Wednesday, August 5, 2020

वनवासाची अखेर !!!

 श्री रामांचे नाव घेतल्यावर इतिहास म्हणून पहिले डोळ्यासमोर यायचा तो चौदा वर्षाचा वनवास..मग नंतर पर्णकुटी,लक्ष्मणरेषा,सोन्याचे हरीण, शुर्पणखा,भिक्षा मागणारा भिक्षुक,रेषा ओलांडणारी सीतामाई,लढणारा जटायू, वानर सेना, श्रीराम लिहिलेले दगड,माती टाकणारी खारुताई, पर्वत उचलून आणणारा हनुमान,लंका जाळणारा हनुमान,अंगठी देणारा हनुमान,शेपटीच्या आसनावर बसणारा हनुमान,राम-रावणाचे युद्ध आणि सीतामाईंची सुखरूप सुटका....


 

हा इतिहास पाहण्यात आणि वाचण्यात बालपण सरले..

पुढे दुर्दैवाने मोठे झालो..आता श्रीराम म्हणल्यावर डोळ्यासमोर यायची ती सदैव वादाच्या विळख्यात जखडलेली अयोध्या.. राम जन्मभुमीच्या जागेवर बांधलेली बाबरी मशीद..त्यावरून पेटलेले रण..१९९२ च्या शेवटाला पाडली गेलेली मशीद..एकमेकांच्या जीवावर उठलेले हिंदु आणि मुस्लिम..बदला घेण्याची लागलेली चढाओढ...९३ चे मुंबई वर झालेले वार..अनंत जखमांनी लाल झालेली मुंबापुरी...तीच तेढ..तोच राग..राम जन्मभूमी मात्र तशीच..तिथे ना श्रीरामाचे मंदिर..ना ती बाबरी मशीद..दोन्ही वास्तु डोळ्यावर पट्टी बांधलेल्या त्या न्याय देवतेच्या कसाट्यात गेली कित्येक वर्षे..मंदिर वही बनाएंगे या एका अजेंड्याची चातका सारखी वाट पाहणारी शरयू..ती संपूर्ण अयोध्या आणि पर्यायाने अखंड भारत...

सुमारे ४९० वर्षाच्या कालावधी नंतर कदाचित आज ही कौसल्येच्या रामाची अयोध्या मोकळा आणि स्वच्छ श्वास घ्यायला सजलीये..हा वनवास तर त्या चौदा वर्षांवर कित्येक पटींनी भारी पडला..

इतकी वर्षे अयोध्या म्हणल्यावर दगडी गोलाकार मशिदीच्या डोमवर चढून ती काठी आणि विविध गोष्टींनी पडणारे लोक हाच व्हिडिओ डोळ्यासमोर असायचा..आज बातम्यांमध्ये अयोध्या या नावाखाली प्रसन्न आणि आनंदी चित्र प्रथमच पाहिले..सजलेला शरयूचा काठ..दिवाळीला लाजवेल अशी दिव्यांची रोषणाई..रांगोळ्यांचा पायघड्या..चौकातील दीपोत्सव..जय श्रीरामाचा जयघोष....देशाला ओढ आहे ती मंदिराच्या पायाची..शहराला आज आनंदाच्या भरात झोप नाही..असेल तरी कशी हो..मर्यादा पुरुषोत्तम वनवास संपवून परत येतायत..

या राम मंदिराच्या यशात वानरसेनेचे योगदान आणि खारीचा वाटा उचलणाऱ्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि

अभिनंदन !!!

खऱ्या अर्थी रामराज्य अस्तित्वात यावं ह्यासाठी प्रभू रामरायाच्या चरणी मनोमन प्रार्थना...

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ||

जय श्रीराम..

हृषिकेश पांडकर

०५.०८.२०२०

 

No comments:

Post a Comment