Friday, April 9, 2021

 An owl is the wisest of all birds because more it sees the the less it talks.

भारताच्या उत्तर पूर्वेकडील भागात इतर राज्यांपेक्षा सूर्य काहीसा लवकरच अस्ताला जातो. अर्थात त्याला भौगोलिक कारण आहे. मात्र भारतात अमेरिकेप्रमाणे २/३ प्रमाण वेळा नाहीयेत. त्यामुळे जंगलातील सफारी ही घड्याळात जरी संध्याकाळी ५.३० ला संपत असली तर साधारण ४.३० नंतरच संधीप्रकाश आपली जागा पक्की करायला सुरुवात करत असतो. 


 

हे सांगायचा खटाटोप यासाठी की अशाच एका तिन्हीसांजेला टिपलेली ही घुबडाची मुद्रा आहे. सूर्य पाठीमागून अस्ताला निघाला असताना दिनचर्येला सुरुवात करणारे हे घुबड फार मजेशीर दिसत होते. मूलतः निशाचर असलेला हा पक्षी. त्यामुळे दिवसा दिसणे तसे कठीणच.

बरेच दिवस हे घुबड पहायची इच्छा होती ती पूर्ण झाली या आसाम मधील काझीरंगा अभयारण्यात. नावातच डस्क (तिन्हीसांज) हा शब्द धारण करणारे हे 'डस्की ईगल आउल'. अर्थात डस्क हा शब्द येथे त्याच्या रंगावरून त्याला मिळालेला आहे. पण अशाच सांजवेळी पहायला मिळाल्याने नाव,रंग आणि वेळ यांच्याशी संबंध नकळतच जोडला गेला. कानाला असलेले झुपकेदार केसांचे आवरण याची ओळख पटवून देतात.

घुबड पहाणे शुभ कि अशुभ हा ज्याचा त्याचा वैयक्तिक समज असू शकतो. पण निसर्गाने घडविलेल्या या पक्षाला पाहण्याचा मोह मला मात्र आवरता आला नाही.

प्रकाश स्रोत पाठीमागून असल्याने त्याचा डस्की रंग दिसत नाहीये. रंग,चेहरा आणि इतर गोष्टी स्पष्ट दिसाव्यात यासाठी अजून काही फोटो मिळाले. पण घुबडाची छबी कशी असावी असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर हा फोटो हे माझे उत्तर असेल कदाचित.

आकाराने बऱ्यापैकी मोठ असलेलं हे घुबड प्रत्यक्ष पहायची संधी मिळाली तर सोडू नका. कारण हे घुबड दिसू शकेल अशा भारतात बऱ्यापैकी जागा आहेत पण दिसेलच याची शाश्वती अर्थातच नाही...

हृषिकेश पांडकर

०९.०४.२०२१

Dusky Eagle Owl | Kaziranga | March '21

 

No comments:

Post a Comment