खळखळ वाहणारे आणि रसायने किव्वा जलपर्णी नसलेले स्वच्छ पाणी ही आदर्श नदीची ओळख किव्वा सूचक आहेत. एखाद्या गोष्टीची पारख करण्याची प्रमाणे ठरलेली असतात. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करण्याचा एक स्वतंत्र लिटमस पेपर असतो ज्यावरून त्या गोष्टीची प्रत ठरवली जाते.
वरील गोष्ट सांगण्याचा अट्टाहास या करिता की जशी शहराची,नदीची,वस्तूची किव्वा अगदी एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरविण्यासाठी काही निकष असतात, त्याच प्रमाणे एखाद्या जंगलाची गुणवत्ता ठरविण्यासाठी तेथे असलेले जैव घटक पडताळले जातात. अशा जैव घटकांना 'इंडिकेटर स्पेसिस' असे म्हटले जाते. याच इंडिकेटर स्पेसिस मध्ये वरील फोटोतील इंडियन ग्रेट हॉर्नबिल हा सकारात्मक निकष समजला जातो.
ज्या जंगलात ही प्रजाती सापडते ते जंगल सर्वदृष्ट्या संपन्न आणि श्रीमंत जंगल समजले जाते. अर्थात याला तशी शास्त्रीय कारणे देखील आहेतच. या पक्षाचे राहणीमान, त्याला लागणारा निवारा, अन्न पुरवठ्याच्या सोयी या गोष्टी पुरवू शकणारे जंगल असल्याने तो पक्षी तिथे टिकाव धरू शकतो.
चोचीचे तीन टप्पे, पंखांचा रंगीत आणि मोठा घेर, उडताना येणारा पंखांचा खणखणीत आवाज आणि मुख्य म्हणजे खूप कमी पक्षांना असलेल्या पापण्या ही या पक्षाची ठळक वैशिष्ट्य. या पक्षाला पापण्या असतात हे यंदाच्या जंगल भेटीत समजले. हा पक्षी लांबून उडत येत असेल तर सुमारे पाउण किलोमीटर पासूनच याच्या पंखांचा आवाज येण्यास सुरुवात होते अशी नोंद आहे आणि आता अनुभव देखील. धगधगत्या वाफेच्या इंजिनाचा आवाज आणि या धनेशच्या पंखांचा आवाज यात कमालीचे साम्य जाणवते.
मुख्यत्वे फळं, छोटे किडे,सरपटणारे जीव आणि काही अंशी छोटे सस्तन प्राणी हे याचे खाद्य. फोटोत पाहिले असता चोचीत पकडलेला साप या खाद्य यादीची ग्वाही देतो.
उडताना देखील पक्षी किती सुंदर दिसू शकतो हे या पक्षाला पाहताना समजते. या पक्षाचे विविध उप-प्रकार असल्याने हॉर्नबिल म्हटल्यावर लांब आणि बाकदार चोच हीच याची प्राथमिक ओळख. मात्र पंखांचा रंग,चोचीची ठेवण आणि एकूण आकार या गोष्टी याला महत्वाची ओळख देतात.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात BNHS चा नावाचा अविभाज्य घटक. त्यांच्या लोगोवर असलेला लक्ष वेधणारा पक्षी तो हाच. केरळ आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांचा राज्यपक्षी म्हणून मान मिळविलेला हा पक्षी. ही दोनही राज्य अशी आहेत ज्यामधील जंगलं प्रचंड समृद्ध आहेत. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या दोन्ही राज्यांचा राज्यपक्षी होण्याचा मान या धनेशचा.
दक्षिणेकडील संपन्न जंगले आणि उत्तर तसेच उत्तर पूर्वेकडील घनदाट आणि तितक्याच सुंदर जंगलात याचे दर्शन होते.
वरील फोटो मानस अभयारण्यात घेतलेला आहे. महाराष्ट्रात राहणारे आपण अर्थातच याला पाहण्याचा जवळचा मार्ग निवडणार. याला पाहण्यासाठी आपल्या जवळ असलेला भाग म्हणजे अरबी समुद्र किनाऱ्या लगत पसरलेला संपूर्ण पश्चिम घाट.
शहरातील मध्यवर्ती वस्तीत देखील सहज दिसणारा राखी धनेश (ग्रे हॉर्नबिल) तुम्ही अनेकवेळा पहिला असेल पण याच्याच जातकुळीतील पण प्रचंड सुंदर आणि भव्य असणारा हा ग्रेट हॉर्नबिल नक्की बघा. हा दिसायला जितका आकर्षक आहे तेवढाच उडताना येणार पंखांचा आवाज आपल्याला भुरळ घालत राहतो यात शंका नाही.
Indian Great
Hornbill - Bird having a big yellow beak with a casque and striking tail
feathers.
हृषिकेश पांडकर
२५.०४.२०२१
Manas National Park | India | March '21
No comments:
Post a Comment