Thursday, April 29, 2021

माझ्या डायरीचे पान...

 कालच्या पावसात गारांच्या तडाख्यात निखळलेले माझ्या डायरीचे पान...

----

मोदी,शहा,महाविकास,डावे,उजवे,राजकारण,समाजकारण,अर्थकारण आणि मीडिया यांच्या पालिकडला करोना..

सध्या सकाळ होते ती झोप पूर्ण झाल्यामुळे कारण उठून घाईने करण्याची काम सद्ध्या थंड झालीयेत. ग्राउंडला चालायला,व्यायामाला किव्वा टाळ्या देऊन नुसत्याच गप्पा मारणाऱ्यांची वर्दळ नसते ना. डबा, दात घासणे आणि चहा झाल्यावर घरून ऑफिसचे काम याखेरीज दिवसातले काही शिल्लक नसते.

पेपर वाचायचा छंद चिंटू आणि शेवटचे खेळाचे पान इतकाच मर्यादित होता. सचिन रिटायर्ड आणि चिंटू मोबाईल वर आल्यावर रद्दी विकणे यापलीकडे पेपर हाताला लागला नाही. त्यामुळे चहा घेत घेत छान पेपर वाचणे वगरे शौक कधीच नव्हते.

दिवसभरात फेसबुक,इन्स्टाग्रामवर, ट्विटर, व्हाट्सएप आणि इथून तिथून येणाऱ्या करोनाच्या बातम्या हे समांतर आयुष्यासारखं चालू आहे. कदाचित करोना हा विषय अजूनच अंगावर यायचं कारण म्हणजे या बेंबीच्या देठापासून ओरडत सुरू असलेल्या, बऱ्याच वेळा असंबद्ध आणि सतत नकारात्मक गोष्टी वाजवून सांगणाऱ्या बातम्या. एखादी गोष्ट माहीत होण्यापेक्षा मनस्ताप व्हायची शक्यता अधिक..असो हे पाहणं टाळतोय..तुम्ही सुद्धा प्रयत्न करा.

प्लास्मा, रक्तदान, ऑक्सिजन, बेड ची व्यवस्था, रिपोर्ट, आर टी पी सी आर, आयसोलेशन, मास्क, सॅनिटायझर, वॅक्सिन, डोस यापैकी एखादा शब्द स्क्रीन वर सहज वावरतोय. लोकांच्या जुन्या सहलींचे फोटो 'टेक मी देअर', सी यु सून' या ओळी पांघरून पुन्हा पुन्हा येतायत. घरपोच डबे, घरपोच भाज्या, घरपोच औषधे सेवेला तत्पर आहेत. कोणी स्वच्छ मनाने आणि काळजीपोटी सेवा देतंय काही तिथंही खिसा भरत आहेत.

केंद्राचं चुकलं, राज्याचं चुकलं, कोणी कसं लुटलं, कोणाचं कसं पटलं, कोण कसं सुटलं, कोणाचं बिंग फुटलं, सरकारने असंच का रेटलं याचे हिशोब जमवता जमवता सामान्य मतदारांच्या माथ्यावरच आभाळ तेवढं फाटलं.

गेल्या वर्षी रुग्णांच्या बातम्या लांबून यायच्या आज जवळचेच रुग्ण होतायत. प्रश्न जवळ लांबच्यांचा नव्हताच कधी पण विस्तव जवळ आल्याखेरीज त्याची धग जाणवत नाही हा त्यातला भाग. आता आपलेच होरपळत आहेत त्यांच्यावर पाणी टाकावं की बाकीची आग विझवावी.

कुंभमेळा कशासाठी, निवडणूका का, लॉकडाउन हवा की नको यावर चाललेल्या चर्चा आता बेड कुठे उपलब्ध आहेत, औषध कुठे मिळतील,लस कधी कुठे कशी मिळेल, जेवणाचा डबा तेवढा कसा पोहोचेल आणि मित्र,नातलग आणि आप्तेष्टांच्या तब्येतीच्या काळजीत बदलल्या. जवळचा गेल्याची हुरहूर आणि स्वतःच्या जीवाची काळजी अशा दुहेरी कात्रीत दिवस सरतोय इतकं नक्की.

काही पोष्टि सामुदायिक अंत्यविधी दाखवतात, काही पोष्टि ऑक्सिजनविना आणि औषधावीना हवालदील रुग्ण आणि त्याचे सोबती दाखवतात. काही पोष्टि हिम्मत ठेऊन लढायला सांगत आहेत. हेही दिवस जातील याची खात्री देतायत. काही पोष्टि आपल्यातील कलाकार व्यक्त करतायेत.काही पोष्टि लोकांनी कशी आणि किती मदत केली याचे आकडे फिरवत आहेत. काही पोष्टि प्रामाणिकपणे किती रुग्ण वाढले किती बरे झाले याचे धावते समालोचन करीत आहेत. यातच सुरू झाला लसीचा खेळ. वयाची बंधन लावून लसीकरण सुरू झाले. पहिला डोस दुसरा डोस, त्यातलं अंतर , त्याचा परिणाम याचा पण उहापोह वाचायला मिळतोय. ऍलोपॅथी, आयुर्वेदिक की होमिओपॅथी याचा जो तो आपापल्या परीनं समजवायचा प्रयत्न करतोय. आमचंच कसं चांगलं यापेक्षा उपयुक्त कोणतं आणि कसं हेही सांगणाऱ्या पोष्टि वाचल्या की हुरूप येतोय.

माझ्यातला सामान्य माणूस भीती,काळजी,राग,जबादारी,हतबलता,उसन अवसान, निःश्वास, आशा आणि विश्वास या भावना ओळीने गिरवत दिवस उलटतोय.

सुखाच्या व्याख्या जशा सारख्या नसतात तशाच व्यथा देखील एकाच तराजूत तोलता येत नाहीत. विस्कटलेली घडी कधी सरळ बसेल याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

दिवस असाच सरून जातो. असेही काही सल्ले येतात या करोनाच्या बातम्या किव्वा पोष्टि वाचू नका म्हणतात. व्यायाम करा, आहार नीट ठेवा आनंदी रहा वगरे वगरे.

आपली काळजी आणि पर्यायाने सर्वांची काळजी या खेरीज आता फारसं काही शिल्लक नाहीये आपल्याकडे. गेलेल्या व्यक्तीला शेवटचं पहायची सोय शिल्लक नाहीये. राजकारण, आरोप, प्रत्यारोप, दिखाऊ काम आणि जनहितापेक्षा वैयक्तिक तिजोऱ्या भरण्याकडे कदाचित खुर्चीधारी मन लावून प्रयत्न करतील. संबंध भारत देश यापेक्षा देखील आखून दिलेल्या राज्याच्या सीमा मदतीला वेसण घालतील पण आपला धीर सुटता कामा नये.

या सगळ्या चढ उतारात दिवस कसा मावळतो कळत नाही. शनिवार रविवार आणि इतर दिवस यामध्ये नावापेक्षा जास्त असा काही फरक जाणवत नाही. इच्छाशक्ती आणि मन मात्र नक्की सांगतं उसळलेली लाट नक्की शमेल. सय्यमची आणि धीराची कसोटीच की ही.काही परीक्षा अवघड असतात पण पास होण्याला पर्याय नसतो. त्यातलाच हा भाग.

काहीशी स्वयंशिस्त, पुरेशी खबरदारी,काळजी आणि बेफिकीर,फाजीलआत्मविश्वासाला आळा या गोष्टी आचरणात आणल्या तर कदाचित यंदाच्या दिवाळीची खरेदी जोरात होईल. प्रत्यक्ष फराळाला जायचा योग येईल. बाप्पा वाजत गाजत येईल. सगळं तसंच अलबेल असेल जसं आधी होतं. कदाचित तेव्हा जरा जाण आली असेल आपल्याला...सर्वात चाणाक्ष म्हणून मिरवत असलेली मनुष्यप्राणी ही जमात प्रत्यक्षात मात्र किती असुरक्षित, हतबल आणि केविलवाणी आहे..नाही का ?

माझा दिवस असाच संपतो..निजतो ..

हृषिकेश पांडकर

२९.०४.२०२१

 

No comments:

Post a Comment