Wednesday, March 7, 2012

माझे जीवन गाणे ...

         "गुरुवार"  ..वार जरी दत्ताचा असला तरी मात्र 'लाईट नसणे' हा प्रश्नच आमच्या समोर दत्त म्हणून हजर असतो.थोड्या फार प्रमाणात हा प्रश्न कमी झाला आहे.असे  वाटत असतानाच परवाच्या गुरुवारी लाईटच्या 'जाण्याने' धक्का बसणे हे मी पुन्हा अनुभवले ..Invertor, battery backup,solar backup यांनी केव्हाच हात वर  केले होते..Laptop असल्यामुळे "लाईट नाहीत" याचा आनंद फार काळ  टिकला नाही.आणि शांततेत कामाला पूर्ववत सुरुवात झाली.Server चा आवाज,लिफ्ट चा आवाज या आवाजाची अनुपस्थिती सुसह्य वाटत होती.मी सहज म्हणून माझ्या फोन मधला FM चालू केला आणि earplugs लटकावून कामाला लागलो.मी शक्यतो असे गाणी ऐकत बसलोय असे घडत नव्हते पण एवढ्या शांततेत तेवढाच टाईमपास म्हणून मी रेडीओ ऐकायचे ठरवले होते. मात्र पुढचे सुमारे साडेतीन तास मी एका वेगळ्याच विश्वात गेलो.सर्वसाधारणपणे पुण्यामध्ये ६/८ music stations आपण व्यवस्थित ऐकू शकतो.ज्याला 1500 रुपयांचा फोन  आणि ८५ रुपयाचा ear plug खूप पुरून उरत होता.
        मी संध्याकाळी घरी आलो,आणि आवरून जिम मध्ये गेलो.व्यायाम करत असताना माझ्या शेजारी माझा  मित्र trademill वर पळत असताना earplug लावून गाणी ऐकत असल्याचे मी पाहत होतो ,जिम झाल्यावर मी त्याला विचारले कि तुझ्या ipod वर तू किती गाणी टाकली आहेस आणि किती बसतात ? मोठ्या अभिमानाने त्याने Ipod माझ्या हातात ठेवला,मला म्हणाला कि 'सध्या २०० गाणी आहेत आणि अजून हजार दीड हजार सहज बसतील.मी चांगली, नवीन selected गाणी टाकली आहेत'.मी हसलो आणि त्याला विचारले कि 'अरे म्हणजे तुला कुठली गाणी लागणार आहेत हे माहित असणार' ? तो यावर म्हणाला  'म्हणजे काय...मीच तर टाकली आहेत...सगळी आवडीची आहेत रे..' मी हसलो..त्याला ipod परत केला..आणि घरी मार्गस्थ झालो...अर्थात मी त्याच्यावर हसलो  नव्हतोच...
         रात्री अंथरुणावर आल्यावर दुपारचा आणि संध्याकाळचा प्रसंग एखाद्या डासासारखा माझ्याभोवती गुणगुणत आला.मी सहज दुपारचा प्रसंग आणि संध्याकाळचा प्रसंग compare केला होता..
         दुपारी मी FM ऐकत होतो.तेव्हा मला अजिबात कल्पना नसायची कि पुढचे गाणे कोणते आहे.फक्त ऐकत राहणे हे एकच काम होते.. दुपारचे ३ तास मी वेगळ्याच विश्वात होतो हे सांगायचे मुख्य कारण हेच होते.गाण्याची आवड निवड हा वेगळाच मुद्दा आहे.पण आठवणीतील गाणी हि गोष्ट मात्र सगळ्यांना नक्कीच  लागू होते.भले ती आठवण चांगली असो किवा वाईट.असे बरेच प्रसंग एखाद्या गाण्यामुळे आयुष्यभर कायम लक्षात राहतात.काही अशी गाणी आहेत जी अचानक कानावर आली कि आपल्याला एखाद्या जुन्या वेळेची आठवण होते.काही गाणी अशी असतात कि ती ऐकल्यावर अगदी तोच क्षण देखील आहे तसा आठवतो.'तू चीज बडी हे मस्त मस्त' हे गाणे मी ऐकलं आणि  'एक से बढकर एक' नावाचा गाण्यांचा कार्यक्रम जसाच्या तसा डोळ्यासमोर आला.आता तस पहायला गेला तर फार  काही विशेष कार्यक्रम नसेलही  कदाचित पण या ४ मिनिटाच्या गाण्याने संपूर्ण उजळणी करून दिली.हीच गत झाली 'हमसे हे मुकाबला' मधील 'मुकाबला' या  गाण्याची, हे गाणे ऐकले आणि थेट 'फिलिप्स Top 10' आठवले, कारण या गाण्याचे lyrics कधीच समजले नव्हते आणि तेव्हा या कार्यक्रमात खाली lyrics लिहून यायचे.त्यामुळे गाणे ऐकणे आणि पाहणे या पेक्षा Lyrics वाचणे हा कार्यक्रम असायचा. हे गाणे ऐकल्यावर पुन्हा भूतकाळात येऊन विसावलो होतो.
काही गाणी आणि प्रसंग याचा ताळमेळ काहीच नसतो पण त्यांचा संबंध का लागतो याचे कोडे उलगडत नाही पण ते गाणे ऐकले कि क्लिक करावे तसे आपण भूतकाळात त्या प्रसंगाच्या फोल्डर मध्ये येऊन पडतो एवढे मात्र नक्की.
      'स्वदेस' मधील "ये तारा वो तारा " हे गाणे मी आत्ता जरी ऐकले तरी मी त्या दिवाळीच्या दिवशी आम्ही japanese group भेटलो होतो हे मला का आठवते. आणि ते सुद्धा ठिकाण,वेळ,लोक यांच्या संपूर्ण तपशीलासाहित.रणरणत्या उन्हात देखील 'कहो न प्यार है' मधील ती दोन गाणी ऐकली कि  मी direct ' हिमालयातील पिंडारी' Glaciour वर जाऊन का पोहोचतो."चक दे इंडिया" चे Title song ऐकल्यावर भले आज भारत डावाने हरला असेल तरीही मी मात्र कोकणातील मित्राच्या घरी पाहिलेल्या आणि आपण जिंकलेल्या २०-२० विश्वकरंडकाच्या फायनलच्या आठवणीत का रमतो.
   या ५ मिनिटाच्या गाण्यात एवढी ताकद असते का या वर माझा अजूनही विश्वास बसत नाही.

         एखादे गाणे ऐकले कि मी direct मित्राच्या लग्नात जाऊन पोहोचतो.आणि लग्नात नाही बरका, लग्नाला जाताना केलेल्या बस च्या प्रवासात जाऊन पोहोचतो.आणि मग तो बस चा प्रवास,ते रूम वरचे राहणे,मित्राचे लग्न,लग्न असूनही हॉटेल मध्ये केलेले जेवण आणि परतीचा प्रवास या गोष्टी आपसूक माझ्या  डोळ्यासमोरून जाण्याची भूमिका न चुकता बजावतात.काही वेळेला तर एखादे गाणे आपल्याला एका विशिष्ट क्षणाची आठवण करून देतात म्हणजे ते गाणे ऐकले  कि मला फक्त, मी कुठे उभा होतो माझ्या समोर काय दिसत होते याचीच फक्त आठवण करून देते.म्हणजे मी ते गाणे ऐकले कि मी direct 'रानडे institute ' च्या  canteen मध्ये सगळ्यात उजवीकडच्या खुर्चीत बसलोय आणि समोर FC road झाडाच्या फांद्यांमधून दिसतोय एवढंच फक्त आठवते.
       एखादे गाणे मला कुठेही असलो तरी आमच्या नवीन गाडीच्या माझ्या पहिल्या राइड ची आठवण करून देते.म्हणजे भले मी रस्तावरून चालत असीन आणि मी ते गाणे ऐकले तर मला नकळत आमच्या गाडीतूनच जावे लागते.....किमान 5 मिनिटे तरी.
        भले मी आत्ता ५४ इंची ' home theater ' वर इंग्लिश सिनेमा पाहत आहे आणि अचानक कुठून तरी 'भोली भाली लडकी' हे गाणे मी ऐकले तर मी थेट ५४ वरून १४ इंची ' black n white ' टीव्हीवर जातो...टीव्ही वर असलेले मोट्ठे आवाजाचे बटन मला आवाज वाढविण्याची साद घालतात..आत्ताच्या हातातल्या रिमोट चे काय घेऊन बसलाय.
             बर प्रत्येक वेळी गाण्यामुळे जुन्या आणि छान आठवणींना उजाळा मिळेल असेही नाही.एखाद्या आनंदाच्या क्षणी मी ते गाणे ऐकले मी direct 'Dukes Nose ' च्या  ट्रेक ला गुडघा दुखावल्याने दोन मित्रांचा आधार घेऊन चालतोय याची आठवण करून देते.पण म्हणून ते गाणे ऐकूच नये असे मला कधीच वाटले नाहीये.कारण ती ५ मिनिटे मला तो संपूर्ण ट्रेक, तो पाऊस, तो ट्रेन प्रवास आणि तो लंगडत तुडवलेला लोणावळ्याचा रस्ता या गोष्टीनी न्हाऊ घालते.
         एखादे गाणे थेट दिवाळीच्या सुट्टीत केलेल्या किल्ल्यावर नेऊन सोडते.आता ते गाणे मी तेव्हा किल्ला करताना ऐकले होते कि काय हे मला आठवत नाही पण ते गाणे आत्ता कानावर आले कि मी थेट आमच्या galery मध्ये केलेल्या किल्ल्यावर जाऊन थांबतो.
          गाण्याचे lyrics या गोष्टीला कारणीभूत असेल..असेही नसावे कारण अहो इयत्ता ४ / ५ मध्ये 'उर्वशी' सारख्या गाण्याचे lyrics समजल्यामुळे लक्षात राहिले असे होणे किमान माझ्यासाठी तरी शक्य होते असे मला प्रामाणिक पणे वाटत नाही.पण अजूनही उर्वशी हे गाणे ऐकले कि मी मला आमच्या घरासमोरचा चिखलाने माखलेला  रस्ता आठवतो.कारण तिथे डांबरीकरण झाले नव्हते.पण आता हे गाणे आणि तो रस्ता याचा संबंध काय असेल याचा विचार करण्यापेक्षा 'आत्ताचा रस्ता तेव्हा असा दिसत होता होय' या आश्चर्याने त्या वेळेचा आनंद लुटतो.
         अश्या अनेक गोष्टी मला अनेक क्षणांची आणि प्रसंगांची  आठवण करून देतात.कदाचित मला जसे गाण्याबद्दल असे वाटते तसेच कदाचित सगळ्यांचे असेलही.याला कारण काय असेल हे शोधण्यात मला काडीमात्र रस नाहीये.पण आश्चर्य नक्की आहे.पण प्रत्येक कुतूहल उलगडून बघायची गरज असतेच असे नाही.
          आता रात्रीचे बरेच वाजून गेले होते...आणि मी या निष्कर्षावर पोहोचलो होतो कि ipod वर गाणी ऐकणे किव्वा FM वर गाणी ऐकणे यात फरक एवढंच आहे कि iPod मध्ये कोणती गाणी लागणार आहेत हे त्याला आधी माहित होते पण तसे FM चे होत नाही...आणि त्यामुळेच कदाचित अनपेक्षित लागलेल्या गाण्यामुळे भूतकाळात  जाण्याचा माझा आनंद जास्त होता..

           अर्थात यात कुठेही तुलना नाहीये.पण अचानक एखादे ऐकलेले गाणे आपल्याला भूतकाळातील एखाद्या ठराविक आठवणीवर नेऊन सोडते.म्हणजे ५ मिनिटाचे  गाणे आपल्या आयुष्यातील कित्त्येक आठवड्यांचा,महिन्यांचा आणि वर्षाचा देखील काळ एका क्षणात rewind करतात.

....आणि याच विचारात माझ्या झोपेने माझ्या डोक्यातील विचारांचा ताबा घेतला ...

कदाचित आयुष्याच्या पुस्तकात हि गाणी Bookmarkचे काम करतात कि काय असे मला नेहमी वाटते...

                                                                                                                                  हृषीकेश पांडकर
                                                                                                                                  ( ०७-०३-२०१२ )

Tuesday, February 14, 2012

आमच्या गावची जत्रा...


       परवा रात्रीची गोष्ट आहे.थंडीची लाट जरा कमी झाली आहे असे वाटत असतानाच अचानक पुन्हा थंडी वाढली आणि हवामानशाळेनी या मोसमातील निच्चांकी हवामानाची नोंद केली.त्याच रात्री साधारण १० च्या सुमारास डेक्कन कडून नारायण पेठेत चाललो होतो,बाबा भिडे पुलावर थंडीने सगळ्या मर्यादा सोडल्या होत्या.कारण दोन्ही बाजूने नदी आणि संपूर्ण रिकामी जागा आहे. या पुलावरून जात असताना मला कायम तेथे लागणाऱ्या जत्रेची किव्वा रॅम्बो सर्कस ची प्रकर्षाने आठवण होते.परवा जात असताना पण मी सहज डावीकडे पाहिले तर नदीपात्रात कुठले तरी स्टेज उभारण्याचे काम चालू होते एवढ्या कडाक्याच्या थंडीत लोक काम करत होते.मी तसाच पुढे गेलो तर तिथे " जाहीर महाप्रचारसभा " असे मोट्ठे होर्डिंग लागले होते.मग मला लगेच समजले कि नदीपात्रामध्ये हि सभा होणार आहे.त्यानंतर सुमारे तासाभरानंतर मी पुन्हा घराकडे निघालो होतो.पुन्हा पुलावर आल्यावर त्या तयारीकडे लक्ष गेले.स्टेज चे काम बर्यापैकी पूर्ण झाले होते.लोक अजूनही कामात मग्न होते.मी घरी आलो.आणि अंथरुणावर येऊन झोपलो.का कोणास ठाऊक पण नदीपात्रात लागणारी जत्रा आणि निवडणूक या दोनच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या..काहीवेळानंतर झोपेने माझ्या या विचारांवर ताबा केव्हा घेतला हे समजले देखील नाही.
           मी एका मोठ्ठ्या जत्रेच्या प्रवेशद्वारापाशी कुतूहलाने पाहत उभा होतो.काही लोक आत मध्ये जात होते काही बाहेर येत होते.मी देखील आत काय आहे ते बघुयात असा विचार करून जत्रेत प्रवेश केला.आत पाहतो तर काय सगळी कडे नुसता झगमगाट होता.विविध स्टॉल्स लागले होते.स्टॉल्स वर त्या त्या स्टॉल्स ची माहिती देणारे लोक होते.आमच्या स्टॉलवर काय चांगले आहे , आमचा स्टॉल कसा भारी आहे,आमच्या इथे काय गोष्टी मिळतात.आमच्या इथे कुठले खेळ आहेत त्यात तुम्ही जिंकल्यावर तुम्हाला काय मिळेल अशा आशयाचे मजकूर लिहिलेले बोर्ड्स,फळे बाहेर टांगलेले दिसत होते.काही स्टॉलवाले तर चक्क खुर्चीवर उभे राहून मोट्ठ्याने ओरडत लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
         क्षणभर 'कुठे आलो या गदारोळात' असे देखील वाटले होते.पण मागे फिरलो नाही..आलोच आहोत तर नीट पाहून तरी जाऊयात असे वाटून मी जत्रेत एकरूप  झालो.
        थोडेसे चालत पुढे गेलो तर डाव्या बाजूला कमळाच्या आकाराचा मोठ्ठा तंबू उभारला होता ,बाहेर कमळाचे गुणधर्म,महत्व आणि उपयोग काय काय आहेत हे  दर्शवणारी मोठी चित्रे टांगलेली होती.चालत चालत त्या कमळाच्या आकाराच्या तंबूत देठामधून वाकून प्रवेश केला,आत मध्ये कमळाच्या फुलापासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू,कमळाच्या पानापासून बनवलेल्या औषधी गोष्टी इत्यादींची टेबल्स मांडून ठेवलेली होती.शेजारी काही लोक इतर फुलांपेक्षा आमचे कमळ कसे गुणवान आहे हे आत आलेल्या लोकांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न करत होते.आणि आपल्याकडील वस्तू त्यांच्या गळी उतरविण्याचा घाट घालत होते.
         मी या कलकलाटातून हळूच निसटलो आणि पुन्हा बाहेर येऊन बाकीची जत्रा पाहणे सुरु ठेवले.
थोडा पुढे चालत गेलो तर अजून एक  मोठ्ठा स्टॉल लागला होता जिथे एक खेळ चालू होता.मोठ्ठ्या थर्मोकोल वर एक भारताचा मोठा नकाशा काढला होता आणि त्यात सर्व राज्ये विविध रंगांनी रंगवलेली होती.आणि ते थर्मोकोल चे मोट्ठे शिट समोरच्या बाजूस लटकविलेले होते.आता जो कोण हा खेळ खेळत असेल त्याने  सर्वप्रथम काउंटरवर पैसे भरायचे, पैसे भरून झाल्यावर त्याला एक धनुष्य आणि ३ बाण मिळतात,  मग तिथे उभा असलेला त्यांचा स्वयंसेवक त्याला सांगतो कि अमुक एका राज्यावर बाण मारायचा आणि समजा तो बाण अचूक लागला तर त्यांनी जी काय बक्षिसे ठरवलेली होती ती त्यांना मिळणार.मी सुमारे १५ मिनिटे हा  खेळ पहात होतो.७-८ लोक माझ्यासमोर खेळले मोठ्या हौशीने पैसे भरून खेळले पण एकाचा देखील नेम अचूक लागला नाही.नंतर निराश होऊन 'जाऊदे पुढल्या  वेळी' असे म्हणत पुढे जात होते.तिथे असलेले स्वयंसेवक मात्र आपले बक्षीस सुरक्षित आहे आणि पैसे पण मिळत आहेत या आनंदात अजून लोकांना खेळण्याचे  आमंत्रण देत होते.
        मी देखील आता तिथून काढता पाय घेतला आणि पुढल्या स्टॉलवर स्थिरावलो.पुढे काहीतरी भलताच प्रकार चालू होता.मी व्यवस्थित जागा हेरून तिथून तो  प्रकार पाहू लागलो.मोठा स्टॉल होता त्यावर विविध रंगाच्या पाण्याचे ट्रे ठेवलेले होते.आणि प्रत्येक ट्रे शेजारी एक पांढऱ्या शुभ्र कापडाचे चौकोनी तुकडे कापून ठेवलेले होते.तर हा प्रकार असा होता कि दाराजवळ पैसे भरून आत जायचे, समोरच्या बाजूला त्यांचे लोक उभे होते.आपण सर्वप्रथम आपले पंजे स्वच्छ धुवायचे आणि पुसून त्या रंगीत पाण्यात बुडवायचे.बुडवून झाल्यावर तोच पंजा शेजारी ठेवलेल्या पांढऱ्या कापडावर दाब देऊन उमटवायचा आता आपल्या पंजाची प्रतिमा त्या  कपड्यावर येते.आणि मग ते कापड त्यांचे लोक आत मधील खोलीत घेऊन जातात आणि ५ मिनिटानंतर आपले कापड आणि एक कागद पुन्हा आपल्याला परत  करतात, त्या कागदावर आपले भविष्य लिहिलेले असते.( म्हणजे काहीतरी लिहिलेले असते आणि तेच तुमचे भविष्य आहे असे ते सांगत होते.)..लोक आपापला  कागद आणि कापड घेऊन स्टॉल बाहेर येत होते.काही लोक चुकीचे वाटतंय म्हणून हसत होते.काही लोक भविष्य वाचून खुश होत होते.काही लोक पैसे भरून देखिलाही "अरे नुसता पंजा बघून काही भविष्य ठरते का ?" असे म्हणत नैराश्य व्यक्त करत होते.
           उतार वयातील मंडळी दुसर्यांचे भविष्य सांगण्यात गुंतलेली पाहून थोडेसे आश्चर्य वाटत होते.थोडक्यात काय तर स्टॉल वाले कार्यकर्ते सोडले तर बाकीच्यांना कितपत आनंद मिळत असेल अश्या संभ्रमात मी तिथून पुढे निघालो.
गर्दी भरपूर झाली होती मी देखील गर्दीतून वाट काढत पुढे जात होतो.पुढे तर एक वेगळेच चालू होते.मोठ्ठी आगगाडी बनवली होती आणि त्या आगगाडीतून संपूर्ण जत्रेमधून फेरफटका मारण्याची संधी तुम्हाला मिळत होती.भलेमोठे इंजिन बनवले होते आणि त्यामेगे ३ डबे जोडलेले होते.संपूर्ण जत्रे मध्ये काय चालू आहे हे  तुम्हाला पहायचे असेल तर त्या इंजिनात बसा..एकदा इंजिनात बसलात कि बाकी ठिकाणी वेगळे जायची गरजच नाही अशा प्रकारची जाहिरात करणारे फलक  बाहेर लावलेले होते.सर्व तरुण मंडळी इंजिन भोवती जमली होती.इथे पण आधी पैसे भरायचे आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचे.आणि मग फेरी मारून झाल्यवर पुढे जायला मोकळे.एकदा तिथून सुटलेले इंजिन पाहून मी तेथून निघालो.फेरफटका मारलेला तरुण वर्ग चांगलाच खुश वाटत होता पण बसल्या बसल्या  आपले स्टॉल नुसते बघून लोक पुढे जातात या कल्पनेने इतर स्टॉल वाले इंजिनावर भलतेच नाराज दिसत होते..
       तिथून पुढे गेलो, आपल्याला खूप उशीर झाला आहे असे वाटून कोणाला तरी वेळ विचारावी म्हणून आजूबाजूला पाहू लागलो तेवढ्यात समोरच्या स्टॉल वर  घड्याळ लावलेले दिसले,पळत पळत त्या स्टॉल पाशी गेलो पण तिथे फक्त मोठ्ठ्या घड्याळाचे चित्र टांगलेले होते आणि त्यात १० वाजून गेले होते.पण कागदाचे  घड्याळ काय खरी वेळ दाखवणार म्हणून मी वेळ विचारण्यासाठी त्या घड्याळाच्या स्टॉल वर गेलो.आणि समोर पाहतो तर अनंत प्रकारची घड्याळे मांडून  ठेवलेली  होती.काही मनगटी घड्याळे काही भिंतीवरची घड्याळे काही जुनी घड्याळे,'साहेब' लोक घालतात तसली बिनकाट्याची घड्याळे,मोठे शेतकरी लोक वापरतात तसली सोनेरी रंगाची घड्याळे अशी अनेकविध घड्याळे उपलब्ध होती.लोक आपल्या खिशाला आणि पसंतीला योग्य वाटतील अशी घड्याळे निवडत होते.सगळ्यांचे एकच मत होते "बाबा रे वेळ योग्य दाखव म्हणजे झालं".
           घड्याळे बघण्यात माझा बराच वेळ गेला मात्र आत्ता किती वाजले हे पाहण्यासाठी मला त्या घड्याळाचा उपयोग झालाच नाही शेवटी बाहेर येऊन एका काकांना विचारले "काका किती वाजले"...काका हसत म्हणाले अरे बाळा इतका घड्याळांच्या दुकानात जाऊन आलास आणि साधी वेळ तुला समजली नाही ?...आणि एवढे म्हणून  ...आणि ते काका गालातल्या गालात हसत मार्गस्थ झाले....मला काहीच समजले नाही.मी मात्र चालू आणि वेळ दाखवणाऱ्या घड्याळाच्या शोधात मार्गी लागलो.
         थोडे पुढे गेल्यावर ज्या लोकांना स्टॉल ची गरज नसावी किव्वा ज्यांना स्टॉल मिळाले नसावेत अशी लोक आपापले छोटे चौथरे टाकून बसले होते.तिथे काही लोक  लहान मुलांची खेळणी विकत होते ज्यामध्ये विमाने,सायकल,बॅट,शिट्टी,हत्ती अश्या प्रकारच्या गोष्टी मांडून ठेवलेल्या होत्या.या ठिकाणी जास्त गर्दी जाणवत नव्हती.मी आपला सहज वर वर सगळ्या गोष्टी आपल्या नजरेखालून घातल्या आणि पुढे निघालो.त्यांचा पसारा जरी लहान असला तरी आपल्या वस्तू विकायच्या  कश्या हे त्यांना पक्के ठाऊक होते.लोकांना आपल्याकडे खेचण्याचा एकही मार्ग त्यांनी मोकळा सोडला नव्हता ....
          आता मात्र मला आपल्याला पोट आहे आणि पाय देखील याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली होती.खिशात फारसे पैसे नव्हते त्यामुळे चहा कुठे मिळतोय का हे  शोधत मी थोडा पुढे गेलो आणि एका ठिकाणी मोठ्ठा फलक लावला होता "चहा घ्या...आणि तो सुद्धा फक्त आमच्याच कप -बशी मधून"मी आनंदाने तिथे गेलो माझ्याप्रमाणे अनेक लोक तिथे जमले होते.मी पैसे देऊन चहा घेतला तेव्हा तिथल्या स्टॉल वरचा माणूस मला म्हणाला कि चहा कसाही असो आमच्या कप -बशीतून घेतला म्हणजे चवदार लागणारच.मी तोंडदेखले हसून ती कप बशी घेतली आणि शेजारी उभा राहून चहा प्यायलो.चहा घेऊन झाल्यावर..चहा नसता प्यायला तर किमान पैसे तरी वाचले असते असे वाटण्याइतपत चवहीन चहा होता.माझ्याप्रमाणेच इतर लोकांच्या पण प्रतिक्रिया अश्याच होत्या.पोटातील अग्नी  विझाव्ण्याच्यी  कल्पनाच मुळात विझ्ल्यामुळे मी काहीसा निराश होऊन पुढे निघालो...
        सरतेशेवटी
  मी जत्रेच्या बाहेर पडण्याच्या दाराजवळ येऊन पोहोचलो. जत्रा संपूर्ण पाहून झाली होती. माझ्याबरोबर बरेच लोक बाहेर पडत होते काही लोक आनंदी वाटले  काहींना मनासारखे न मिळाल्याचे नैराश्य लपविता येत नव्हते.काही लोक छान टाईमपास झालं या आनंदात हसत बाहेर पडले.तर काही लोक पैसे जाऊन देखील  नेमबाजी जिंकता आली नाही याच दु:खात बाहेर पडत होते.काहींना चुकीच्या ठिकाणी पैसे घालवले याची खंत सलत होती.
परंतु जत्रेच्या दाराजवळ भिक मागणारा भिकारी आणि जत्रेतील
 प्रत्येक स्टॉल मालक यांना मात्र फक्त फायदाच होत असावा.कारण त्यांचे चेहरे कायम आनंदीच होते.
        याच  विचारात मी तेथून बाहेर पडलो.समोर पुन्हा भिडे पूल होता...घरी निघायचे यासाठी मी खिशात ठेवलेल्या गाडीच्या किल्ली साठी हात नेला आणि "चला उठा...रात्री विनाकारण जागरणं करायची मग सकाळी जाग येत येत नाही...मग अंघोळीला बरोबर घाई होते" असा आईचा गोड आवाज कानावर आदळला....ताडकन जागा झालो...
    घड्याळात ८ वाजून गेले होते....उठण्याशिवाय गत्यंतर नव्हते...






         




                                                                                                                               हृषीकेश पांडकर
                                                                                                                                (१४-०२-२०१२)

Wednesday, February 1, 2012

रोज न येणारी ..रोजनिशी..

          सकाळी झोपेतून जाग आल्यापासून ते अंथरुणावरून बाहेर पडेपर्यंत घरातील लोकांच्या बोलण्याचा,भांड्यांच्या आवाज येण्याची इतकी सवय झाली आहे कि एक दिवस हा आवाज झाला नाही कि अजूनही मध्यारात्रच आहे असे वाटून परत झोपावे कि काय असे वाटायला लागते.काही गोष्टींची इतकी सवय होऊन जाते कि या गोष्टी चुकीच्या कि बरोबर हा विचार करायचे कष्ट देखील घ्यावेसे वाटत नाहीत.कदाचित असू शकतीलही चुकीच्या.....
          तसेच काहीसे इथे झाले आहे...घरी आई बाबा असण्याची सवय पण अशीच काहीशी आहे.
दोन दिवस आई बाबा गावाला गेले कि कुठल्या गोष्टींना तोंड द्यावे लागते याचे प्रत्यंतर मला या आधी देखील आले आहे.पण तो अनुभव कागदोपत्री करण्याचा हा पहिलाच प्रयत्न.
    तसे पाहायला गेले तर आई बाबा गावाला जाऊन आपण घरात एकटे राहणे हि प्रचंड सामान्य आणि शुल्लक बाब आहे.पण केवळ दैनंदिन प्रवाहात अचानक  अडथळा आल्याने या गोष्टीला वेगळेच महत्व प्राप्त होते असे माझे वैयक्तिक मत आहे.
    दिवसातील २४ तासात १० तास ऑफिस,संध्याकाळचे ४ तास मित्र आणि इतर गोष्टींसाठी बाहेर आणि रात्री ७ तास झोप असे साधे समीकरण आहे. म्हणजे केवळ ३  तासांचा हिशोब लावायचा आहे.वर वर जरी हे तीनच तास मला manage करायचे आहेत असे वाटत असले तरी आई बाबा घरी असणे आणि नसणे यावर दिवसाच्या २४ तासाचा मनोर्याचा तोल सांभाळणे सर्वस्वी अवलंबून असते या निष्कर्षावर येऊन मी पोहोचलो आहे.
  परवाचीच गोष्ट आहे आई बाबा २६ जानेवारी च्या  'connected holidays' निमित्त घराबाहेर होते.मी घरी एकटाच होतो. उद्यापासून ३ दिवस आई बाबा घरात नाहीत या विचाराने झोप लागायला अवघड jaat नाही पण सकाळी आई बाबा घरात नाहीत या विचाराने अंथरूण सोडणे मात्र नक्की अवघड जाते.
              सकाळ झाली त्यामुळे उठणे क्रमप्राप्त होते.रात्री लावलेले पडदे तसेच बंद होते.त्यामुळे उठल्यावर अंथरूण आवरणे,पडदे उघडणे,पेपर,दुध आधी घरात घेणे या कामांच्या प्रत्येकी एक अश्या ६/७ आठ्या माझ्या कपाळावर डोळे उघडता क्षणीच आल्या होत्या.
नाईलाज या शब्दामागे सगळ्या आठ्या लपवून कामाला लागलो.सकाळी उठल्या उठल्या दरवाजा उघडून बाहेर जाने आणि गार दुधाची पिशवी घरात घेणे खरच नकोसे वाटते,तरी बरं ८ च वाजले होते.हि basic कामं करून दात घासायला बेसिन जवळ उभा राहिलो.आणि चहा चा प्रश्न दत्त म्हणून हजर झाला.म्हणजे दात घासून  आधी चहा करायचा आणि मग तो प्यायचा या विचारानेच कदाचित ब्रश वर आलेली जास्तीची पेस्ट बेसिन मध्ये पडली असावी....
                बेसिन आणि आसपासची सगळी कामे करून ओट्याजवळ उभा राहिलो.Gas लावला भांडे ठेवले चहा ची तयारी झाली ....चहा ठेवला.आणि बाहेर पेपर घेऊन बसलो.चहा होऊन तो कपात ओतणे या सव्वापाच मिनिटांच्या वेळेत मी सुमारे १३ वेळा gas जवळ गेलो.आणि याचे कारण असे कि एक कप चहा,त्याकडे लक्ष
देणारा मी एकटा,आणि समजा धांदरटपणामुळे चहा उतू गेला तर gas शेगडी स्वच्छ करणे,ओटा स्वच्छ करणे,काळे ठिक्कर पडलेले भांडे घासणे हि त्या धांदरटपणामुळे complimentary म्हणून मिळणारी कामे पण मलाच करावी लागणार होती.म्हणून किमान हे नक्की टाळता येईल या विश्वासाने का होईना मी ते व्यवस्थित टाळले.
              चहाची चव कशी होती हे मी इथे नमूद करणे प्रकर्षाने टाळतो.कारण कालचे फ्रीज मध्ये ठेवलेले दुध direct गरम चहात टाकले कि चव बिघडते हे माहित असूनही दुधाचे भांडे फ्रीज मधून आधी बाहेर न काढल्याने चहाची चव हा वेगळाच मुद्दा होता. पण गरम चहा तयार झाला या खुशीत मी बाकीच्या गोष्टींना दुय्यम लेखात कप  बशी आणि बिस्किट्स घेऊन hall मध्ये येऊन निवांत बसलो.पण ह्या निवांतपणा चा आनंद चहाच्या चोठ्याची विल्हेवाट आणि 'दुधाचे काम झाल्यवर झाकून परत फ्रीज मध्ये ठेव' अशी आईची बजावणी या दोन गोष्टींनी फार काळ टिकू दिला नाही.
              पेपर वाचून झाल्यावर म्हणण्यापेक्षा चहा घेऊन झाल्यावर ओटा आवरून घेतला कारण चहा ओतताना किमान २ थेंब तरी आम्ही ओट्यावर सांडतोच.आई असताना कप बशी फक्त dining table पर्यंत पोहोचवणे एवढी एकाच जबाबदारी असते.मात्र आज ओटा स्वच्छ करणे हे देखील काम होतेच. चहा हा विषय संपल्यावर बराचसा काम झाल्याच्या अविर्भावात अंघोळीला गेलो.कपडे काढले आणि अचानक डोक्यात आले कि कचर्याचा डबा बाहेर ठेवायचा राहिला आहे.आता हे काम करणे must होते कारण आत्ता जर केर बाहेर ठेवला नाही तर एकदम उद्याच द्यायचा.नाईलाजाने कपडे घातले डबा बाहेर ठेऊन आलो.
अंघोळ उरकली आणि बाहेर आलो.घड्याळाने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या.ऑफिस ला होणारा उशीर अटळ होता.कपडे घालावेच लागतात म्हणून चढवले.घरातील दरवाजे तपासून घराबाहेर पडलो.ऑफिस मध्ये उशीर झालाच होता.आणि दुष्काळात १३ वा महिना म्हणजे दुपारी घरचा डबा नसून बाहेर खावे
लागणार होते या दु:खात ऑफिस चा पूर्वार्ध उरकला.संध्याकळी बरोब्बर  ७ ला पोहोचलो.कुलूप उघडायच्या आधी रिकामा कचर्याचा डबा पण बरोबर घेतला आणि आत गेलो.७ वाजल्यामुळे घरातला अंधार बाहेरच्या अंधाराशी स्पर्धा करत होता.आधी दिवे लावले.आणि बूट काढताना पुढे करायच्या कामाची कल्पना येऊ लागली.आता फक्त माझे आवरून झाल्यावर चहा मिळणार नव्हता किव्वा खायला पण मिळणार नव्हते.एक वेळ चहा मिळाला नाही तरी चालेल पण चहा करायला लागणार हि कल्पनाच सहन होत नाही.पण पुन्हा एकदा इलाज नव्हता.पुन्हा एकदा सकाळ प्रमाणे चहा केला.Rack वर जे डबे हाताला लागतील ते तपासून पहिले आणि ज्या गोष्टी खाता येऊ शकतील अशा खाल्ल्या.शक्यतो असे पदार्थ  घेतले जे खाल्ल्याने नंतरची कामे फार करावी लागणार नाहीत.डिंकाचे लाडू घरात आहेत यावर मी ठाम होतो पण डबा न सापडल्याने डिंकाच्या लाडूची तहान मारी बिस्किटांवर भागवावी लागली.पण खरचं आहे दुध मिळत नसेल आणि टाकणे तहान भागणार असेल तर ताक प्यायला हरकत काय आहे ....
"जाऊदे तसाही बाहेरच जेवायचे आहे" असे मनात म्हणून डिंकाचा लाडू न मिळाल्याचे अपयश लपवून घराबाहेर पडलो.
            रात्री जेऊनच घरी आलो कारण घरी नेऊन खाणे  आणि नंतर आवरणे या गोष्टी कल्पनेच्या बाहेरच्या होत्या.आता घरी जाऊन फक्त झोपायचे एवढेच काम होते.मात्र हे क्षणिक समाधान कुलूप उघडताच मावळले.
रात्री ११.३० वाजता बाल्कनी मध्ये वाळत टाकलेले सगळे कपडे घडी घालून आत आणणे या विचाराने मला उगीचच झोप जरा जास्तच आली आहे असे वाटू लागली .ते काम पूर्ण केले. ज्या गोष्टी बंद करायच्या त्या गोष्टी बंद केल्या.(नळ,बटन्स,खिडक्या,दार).सरतेशेवटी उशी पांघरून घेऊन बेड वर झोपलो...आणि अशा वेळी टी.व्ही  लाऊन पाहावा याची पुसटशी देखील  इच्छा झाली नाही.
       गादीला पाठ लागली आणि दिवसाचे संपूर्ण पान डोळ्यासमोरून गेले.
दिवस नेहमीचाच होता,दिनचर्या नेहमीचीच होती फरक फक्त इतकाच होता कि आज आई बाबा घरी नव्हते. 
      आता नोकरी,शिक्षण किव्वा अन्य कुठल्याही कारणास्तव तुम्ही वेगळे रहात असाल तर अशा लोकांना या गोष्टी अतिशय बाळबोध आणि नेहमीच्या वाटत असतीलही आणि मी त्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे.आणि मला त्यांचे विशेष कौतुक पण आहे.मात्र असा अनुभव कधीतरीच घेणार्यांना मात्र माझे म्हणणे पटले असावे .कदाचित कामाचे स्वरूप थोडे इकडे तिकडे होईल पण माझ्या भावना पोहोचण्यास काही तडजोड नसावी.
प्रत्येक गोष्टी बरोबर फायदे आणि काही तोटे पण येतातच पण यावेळी मात्र तोट्याचे पारडे सहज खाली जाते यात तिळमात्र शंका नाही.

         मुद्दा फक्त सवयीचा आहे...पण तो इतका प्रकर्षाने  जाणवतो  कि  नेहमचा दिवस पण नेहमीचा रहात नाही एवढे मात्र नक्की.

                                                                                                                                    हृषीकेश पांडकर
                                                                                                                                    ०१/०२/२०१२

Monday, November 28, 2011

स्वप्नपूर्ती ….


    काही गोष्टी विसरायच्या आहेत म्हणून लक्षात ठेवल्या जातात...आणि मग त्या कायमच्याच अविस्मरणीय होऊन जातात...

       कदाचित वर लिहिलेली ओळ याक्षणी मला किंचित खटकत असेलही..आणि खटकत आहेच..कारण मी ज्या विषयी पुढे लिहिणार आहे ती गोष्ट मला विसारावीशी का वाटत होती याचे आत्ता माझ्याकडे उत्तर नाही...
      एखादी गोष्ट करायची प्रचंड इच्छा असते.आणि त्या गोष्टीची इच्छापूर्ती होणे यासारखे समाधान नाही.
टीव्ही,इंटरनेट,रेडीओ,मासिके,पुस्तके,वर्तमानपत्र या माध्यमातून क्रिकेट अक्षरशः मनगटापासून चाटून पुसून घेतले आहे.
      पण आज पर्यंत एकही टेस्ट match याची देही याची डोळा पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती.India-WI च्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात तो योग होता असे म्हणायला हरकत नाही.सामना मुंबईच्या वानखेडे stadium वर होता.
      उद्या आपली batting येईल या हिशोबाने आदल्या दिवशी मुंबईला गेलो.रात्री ९ ला निघाल्याने पोहोचायला साधारण ११.३० झाले.मुंबईत कमी गर्दीच्या वेळा दाखवणारे घड्याळाच तयार झालेले नाही.त्यामुळे express-way संपल्यावर मुंबई चालू झाली हे सांगण्यासाठी "Navi Mumbai Welcomes you" या सारखे वेगळे बोर्ड लावायची काय गरज आहे असे मला नेहमी राहून राहून वाटते..समुद्राचा खरा वासच खुद्द प्रवेशाला सुवास शिंपडायला आहे.

     तर सांगायचा मुद्दा एवढाच कि आम्ही रात्री ११ .३० ला मुंबई ला पोहोचलो.अर्थात मुक्कामाचे ठिकाण अंधेरी असल्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी एक वेगळा प्रवास करावा लागतो हे हि तितकेच खरे आहे.पण उद्या आपल्याला match पहायची आहे या उत्साहातच मी इतका गुरफटून गेलो होतो कि प्रवासाचा शीण आला आहे हे जाणवायला  माझ्याकडे वेळच नव्हता.
      सकाळी उठणे हा माझ्यासाठी थोडा कठीण प्रकार आहे मात्र कठीणतेची व्याख्या उठून काय करायचे आहे या गोष्टीनुरूप बदलत राहते.आणि उद्या तर साक्षात देवाच्या दर्शनाला जायचे होते आणि तेही देवाच्या सर्वोच व प्रार्थनीय रुपात.त्यामुळे  उठण्याचा कंटाळा,किव्वा लवकर जाग न येणे यांसारखे शुल्लक अडथळे उद्भावायचा संबंधाच नव्हता.
     सकाळी सुमारे ६ वाजता एक अनामिक ओढ आणि कमालीचे औत्सुक्य या दोन गोष्टी sack मध्ये भरून वानखेडे गाठले.तिकीट मिळविण्यापासून सुरुवात होती.डोक्यात फक्त एकाच विचार होता कि तिकीट मिळवणे आणि stadium मध्ये जाऊन बसणे.Marin drive ला असलेल्या गेट no ३  वर बसलेल्या security गार्ड  ला तिकीटा बद्दल विचारले.तर तो म्हणाला कि चर्चगेट च्या पलीकडे incom tax ऑफिस समोर तिकीट मिळतील..तुम्हाला स्टेशन मधून जाता येणार नाही.फिरून जावे लागेल.आम्ही शेवटचे वाक्य पूर्ण होईपर्यंत गाडीत बसून पुढे पण गेलो होतो.२ किमी च्या प्रवासात ६ जणांना विचारून सरतेशेवटी आम्ही तिकीट काउंटर ला पोहोचलो.आमच्या आधी ३०/४० लोक आधीपासून रांगेत उभी होती.आणि काउंटर बंद होते.आम्ही पण गाडी लाऊन रांगेत उभे राहिलो.७ वाजले होते.रस्त्यावरची गर्दी वाढत होती आणि रांगेतली देखील.

        रांगेत उभे राहण्याच्या वयातील विविधता पाहून मुंबई आणि क्रिकेट या दोघांचे नाते इतके जुने आणि
घट्ट का आहे यावर पुन्हा एकदा मानसिक शिक्कामोर्तब करून तिकीट खिडकी कडे मी पाहत होतो.हातात हात घालून आलेल्या प्रेमी युगुलांपासून नातवाच्या हातात हात घालून आलेले आजोबा मी आमच्या रांगेत पहिले.प्रत्येकाच्या चर्चेला एकाच विषय कि..आज batting येईल आणि सचिन century करेल...
       शक्यतो वाट पाहण्यात घालवलेला वेळ नेहमीच जास्त  आणि कंटाळवाणा वाटतो असे म्हणतात पण आज रांगेत उभे राहून वाट पाहण्यात घालवलेला वेळ समोर  दिसणाऱ्या वानखेडेच्या ओढीने कसा गेला काहीच समजले देखील नाही.आम्ही रांगेत उभे होतो तिथून वानखडे चे २  floodlights दिसत होते.आणि क्षणार्धात तो  क्षण आठवला जेव्हा धोनी ने WC '११
फायनल ला सिक्स मारून आमचं आणि सबंध देशाचं स्वप्न पूर्ण केला होतं.
       १० ते १५  मिनिटात ३०/४० लोकांची संख्या ३००/४०० पर्यंत गेली होती.सुमारे अर्ध्या तासांनी MCA चे volunteers आणि security गार्ड तिथे आले.आणि आता तिकीट खिडकी उघडणार या शक्यतेने माझ्या  उत्साहाची पातळी अजून वाढली.पण तरीदेखी माझ्या उत्साहाचा अंत पाहत सुमारे अर्ध्या तासानी खिडकी उघडली आणि तिकीट विक्री चालू झाली.एव्हाना गर्दी प्रचंड वाढली होती.रस्त्यावरची आणि रांगेतली देखील.रांगेबाहेर झेंडे,सिक्स आणि फोर चे बोर्ड्स  विकणार्यांचा वेगळाच गोंधळ चालू होता.बाहेरून जाणार्या taxi आणि बस मधून जाणारे कुतूहलाने आमच्याकडे पाहत होते.मात्र आश्चर्य कोणालाच नव्हते कारण मुंबईकरांच्या रक्तात क्रिकेट आहे हेच खरे.बरोबर ८.१५ वाजता आम्ही तिकिटे मिळवून युद्ध जिंकल्याच्या आनंदात तिथून बाहेर आलो.आता पुढची पायरी होती कि गेट no ५ शोधणे.मात्र या वेळी वेळेने आमची परीक्षा घेतली नाही ..थोडे चालत गेल्यावर अजून एक रांग आम्हाला दिसली जेथून आम्हाला आत जायचे होते.पटकन रांगेत जाऊन उभे राहिलो.लोकांच्या उत्साह आणि तिकीट मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता.

        ५ ठिकाणी पोलिसांच्या चेकिंग नंतर आम्ही आत आलो होतो समोर 'North Stand' असे लिहिलेला मोठा बोर्ड झळकत होता.आणि तिथून चढून गेल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर दिसणार होते त्याची वाट मी गेली २० वर्ष पहात होतो. पायर्या चढून आत गेलो.आणि समोर संपूर्ण वानखेडे दिसत होते.क्षणभर स्तब्ध झालो आणि करोडो वेळा पाहिलेली धोनीची ती सिक्स आणि पळत आलेला सचिन डोळ्यासमोरून जायलाच तयार नव्हता.हीच ती जागा जिथे २२  वर्ष वाट पाहिल्यावर  मिळालेल्या विजयाचा आनंद सचिन ला लपवता आला नव्हता.हीच ती जागा होती जिथे ११ लोकांनी १०० करोड लोकांना स्तब्ध केले होते.हीच ती जागा जिथे भारतचे नाव विश्वकरंडकावर कोरले गेले होते.२ मिनिटे अंगावर कट आला.आणि हातावरून हात फिरवतोय तोच कानावर सचिन च्या नावाचा आवाज येऊन आदळला.संपूर्ण stadium एकाच नावाने ओरडत होते.आम्ही आमच्या व्यवस्थित सावलीची जागा घेऊन बसलो.शेवटी पुणेकर..त्यामुळे दुपारी येणारे उन, संध्याकाळी येणारे उन यांचा भौगोलिक अभ्यास करून खुर्च्या निवडल्या आणि पटकन बसून घेतले.

          एव्हाना stadium भरू लागले होते.WI ची टीम ग्राउंडवर practise करत होती.लोक दिसतील त्याच्या नावाने ओरडत होती.थोडा वेळ ग्राउंड,साईट स्क्रीन ,pavilion,commentary box,सचिन तेंडूलकर stand,गावस्कर stand,गरवारे pavillion या टीव्ही वर दिसणाऱ्या गोष्टी समक्ष पाहण्यात निघून गेला.आणि मग
समोरून एक उंच आणि त्याच्या शेजारी बुटकी अशा दोन व्यक्ती चालत येताना दिसल्या.आणि Natwest Final,सचिन च्या ODI मधील २०० रन्स,Champions Trophy Final,T-20 WC Winning final,WC final अश्या वेळी ऐन क्षणाला commentry करणारा रवी शास्त्री आणि त्याच्या खांद्याला डोकं ( खांद्याला खांदा नाही म्हणता येणार ) लावून चालणारा little master सुनील गावस्कर यांना जवळून बघण्याचा योग आला.टीव्ही मध्ये बघणे किती वेगळे असते हे पदोपदी पटत होते.
       शेजारी असलेल्या A/c रूम मधील टीव्ही मध्ये जाहिराती चालू होत्या.तेव्हा अचानक घरी match सुरु होण्याआधी लागणाऱ्या जाहिरातींची आठवण झाली आणि आणि आज आपल्याला एकही जाहिरात पहावी लागणार नाही याचे समाधान चेहेर्यावर झळकले.समोर नजर टाकतो न टाकतो तोच भारताची भिंत म्हणून
ओळखला जाणारा द्रविड ड्रेसिंग रूम मधून उतरत होता.आणि त्या मागून तलवारी सारखी bat चालवणारा सेहवाग आणि संकट मोचक लक्ष्मण हे तिघेही सरावासाठी येत होते.लोकांनी तिघांच्या नावानी stadium डोक्यावर घेतले होते.
वेगवेगळ्या नेट मध्ये तिघेही batting practise करत होते.आजू बाजूचे लोक बोट दाखवून इतरांना सांगत होते कि त्यांना कोण दिसतंय आणि कोण काय करतंय.

      हे पहात असतानाचा अचानक मोठ्ठा शंखनाद झाला, आम्ही सहज वर पहिले तर वरच्या Stand मध्ये सचिन Fan सुधीर हातात मोठ्ठा शंख डोक्यावर भारताचा नकाशा आणि चेहऱ्यावर तिरंगा रंगवलेला अशा नेहमीच्या वेशात मोठ्ठा तिरंगा घेऊन शंखनाद  करत होता.आता सचिनचा fan शंखनाद करतोय हे लक्षात येताच  मी थेट ड्रेसिंग रूम मधून उतरणाऱ्या पायर्यानाकडे पहिले आणि ज्या साठी केला होता हा अट्टाहास ती गोष्ट डोळ्यासमोर होती अगदी काही फुटांवर.संपूर्ण stadium मध्ये एकाच आवाज होता.सचिन...सचिन ... ती वामन मूर्ती bat आपल्या काखेत ठेऊन पायर्या उतरत मैदानात सरावाला आली.२ मिनिटे WI चे खेळाडू देखील थांबले असतील.
      लोह्चुम्बकाला लोखंडाचे कण जसे चिकटतात त्या प्रमाणे सगळ्यांचे कॅमेरे सचिनच्या  दिशेने रोखले गेले होते.मात्र मोजून १० मिनिटे सराव करून सचिन परत ड्रेसिंग रूम मध्ये परतला.एव्हाना द्रविड,लक्ष्मण  पण गेले होते.ग्राउंड च्या कर्मचाऱ्यांनी सगळी नेट्स काढून नेली.WI चे खेलाडूपण परत वर गेले होते.आता वेळ होती पीच रिपोर्ट ची गावस्कर यांनी नेहमीच्या शैलीत पीच रिपोर्ट दिला.अर्थात आम्हाला तो कळणे शक्यच नव्हता.कारण आज आम्ही मैदानावर होतो.मधला वेळ अत्ता कसा वाटतंय हे घरी आणि मित्रांना फोन करून सांगण्यात उडून गेला.
      आणि एवढ्यात २ अम्पायर stadium मध्ये आले.आणि त्या पाठोपाठ WI चे शेवटचे दोन batsman पण...आणि मग ड्रेसिंग रूम मधून संपूर्ण भारतीय टीम खाली आली आणि T-20 आणि ODI असे दोनही WC उचलून विजयाची सवय लावणारा धोनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मैदानात आला.Stadium आता भरू लागले होते .Match सुरु झाली आणि १०  मिनिटात त्यांची शेवटची विकेट पडली आणि आता आपली batting सुरु होणार या विचारानेच मुंबईकर वेडे झाले.आपली batting आणि सेहवागची तोडफोड सुरु झाली.टीव्ही वरील match आणि Stadium मधली match या दोन भिन्न गोष्टी आहेत याची आता खात्री पटली होती.

        सेहवाग आउट झाला ,आणि राहुल द्रविड मैदानात आला .आपसूकच जागेवर उठून उभे राहिलो आणि फक्त आम्ही नाही तर stadium वरचा प्रत्येकजण उभा होता आणि boundry लाईन ते पीच या चालण्यात संपूर्ण टाळ्यांची सलामी देत त्याचे स्वागत केले..गंभीर  आणि द्रविड ची चांगली जोडी जमली होती. लंच झाला..आम्ही पण खाऊन घेतले..उन डोळ्यावर आले होते.match सुरु झाली ..लोकांची चलबिचल सुरु झाली होती ज्या साठी आपण आलोय ते अजून होत नाही या विचाराने लोकांचा मूड थोडा बदललेला स्पष्ट जाणवत होता.
      आणि तेवढ्यात गंभीर आउट झाला ..आता गंभीर आउट झाला हि बाब भारतीय टीम साठी असेलही कदाचित गंभीर पण लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.गंभीर मान खाली घालून चालत होता बिचारा ,पण stadium मधला प्रत्येक जण सचिन च्या नावाने ओरडत होता....कदाचित या गोष्टीची देखील इतर batsman ला सवयच लागली असेल.गंभीर आत गेला आणि साक्षात देवाने आपल्या संपूर्ण आयुधासाहित दर्शन द्यावे त्याप्रमाणे ती साडेपाच फुटी वामन मूर्ती आपले हेल्मेट सरळ करीत आणि आकाशाकडे पहात मैदानात आली.आणि एकच गजर ग्राउंड वर चालू झाला .लोकांच्या आनंदाला सीमा उरल्या नव्हता.आज Century कर एवढं एकच मागणं प्रत्येक जण करत होता..." तुझ मागतो मी आता ... " अशा अविर्भावात प्रत्येक  भक्त सचिन ला एकच विनंती करत होता.सचिन क्रीज वर पोहोचला आणि ज्या साठी इतक्या लांब आलो ती वेळ आणि व्यक्ती साक्षात समोर उभी होती.

      सगळे रेकॉर्ड्स,प्रसद्धि,मान,पैसा या गोष्टी बाजूला सारून शांतपणे अम्पायर कडे लेग स्टंप मागणारा सचिन टीव्ही वर अनंत वेळा पहिला होता पण आज समक्ष पहिला आणि 'गंगेत घोडा न्हायलं' .....
पहिली ५ मिनिटे त्याला पाहण्यातच गेली,गार्ड मार्क करणे,फिल्डिंग पाहणे,साईट स्क्रीन adjust करणे या गोष्टी होऊन खेळ सुरु होईपर्यंत प्रेक्षकांना उसंत नव्हती .उन्हाचे चटके सोयीस्कर दुर्लक्षित होऊ लागले होते.द्रविड आणि सचिन यांना एकत्रित खेळताना पाहण्याचे स्वप्न डोळ्यासमोर पूर्ण होत होते.बघता बघता दोघांचे अर्धशतक पूर्ण झाले.सचिन ला bat दाखवताना पाहण्याची इच्छा पण एव्हाना पूर्ण झाली होती.एका बाजूला सचिन आणि दुसर्या बाजूला द्रविड हे म्हणजे सिंहगडावर  उभे राहून तोरणा आणि राजगड बघण्यासारखे होते.

     आणि सगळं व्यवस्थित चालू आहे असे वाटत असतानाच द्रविड आउट झाला.८२ रन्स ची ती खेळी बर्याच गोष्टी दाखवून गेली.उभे राहून द्रविड चे अभिनंदन करे  पर्यंत लक्ष्मण मैदानात हजर होता.ऑस्ट्रेलिया ला आपल्या मनगटावर नाचवणारा लक्ष्मण आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिला.आणि हाच तो माणूस ज्याने follow-on घेऊन ऑस्ट्रेलिया ला चीतपट केले.आणि दिवसभर खेळून ऑस्ट्रेलियन bowlers ची पिसे काढली होती. दोघेही व्यवस्थित खेळत होते.आणि बघता  बघता दिवस संपला.सचिन ६७  वर नाबाद होता या आनंदातच मी खुर्चीवरून उठलो.सचिन परत ड्रेसिंग रूम कडे जात असताना फक्त हेल्मेट आणि bat एवढाच नाहीतर १००  करोड लोकांच्या शतकी अपेक्षांचा ओझंच जणू घेऊन चालला होता.

      सचिन ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचेपर्यंत कोणीही आपापली जागा सोडली नव्हती.दोघे आत गेले आणि लोकांच्या चर्चेला आता उत आला होता.तेवढ्यात उद्याच्या तिकिटांची जाणीव होऊन आम्ही त्वरित उद्याची सोय करण्यासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो.......रांगेतला पर्त्येक जण एकच विषयावर बोलत होता.दीड तासानंतर आम्हाला तिकीट मिळवण्यात यश आले.उद्या शतक पाहायला मिळणार या आनंदात पुढचा वेळ कसा गेला हे वेगळे सांगणे आणि लिहिणे न लागो.

दुसर्या दिवाशीचा सूर्य देखील सचिन चे शतक पाहण्यासाठीच उगवला होता...

      आम्ही जमेल तसे आवरून सकाळी ९ ला stadium मध्ये हजर झालो...तिकीट कालच मिळाल्याने आजचे काम त्यामानाने खूपच सोपे होते.आता एकच गोष्टीचा  ध्यास होता आणि ते म्हणजे महाशतक.खेळ सुरु झाला.सचिन ची प्रत्येक धाव लोकांच्या टाळ्यांची धनी होती.२ चौकार आणि एक सिक्स या प्रकाराने ६७ ते ९४ हा 
प्रवास इतका लगेच झाला कि शतकासाठी फार प्रतीक्षा नाही हे निश्चित झाले होते.आपल्याला शतक पाहायला मिळणार हे आता नक्की झाले होते. लोकांना खुर्चीवर बसायची इच्छाच नसावी कदाचित.
आणि rampaul चा खांद्यापर्यंत उडालेला चेंडू backfoot वर येऊन खेळण्याच्या नादात सचिन च्या bat ची कड घेऊन गेला आणि थेट सामी च्या हातात येऊन विसावला ....

       इतक्यावेळ बेभान होऊन नाचणारे वानखेडे stadium क्षणार्धात गलितगात्र होऊन पडले.२ सेकंदापूर्वी टाळ्या शिट्या वाजवणारे हजारो प्रेक्षक डोक्याला हात लावून स्तब्ध झाले.Stadium वर स्मशान शांतता पसरली होती.महाशाताकाची प्रतीक्षा अजून लांबणीवर पडली होती.एवढ्या जवळ पोहोचून देखील यश न आल्याचे दुख  मात्र सचिन च्या चेहेर्यावर तसूभर देखील नव्हते.तो आपली बात काखेत आणि मन खाली घालून ड्रेसिंग रूम कडे परतत होता.लोकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत  नव्हता.इतिहास रचताना पाहण्याचे स्वप्न उध्वस्त झाले होते .निराशा लपवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरत होते.सचिन सीमेरेषेजवळ जवळ पोहोचला तेव्हा त्याने  प्रेक्षकांना bat उंचावून दाखवली आणि इतक्या वेळ असलेली स्मशान शांतता भंग पावली...कर्णकर्कश  आवाजाने पुन्हा एकदा सचिन च्या खेळला सलाम करण्यात  येत होता.सचिन च्या नावाचा गजर झाला.संपूर्ण भारत कदाचित हेच सांगत असावा कि "हरकत नाही..अरे ९९ वेळा जे तू केले तीच गोष्ट अजून एकदा करायला तुला जमणार नाही हे केवळ अशक्य...आज नाही तर पुढल्यावेळी...आम्ही असेच तुझ्या पाठीशी आहोत."सुमारे ५ मिनिटे लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला..

      सचिन आत परतला आणि धोनी मैदानात आला.पण आता match मधला गाभाच संपल्याची जाणीव लोकांना झाली होती.सचिन गेल्यावर stadium मधील लोक परतू लागले.आणि आम्ही देखील काढता पाय घेतला..
बाहेर आल्यावर सगळी कडे एकच हळहळ होती कि इतक्या जवळ जावून होम ग्राउंड वर ते शतक पूर्ण करता आले नाही..आम्ही एव्हाना stadium पासून लांब आलो होतो.मेसेजस मधून येणारे निराशेचे सुर अजूनच त्रासदायक वाटत होते......

खरच आहे .आम्ही पहायला
 गेलो आणि शतक झाले नाही याचे वाईट वाटणे साहजिक आहे.पण याचा अर्थ शतक होणारच नाही असा नक्की नाही..कदाचित हा योग  कांगारूंच्या देशातच असेल.
हरकत नाही आम्ही तयार आहोत .२६ डिसेंबर ..Boxing Day Test..Border Gavaskar Trophy...MCG..
याची खुणगाठ बांधूनच आणि सकाळची मुंबई अंगावर घेत आम्ही कार पर्यंत पोहोचलो...

आणि या दोन दिवसांनी मला काय दिले याचा हिशोब करतानाच कार चे दार बंद केले...
खिडकीतून बघितले तर समोर डौलाने उभे असलेले गेट वे ऑफ  इंडिया होते आणि मागे क्षणिक दुखाने झुकलेले वानखेडे...

हृषीकेश पांडकर
२८/११ /२०११

Tuesday, November 22, 2011

साखरपुडा.....तो.. आणि.. तो...



    मागच्याच आठवड्यातील तो दिवस....सकाळी उठलो तेव्हा ध्यानीमनी देखील नव्हते कि आज रात्री झोपायच्या आधी मला असे दोन एकाच  बांधणीचे पण टोकाचे अनुभव येतील.म्हणजे एखादी व्यक्ती एकाच दिवसात एकाच पद्धतीचे पण प्रचंड विरोधाभास असलेले अनुभव कसे घेऊ शकते या विचारानेच माझी झोप लांबवली..

           अगदी दैनंदिनी लिहायच्या फंदात पडत नाही पण दिवसाचा घटनाक्रम सांगायचा हा खटाटोप.तारीख, वार लिहिण्याचे  सोपस्कार पाडायची फारशी गरज वाटत नाही.पण दिवस चांगलाच असावा...मित्राच्या साखरपुड्याचा मुहूर्त होता.आता खरं  सांगायचे तर अगदी जवळचा मित्र आहे असे म्हणण्याइतपत  जवळचा मित्र नाहीये..पण ऑफिस हि जागाच अशी आहे कि रोज भेटून  भेटून ओळखीला मैत्री म्हणायची वेळ येते.हरकत नाही..आमची ओळख  ४/५ महिन्याच्या पलीकडे जाणारी नव्हती.पण जन्म कोल्हापूर चा असल्याकारणाने साखरपुड्याला नक्की या असे बजावून सांगितले होते.आणि मी पण गेलो होतो.अर्थात साखरपुड्याला पुणे सोडून जाणे, एवढा उत्साह माझ्यात नाही.पण ऑफिस ला सुट्टी आणि तेवढंच फिरण्याचा आनंद या दोन सोयीस्कर गोष्टीनमुळे मी पण जाणार होतो.

आता आम्ही सकाळी ८.३० वाजता गाडीत बसलो आणि ११ .३० वाजता कराड ला पोहोचलो.मजा बघा..तिथे गेल्यावर मित्राला  पुन्हा पत्ता विचारला कि बाबा रे  आम्ही इथे आलोय पुढे कसे जायचे...यावर तो म्हणाला कि कराड पासून थोडे पुढे म्हणजे साधारण ४० km अंतरावर तासगाव नावाचा तालुका आहे तिथे या....आम्ही मुकाट तिथे गेलो...गाडीचा पत्रा आणि डांबर या दोन्ही गोष्टी सहज वितळतील असे छान उन पडले होते...निसर्ग म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येते अशी कोणतीही गोष्ट खिडकीतून दिसत नव्हती.सुमारे तासाभरानंतर आम्ही तिथे पोहोचलो.मग पुन्हा तिथून त्याला फोन केला तर तो म्हणाला कि आता तासगाव पासून अजून १० km अंतरावर शिरगाव नावाचे एक गाव आहे तिथे या आणि फोन करा...आमच्याकडे आता पर्याय नव्हता ..आम्ही तिथे गेलो आणि फोन केला...दुपारचा १ वाजून गेला होता  कुठून इथे आलो मरायला असे वाटण्याइतपत  कंटाळा आला होता...मित्राला फोन केला कि आम्ही आलोय आता कुठे ? तर तो म्हणाला कि ******* हे नाव विचार त्यांच्या घरासमोरच  मांडव  आहे.
         आता घरासमोर मांडव हि कल्पना पटायलाच माझा थोडा वेळ गेला.कारण याआधी अशा ठिकाणी जायची वेळच आली नव्हती.जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडी नेली.आणि केवळ आमचे भाग्य कि मांडव दिसू शकेल अशा ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचू शकलो...


आम्ही गाडीतून उतरलो आणि थेट मांडवात गेलो...दुपारचे १.३० वाजून गेले होते..भुकेने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या...साखरपुडा म्हणल्यावर जे पदार्थ डोळ्यासमोर येतात त्यातील एकही पदार्थ असू शकेल याची शक्यता देखील नव्हती.आम्ही मांडवा पाठीमागे असलेल्या हपाश्यावर हात,पाय,तोंड धुतले..पाण्याची चव या विचायावर लोकांनी आपापली मत मांडली.काहींनी एका शिवीमध्ये विषय हाताबाहेर काढला.नंतर शेजारी असलेल्या पिंपळाच्या पारावर येऊन बसलो आमच्या बरोबरीने गावातील काही वृद्ध मंडळी गप्पा मारत बसले होते...काही जण केवळ जेवणाच्या वेळेची वाट पहात पहुडले होते.मांडवातील दृश्य अतिशय स्पष्ट दिसत होते.विधी जिथे चालू होते त्या चौथर्यावर जितकी लोक होती तितकीच लोक चौथर्याच्या खाली होती.मोजून  ११ खुर्च्या समोर टाकल्या होत्या त्यातल्या ९ रिकाम्या होत्या..एकावर कुत्रे बसले होते...जे नंतर एका आजोबांनी  हटकल्यामुळे पळून गेले....

        कुठेही गोंधळ नव्हता...शांतपणे सगळे चालू होते...रिंग exchange ज्याला आम्ही म्हणतो तो विधी कधी झाला हे सांगण्या इतपत लक्षात नाही...पण मित्रांनी हात वर करून रिंग दाखवली खरी.मांडवाला लागुनच मुलीचे घर असावे.कारण २/३ ठराविक बायका घरातून मांडवाकडे आणि मांडवातून घराकडे अक्षरशः पळत होत्या .विधी झाल्यावर पेढ्याला लागलेल्या मुंग्या पेढ्याला धक्का लागल्यावर जश्या पसरतात त्याप्रमाणे चौथार्यावरची गर्दी पांगली...काही लोक थेट घरी गेले...आता थेट म्हणण्यात मजा नाही कारण ४ पावलांवर घरे होती.त्यानंतर जेवणाची वेळ आली..अर्थात आम्ही पोहोचलो ती सुद्धा जेवणाचीच वेळ होती..पण आता जेवण पण होते.पहिली पंगत बसली जी तब्बल २२ लोकांची .मगाशी पहुडलेले आजोबा, काका सगळे पंगतीत होते...त्यांचे जेवण चालू असताना आम्ही एका tractor वर बसून फोटो काढत होतो.

त्यानंतर आमची जेवायची वेळ आली...आम्ही जाऊन बसलो पत्रावळ्या ठेवल्या द्रोण ठेवले...पाणी मिळाले...भात वाढला आणि शिरा वाढला....दोन्ही पदार्थ अतिशय अप्रतिम झाले होते आणि त्यात भूक आ वासून उभी होती भात आणि शिरा संपला आता मी पोळी or पुरी ची वाट पहात बसलो ...पण असे समजले कि तसलं काही नाहीये.... आता साखरपुड्याच्या जेवणात पोळी किव्वा पुरी नाही हि गोष्ट माझ्यासाठी पहिल्यांदाच होती...आणि याच गोष्टीचा विचार मी हात धुवत असताना करत होतो....आणि मग सहजच विचार डोक्यात आला कि जर पोळी आणि पुरी नाहीये तर बटाट्याची भाजी फक्त भाताबरोबर खायची होती ?...तरी देखील पोटभर जेवलो...

एव्हाना उन कमी झाले होते गार वर सुटला होता...आम्ही जेवून पुन्हा पारावर येऊन बसलो.मधल्या वेळेत मित्र आणि त्याची बायको घरात जाऊन जेवून आले...पुढच्या अर्ध्या तासात सर्वांची जेवणं झाली...


३ वाजले होते. निघायची वेळ झाली होती...तेवढ्यात मित्र म्हणाला कि अरे सगळे स्टेजवर या..आम्ही मुकाट स्टेजवर जाऊन उभे राहिलो...मुलाकडले पाहुणे या नात्याने मुलीकडच्यांनी आम्हाला नारळ टॉवेल आणि टोपी दिली...आता पांढरी टोपी स्टेजवर घालून घ्यायची माझी पहिलीच वेळ.आणि हे सर्व झाल्यावर त्या काकांनी ताकीद दिली कि टोपी अज्जिबात काढायची नाही.मग तसाच स्टेज वरून उतरून आम्ही निघालो.जीन्स घातलेले बहुदा आम्हीच ४/५ जण असू.उगीचच कोणीतरी वेगळे आहोत असे पदोपदी वाटत होते.

           त्यानंतर आम्ही मित्राचे अभिनंदन करायला पुन्हा स्टेजवर गेलो.फक्त दोघेच होते .मित्राला अभिनंदन केले आणि त्याच्या बायकोला पण.कुठेही बडेजाव नव्हता,घाई नव्हती.बारीक आवाजात सनई चालू होती काही लोक मांडव स्वछ करत होते.एका कोपर्यात ओट्या भरणे चालू होते.नवरा बायको घरात hall  मध्ये बसले होते.गावकरी आपापल्या घरी निघाले होते.आणि आम्ही विदुशकासारखे मांडवातून फिरत होतो.एकूण मिळून ६०  लोक पण नसतील...निघायची वेळ आली ...३.३०  वाजले होते.मित्राचा निरोप घेऊन आणि एकूणच गावाचा निरोप घेऊन आम्ही पुण्याला परत निघालो...प्रवासातले सगळे सोपस्कार पार पाडून साधारण ७.००  ला मी घरी पोहोचलो..

         घरी पोहोचतानाच मोबाईल वाजला...आणि unknown नंबर पाहून उगीचच कपाळावर आठ्या आल्या...नाखुशीने फोन उचलला...आणि २ मिनिटानंतर समजले कि  समोरून बोलणारी व्यक्ती इयत्ता ७ वी मध्ये बेंचवर माझ्या शेजारी बसत असे...सध्या अमेरिकेत रहात असून साखरपुड्याकरिता  पुण्यात आलेली आहे आणि आजच त्याचा साखरपुडा आहे आणि मला तिथे जायचे आहे....ज्या दिवशी साखरपुडा त्याच दिवशी पाउण तास आधीचे ते आमंत्रण घेऊन मी अंघोळीच्या तयारीला सुरुवात केली...सकाळचा साखरपुडा संपतो न संपतो तोच समोरचा दत्त म्हणून समोर होता...

        पटापट आवरून बाहेर पडलो...स्थळ होते श्रुती मंगल कार्यालय..आपटे रोड..
आता आपटे रोड म्हणल्यावर साहजिकच वेशभूषा करण्यात थोडा जास्त  वेळ गेला...सकाळी समोरील व्यक्ती कशी दिसत असेल याची काळजी होती...आणि आता आपण कसे दिसत असू याची…..सौंदर्याचे गणित जमवून घाईतच बाहेर पडलो..
१५ मिनिटात कार्यालयात आलो...पहिल्या मजल्यावर कार्यक्रम आहे असे सुचविणारी मोठी इलेक्ट्रोनिक आणि साधी अशा दोन्ही पाट्या खाली लटकविलेल्या होत्या...जाताना जिन्यात असलेल्या आरशात पाहून उगीच formality पूर्ण केल्या.आणि hall मध्ये पोहोचलो...perfume चा घमघमाट पसरला होता....
समोर स्टेजवर विधी चालू होते...पत्रकार परिषदेत पत्रकार ज्या प्रमाणे कॅमेरे धरून उभे असतात त्या प्रमाणे लोकांची photography चालू होती...काही लोक सरळ लावलेल्या खुर्च्या सोयीस्कर फिरवून त्यावर बसून जेवण सुरु होण्याचा वेळेपर्यंत गप्पा मारून टाइमपास करत होते. मुलाची आई आणि नवरी मुलगी यांच्या makeup मधील चढाओढ चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती...

       सनई लावली होती पण ती का लावली आहे याचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला नाही...
मी आणि माझे दोन मित्र मागे बसून गप्पा मारत होतो...मध्ये एकदा उत्सवमूर्ती ला हात केला...hall मध्ये 'मला बघा' या अविर्भावात फिरणाऱ्या मुलींकडे पाहण्यात आमचा वेळ चमच्यावर ठेवलेली maggie जशी हळुवार घसरते त्या प्रमाणे अलगद जात होता.

     काही वेळानंतर 'Ring Exchange ' चा कार्यक्रम चालू झाला...दोघांनी आपापल्या ring एकमेकांना घातल्या...Congratulations चा केक कापला...लोकांनी टाळ्या वाजवल्या मोठा फुगा फुटला त्यातली चमकी नवरा बायको सोडून सगळ्यांवर व्यवस्थित पडली..पेढा भरवणे या प्रकारात नको नको म्हणताना मुलीने ५/६ पेढे सहज  रिचवले….
ज्या साठी त्यांनी मला बोलावले तो कार्यक्रम तर झाला...आता ज्या साठी आम्ही गेलो तो कार्यक्रम सुरु झाला होता...

        खाणे संपेल कि काय या भीतीने लोकांनी बुफेपाशी गर्दी केली...त्यात आम्ही पण होतोच अर्थात...मीठ आणि लिंबू धरून बरोब्बर १७ प्रकार जेवायला होते...जेवताना मधेच जावून घेणार्यानमुळे नवीन डिश घेणाऱ्यांच्या कपाळावरील अठ्यांची संख्या सुरळीच्या वडीच्या थरानपेक्षा जास्त होती.

       जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी washroom मध्ये गेलो...लोकांनी हात धुतल्यावर पुन्हा एकदा आरश्यासमोर उभे राहून चेहेर्याची रंगरंगोटी सुरु केली  होती.
...' कृपया पेपर Napkins येथे टाकू नका' यातील 'कृपया' आणि 'टाकू' या दोन शब्दांवर आधीपासूनच कागद पडलेले होते.
      बाहेर आलो बडीशेप ठेवलेली होती...लहान मुलं बडीशेप मधील खडीसाखर वेचून खात होते.
एव्हाना जवळचे मित्र आणि अगदी जवळचे नातेवाईक एवढेच फक्त hall मध्ये शिल्लक होते.बाकीच्यांचा साखरपुडा केव्हाच संपला होता.आम्ही देखील निघायचे म्हणून मित्राला भेटायला गेलो.अभिनंदन केले स्टेजवर व्हिडीओ कॅमेर्यासमोर खोटे हसलो.’पुन्हा भेटू नक्की’ या विरत्या आश्वासनाने हसत त्याचा निरोप घेतला...
जवळचे नातलग आणि मित्रमैत्रिणी या मध्ये त्यातल्या त्यात उठून दिसणारे चेहरे उगीचच  मागे वळून टिपत आम्ही जिन्यापाशी आलो.मगाशी दारावर लावलेल्या तोरणा मधील फुलाच्या पाकळ्या खाली पडल्या होत्या...मगाशी भरलेला hall आता रिकामा होता.बाहेर काढलेली रांगोळी व्यवस्थित हलली होती आणि hall मधील खुर्च्यांची एक नवीनच रांगोळी तयार झाली होती.

आम्ही मात्र मस्त जेवण चेपून घराकडे परतलो……

         असे खूप कमी दिवस येतात ज्या दिवशी गादीला पाठ लागल्यावर संबंध दिवस आठवावासा वाटतो किंबहुना तो दिवस आपोआपच डोळ्यासमोरून जातो..

       एकाच दिवसातील सूर्योदय आणि सूर्यास्त असे एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवतील असे ध्यानी मनी पण नव्हते.पण एकाच प्रकारच्या दोन समारंभात इतके  भिन्न अनुभव येतील याचा आनंद मला दुसर्यादिवशी मित्रांना सांगताना लपवता आला नाही.अर्थात लिहिण्यामागे कुठेही तुलना करायची मुळीच इच्छा नाहीये.पण ज्या प्रकारे गोष्टी घडतात तश्याच इथे उतरवल्या आहेत.कुठला समारंभ चांगला वाटला असे विचारले तर माझ्याकडे ठाम मत नाही.कारण दोन्ही ठिकाणच्या मजा वेगळ्या आहेत.

       फक्त फरक इतकाच कि विकायची असते काचच...पण काही लोक
थर्मोकोल मध्ये ठेऊन विकतात तर काही लोक गवताच्या भाऱ्या मध्ये गुंडाळून.....

खरच.....अनुभव घेताना choice नसलेलाच बरा असतो.....


                                                                                                                                                                                                                                                            - हृषीकेश पांडकर
                                                                                                                                                                                                                                                             २१ नोव्हेंबर २०११

Sunday, September 4, 2011

माझे आवडते महिने …


        दिवसाचे रुटीन सेट होणं हीच जिथे अवघड गोष्ट आहे...अश्या ठिकाणी वर्षाचं रुटीन सेट होणं  याचं विचार न केलेलाच बरा.पण का कोण जाणे वर्षाचे ढोबळमानाने रुटीन सेट झाले आहे असे मला नेहमी वाटत आले आहे.आणि असे वाटायचे मुख्य   कारण म्हणजे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर हे महिने.तसं पहायला गेलं तर बाकीचे महिने पण आहेतच पण नवीन कोऱ्या शाळेच्या गणवेशातला मुलगा पहिला की पुढेच तीन महिने काय होणार आहे याची कल्पना सहज येते.आणि आता त्याची इतकी सवय झाली आहे की पालखी दिवेघाटात आली या बातमी नंतर विंबल्डन  स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी फेरीत काय झालं हि जर का बातमी नसेल तर चुकचुकल्या सारखे वाटण्या इतपत हे रुटीन माझे सेट झाले आहे.

          शाळेची नवीन खरेदी...पावसाला व्यवस्थित झालेली सुरुवात..रस्त्यावर माणसांनी घातलेले कपडे दिसण्यापेक्षा त्यांनी घातलेले रंगीबेरंगी रेनकोट..याच गोष्टी इतक्या जवळच्या वाटतात की एक वर्ष कोणीच कॅलेंडर जरी छापले नाही तरी व्यवस्थित दिवस ओळखण्याची मी खात्री देतो.मराठी महिने इंग्लिश प्रमाणे धडाधड सांगू शकेन याची मी खात्री देत नाही...पण आषाढ श्रावण आणि भाद्रपद हे महिने गरवारे च्या सिग्नल ला उभे राहून देखील अचूक सांगू शकतो..कारण भाद्रपदातील गणपतीच्या मिरवणुकीची प्रक्टीसे तेथे चालू असते..

         "नागडी लहान मुलं साचलेल्या पाण्यात खेळत आहेत..आणि पाऊस पडत आहे"पहिल्या पावसानंतर सालाबादप्रमाणे छापत आलेला सकाळ चा हा फोटो समजा एखाद्या वर्षी त्यांनी छापला नाही तर यंदा पावसाळा नाही असे वाटून चातक पक्षी देखील आत्महत्या करेल की काय असे वाटते."हवामानातील बदल" या गोंडस कारण खाली आजारी पडून सुट्टी घ्यायचे धंदे या काळात जोर धरतात.

         पहिले काही दिवस भरपूर पाऊस पडल्यावर पुण्यातील धरणांची पातळी,मुंबईच्या  रेल्वे ट्रॅकवर झालेला स्विमिंग टॅंक..ताम्हिणी  मधील कुठलाही एखादा फोटो "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे  चोहीकडे" या शीर्षकाखाली छापलेला, पुणेकरांची अवेळी पावसाने उडालेली धांदल या सगळ्या रुटीन गोष्टी वर्तमानपत्र  वाले कधीच मिस करत नाहीत आणि मी देखील...  

         आषाढी एकादशीची सुट्टी आणि शाळेतील गुरुपौर्णिमा या दोन गोष्टी शालेय वर्षातील प्रवासाचा पहिला मैलाचा दगड ठरतो.कॉलेजेस नुकतीच सुरु झालेली असतात त्यामुळे "सध्या लेक्चर्स नसतातच..फक्त प्रॅक्टिकल होतात" अशी टिपिकल वाक्य कानावर पडतात.

         पेपर मधील फोटो आणि वर्षासहल यासारख्या गोष्टींचा इतका प्रभाव आमच्यावर पडतो की...नागपंचमी ला सुट्टी मिळाली नाही याचे दुख विसरता विसरता १५ ऑगस्ट ला भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षा १३-१४-१५ किव्वा १५-१६-१७ अश्या जोडून आलेल्या सुट्टीमुळे आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद आम्हाला जास्त होतो..आणि ऑगस्ट सुरु व्हायच्या आधीच कनेक्टिंग हॉलिडेज चे प्लॅन ठरवले जातात.

        शाळेतील मुलांचे मात्र वेगळेच असते...पहाटे उठून शाळेचा धुतलेला आणि इस्त्री केलेला युनिफोर्म घालून प्रत्येक चौकात लावलेली देशभक्तीपर गाणी ऐकत शाळेत जाणे...झेंडावंदन करून घरी येणे यात  काडीमात्र बदल नसतो...पण शाळेतून लवकर घरी येणे क्रमप्राप्त असते कारण चाचणी परीक्षा दुसर्या दिवसावर आलेली असते...वर्षातील पहिलीच परीक्षा असल्याने सिरीयसनेस जास्त असावा कदाचित.

        शाळेचे दिवस दुर्दैवाने संपले...त्यामुळे सकाळी राखी बांधायला बहिणीकडे जाऊन तिथेच जेवायचे दिवस पण संपले..पण आता सकाळच्या ऐवजी रात्री एवढाच फक्त काय तो बदल झाला बाकी सर्व तेच...आणि हो "आपकी फरमाईश " या विविध भारती च्या कार्यक्रमात "फुलोसा तारोसा " हे गण देखील तसेच..बदलला तो फक्त रेडीओ..

        शाळेतली पालखी,शाळेतली दहीहंडी या गोष्टी संपल्या पण दहीहंडी मनोरा,आणि दिवेघाटातील पालखी...या दोन गोष्टींचे वर्तमान पत्रातील फोटो तितकाच आनंद देऊन जातात...लग्नाचा season नुकताच चालू झालेला असतो.त्यामुळे हॉल मधल्या फोन शेजारी २/३ लग्न पत्रिका हमखास पडलेल्या असतात.

       ऑगस्ट पण संपत आलेला असतो..आधी फक्त संध्याकाळी पडणारा पाऊस आता सकाळी आणि मध्यरात्री देखील पडायला सुरुवात झालेली असते..पण पावसाचा जोर पहिल्यासारखा नसतो...पावसाचीही सवय होते..आणि पाकीट रुमाल या गोष्टींप्रमाणे रेनकोट ,छत्री देखील बरोबर घेतली जाते.याच सुमारास श्रावणाला सुरुवात होते...शाळेतील मुले "श्रावण" माझा आवडता महिना .यावर  निबंध लिहितात..मात्र खरच श्रावण का आवडतो याचे प्रत्यंतर मला आत्ता पर्यंत आलेले आहेच. 

       ऑगस्ट संपण्याची सुरुवातच मुळात दहीहंडीच्या होर्डींग्स ने होते ..ऑफिस मधून घरी येताना प्रत्येक सिग्नलवर किमान २  होर्डींग्स तरी हमखास दिसतात..आणि समजा तुमचे ऑफिस लकडी पुलाच्या पलीकडले असेल तर त्या दोनाचे ४ व्हायला वेळ लागत नाही..बक्षिसांची रक्कम हंडीच्या उंचीला 'directly proportionate '   असते...आणि होर्डिंग च्या देखील...

      आई बाबा ठाण्यात ( मुंबई ) मध्ये चाललेली दहीहंडी  टीव्हीवर बघतात...आणि आम्ही बाहेरच्या पाहतो..उंच दहीहंड्या कधीच ठरवलेल्या उंचीवर फुटत नाहीत...दरवर्षी त्या खाली घेऊन फोडण्यात येतात...दर  वर्षी एखाद्या वयस्कर माणसाचा हंडी पाहताना हार्ट अटॅक  येऊन मृत्यू होतो..आणि एखाद्या तरुणाचा मनोर्यावरून पडून...आकडे फक्त कमी जास्त होतात पण फोटोसकट तीच बातमी आम्ही पेपर मध्ये वाचतो...

      दहीहंडी संपल्यावर पण होर्डींग आठवडाभर तशीच असतात...आणि ती लटकविलेला दोरखंड पण..एव्हाना गरवारेचा चौक,म्हात्रे पूल,नदीकाठचा रोड या  ठिकाणी येणारे ढोल ताशांचे आवाज तीव्र झालेले असतात...कारण प्रॅक्टिस अंतिम टप्प्यात आलेली असते..वाजवणारे लोक दिसतच नाहीत..फक्त पहायला आलेल्या लोकांची गर्दी आणि ठेकेबद्ध आवाज...पुण्याचे गणपती जवळ आलेले असतात...
      आता गणपतीची चाहूल पेपरवाल्यांना आधीच लागते ...कारण गणपती च्या आकर्षक आणि सुबक मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचा फोटो पेपर मध्ये आलेला असतो...

      शाळेच्या चाचणी परीक्षा झालेल्या असतात ..मुलांना गणपतीचे वेध लागलेले असतात...कॉलोनी मधील उत्साही कार्यकर्ते नियमित भेटणे चालू करतात..मंडळांचे वार्षिक अहवाल पुन्हा प्रिंट केले जातात.
भर रस्त्यात मांडवासाठी खड्डे खणले जातात...त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते...काही दिवसांनी त्यामध्ये खांब उभारले जातात आणि रिकाम्या मांडवाखाली सोयीस्कररित्या रिक्षा आणि आपली वाहने पार्क केलेली दिसतात... जसे गणपती जवळ येतात तसे त्या खांबांवर पत्रे टाकून  मांडव पूर्ण होतो...आणि कार्यकर्ते देखाव्यासाठी तयारी ला लागतात...आत्ता पर्यंत साध्या ट्यूब्स आणि बल्ब लावलेली जनरल स्टोअर आता गणपतीचे  डेकोरेशन साहित्याने लखलखीत होतात..."आमच्या येथे पेणचे सर्वांग सुंदर श्रींच्या मूर्ती मिळतील" हे बोर्ड्स दिसू लागतात.

      गणपतीचे १० दिवस घरी गणपती नसताना देखील किती भारी जाऊ शकतात हे जाणून घ्यायचे असेल तर हे वर लिहिलेल्या व्यक्तीलाच विचारा. ११ व्या दिवशी विसर्जन मिरवणूक होते..आणि ३/४ दिवस आधी पाहिलेले मांडव रिकामे रिकामे आणि भकास वाटू लागतात...आताही  त्या मांडवात रिक्षाच उभ्या असतात...आणि पेपर मध्ये मांडवामुळे वाहतुकीला कसा अडथळा होतो याचे फोटोसहित वर्णन आलेले असते..

      शाळा पूर्ववत चालू होतात...चाचणी परीक्षांचे पेपर्स मिळालेले असतात..ऑफिसेस सुद्धा पूर्ववत होतात..घरचे डेकोरेशन साहित्य माळ्यावर गेलेले असते...लक्ष्मीरोड वर गुलालाचा थर दिसत असतो...आणि रस्त्याच्या कडेला तुटलेल्या चपला पडलेल्या असतात....लकडी पुलावरून पाण्यात तरंगत असलेले निर्माल्य दिसत असते..

      श्रावण तर संपलाच..पण भाद्रपद पण संपत आलेला असतो आणि सप्टेंबर पण...पाऊस पूर्णपणे ओसरलेला असतो...रोज ३ वेळा पडणारा पाऊस आता ३  दिवसातून एकदा पडत असतो...

      शाळा, कॉलेज आणि ऑफिसेस व्यवस्थित सुरु असतात..पुढच्या सुट्टीची वाट बघत....आणि बोगद्यातून पलीकडचा उजेड दिसावा त्याप्रमाणे कॅलेंडर वर दसरा डोकावत असतो...

हृषिकेश पांडकर