Monday, November 28, 2011

स्वप्नपूर्ती ….


    काही गोष्टी विसरायच्या आहेत म्हणून लक्षात ठेवल्या जातात...आणि मग त्या कायमच्याच अविस्मरणीय होऊन जातात...

       कदाचित वर लिहिलेली ओळ याक्षणी मला किंचित खटकत असेलही..आणि खटकत आहेच..कारण मी ज्या विषयी पुढे लिहिणार आहे ती गोष्ट मला विसारावीशी का वाटत होती याचे आत्ता माझ्याकडे उत्तर नाही...
      एखादी गोष्ट करायची प्रचंड इच्छा असते.आणि त्या गोष्टीची इच्छापूर्ती होणे यासारखे समाधान नाही.
टीव्ही,इंटरनेट,रेडीओ,मासिके,पुस्तके,वर्तमानपत्र या माध्यमातून क्रिकेट अक्षरशः मनगटापासून चाटून पुसून घेतले आहे.
      पण आज पर्यंत एकही टेस्ट match याची देही याची डोळा पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती.India-WI च्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात तो योग होता असे म्हणायला हरकत नाही.सामना मुंबईच्या वानखेडे stadium वर होता.
      उद्या आपली batting येईल या हिशोबाने आदल्या दिवशी मुंबईला गेलो.रात्री ९ ला निघाल्याने पोहोचायला साधारण ११.३० झाले.मुंबईत कमी गर्दीच्या वेळा दाखवणारे घड्याळाच तयार झालेले नाही.त्यामुळे express-way संपल्यावर मुंबई चालू झाली हे सांगण्यासाठी "Navi Mumbai Welcomes you" या सारखे वेगळे बोर्ड लावायची काय गरज आहे असे मला नेहमी राहून राहून वाटते..समुद्राचा खरा वासच खुद्द प्रवेशाला सुवास शिंपडायला आहे.

     तर सांगायचा मुद्दा एवढाच कि आम्ही रात्री ११ .३० ला मुंबई ला पोहोचलो.अर्थात मुक्कामाचे ठिकाण अंधेरी असल्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी एक वेगळा प्रवास करावा लागतो हे हि तितकेच खरे आहे.पण उद्या आपल्याला match पहायची आहे या उत्साहातच मी इतका गुरफटून गेलो होतो कि प्रवासाचा शीण आला आहे हे जाणवायला  माझ्याकडे वेळच नव्हता.
      सकाळी उठणे हा माझ्यासाठी थोडा कठीण प्रकार आहे मात्र कठीणतेची व्याख्या उठून काय करायचे आहे या गोष्टीनुरूप बदलत राहते.आणि उद्या तर साक्षात देवाच्या दर्शनाला जायचे होते आणि तेही देवाच्या सर्वोच व प्रार्थनीय रुपात.त्यामुळे  उठण्याचा कंटाळा,किव्वा लवकर जाग न येणे यांसारखे शुल्लक अडथळे उद्भावायचा संबंधाच नव्हता.
     सकाळी सुमारे ६ वाजता एक अनामिक ओढ आणि कमालीचे औत्सुक्य या दोन गोष्टी sack मध्ये भरून वानखेडे गाठले.तिकीट मिळविण्यापासून सुरुवात होती.डोक्यात फक्त एकाच विचार होता कि तिकीट मिळवणे आणि stadium मध्ये जाऊन बसणे.Marin drive ला असलेल्या गेट no ३  वर बसलेल्या security गार्ड  ला तिकीटा बद्दल विचारले.तर तो म्हणाला कि चर्चगेट च्या पलीकडे incom tax ऑफिस समोर तिकीट मिळतील..तुम्हाला स्टेशन मधून जाता येणार नाही.फिरून जावे लागेल.आम्ही शेवटचे वाक्य पूर्ण होईपर्यंत गाडीत बसून पुढे पण गेलो होतो.२ किमी च्या प्रवासात ६ जणांना विचारून सरतेशेवटी आम्ही तिकीट काउंटर ला पोहोचलो.आमच्या आधी ३०/४० लोक आधीपासून रांगेत उभी होती.आणि काउंटर बंद होते.आम्ही पण गाडी लाऊन रांगेत उभे राहिलो.७ वाजले होते.रस्त्यावरची गर्दी वाढत होती आणि रांगेतली देखील.

        रांगेत उभे राहण्याच्या वयातील विविधता पाहून मुंबई आणि क्रिकेट या दोघांचे नाते इतके जुने आणि
घट्ट का आहे यावर पुन्हा एकदा मानसिक शिक्कामोर्तब करून तिकीट खिडकी कडे मी पाहत होतो.हातात हात घालून आलेल्या प्रेमी युगुलांपासून नातवाच्या हातात हात घालून आलेले आजोबा मी आमच्या रांगेत पहिले.प्रत्येकाच्या चर्चेला एकाच विषय कि..आज batting येईल आणि सचिन century करेल...
       शक्यतो वाट पाहण्यात घालवलेला वेळ नेहमीच जास्त  आणि कंटाळवाणा वाटतो असे म्हणतात पण आज रांगेत उभे राहून वाट पाहण्यात घालवलेला वेळ समोर  दिसणाऱ्या वानखेडेच्या ओढीने कसा गेला काहीच समजले देखील नाही.आम्ही रांगेत उभे होतो तिथून वानखडे चे २  floodlights दिसत होते.आणि क्षणार्धात तो  क्षण आठवला जेव्हा धोनी ने WC '११
फायनल ला सिक्स मारून आमचं आणि सबंध देशाचं स्वप्न पूर्ण केला होतं.
       १० ते १५  मिनिटात ३०/४० लोकांची संख्या ३००/४०० पर्यंत गेली होती.सुमारे अर्ध्या तासांनी MCA चे volunteers आणि security गार्ड तिथे आले.आणि आता तिकीट खिडकी उघडणार या शक्यतेने माझ्या  उत्साहाची पातळी अजून वाढली.पण तरीदेखी माझ्या उत्साहाचा अंत पाहत सुमारे अर्ध्या तासानी खिडकी उघडली आणि तिकीट विक्री चालू झाली.एव्हाना गर्दी प्रचंड वाढली होती.रस्त्यावरची आणि रांगेतली देखील.रांगेबाहेर झेंडे,सिक्स आणि फोर चे बोर्ड्स  विकणार्यांचा वेगळाच गोंधळ चालू होता.बाहेरून जाणार्या taxi आणि बस मधून जाणारे कुतूहलाने आमच्याकडे पाहत होते.मात्र आश्चर्य कोणालाच नव्हते कारण मुंबईकरांच्या रक्तात क्रिकेट आहे हेच खरे.बरोबर ८.१५ वाजता आम्ही तिकिटे मिळवून युद्ध जिंकल्याच्या आनंदात तिथून बाहेर आलो.आता पुढची पायरी होती कि गेट no ५ शोधणे.मात्र या वेळी वेळेने आमची परीक्षा घेतली नाही ..थोडे चालत गेल्यावर अजून एक रांग आम्हाला दिसली जेथून आम्हाला आत जायचे होते.पटकन रांगेत जाऊन उभे राहिलो.लोकांच्या उत्साह आणि तिकीट मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता.

        ५ ठिकाणी पोलिसांच्या चेकिंग नंतर आम्ही आत आलो होतो समोर 'North Stand' असे लिहिलेला मोठा बोर्ड झळकत होता.आणि तिथून चढून गेल्यावर जे दृश्य डोळ्यासमोर दिसणार होते त्याची वाट मी गेली २० वर्ष पहात होतो. पायर्या चढून आत गेलो.आणि समोर संपूर्ण वानखेडे दिसत होते.क्षणभर स्तब्ध झालो आणि करोडो वेळा पाहिलेली धोनीची ती सिक्स आणि पळत आलेला सचिन डोळ्यासमोरून जायलाच तयार नव्हता.हीच ती जागा जिथे २२  वर्ष वाट पाहिल्यावर  मिळालेल्या विजयाचा आनंद सचिन ला लपवता आला नव्हता.हीच ती जागा होती जिथे ११ लोकांनी १०० करोड लोकांना स्तब्ध केले होते.हीच ती जागा जिथे भारतचे नाव विश्वकरंडकावर कोरले गेले होते.२ मिनिटे अंगावर कट आला.आणि हातावरून हात फिरवतोय तोच कानावर सचिन च्या नावाचा आवाज येऊन आदळला.संपूर्ण stadium एकाच नावाने ओरडत होते.आम्ही आमच्या व्यवस्थित सावलीची जागा घेऊन बसलो.शेवटी पुणेकर..त्यामुळे दुपारी येणारे उन, संध्याकाळी येणारे उन यांचा भौगोलिक अभ्यास करून खुर्च्या निवडल्या आणि पटकन बसून घेतले.

          एव्हाना stadium भरू लागले होते.WI ची टीम ग्राउंडवर practise करत होती.लोक दिसतील त्याच्या नावाने ओरडत होती.थोडा वेळ ग्राउंड,साईट स्क्रीन ,pavilion,commentary box,सचिन तेंडूलकर stand,गावस्कर stand,गरवारे pavillion या टीव्ही वर दिसणाऱ्या गोष्टी समक्ष पाहण्यात निघून गेला.आणि मग
समोरून एक उंच आणि त्याच्या शेजारी बुटकी अशा दोन व्यक्ती चालत येताना दिसल्या.आणि Natwest Final,सचिन च्या ODI मधील २०० रन्स,Champions Trophy Final,T-20 WC Winning final,WC final अश्या वेळी ऐन क्षणाला commentry करणारा रवी शास्त्री आणि त्याच्या खांद्याला डोकं ( खांद्याला खांदा नाही म्हणता येणार ) लावून चालणारा little master सुनील गावस्कर यांना जवळून बघण्याचा योग आला.टीव्ही मध्ये बघणे किती वेगळे असते हे पदोपदी पटत होते.
       शेजारी असलेल्या A/c रूम मधील टीव्ही मध्ये जाहिराती चालू होत्या.तेव्हा अचानक घरी match सुरु होण्याआधी लागणाऱ्या जाहिरातींची आठवण झाली आणि आणि आज आपल्याला एकही जाहिरात पहावी लागणार नाही याचे समाधान चेहेर्यावर झळकले.समोर नजर टाकतो न टाकतो तोच भारताची भिंत म्हणून
ओळखला जाणारा द्रविड ड्रेसिंग रूम मधून उतरत होता.आणि त्या मागून तलवारी सारखी bat चालवणारा सेहवाग आणि संकट मोचक लक्ष्मण हे तिघेही सरावासाठी येत होते.लोकांनी तिघांच्या नावानी stadium डोक्यावर घेतले होते.
वेगवेगळ्या नेट मध्ये तिघेही batting practise करत होते.आजू बाजूचे लोक बोट दाखवून इतरांना सांगत होते कि त्यांना कोण दिसतंय आणि कोण काय करतंय.

      हे पहात असतानाचा अचानक मोठ्ठा शंखनाद झाला, आम्ही सहज वर पहिले तर वरच्या Stand मध्ये सचिन Fan सुधीर हातात मोठ्ठा शंख डोक्यावर भारताचा नकाशा आणि चेहऱ्यावर तिरंगा रंगवलेला अशा नेहमीच्या वेशात मोठ्ठा तिरंगा घेऊन शंखनाद  करत होता.आता सचिनचा fan शंखनाद करतोय हे लक्षात येताच  मी थेट ड्रेसिंग रूम मधून उतरणाऱ्या पायर्यानाकडे पहिले आणि ज्या साठी केला होता हा अट्टाहास ती गोष्ट डोळ्यासमोर होती अगदी काही फुटांवर.संपूर्ण stadium मध्ये एकाच आवाज होता.सचिन...सचिन ... ती वामन मूर्ती bat आपल्या काखेत ठेऊन पायर्या उतरत मैदानात सरावाला आली.२ मिनिटे WI चे खेळाडू देखील थांबले असतील.
      लोह्चुम्बकाला लोखंडाचे कण जसे चिकटतात त्या प्रमाणे सगळ्यांचे कॅमेरे सचिनच्या  दिशेने रोखले गेले होते.मात्र मोजून १० मिनिटे सराव करून सचिन परत ड्रेसिंग रूम मध्ये परतला.एव्हाना द्रविड,लक्ष्मण  पण गेले होते.ग्राउंड च्या कर्मचाऱ्यांनी सगळी नेट्स काढून नेली.WI चे खेलाडूपण परत वर गेले होते.आता वेळ होती पीच रिपोर्ट ची गावस्कर यांनी नेहमीच्या शैलीत पीच रिपोर्ट दिला.अर्थात आम्हाला तो कळणे शक्यच नव्हता.कारण आज आम्ही मैदानावर होतो.मधला वेळ अत्ता कसा वाटतंय हे घरी आणि मित्रांना फोन करून सांगण्यात उडून गेला.
      आणि एवढ्यात २ अम्पायर stadium मध्ये आले.आणि त्या पाठोपाठ WI चे शेवटचे दोन batsman पण...आणि मग ड्रेसिंग रूम मधून संपूर्ण भारतीय टीम खाली आली आणि T-20 आणि ODI असे दोनही WC उचलून विजयाची सवय लावणारा धोनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मैदानात आला.Stadium आता भरू लागले होते .Match सुरु झाली आणि १०  मिनिटात त्यांची शेवटची विकेट पडली आणि आता आपली batting सुरु होणार या विचारानेच मुंबईकर वेडे झाले.आपली batting आणि सेहवागची तोडफोड सुरु झाली.टीव्ही वरील match आणि Stadium मधली match या दोन भिन्न गोष्टी आहेत याची आता खात्री पटली होती.

        सेहवाग आउट झाला ,आणि राहुल द्रविड मैदानात आला .आपसूकच जागेवर उठून उभे राहिलो आणि फक्त आम्ही नाही तर stadium वरचा प्रत्येकजण उभा होता आणि boundry लाईन ते पीच या चालण्यात संपूर्ण टाळ्यांची सलामी देत त्याचे स्वागत केले..गंभीर  आणि द्रविड ची चांगली जोडी जमली होती. लंच झाला..आम्ही पण खाऊन घेतले..उन डोळ्यावर आले होते.match सुरु झाली ..लोकांची चलबिचल सुरु झाली होती ज्या साठी आपण आलोय ते अजून होत नाही या विचाराने लोकांचा मूड थोडा बदललेला स्पष्ट जाणवत होता.
      आणि तेवढ्यात गंभीर आउट झाला ..आता गंभीर आउट झाला हि बाब भारतीय टीम साठी असेलही कदाचित गंभीर पण लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.गंभीर मान खाली घालून चालत होता बिचारा ,पण stadium मधला प्रत्येक जण सचिन च्या नावाने ओरडत होता....कदाचित या गोष्टीची देखील इतर batsman ला सवयच लागली असेल.गंभीर आत गेला आणि साक्षात देवाने आपल्या संपूर्ण आयुधासाहित दर्शन द्यावे त्याप्रमाणे ती साडेपाच फुटी वामन मूर्ती आपले हेल्मेट सरळ करीत आणि आकाशाकडे पहात मैदानात आली.आणि एकच गजर ग्राउंड वर चालू झाला .लोकांच्या आनंदाला सीमा उरल्या नव्हता.आज Century कर एवढं एकच मागणं प्रत्येक जण करत होता..." तुझ मागतो मी आता ... " अशा अविर्भावात प्रत्येक  भक्त सचिन ला एकच विनंती करत होता.सचिन क्रीज वर पोहोचला आणि ज्या साठी इतक्या लांब आलो ती वेळ आणि व्यक्ती साक्षात समोर उभी होती.

      सगळे रेकॉर्ड्स,प्रसद्धि,मान,पैसा या गोष्टी बाजूला सारून शांतपणे अम्पायर कडे लेग स्टंप मागणारा सचिन टीव्ही वर अनंत वेळा पहिला होता पण आज समक्ष पहिला आणि 'गंगेत घोडा न्हायलं' .....
पहिली ५ मिनिटे त्याला पाहण्यातच गेली,गार्ड मार्क करणे,फिल्डिंग पाहणे,साईट स्क्रीन adjust करणे या गोष्टी होऊन खेळ सुरु होईपर्यंत प्रेक्षकांना उसंत नव्हती .उन्हाचे चटके सोयीस्कर दुर्लक्षित होऊ लागले होते.द्रविड आणि सचिन यांना एकत्रित खेळताना पाहण्याचे स्वप्न डोळ्यासमोर पूर्ण होत होते.बघता बघता दोघांचे अर्धशतक पूर्ण झाले.सचिन ला bat दाखवताना पाहण्याची इच्छा पण एव्हाना पूर्ण झाली होती.एका बाजूला सचिन आणि दुसर्या बाजूला द्रविड हे म्हणजे सिंहगडावर  उभे राहून तोरणा आणि राजगड बघण्यासारखे होते.

     आणि सगळं व्यवस्थित चालू आहे असे वाटत असतानाच द्रविड आउट झाला.८२ रन्स ची ती खेळी बर्याच गोष्टी दाखवून गेली.उभे राहून द्रविड चे अभिनंदन करे  पर्यंत लक्ष्मण मैदानात हजर होता.ऑस्ट्रेलिया ला आपल्या मनगटावर नाचवणारा लक्ष्मण आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिला.आणि हाच तो माणूस ज्याने follow-on घेऊन ऑस्ट्रेलिया ला चीतपट केले.आणि दिवसभर खेळून ऑस्ट्रेलियन bowlers ची पिसे काढली होती. दोघेही व्यवस्थित खेळत होते.आणि बघता  बघता दिवस संपला.सचिन ६७  वर नाबाद होता या आनंदातच मी खुर्चीवरून उठलो.सचिन परत ड्रेसिंग रूम कडे जात असताना फक्त हेल्मेट आणि bat एवढाच नाहीतर १००  करोड लोकांच्या शतकी अपेक्षांचा ओझंच जणू घेऊन चालला होता.

      सचिन ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचेपर्यंत कोणीही आपापली जागा सोडली नव्हती.दोघे आत गेले आणि लोकांच्या चर्चेला आता उत आला होता.तेवढ्यात उद्याच्या तिकिटांची जाणीव होऊन आम्ही त्वरित उद्याची सोय करण्यासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो.......रांगेतला पर्त्येक जण एकच विषयावर बोलत होता.दीड तासानंतर आम्हाला तिकीट मिळवण्यात यश आले.उद्या शतक पाहायला मिळणार या आनंदात पुढचा वेळ कसा गेला हे वेगळे सांगणे आणि लिहिणे न लागो.

दुसर्या दिवाशीचा सूर्य देखील सचिन चे शतक पाहण्यासाठीच उगवला होता...

      आम्ही जमेल तसे आवरून सकाळी ९ ला stadium मध्ये हजर झालो...तिकीट कालच मिळाल्याने आजचे काम त्यामानाने खूपच सोपे होते.आता एकच गोष्टीचा  ध्यास होता आणि ते म्हणजे महाशतक.खेळ सुरु झाला.सचिन ची प्रत्येक धाव लोकांच्या टाळ्यांची धनी होती.२ चौकार आणि एक सिक्स या प्रकाराने ६७ ते ९४ हा 
प्रवास इतका लगेच झाला कि शतकासाठी फार प्रतीक्षा नाही हे निश्चित झाले होते.आपल्याला शतक पाहायला मिळणार हे आता नक्की झाले होते. लोकांना खुर्चीवर बसायची इच्छाच नसावी कदाचित.
आणि rampaul चा खांद्यापर्यंत उडालेला चेंडू backfoot वर येऊन खेळण्याच्या नादात सचिन च्या bat ची कड घेऊन गेला आणि थेट सामी च्या हातात येऊन विसावला ....

       इतक्यावेळ बेभान होऊन नाचणारे वानखेडे stadium क्षणार्धात गलितगात्र होऊन पडले.२ सेकंदापूर्वी टाळ्या शिट्या वाजवणारे हजारो प्रेक्षक डोक्याला हात लावून स्तब्ध झाले.Stadium वर स्मशान शांतता पसरली होती.महाशाताकाची प्रतीक्षा अजून लांबणीवर पडली होती.एवढ्या जवळ पोहोचून देखील यश न आल्याचे दुख  मात्र सचिन च्या चेहेर्यावर तसूभर देखील नव्हते.तो आपली बात काखेत आणि मन खाली घालून ड्रेसिंग रूम कडे परतत होता.लोकांचा या गोष्टीवर विश्वासच बसत  नव्हता.इतिहास रचताना पाहण्याचे स्वप्न उध्वस्त झाले होते .निराशा लपवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरत होते.सचिन सीमेरेषेजवळ जवळ पोहोचला तेव्हा त्याने  प्रेक्षकांना bat उंचावून दाखवली आणि इतक्या वेळ असलेली स्मशान शांतता भंग पावली...कर्णकर्कश  आवाजाने पुन्हा एकदा सचिन च्या खेळला सलाम करण्यात  येत होता.सचिन च्या नावाचा गजर झाला.संपूर्ण भारत कदाचित हेच सांगत असावा कि "हरकत नाही..अरे ९९ वेळा जे तू केले तीच गोष्ट अजून एकदा करायला तुला जमणार नाही हे केवळ अशक्य...आज नाही तर पुढल्यावेळी...आम्ही असेच तुझ्या पाठीशी आहोत."सुमारे ५ मिनिटे लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला..

      सचिन आत परतला आणि धोनी मैदानात आला.पण आता match मधला गाभाच संपल्याची जाणीव लोकांना झाली होती.सचिन गेल्यावर stadium मधील लोक परतू लागले.आणि आम्ही देखील काढता पाय घेतला..
बाहेर आल्यावर सगळी कडे एकच हळहळ होती कि इतक्या जवळ जावून होम ग्राउंड वर ते शतक पूर्ण करता आले नाही..आम्ही एव्हाना stadium पासून लांब आलो होतो.मेसेजस मधून येणारे निराशेचे सुर अजूनच त्रासदायक वाटत होते......

खरच आहे .आम्ही पहायला
 गेलो आणि शतक झाले नाही याचे वाईट वाटणे साहजिक आहे.पण याचा अर्थ शतक होणारच नाही असा नक्की नाही..कदाचित हा योग  कांगारूंच्या देशातच असेल.
हरकत नाही आम्ही तयार आहोत .२६ डिसेंबर ..Boxing Day Test..Border Gavaskar Trophy...MCG..
याची खुणगाठ बांधूनच आणि सकाळची मुंबई अंगावर घेत आम्ही कार पर्यंत पोहोचलो...

आणि या दोन दिवसांनी मला काय दिले याचा हिशोब करतानाच कार चे दार बंद केले...
खिडकीतून बघितले तर समोर डौलाने उभे असलेले गेट वे ऑफ  इंडिया होते आणि मागे क्षणिक दुखाने झुकलेले वानखेडे...

हृषीकेश पांडकर
२८/११ /२०११

8 comments:

  1. फार भारी लिहिले आहेस .. हे तुझे लिखाण वाचताना ज्याच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले नाही त्याने स्वतःला जिवंत म्हणवून घेऊ नये

    ReplyDelete
  2. एका बाजूला सचिन आणि दुसर्या बाजूला द्रविड हे म्हणजे सिंहगडावर उभे राहून तोरणा आणि राजगड बघण्यासारखे होते – Sinhgad, Rajgad , Torana ani Sachin ani Dravid. He shabd eka wakyat yena thodasa patla nahi. (Individual opinion ahe)

    Rahul Dravid che 82 runs hi afalatoon hote. Tyalahi koutukache char shabd milale aste tar bara watla asta. Tasahi to “Shapit Rajputra” ahech. Pan cricket wedya kadun tyacha thodassa koutuk apekshit hota.

    Shivay Sachin che 67 runs tuzyakadun aikayla khup bara watala asta. Stadium paryantcha pravas, sachin chi stadium madhil entry ani baki sagala likhan khup surekh ahe. Tuze sagale kshan dolyasamor ale. Pan Sachin che 67 runs and Dravid che 82 runs madhale kahi apratim kshan wachayla khup aawadla asta. He runs banawtana kahi khelele apratim shots, hyachi dehi hyachi dola pahne jamle hote tula.

    Baki purna lekh apratim.

    ReplyDelete
  3. ekdum wankhede madhe aslyasarkha watla

    ReplyDelete
  4. Good one... मलाही थोडे खेळाचे वर्णन वाचायला आवडले असते...पण असो ते मी highlights मध्ये बघीनच... ;)

    ReplyDelete
  5. डोळ्यात पाणी आणलेस रे .. अप्रतिम लेख .. प्रिंट काढून आणली आहे लेखाची वाचायला !!!
    तुझ्या "पांडकरी" शैलीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ..
    मी जेव्हा वानखेडे ला गेलो होतो तेव्हा माझे असेच झाले होते .. मी तर नमस्कारच घातला होता वानखेडे ला ..
    मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे सचिन ला पाहताना सगळ्यांच्या मनाची हीच गत होते ..
    माझा अनुभव नक्की वाच ...
    http://mimihir.blogspot.com/2011/02/its-like-dream-come-true.html

    ReplyDelete
  6. एका सच्च्या क्रिकेट प्रेमीने मना पासून लिहिलेला लेख......

    आषाढी च्या वारीला जाणारा वारकरी ज्या भक्तिभावाने पांडुरंगाच्या दर्शनाला जातो...त्या भक्ती भावाने मुंबई ला जाऊन ही म्याच बघितल्याशिवाय असा लेख लिहिता येणे शक्य नाही......

    ReplyDelete
  7. खरंच डोळ्यात पाणी आले....अक्षरशः २ सेकंद स्तब्ध झालो होतो...खुपच सुंदर लिहिले आहेस...संपूर्ण वानखेडे, अगदी त्या रांगेतल्या प्रेमी युगालापासून ते तुम्ही उभं राहून द्रविड ला दिलेल्या टाळ्यांच्या सलामी पर्यंत सगळे काही अगदी डोळ्या समोर उभं राहिले. खुपच उत्तम!

    ReplyDelete