कल खेल मे हम हो न हो..
गर्दीश मे तारे रहेंगे सदा..!!!सचिन जर माझ्यासाठी प्रेमानं आणि लाडाने जपणारी भारतीय क्रिकेटची आई होती तर एमएस हा खंबीरपणे पाठी उभा असलेला बाप होता.माझ्यासाठी असलेले भारतीय क्रिकेट आज खऱ्या अर्थी आई-बापाविना पोरकं झाल्याची भावना बोचतीये.
वर्षभरापासूनच माहीत होतं माही या क्रिकेट जगताचा निरोप घेईल. कुठल्याही क्षणी ही बातमी कानावर आदळेल. आज तो दिवस आला. सगळी कल्पना असूनही तो इन्स्टाग्रामचा व्हिडीओ डोळ्याच्या कडा ओल्या करून गेलाच.
धावा,झेल,शतकं,स्टम्पिंग,विजेतेपद आणि अशा अनेक आकडेवाऱ्या. या तांत्रिक बाबीत मला अडकायचेच नाही. पण एक खेळाडू म्हणून एक माणूस म्हणून एक कर्णधार म्हणून एम एस कसा राहिला याच अप्रूप खूप जास्त होतं.
त्याचा कव्हर ड्राइव्ह,स्ट्रेट ड्राइव्ह कधीच देखणा नव्हता पण वाऱ्याच्या वेगाने काढलेल्या दोन धावा कायम सुखावह वाटायच्या.त्याचे लेट कट, स्वीप कधीच मंत्रमुग्ध करणारे नसतील पण विजेच्या वेगात उखडलेल्या बेल्स मला तितकच किंबहुना त्याहून जास्त समाधान आणि आनंद देऊन गेल्या.
जोहानसबर्गच्या पहिल्या टी२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोगिंदर ला दिलेली शेवटची ओव्हर..बांगलादेश विरुद्ध शेवटच्या चेंडूसाठी ग्लोव्हज काढून केलेले यष्टीरक्षण..स्वतः झेलबाद होत असताना समोरच्या फलंदाजाला पटकन क्रॉस करायला सांगणारा माही..इथपासून ते दादाच्या शेवटच्या सामन्यात शेवटच्या सत्रात स्वतःहून कप्तानपदाची सूत्र त्याला देणारा धोनी.. अगदी विश्वकरंडकाच्या ट्रॉफी पासून आयपीएलच्या ट्रॉफी पर्यंत कुठलीही ट्रॉफी संघातील ज्युनियर खेळाडूच्या हाती सोपवणारा..स्लेजिंगच्या प्रश्नाला मौनाने उत्तर देणारा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेवून जातो या टिकेपासून विजयी फटका मारणारा एम एस जास्त जवळचा वाटत राहिला..
मैदानाबाहेर असताना एकही आततायी वक्तव्य न करणारा..मैदानात असताना सय्यमाचा महामेरू..सामन्याच्या कुठल्याही स्थितीत चेहऱ्यावरील भाव न बदलणारा कणखर खेळाडू मी या आधी कधीच अनुभवला नाही.
मेहमत,अंगभूत कौशल्य,आणि अविरत सराव यांच्या जोरावर मैदान गाजवलेले अनेक खेळाडू आपण पाहिले पण खेळाची जाण आणि परिस्थितीचे भान यांचा योग्य विचार करून खेळाचे आकलन करून घेणारा कर्णधार मी माही मध्येच पाहिला.
विजयाचा जल्लोष किव्वा पराभवाची सल अशी माहिच्या चेहेऱ्यावर कधीच फारशी दिसली नाही. पण म्हणून खेळाचा आनंद याने कधी घेतला नाही असे नक्कीच म्हणता येणार नाही. पत्रकारांवर भडकलेला..इतर खेळाडूंवर चिडलेला हा कर्णधार कधीच पहायला मिळाला नाही.
स्टम्पिंग,रन आउट करणे किव्वा डी आर एस घेणे या मध्ये जर धोनी कुठे असला तर खात्री असायची हिरवा किव्वा लाल यापैकी कुठलाही दिवा असेल पण दिवा आपल्याच बाजूने लागणार.
खरं तर टेस्ट क्रिकेट हा खेळ कौशल्याच्या अंगाने धोनीचा प्रांत नसावा. पण ३८ ची सरासरी आणि स्टंपच्या मागे हजारो बैठका ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. यष्टीरक्षण,नेतृत्व आणि फलंदाजी एकाच सामन्यात करणं तितकं सोपं काम नव्हतं जे या माणसाने तीनही प्रकारात मोठ्या काळासाठी यशस्वीपणे आणि समर्थपणे केले.
खेळविषयीची जाण कशी असावी याचे प्रत्येक सामन्यागणिक प्रात्यक्षिक हा खेळाडू दाखवून द्यायचा. प्रतिस्पर्ध्यापेक्षा कायम आपली नीती दोन पाऊले पुढे आणि वेगळी कशी राहील याचा विचार करणारा चतुर कर्णधार म्हणून माही जास्त लक्षात राहिला.या माणसाने खेळ वाचायला शिकवला.
इंग्लंडच्या खेळाडूला खिलाडू वृत्ती जपून पुन्हा खेळायला बोलावणारा मोठया मनाचा आणि बोल आउट असताना वेगवान गोलंदाजाला मदत होईल म्हणून स्टंप ला खेटून उभा राहिलेला चाणाक्ष माही नजरेतून सुटला नाही.
सुरुवातीला लांब सरळ केसांचा तरुण नंतर जबाबदारी वाढलेला सैनिकी केशरचनेचा एम एस आणि विश्वकरंडक जिंकल्यावर त्या रात्रीत सरसकट टक्कल केलेला माही कायम स्मरणात राहील.
भारतीय क्रिकेट म्हटले की दिल्ली, महाराष्ट्र, मुंबई ,गुजरात आणि कर्नाटक यांची मक्तेदारी कायमच राहिली आहे. पण झारखंड मधील रांची सारख्या छोट्या गावातून पुढे येऊन देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व करणारा माही अशा सगळ्या तरुणांचे प्रेरणास्थान बनला जे भारतातल्या छोट्या गावातून खेळण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत.
तब्बल सोळा वर्षाची कारकीर्द. सचिन,राहुल, सौरव यांच्या पंखाखाली खेळायला सुरुवात झालेली पुढे संपूर्ण संघ आपल्या पंखाखाली घेऊन सगळ्या मोठ्या चषकांवर तिरंगा कोरणारा माही एक वेगळं रसायन म्हणून वावरला.
या सोळा वर्षात अनेक चांगल्या वाईट आठवणी दिल्या.मोठे विजय साजरे करायची संधी दिली.प्रेक्षक म्हणून सामना कसा पहावा याचीही जाण त्याने आम्हाला दिली असे नक्की वाटते.
माही आता निळ्या किव्वा पांढऱ्या वेशात कधीच दिसणार नाही याची खंत आहेच. पण चेन्नईचा थाला म्हणून पुन्हा त्या पिवळ्या कपड्यात आणि सात नंबरात आपल्या समोर येईल हे एक समाधान.
कुठल्याही गजबजाटाविना शांतपणे फक्त एक मिनिटाचा व्हिडीओ टाकून आपल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम देणारा अवलिया पुन्हा होणे नाही.
शेवटच्या रन आउटचा चटका तेवढा मागे ठेऊन गेला...असो सचिन नंतर अजून एका मोठ्या पर्वाचा साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला मिळाले यापेक्षा मोठा आनंद तो कोणता.. ? धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल.. इंडीया लिफ्ट द वर्ल्ड कप आफ्टर ट्वेन्टी एट इयर्स...या ओळी कायमच अंगावर शहारे आणतील यात शंका नाही...या सगळ्या अठवणींसाठी मनापासून धन्यवाद.
कदाचित आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा असे म्हणत अलगद या क्रिकेट वर्तुळातुन एक्झिट घेणारा..प्रत्येक शॉट नंतर ग्लोव्हजचे बंद पुन्हा काढून लावणारा आणि हातातला एक ग्लोव्हज पाठीमागे खोचून ठेवलेला माही कायमस्वरूपी लक्षात राहील...
हृषिकेश पांडकर
१५.०८.२०२०
No comments:
Post a Comment