Monday, May 22, 2017

IPL 2017

 दीड महिना चालू असलेले IPL काल संपले.कोण जिंकले,कोण हरले,कोणी पर्पल कॅप घेतली,कोणाची ऑरेंज कॅप हुकली,सर्वोत्कृष्ट कॅच,इमर्जिंग प्लेयर,ग्लॅम शॉट आणि या सारख्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.आवडत्या प्लेयरमुळे होणारी आवडती टीम किव्वा नावडता खेळाडू असल्यामुळे येणारा कडवटपणा यांची प्रतिबिंबे फेसबुक,व्हाट्सअँप आणि ट्विटरने अनुभवली.

सुमारे पन्नास दिवसांच्या या कालखंडात एक प्रेक्षक म्हणून मी काय अनुभवले हा एक गमतीशीर विषय आहे.फक्त मैदानावरील वाटचाली तर सगळेच पाहतात पण जाहिरातींमधील वाटचाल देखील अनुभवण्यासारखी होती.वोडाफोनने दाखवलेले म्हातार्यांचे गोव्याचे हनिमून.अगदी गोव्याला निघण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंत सरणारा त्यांचा रोमँटिक प्रवास मी या साठ मॅचेस बरोबर अनुभवला एकीकडे सामन्यागणिक कोहली आणि ए बी डिव्हिलियर्सचे हातापायावरचे टॅटू निघत होते आणि हे म्हातारं जोडपं दर दिवशी नवीन टॅटू काढत गोव्याभर फिरताना मी अनुभवत होतो.अगदी पुण्यासारखीच असलेली शिकाऊ 'चोंकपूर चिता' ची टीम दिवसागणिक प्रगती करत होती.हैद्राबादच्या भुवनेश्वर प्रमाणेच या चोंकपूरच्या ध्यानीसिंग नि देखील कमाल केली.अडचणींवर मात करत बॅटिंग करणारा पुण्याचा राहुल त्रिपाठी आणि या चोंकपूरचा 'पप्पी' पाहताना दोन ओव्हरच्या मध्ये अजून एक मॅच पहात असल्याचा भास मला होत होता.अर्थात रंग उडवणारी आलिया भट मध्ये नाचून नाचून नको करत होती.मॅचच्या मध्येच समजा TV लावला तर 'तुम्हे तो येह भी नही पता' असं सांगून समोरच्याचा कचरा करत पार्लेजी घशाखाली सारणाऱ्या बायका मजेशीर वाटायच्या.जणू,एक बाई आपल्याला संगतीये कि 'तुम्हे तो येह भी नही पता नही की' जयदेव उनाडकटने लास्ट ओव्हर मेडन हॅट्रिक डाली है'.आणि मग नक्की काय झालं हे मी रिप्ले मध्ये पहायचो. सिएट टायरने दिलेल्या स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये किती लोकांनी जेवताना वाळलेले हात धुतले आहेत. 'वोह फायर है तो मै वायर है' असं म्हणणारा तो हॅवेल्सचा वाघ जरी ५० दिवस सारखाच असला तरी प्रत्येक दिवसाला सामन्यागणिक बदलणारा वाघ वेगळाच होता.पॉलीकॅबच्या वायर वापरून वीजबिलात कपात करा सांगणारा आणि विविध भाषा अवगत असलेला आणि त्याहून मजेशीर म्हणजे एकाच बिल्डिंग मध्ये भारतातील सर्व राज्यातील बिऱ्हाडांसोबत राहणारा परेश रावल लक्षात राहिला.हे म्हणजे 'Divided by the IPL but United by the Polycabs'सारखं झालं.आणि याच्या सोबतीला 'दहा वर्ष तुमच्या नावावर' असं वाजत गाजत सांगणारे IPL चे ढोल ताशे अशा गोष्टी आपण दहा वर्ष पहात आलोय यांची जाणीव करून देत होते.जीओ धन धना धन म्हणत सगळ्या टीम्स आणि त्यांच्या खेळाडूंना नाचवणारा शेवटी खऱ्या अर्थाने नाचला आणि जिंकलापण, बाकीचे तसेच नाचत राहिले.

आधीच्या IPL मध्ये खालून एक किव्वा फारतर दोन वर असणारी पुण्याची टीम फायनल खेळेल असेल कधीच वाटले नव्हते.त्यातही मुंबईसारख्या टीमला एकाच स्पर्धेत तीन वेळा हरवेल याची सूतराम शक्यता देखील नव्हती.अर्थात मुंबईने पुण्याला फायनल मध्ये हरवले हा भाग अजूनच वेगळा.पण या गडबडीत सगळ्यात जास्त मजा आली ती लोकांचे व्हाट्सअँप,फेसबुक आणि ट्विटर वरचे मेसेज वाचून.शहराची तयार झालेली प्रतिमा आणि त्यानुसार एकमेकांवर तयार होणारे विनोद याची परमसीमा यावेळी गाठली गेली.पुणे आणि मुंबई जर फायनल खेळत असतील तर उपहासात्मक विनोदांना गगन ठेंगणं होतं याची प्रचिती आली.यात चितळे बंधू,दगडूशेठ,सिद्धिविनायक आणि मिसळपाव,शनिवारवाडा या (hp) गोष्टी सुद्धा सुटू शकल्या नाहीत तिथे अशोक दिंडा सारख्याच काय ?.लोकांची क्रिएटिव्हिटी अशा ठिकाणी इतक्या पराकोटीला कशी जाऊ शकते याचा अचंबा मला कायमच वाटतो.इथून पुढील काळात जर तिसरे,चौथे किव्वा कुठलेही महायुद्ध व्हाट्सअँपवर लढायचे ठरवले तर भारताला शह देऊ शकणारा एकही देश या पृथ्वीवर आहे असे मला वाटत नाहीं .IPL चा शेवट आफ्रिदीच्या आईची ओटी भरून करण्यात आला आणि चार जूनला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याआधी याच क्रिएटिव्हिटीच्या पुनःप्रत्ययाची नांदी निश्चित झाली.

जेमतेम तीन चार दिवसांची उसंत आणि मग चॅम्पियंन्स ट्रॉफीची सुरुवात आहे.इतकेदिवस उलट सुलट,वेडेवाकडे आणि शिवीगाळ या भाषेत सुसंवाद साधणारे आणि तरीही 'fair play' चे पैसे घशात घालणारे सर्वजण पुन्हा एकदा देशासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील.राज्यभक्तीची जागा राष्ट्रभक्तीने घेतली जाईल.पण या सर्वांमध्ये आपल्याला आनंद कशात मिळतो हे आपण ठरवायचे.क्रिकेट पाहणे,पाठिंबा देणे या गोष्टी तर मी लहानपणापासूनच करत आलोय.पण त्या बरोबरच डोळे आणि कान उघडे ठेऊन सभोवताली सुरु असलेल्या प्रतिक्रियांनी स्वतःचे मनोरंजन करून घेण्याच्या नवीन संधी मी हल्ली शोधत असतो.

चला तर मित्रहो तूर्तास विश्रांती घेतो.चॅम्पियंन्स ट्रॉफीच्या अगोदर IPL च्या फोटोने भरून वाहत असलेली फोनची गॅलरी आधी रिकामी करतो कारण मागचे दोन महिने तर लुटुपुटुची लढाई होती आता तर खुद्द पाकिस्तान आणि बांगलादेश आहेत. 

पु.ल तेव्हा म्हणाले होते कि क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे.आज पु.ल असते तर नक्की म्हणाले असते कि क्रिकेट हा खेळण्याचा विषय नक्की नसून बोलण्याचा,पाहण्याचा,टीका करणे,विनोद,चेष्टा,मस्करी,उपहास,राग,आनंद या सर्व भावनांचा वापर करून व्यक्त होण्याचा विषय आहे.आणि यासाठी व्हाट्सअँप,फेसबुक आणि ट्विटर नव्याने सज्ज आहेतच. 

- हृषिकेश

 

No comments:

Post a Comment