Saturday, August 22, 2020

मंगल मूर्ती मोरया

 आमच्या घरी गणपती बसत नाहीत..

मात्र गणेशोत्सव अनुभवायला ती गरज कधीच भासत नाही..

ढोल पथकांचा नदीकाठी सुरू झालेला सराव हीच आमच्या बाप्पाची नांदी...

'मी येतोय' या होर्डिंग ची गर्दी हीच त्या सणाची धुंदी..

मांडवासाठी सज्ज असलेले चौक..

लाकडी फळ्यांवर ओळीने विराजित बाप्पांच्या सुबक मूर्ती..

किंचितही उसंत नसलेली गजबजाटाने मढलेली तुळशीबाग..

हीच त्याच्या आगमनाची चाहूल..

चर्चेत सरलेल्या रात्रीनंतरच उमगते..

मागच्या वर्षीचेच डेकोरेशन की यंदा काहीतरी नवे...

जुने नकोच काही..या वर्षी बाप्पाला करूयात दालन नवे...

साधू संत येतात तो असतो दिवाळी दसरा..

आज तर येणार असतो साक्षात बाप्पा..

सजलेल्या रित्या मखरात पाहुणा येणार असतो..

काही ठिकाणी एकटाच तरी काही ठिकाणी बहिणी सोबत असतो..

दुर्वा,कापूर,चंदन आणि फुलांनी घर दरवळून निघते...

मोदकाच्या सारणाने स्वयंपाकघर सजते..

'बाप्पाच्या आगमनाची तयारी ' फोटोंसह वर्तमानपत्रात दिसते..

मानाच्या श्रींचे वेळापत्रक तपशीलवार असते..

लांबवर वाजणाऱ्या लयबद्ध मिरवणुका कायमच लक्ष वेधून घेतात..

रथात नटलेल्या आणि धुपात हरवलेल्या बाप्पाला जणू हात धरून बोलवत असतात..

तुपात तरंगणारे मोदक आधी कॅमेऱ्याचे पोट भरतात...

त्या नंतर बाप्पा..मग आमच्या समोर येतात..

संध्याकाळपर्यंत सार्वजनिक मंडळांचे मांडव देखील सजतात..

पुढल्या दहा दिवसांचा उत्साह,आनंद अन् भाव यांची झलक मिरवत असतात..

यंदा चित्र काहीस निराळच आहे..

मोरया म्हणणाऱ्या तोंडावर मास्क...आणि खिरापत वाटणाऱ्या हाताला सॅनिटायझर आहे..

मिरवणुका,देखावे,रात्रीची भटकंती यंदा काही व्हायची नाही..

करोना असला म्हणून काय झालं आठवणी तेवढ्या क्वारन्टीन नाहीत..

छोटे स्टॉल,रस्त्यावरील विक्रेते अन् असंख्य जोडधंदे यांची सल कित्येक पटींनी जास्त...

बुद्धीच्या देवतेला नमन करून मार्गक्रमण करणेच रास्त..

सहा महिने सरले ..उरलेले देखील सरतील..

पुढल्या वर्षी हीच कसर नक्की भरून काढतील..

सार्वजनिक गणेशोत्सव यंदा शांत असेलही कदाचित..

उत्साह,सय्यम अन भक्तिभाव जपुया तेवढा यथोचित..

पर्यावरण,विज्ञान आणि श्रद्धा यांची योग्य सांगड घालूयात..

परिस्थितीचे भान ठेवून 'मंगल मूर्ती मोरया' म्हणूयात..

गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा !!!

हृषिकेश पांडकर

२२.०८.२०२०

 

No comments:

Post a Comment