Thursday, March 3, 2022

पिजन हॉक

 परवा घरच्या ओपन टेरेस ला कबुतरांची जाळी लावली. कबुतरांची म्हणण्यापेक्षा कबुतर आत येऊ नये यासाठीची जाळी लावली. घरासमोरचे अंगण गायीच्या शेणाने सारवावे असे म्हणतात. हल्लीच्या फरश्या कबुतराच्या शेणाने सारवाव्या लागतात. हा आणि यासारखे काही कबुतरांचे उपद्रव घराबाहेरच ठेवण्यासाठी तो जाळीचा घाट घालावा लागला.

आपल्याकडे गाडीच्या सीटवर हागणाऱ्यांना, गळ्यातून सतत येणाऱ्या आवाजाने नको करणाऱ्या आणि खिडकीच्या वर अहोरात्र डोळे मिटून पिसांची स्वच्छता करणाऱ्यांना पिजन म्हणतात कि डव्ह या मध्ये माझा थोडासा घोळ होतो. पण यांनाच रॉक पिजन म्हणतात हे आता समजलंय त्यामुळे हि रॉक पिजन घाणेरडीच असतात असा माझा समज आता ठाम होत चाललाय.


 

हे एवढे पिजन पुराण प्रस्तावनेत कशासाठी, याचा आणि वरच्या फोटोचा संबंध काय हा प्रश्न तुम्हाला पडणे अगदी स्वाभाविक आहे. पण एखाद्या नवीन गोष्टीबद्दल लिहिताना आपल्या दैनंदिन जीवनातील त्याचा साधारण संबंध सांगितला तर पुढे येणाऱ्या नवीन गोष्टीचे आकलन व्हायला आणि काही अंशी लक्षात राहायला सोपे जाते.

तर हा फोटोत असलेला पक्षी म्हणजे मर्लिन. याचा आणि आपल्या पिजन चा दिसणे,प्रवृत्ती, खाद्य सवयी या आणि अशा कुठल्याच वर्गात काडीमात्र साधर्म्य नाही.कारण मूलतः मर्लिन हा शिकारी पक्षी आहे. ससाणा या घराण्यातील एक छोटा पक्षी अशी याची ओळख. भारत पाकिस्तान सीमेवरील काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. भारताबाहेर देखील हा पहायला मिळेल मात्र भारतात बघायचा असल्यास राजस्थान च्या वाळवंटाला पर्याय नाही. मात्र आपल्याकडे जरी माळरानावर दिसत असला तरी उत्तर गोलार्धातील इतर ठिकाणी किनार पट्टीवर देखील पहायला मिळतात.

हा पक्षी उडत असताना काहीसा आपल्या पिजन सारखा दिसतो म्हणून याला 'पिजन हॉक' असेही म्हटले जाते. इतकेच याचे साधर्म्य. अर्थात उडता ससाणा हा या कबुतरासारखा दिसतो हे मानायलाच माझं मन तयार नाही. ससाण्याचा वेग आणि चपळाई पाहता कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली. असो, पण नुसतं पिजन असं नाहीये, त्यात हॉक हा देखील शब्द आहे त्यामुळे शिकारी तो शिकारीचं आणि प्रेमाचे संदेश देणार कबुतर ते कबुतरचं, नाहीका ?

हृषिकेश पांडकर

०३.०३.२०२२

Merlin - A fierce falcon from the Northern Hemisphere

Merlin | India, 2022

 

No comments:

Post a Comment