Wednesday, May 3, 2017

जिप्सी आणि वाघ

 ५०-७५ मीटरवर वाघ आहे याची खात्री आणि जाणीव इथे प्रत्येकालाच आहे कारण त्याची पाठ व्यवस्थित दिसतीये.भले त्याची काही हालचाल नाहीये.कधीतरी उठेल या आशेने एकटक त्याच्याकडे पहात ताटकळत उभे राहण्यासारखी वेडी आशा नाही.किमान तो एकदा उठावा एक मिनिटापुरता का होईना पण समोर यावा आणि पुन्हा झुडपात नाहीसा झाला तरी बेहेत्तर या एका इच्छेखातर वाट बघणाऱ्या या जिप्सी त्या घनदाट अभयारण्यात मजेशीर वाटतात.


 

असाच तास दीडतास सरतो.हट्टी वाघ जागचा हालत नाही आणि इतकावेळ रोखलेले श्वास हालचालींद्वारे,आळसाद्वारे बाहेर निमूटपणे मोकळे व्हायला लागतात.लागलेली तहान शमवली जाते.आणि वाघाची जागा सोडून इतरही जागा न्याहाळायला सुरुवात होते.अशाच परिस्थितीत दुसऱ्यांच्या जिप्सी मधील हालचाली अनुभवण्याची मजा काही वेगळीच असते.आमच्याच समोर असलेल्या गाडीचे टिपलेले हे छायाचित्र.

स्वभाव आणि परिस्थिती याची सांगड घालून या छायाचित्राचे पैलू नजरेसमोर येतात.इतकावेळ गाडीत बसलेले सगळेजण आता वाघाच्या आशेने उभे राहिलेत.काही लोक अजूनही बोट दाखवून वाघाची जागा निश्चित करण्यात मग्न आहेत.तर काही लोक त्याला मार्गदर्शन करत असावेत.वाघाची निश्चित जागा कदाचित अजूनही काहींना समजलेली नसते. काही लोकांना समोरून कोणीतरी फोटो काढतोय याची चाहूल लागताच भले परिस्थिती काही असो आपला फोटो व्यवस्थितच आला पाहिजे अशी अट्टाहास असतो.दोन तास थांबूनही चेहऱ्यावरचे हास्य अबाधित ठेवून 'फोटोसाठी काहीही' हा बाणा जपणारे हसतमुखाने कॅमेऱ्याला सामोरे जातात.काही लोकांना कोणी आपला फोटो काढतोय किव्वा आजूबाजूला काही घडतंय याची जाणंही नसते.ते आपल्याच नादात असतात.थोडक्यात काय तर प्रत्येकजण आपापल्या विश्वात रममाण असतो.

वाघाची वाट पाहण्यात जो वेळ जातो त्या वेळात हे असे निरीक्षणाचे धंदे करण्यात मजा येते.कारण सय्यम सुटल्यानंतर किव्वा वाट पहायचा कंटाळा आल्यानंतर जो ढिलेपणा येतो तो इथे बऱ्याच वेळा जाणवतो.यात वावगं असं काहीच नाही पण फावल्या वेळात अशा गोष्टी पाहणे मजेदार असते.या नंतर वाघ दिसला किव्वा दिसला नाही हा मुद्दा पुढचा.जंगलामधील या निरव शांततेत चालू असलेल्या पाठशिवणीचा खेळात आपणच आपले मनोरंजन अशा पद्धतीने करून घेण्याचा छंदच जडलाय आता मला 😉

 

No comments:

Post a Comment