Friday, May 7, 2021

हुलॉक गिबन

 ज्याच्या शेंडीला पावशेर तूप असतं ते माकड. ज्याला शेपटीच नसते ते हे वानर. वानर आणि माकड हे दोन वेगळे विषय आहेत हे समजायला मला तसा बराच वेळ गेला. अर्थात हा फोटो काढायच्या बऱ्याच आधी तो फरक समजला होता पण प्रत्यक्ष वानर पहायची ही माझी पहिलीच वेळ. 


 

मनुष्यप्राण्याच्या जातकुळीतीलच हे दोन्ही जीव.वानराला शेपटी नसते आणि माकडाला ती असते. त्यामुळे माणसाच्या जवळ जाणारा या दोघांमधला प्राणी म्हणजे वानर असं म्हणायला हरकत नाही.

वरील फोटोमध्ये असलेले वानर हुलॉक गिबन या नावाने ओळखले जाते. भारतात सापडणारी एकमेव वानराची प्रजाती. भारताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या सात बहिणींना कधी भेट देण्याची संधी मिळाली तर या वानराची सुदधा भेट घ्या.

याच्या हातांची लांबी ही पायाच्या लांबीच्या साधारण दुप्पट असते. तोल सांभाळण्याचे काम जसे माकड आपल्या शेपटीने करतात साधारण तसेच काहीसे हे हुलॉक गिबन आपल्या हाताने करतात. लटकत अंतर कापणारी काळी वानरं हिरव्या झाडांवर मजेशीर दिसतात.

चेहेऱ्यावर असलेली पांढऱ्या रंगाची किनार एखाद्या मुखवट्या सारखी भासत राहते. नर आणि मादी यांच्या रंगात जरी काहीसा फरक असला तरी चेहेर्यावरील हा मुखवटा दोघांनाही तसाच असतो.यांची अजून एक मजेशीर बाजू म्हणजे गाणं म्हणल्यासारखा केला जाणारा आवाज. आवाजाच्या वेळा इतक्या ठरलेल्या असतात की कोंबड्याच्या बांगे प्रमाणे यांचा आवाज देखील वेळ सांगण्यासाठी होत असे अशी माहिती समजते.

जंगलातील उंच आणि भरगच्च झाडाच्या शेंड्यावर लोम्बकळात खेळणारी ही वानर पहायला मिळतात. माकडं जशी खाली जमिनीवर पण सहज दिसतात तशी ही वानरं खाली दिसणं तसं दुर्मिळच.

आसाम मध्ये गिबन अभयारण्य नावाचे स्वतंत्र अभयारण्य आहे जिथे हा जीव पहायला मिळतो. मात्र वर काढलेला फोटो हा काझीरंगा अभयारण्यातील आहे. काझीरंगा अभयारण्याला स्पर्शून जाणाऱ्या महामार्गावरून जाताना जर नशिबाने साथ दिली आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले चहाचे मळे पहाण्यातून वेळ झाला तर झाडावर बागडणारे हे गिबन सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे अगदी अभयारण्य असे नाही पण बाकीच्या गोष्टी पाहण्यासाठी इथे जाणे झाले तर हा माणसाचा पूर्वज नक्की पहा.

हृषिकेश पांडकर

०७.०५.२०२१

We admit that we are like apes, but we seldom realize that we are apes.

Hoolock Gibbon | Assam, India | Mar '21

 

No comments:

Post a Comment