हावे लागते.' 🙂

- हृषिकेश पांडकर

 

No comments:

Post a Comment