Monday, May 8, 2017

पिसारा

 स्वतःचे सौन्दर्य आरशात न्याहाळण्याच्या मोहातून मनुष्य सुटला नाही तिथे या प्राण्यांचे काय.निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेली सौन्दर्य समृद्धी न्याहाळत असताना टिपलेली हि आपल्या राष्ट्रीय पक्षाची मुद्रा.

मध्यभारतातील उन्हाळा काहीसा उतरणीला लागला असे फक्त वातावरण निर्माण झाले आणि क्षणापुरता का होईना पण सूर्याने एका धागामागे विसावा घेतला.ढगांशी वारा तर झुंजला होता पण अजून काळा काळा कापूस पिंजायला तसा अवकाश आहे.मात्र हा तात्पुरता बदल या पक्षाला पिसारा फुलवण्यासाठी पुष्कळ ठरला.


 

मोराची पिसे पुस्तकात किव्वा वहीत ठेवण्यापासून ते डोळ्यासमक्ष फुलणारा पिसारा न्याहाळण्यापर्यंतचा प्रवास आज येथे पूर्ण झाला.जंगल म्हणल्यावर आणि त्यातही 'टायगर रिसर्व' असल्याने वाघासाठी आसुसलेली नजर काही काळ का होईना या पक्षावर खिळून राहते.या आणि अशा अनेक गोष्टी जंगल आपल्याला दाखवते.

असा देखावा साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून पहायला मिळू शकतो.पंचतंत्र किव्वा लहानपणीच्या गोष्टींच्या पुस्तकावरून पावसाळ्यात मोर पिसारा फुलवतो अशी जरी माहिती आपल्याला असली तरी ती संपूर्ण चुकीची नाहीये.पण मोराच्या जीवनचक्रानुसार वंशवेल वाढवण्याची हीच ती वेळ आहे त्यामुळे भारतातील जंगलात उन्हाळयाच्या उत्तरार्धात हे दृश्य पाहणे कायमच आनंददायी ठरते.'पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात निळ्या सवंगड्या नाच' या ओळीची प्रचिती घेण्याची संधी फार कमी मिळते कारण एकतर पावसाळ्यात जंगल अधिकृतरीत्या बंद असते.आणि पाऊस पडत असताना हा सवंगडी आपल्या समोर येईलच याची शाश्वतीही नसते.

Peacock | Kanha National Park | May 2017

 

No comments:

Post a Comment