आधी उजव्या हातातून डाव्या हातात फिरणारा चेंडू दोन तीन वेळा जायचा. मग जीभ बाहेर काढून फिरवली जायची, सदैव उभे असलेले सोनेरी केस ज्याला बाहेरचे जग स्पाईक्स असं म्हणतात. पांढरा शुभ्र किव्वा पिवळा धमक रिस्ट बँड जो रिस्ट च्या कायम वरच असायचा. जेमतेम दोन पावलं चालत येऊन या माणसाने आपले जादूचे प्रयोग सर्व जगाला करून दाखवले.
कपिल देव ची बॉलिंग स्टाईल ही पोस्टर मध्ये छान दिसायची त्यामुळे बेडरूमच्या लाकडी दारावर कपिल देव चे उभं पोस्टर दिसायचं. पण रबरी आणि टेनिस बॉल वर आम्ही ज्या मॅचेस घ्यायचो त्यात टॉस करणे, स्टंप ठोकाठोकी, टीम पाडणे वगैरे कामं होईपर्यंत आणि रस्त्यातून चालत असताना काहीच कारण नसताना बेमालूम जी ऍक्शन करायचे त्यात ही जादूगाराची ऍक्शन अग्रस्थानी होती.
मी याला प्रत्यक्ष खेळताना कधीच पाहिलं नाही, पुण्यात एकदा संधी होती पण टीम मध्ये वॉर्न नव्हता. ती संधी हुकली ती कायमचीच. शब्दशः हातभर चेंडू वळविणे कशाला म्हणतात हे आम्हाला वॉर्न ने दाखवले. गेटिंग, गिब्स, स्ट्रॉस यांचे बोल्ड पाहिले की अजूनही या वळणाऱ्या बॉल वर विश्वास बसत नाही.
मैदानावर केलेल्या कामगिरी सोबतच मैदानाबाहेर केलेल्या धंद्यांमुळे देखील हा जादूगार कायम चर्चेत राहिला. अर्थात माझी ओळख त्या बावीस यार्डा पुरतीच.
बॉर्डर, टेलर, स्टीव्ह वॉ आणि काही अंशी पॉंटिंग यांच्या अनभिषिक्त आणि अभेद्य संघात महत्वाचं योगदान असलेला जादूगार कायमच स्मरणात राहील.
कुठल्याही टीम चा असला तरी जगभर तितकीच लोकप्रियता मिळवणारे खेळाडू अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतात. त्यातलाच हा. भारतीयांच्या जितक्या शिव्या पॉंटिंग, सायमंडस या मंडळींनी खाल्ल्या त्यापेक्षा जास्त प्रेम शेन वॉर्न ने भारतात मिळवलं. जेव्हा जेव्हा सचिन आणि लारा बद्दल बोललं जाईल तेव्हा तेव्हा वॉर्न च नाव आपसूक घेतलं जाईल. वॉर्न ची जादू भारतात तितकीशी चालली नाही कदाचित पण सचिन-वॉर्न द्वंद्व कायमच आठवणीत राहील.
आयपीएल च्या पहिल्या सिझन मध्ये जिथे मुंबई, कोलकता, बेंगळुरू, दिल्ली अशा मातब्बर संघांनी खेळाडूंचा 'क्रिमी लेअर' आपल्या संघात भरून घेतल्यावर उरलेल्या तरुण पोरांना हाताशी घेऊन थेट विजेतेपदला गवसणी घालणारा वॉर्न कायमचा लक्षात राहील.
संपूर्ण बालपणाच छत ज्या विविध रंगी फुग्यांनी सजले होते त्यातले एक एक फुगे निखळताना होणारी वेदना शब्दात व्यक्त करणे जरा कठीणच. समाधानाची बाब इतकीच की या जादूगाराचे प्रयोग बघायची आपल्याला संधी मिळाली.
विकेट मिळाल्यावर ऑस्ट्रेलियन बाकीचे खेळाडू बॉलर चे केस विस्कटून टाकतात मात्र शेवटपर्यंत ज्याने ते केस तसेच विस्कटलेले ठेवले तो म्हणजे शेन वॉर्न. कदाचित यशाची इतकी सवय आणि खात्री होती की पुन्हा भांग पाडून उपयोग नाही हे त्याला पक्क माहीत होतं.
ज्याने आयुष्यभर इतकी गुगली टाकली त्यालाच नियती इतक्या अनपेक्षित आणि लवकर गुगली टाकेल यावर विश्वास बसत नाही. एकाच हाताच्या पंजावर चार क्रिकेटचे बॉल धरू शकणाऱ्या फिरकीच्या जादूगाराला मनापासून श्रद्धांजली
हृषिकेश पांडकर
०५.०३.२०२२
No comments:
Post a Comment