Thursday, March 29, 2018

घासाघाशी

 'घासाघाशीच्या' प्रकरणानंतर काल चार आजोबांमध्ये झालेला संवाद जसाच्या तसा तुमच्यासमोर ठेवतोय कुठेही 'ध' चा 'मा' केलेला नाही.

'विनाशकाले विपरीत बुद्धी' हो दुसरं काय आणि हो 'करावं तसं भरावही लागत' म्हणलं.इतकी चांगली बॅटिंग,भारी कॅप्टनशिप पण म्हणतात ना 'दैव देते आणि कर्म नेते'.बघा ना 'तेल गेले तूपही गेले आणि धुपाटणेही' गेल्यातच जमा आहे.आधीच मालिकेत पिछाडीवर पडले होते त्यात हि ब्याद आली.'दुष्काळात तेरावा महिना' दुसरं काय.मैदानावर लपून चोरी करणाऱ्याला अगदी 'शेरास सव्वाशेर' व्हिडीयोग्राफर भेटला म्हणायचा.आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहेच त्यात आयपीएल मधला प्रवेशही नाकारला म्हणजे 'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना' अशी अवस्था झाली की.एवढे मोठे विश्वविख्यात खेळाडू पण म्हणतात ना 'नाव मोठे आणि लक्षण खोटे'.ऑस्ट्रेलियन प्रवूत्ती अजून काय वेगळं काय समोर येणार होतं.एवढ्यात मागून जोशीबुवा हळूच म्हणाले 'कडू कारले तुपात तळले,साखरेत घोळले तरी ते कडूच'.

याचा फटका इतर इमानदार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना नक्की बसणार.कसंय तात्या 'ओल्याबरोबर सुकेही जाळायचेच' असो.पण या तिघांच्या बंदीमुळे रिकाम्या झालेल्या जागेवर यायला पोत्यानी लोक उतावळे असतील.कसं सांगू नाना 'एकाची जळते दाढी आणि दुसरा त्यावर पेटवू बघतो विडी' आणि मजा अशी आहे की आता थोडे दिवस जिंका किंवा हरा शिव्या तर तशाही तुम्ही खाणारच कारण 'एकदा का नाव कानफाट्या पडले कि पडलेच'.आणि बरका तात्या आता त्या स्मिथला सांगा, रडून वगरे पण फायदा नाही ओ 'ऋण फिटेल पण हीन फिटत नाही'.

मी तर म्हणतो आता 'आलिया भोगासी सादर झालेले उत्तम' कसे ? (अनुनासिक).उगीच 'फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावत बसायला सांगितलंय कोणी'.अहो आज मी त्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी खेळाडूंचा ट्विट का फिट काहीतरी वाचला या प्रकरणाबद्दल, उगीच आपला शहाणपणा, 'आपले नाही धड आणि शेजाऱ्याचा कढ. पण काही म्हणा नाना त्या प्रकरणामुळे आयपीलचे पैसे सुद्धा बुडाले म्हणायचे यांचे खरंच आहे 'आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी'.आता या प्रकरणातून इतरांनी शिकावे म्हणजे झाल. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा'.दामूकाका वैतागून म्हणाले कशाला पुढचा मागचा करताय अण्णा,यांच्याच टीम ने शंभर वेळा माती खाल्ली पण पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न' ते आहेतच.आधीच चिडके चिडके म्हणून ख्याती होतीच आत तर काय 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास'.लोक अजून काही बाही लिहून जखमेवर मीठ चोळत असतातच.

आणि काय हो अण्णा हे लोक त्या स्मिथची बरोबरी आपल्या कोहली बरोबर करायचे म्हणे.'कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली'.त्या स्मिथ पाठोपाठ तो वॉर्नर निघाला तो बँक्रॉफ्ट निघाला 'यथा राजा तथा प्रजा'.पण हे लोक आयपील मध्ये नाहीत हे बघून त्या राजस्थान आणि हैद्राबाद सारख्या टीमची अवस्था जरा डोलायमान झाली म्हणायची.हे म्हणजे 'असून अडचण नसून खोळंबा'.इतका गुणी खेळाडू पण शेवटी 'वाल्मिकीचा वाल्याकोळी झाला' हो दामूकाका.'तीन तिघाडा काम बिघाडा' झाले म्हणायचे कांगारूंचे.'बुडत्याचा पाय अजून खोलात' जाऊ नये हीच सदिच्छा.

जाऊदे हो आपल्यलाला काय करायचंय ? आपलं चहाच बघू. शेवटी काय 'आपण बरं आणि आपलं काम बरं'...चला..मामा चार चहा द्या बरं..

हृषिकेश पांडकर

 

Tuesday, March 27, 2018

माझ्या मोबाईल इनबॉक्सची व्यथा..!!!

 माझ्या मोबाईल इनबॉक्सची व्यथा..!!!

सोनियाताईंच्या माहेरची साडी घालून,शर्मांची लेक कोहलींची सून झाली,

क्रिकेट आणि बॉलिवूड ची 'मैत्री' पुन्हा 'रिश्तेदारी'मध्ये बदलली.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या जोडप्याच्या नावे झाला...

आयपीएलच्या बाजारात पुन्हा एकदा विकले गेले खेळाडू.

परदेशी लोकांना हाती घेऊन, परराज्याला नमावायला सज्ज झाले खेळाडू

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या कोट्याधीश खेळाडूंच्या नावे झाला...

'झुमर झुमर' म्हणत भंसाळींची पद्मावती आली

थेटरात पोचेपर्यंत तिची पार रया निघून गेली.इतिहास आणि स्वातंत्र्य याच्या नावाखाली उहापोह झाला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या खिलजी-पद्मावतीच्या नावे झाला…

शाळेतल्या मुलीने मारलेला डोळा संबंध देशाला लागला.

समोरचा मुलगा तर जाऊचदे,त्याचा धक्का इतर अनेकांनी उपभोगला

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या अल्लड मुलीच्या नावे झाला...

लोकांचे पैसे घेऊन देश सोडणाऱ्यांच्या रांगेत 'मोदी' उभा राहिला.

सामान्य माणूस तसाच हतबल,सहिष्णू आणि कायदेशीर कारवाईचा अजेंडा तितकाच 'नीरव' राहिला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या सालस,सोबर आणि सदाचारीच्या नावे झाला...

स्वतःच्या काकांचा हात सोडून दुसऱ्या काकांना जाणून घेणाऱ्या इंजिनाची शिट्टी सर्वांनीच अनुभवली.

आधी दिल्ली कि आधी महाराष्ट्र या चर्चेतच ती संध्या मावळली.

गप्पांच्या फलिताचे तर्क लावण्यात सामान्य बुडून गेला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र या काका-पुतण्यांच्या नावे झाला...

'बिजली गिराने में हू आई' म्हणणारी खऱ्या अर्थाने बिजली टाकून निघून गेली.

तांब्या आणि बादलीने अंघोळ करणाऱ्यांना सुद्धा आज टबबाथ मध्ये बुचकळून गेली.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र दारू,मोगरा आणि तिरंग्याच्या नावे करून गेली...

गावागावातून बळीराजा अनवाणी चालत आला.

कोणाला न्याय,कोणाचा स्वार्थ या गोष्टी तेवढ्या गुलदस्त्यातच राहिल्या.

राजकारण किती आणि वस्तुस्थिती काय याचा अंदाज लावत सामान्य पुन्हा चर्चेत रंगला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र त्या अनवाणी आणि आशाळभूत बळीराजच्या नावे झाला..

अपंगत्वावर उभेराहून 'कृष्णविवरावर' सिद्धांत मांडणारा ब्रिटिश अवलिया त्याच अनंतात विलीन झाला.

सापेक्षतावाद आणि किरणोत्सर्जन या शब्दांशीही संबंध नसणार्यांनी श्रद्धांजलीत दिवस खर्ची पडला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र त्या खुर्चीतल्या आजोबांच्या नावे झाला...

फेसबुक मधून माहितीची चोरी होते याचा बोभाटा विश्वाने अनुभवाला.

निषेध नोंदवायला पुन्हा त्याचाच सहारा घेतला.

झुक्याच्या माफीने सामान्य तेवढा समाधानी झाला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र 'कुठल्या पोस्ट टाका कुठल्या पोस्ट काढा' च्या सूचनांच्या नावे झाला...

लंकेसमोर डोलणारा नाग शेवटी वेटोळे करून टोपलीत शिरला.

मोरावरच्या कार्तिकात देशाने गारुडी शोधला.

पहिले पाढे पंचावन्न म्हणत नागोबा तेवढा विसावला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र विजयाच्या जल्लोषापेक्षा अद्दल घडवल्याचा आनंदात ओथंबला...

शेवटचा 'पांढरा गेंडा' गेला म्हणून सर्वांनीच गळा काढला.

गेल्याचे दुःख नक्कीच होते पण असा प्राणी होता हे त्या जातीतला शेवटचा जीव गेल्यावर कळावे या सारखा विरोधाभास जास्त मजेशीर होता

चित्ता म्हणजेच बिबट्या आणि लांडगा म्हणजेच कोल्हा अशी समजूत असणाऱ्या सर्वांच्या श्रद्धांजलीने तो जीवही अनंतात विलीन झाला.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र त्या 'पांढऱ्या गेंड्याच्या' नावे झाला…

'मी नाही त्यातली,कडी लावा आतली' चा आव आणणाऱ्या जंटलमन लोकांना आज चांगलाच हिसका बसला.

बॉल घासून गुळगुळीत करण्याचा नादात सगळा संघच रुतला.

तंत्रज्ञानासमोर उघड पडला चिडक्यांचा खोटेपणा.

माझ्या मोबाईलचा इनबॉक्स मात्र 'चड्डीत घातलेल्या हाताने' हसला...

पहिल्या तीन महिन्यातच माझा मोबाईलचा इनबॉक्स इतका थकला.

अजून काय जिरवावे लागेल याच चिंतेने ग्रासला.

चार टप्प्यातील पहिला टप्पा आता कुठे संपला.

सगळा इनबॉक्स क्लियर करेपर्यंत कोकणचा राजा येऊन ठेपला... ☺

- हृषिकेश पांडकर

 

Thursday, March 8, 2018

महिला दिन

 वर्षाच्या ३६५ दिवसातला एक दिवस महिलांच्या नावानी घोषित करून त्याच्या शुभेच्छा फोन किव्वा तोंड दोन्ही भरून देण्यापेक्षा प्रत्येक दिवशी समान न्यायाने वर्तन केल्यास 'हि' वागणूक विशेष दिन म्हणून साजरी करावी लागणार नाही. कदाचित असा दिवस ठरवून साजरा करावा लागतो हि खंत असू शकेल.पण कृतज्ञता आणि प्रेम या दोन्ही भावना व्यक्त करण्याकरिता प्रातिनिधिक म्हणून असलेला हा दिवस असावा.


 

'रांधा वाढा उष्टी काढा' पासून ते 'मुलगी शिकली प्रगती झाली' या मार्गावर धावणारे आपण पुन्हा 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या वळणावर हळू का होतो याचा विचार अंतर्मुख करायला लावणारा नक्कीच आहे.

फोटोचे आणि महिलादिनाचे साधर्म्य म्हणाल तर फोटो मध्ये वाघीण आहे.आणि अर्थातच फोटो आणि लिखाण यात कुठलाही उपहास दडलेला नाहीये.आपल्या बछड्यांना घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या वाघिणीची आगंतुक आलेल्या जीपला पाहून झालेली मुद्रा 'पोटच्या पोरांची काळजीच दर्शवते'.या आणि अशा अनंत मुद्रा अनंत अवतारात सदैव धारण करू शकणाऱ्या सर्व महिलांना 'महिला दिनाच्या' मनापासून शुभेच्छा.

‘ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः |

यत्रैतात्सु न पूज्यन्ते सर्वस्ताsफलः क्रियाः ||’

या ओळी स्त्रीमहात्म्य तोलून धरायला पुष्कळश्या सक्षम आणि स्व-स्पष्टीकरणात्मक आहेतच.

पुन्हा एकदा शुभेच्छा !!!

#ThoughtWithShot

Bor Tiger Reserve | India

 

Monday, March 5, 2018

नवरंग

 ज्याच्या नावातच त्याच्या सौन्दर्याचा उल्लेख आहे असा हा नवरंग.आपल्या वीतभर आकारात नऊ विविध रंग धारण करणारा हा जीव पहायला जितका मनोहारी वाटतो तितकाच तो शोधायला अथवा पहायला मिळणे अवघड आहे.


 

अतिशय चुणचुणीत आणि चंचल असा हा नाजूक जीव.पश्चिम घाटावर मिळणार नवरंग आणि पूर्वेच्या किनाऱ्यावरील खारफुटीवर मिळणार 'मॅन्ग्रूव्ह पिट्टा' या मध्ये दिसायला जरी साम्य असले तरी दोघांची विभागणी करण्याइतका फरक नक्कीच आहे.'पिट्टा' हे या पक्षाचे इंग्रजी नाव.

बोटीतली सफारी पूर्ण करून झाल्यावर सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास आम्ही त्या खारफुटीच्या कोरड्या पायवाटेवरून जात असताना, डाव्या अंगाला पसरलेल्या झाडीत हा नजरेस आला.थोडासा चिखल गाळ काही ठिकाणी वाळलेला घट्ट झालेला गाळ आणि त्यातून तोंड वर केलेली असंख्य बारीक काठ्यांसारखी मुळे.त्या दाटीवाटीत उड्या मारणारा हा रंगीबेरंगी वीतभर नवरंग आपले खाद्य शोधत बागडत होता.

उन्हाची तिरीप आणि आड न येणारी फांदी यांची प्रतीक्षा करून आम्ही आपापले क्षण टिपत होतो.रंगीत असल्यामूळे एवढ्या काट्याकुट्यातही हा पक्षी आपला वेगळेपण सिद्ध करतो.समोरून पाहण्यापेक्षा मागून किव्वा एका बाजूने पाहताना याच्या अंगावरील सर्वांच्या सर्व नऊ रंग व्यवस्थित पाहता येतात.

पायाखाली आलेल्या कोरड्या पानांचा आवाज टाळून आणि शक्य तितक्या सावधपणे हालचाल करून हा फोटो टिपण्यासाठी केलेल्या अट्टाहासातच या फोटोचे समाधान दडलेले आहे.चिखलात राहणारे पक्षीही सुंदर दिसू शकतात यावरही आता शिक्कामोर्तब झाले.

#ThoughtWithShot

Odisha,India | January 2018