शनिवारी गणपती विराजमान झाले. थाटामाटात आले की हळूच येऊन बसले याचा काहीच अंदाज लागला नाही.रविवारी दुपारी गावात जाण्याचा योग आला. गावात म्हणजे कोथरूड कडे पाठ करून उभे राहिलात की लकडी पुलाच्या पालिकडला भाग. तर तिथून परतत असताना केसरी वाड्यावरून येत होतो.नेहमी प्रमाणे लोकमान्यांची संपूर्ण माहिती असलेला माहिती फलक बाहेर होता.चालत जात होतो त्यामुळे चटकन लक्ष गेले. जन्मतारीख आणि गेल्याची तारीख लिहिली होती. लोकमान्य आपल्यातून गेले ते साल होते १९२० आणि तारीख आहे १ ऑगस्ट. म्हणजे साधारण वीस बावीस दिवसांपूर्वी या गोष्टीला १०० वर्ष पूर्ण झाली.
थोडं अंतर चालून गेलो आणि सहज विचार डोकावला, ज्या व्यक्तीने हा गणेशोत्सव सार्वजनिक केला. घरातील बाप्पासोबतच लोकांनी एकत्र येऊन गणपती बसवण्याची प्रथा सुरू केली ते हे टिळक. या सार्वजनिक उत्सवा मागचा हेतू काय असावा ? लोकांनी एकत्र यावे,सणाच्या हेतूने समाजोपयोगी काही योगदान द्यावे,देखाव्यातून समाज प्रबोधन करावे थोडक्यात काय तर वैयक्तिक भक्तीभावासोबत काही वेळ आजूबाजूच्या लोकांनी एकत्र येऊन सणाच्या आणि भक्तीच्या माध्यमातून सत्कारणी लावावा.
कालांतराने याच सार्वजनिक सणाचे स्वरूप हेतू पासून दुरावले जाऊ लागले. मूळ मुद्द्यापडून सणाचा उद्देश भरकटत जाऊ लागला. सणाचा गाभा हरवत चालला. लोकमान्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव या कल्पनेला तडा जाऊ लागला.
समजा कोणालाही या जानेवारी महिन्यात यंदाच्या गणेशोत्सवा संदर्भात विचारले असते तर याही वर्षी हेच चित्र असणार असे सगळ्यांचे मत असते. पण प्रत्यक्ष चित्रात कमालीचा विरोधाभास आढळला.
वटवाघूळ,चीन,करोना,लोकडाऊन मास्क यांच्या घुसळण्यातून कदाचित लोकमान्यांचा तो गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागचा मूळ उद्देश समुद्रमंथनातून अमृत निघावे तसा साध्य झाला.
आज मिरवणूक नव्हती पण बाप्पा प्रसन्नतेने हजर झाले,लॉकडाऊन नसल्याने नातेवाईक मंडळींनी घरचा गणपती खऱ्या अर्थी एकत्र येऊन बसवला. मिरवणूक यंदा नसल्याने डीजेच्या भिंती,गुलाल आणि पर्यायाने सणाच्या मांगल्याला लागणारे गालबोट आज लागले नव्हते. रस्ता अडवणारे मांडव नव्हते,बरेचसे बाप्पा वर्षभर असलेल्या मंदिरात छान आवरून विराजमान झाले होते.
कोरोनाच्या लढाईत बहुतेक मोठ्या मंडळांनी नाना तर्हेच्या मदतीचे हात पुढे केल्याचे चित्र दिसत होते. औषधांची सोय, बाधित रुग्णांच्या जेवणाची सोय,काम धंदे ठप्प असल्याने कामगार वर्गाला मदत,डॉक्टर,पोलीस,स्वच्छता करणारे मित्र वर्ग यांच्या मदतीसाठी निधी संकलनाचे सत्कार्य होत असल्याचे चित्र होते.
अर्थात लयबद्ध ढोल ताशांच्या मिरवणुका,भव्य देखावे,बाप्पाचे प्रत्यक्ष दर्शन या गोष्टींना आपण नक्की मुकलो याची खंत आहेच. पण यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी याची कसर आपण भरून काढुच की. मात्र लोकमान्यांच्या अपेक्षेचा उत्सव आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात यायला १०० वर्ष वाट पाहावी लागेल याची कदाचित त्यांनाही कल्पना नसावी.
असो..इतकी वर्षे बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, त्यामागे त्यांचा काय उद्देश होता हे अनेकदा वाचनात आले होते. आज तो उद्देश पहिल्यांदाच डोळ्यासमोर उलगडताना अनुभवला. तसे घडण्याचे कारण तितके आनंददायी नक्कीच नाहीये कारण आज शेंगा जरी चीन ने खाल्ल्या असल्या तरी त्याची टरफल संबंध जग वेचत आहे. पण त्या निमित्ताने हाही अनुभव घेता आला.
पुढल्या वर्षी पुन्हा सगळं सुरळीत होईल पण बऱ्याच गोष्टींचा सुवर्णमध्य नक्की साधता येईल. डीजे नसला तरी बाप्पा येतोच,उंच आणि रस्ता व्यापणारा मांडव नसला तरी बाप्पा तक्रार करत नाही,गुलाल नसला तरी बाप्पा नाराज होत नाही आणि मिळालेली वर्गणी ही विधायक कामांना सत्कारणी लावता येते,स्वच्छता ही बाप्पालाही आवडते,सणाला कुटुंबासमवेत असणे हे देखील तितकेच महत्वाचे आणि आनंदाचे असते याचे जरी आकलन झाले तरी हे ही नसे थोडके...यंदा घरीच बनवलेली बाप्पाची प्रतिमा कदाचित जास्त जवळची आणि आपलीशी वाटत असेल जी कुठल्याही नदीत किव्वा तलावात विसर्जित होणार नाही तर घरातल्या कुंडीत विसवणार आहे त्यामुळे बाप्पा आपल्याच घरात असल्याचा आनंद देखील उपभोगता येईल.
तर हाच विचार मनात आला..टिळकांनी सांगितलेला उत्सव आज खऱ्या अर्थी अनुभवता आला तोही त्यांच्या पश्चात आणि थोडया थोडक्या नाही तर तब्बल १०० वर्षांनी...
मंगल मूर्ती मोरया !!!
- हृषिकेश पांडकर
२५.०८.२०२०