Friday, December 11, 2020

मुकं जनावर

 रक्त ? अहो तुमचा आर्डरली पान खाऊन पचापच थुंकलाय !

डिसेंबरचे सुरवतीचे हे दिवस होते. जूनच्या सुरवातीला लागलेला पाऊस दिवाळी संपली तरी ओसरत नाही त्याप्रमाणेच या वर्षाच्या सुरवातीपासून जगाच्या मानगुटीवर बसलेला करोना गेला का नाही या संभ्रमात संपूर्ण विश्व गांगरून गेले होते. 


 

वर्क फ्रॉम होमला कंटाळलेले,वर्षभर ट्रीपा,बाहेरचे खाणे,मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याविना कंटाळलेले पुणेकर आता जरासे मोकळे वाटत होते.

दिवस तसा नेहमीचाच होता. लोकडाऊन चा संभ्रम..वर्क फ्रॉम होम.. लस आलीये की नाही ..बरं आलीये तर कोणाला मिळेल..कोणाला नाही ? फ्री मिळेल की महाग..एकदा होऊन गेला असेल तर परत होईल का ? लग्नसराई आहे तर छोटस गेटटूगेदर चालेल का ? या आणि अशा अनंत प्रश्नांवर चपखल उत्तर नसताना आलेली ही आजची सकाळ होती. इतक्यात व्हाट्सएपच्या खिडकीत गवा गवा गवा असा कोलाहल कानावर आला. पुण्याच्या रस्त्यावर गवा नांदतोय अशी ती बातमी..

ही प्रस्तावना काहीशी कानावर पडलेली नक्की असणार नाही का..?

अशीच सुरुवात होती पुलंच्या 'म्हैस' या विनोदी कथाकथनाची. त्यांचा शेवट गोड होता. इथे प्रत्यक्षात मात्र काहीच गोड झाले नाही तो भाग वेगळा.

संदर्भ घ्यायचे कारण इतकेच की कथेचा गाभा असलेले पात्र एकाच जातकुळीचे. पण लोकांच्या गदारोळात भाईंची चांदी सुखरूप निसटली तर इथल्या लोकांच्या गदारोळात त्या गव्याने मात्र कायमचे देह टेकला.

असो, चूक कोणाची,दोषी कोण , शिक्षा काय असावी आणि कोणी भोगावी यावर पोटभर उहापोह दोन दिवसात पुष्कळ झाला आहेच त्यामुळे त्यावर बोलण्यात मजा नाही.

या निबिड अरण्यातील लाजाळू गव्याने पुण्यासारख्या शहरात भर सकाळी लोकवस्ती गाठली हीच मुळी आश्चर्याची बाब.मागे एकदा कर्वे रस्त्यावर बिबट्या पळत आला होता. परवा हा गवा आज काय तर म्हणे रानमांजर दिसली. उद्या सिग्नलला शेजारी पट्टेरी वाघ जरी आला तर अगदीच धक्का बसेल अस वाटत नाहीये.

लोक हल्ली सफारीच्या नावाखाली या गोष्टी पैसे आणि वेळ खर्चून करतात तर काही लोक या गोष्टी दाखविण्यासाठी पैसे घेतात त्यांच्या पोटावर पाय आल्यासारखाच झाल की राव हे..असच चालू राहील तर कोथरूड परिसराला अभयारण्याचा दर्जा मिळू शकेल अर्थात मुक्या प्राण्यांना मात्र यात कुठेही अभय नसेल. ते प्राणी फक्त पहायला मिळतील मात्र त्यांचे संरक्षण हा मुद्दा दुर्दैवाने इथे गौण असेल कदाचित.

गवा जाण्याचे कारण काहीही असो आणि कोणीही असो पण आपण ज्यांच्या घरी आगंतुकपणे पाहुणे म्हणून त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांच्या पाहुणचारात ते कणभरही कमी पडत नाही पण अनावधानाने आपल्याकडे आलेल्या त्याच पाहुण्याचे आपण केलेले आदरातिथ्य सर्वात बुद्धिमान प्राणी अशी ओळख असलेल्या आपल्या मानवजातीला किती शोभनिय आहे हा प्रश्न तितकाच अनुत्तरित राहतो..

अतिउत्साह,बेजबाबदारपणा आणि कॅमेऱ्यात टिपण्याची घाई या नादात आपण मुकं जनावर हकनाक गमावलं याच वाईट जास्त वाटतं 🙁

- हृषिकेश पांडकर

११.१२.२०२०

 

Tuesday, September 15, 2020

तीन गोष्टी

 गोष्ट पहिली :

गोष्ट तशी जुनीच. नेमकं सांगायचं झालं तर १६६३ सालची म्हणजे जुनी म्हणायला हरकत नाहीये. जुनी असली तरी सगळ्यांना अगदी तोंडपाठ. आहेच मुळी तितकी जवकची. तर गोष्ट आहे 'शाहिस्तेखानाची फजिती'. अगदीच ओळखीची गोष्ट. पटकन सारांश देतो. लाल महालात मुक्कामी असलेल्या गाफील खानाला धडा शिकवणाऱ्या आपल्या राजांची ही गोष्ट. रात्रीच्या वेळी शिताफीने महालात घुसून खानाला लक्षात यायच्या आत त्याची बोटं छाटून राजे पसार सुद्धा झाले. खानाच्या सेनेला काय होतंय हे कळायच्या आत राजे सुखरूप निसटले.

या घटनेनंतर खानाने चिडून राजांचा पाठलाग करायची आज्ञा त्याच्या सैनिकांना दिली असणार. बिचारं सैन्य या बेरकी आणि हुशार राजांच्या मागावर निघालं. पण गनिमी कावा कोळून प्यायला असल्याने राजे गनिमाच्या हाती लागले नाहीतच.

मात्र या संपूर्ण प्रकरणात गनिमाची दिशाभूल करण्यासाठी राज्यांनी एक युक्ती केली ती अशी की बैलांच्या शिंगांना दिवे बांधून ते बैल दिवे घाटाच्या मार्गी सोडून दिले जेणेकरून खानाची सेना त्या मार्गी जाईल. राजे स्वतः वेगळ्या वाटेनं सुस्थितीत जातील. झालं काहीस तसंच गनिमच्या सेनेनं माती खाल्ली. आपले राजे सुखरूप परतले.

गोष्ट दुसरी :

ही पण तशी जुनीच पण शिवरायांच्या कथेनंतरची. ही गोष्ट घडली ते साल होते १७२९. बुंदेलखंडाच्या मदतीला बिनशर्त धाऊन गेलेल्या बाजीराव पेशव्यांची.

राजा छत्रसाल यांनी बाजीराव पेशव्यांकडे मोहम्मद खान बंगेश याच्या विरुद्ध मदत मागितली होती. पेशव्यांनी ती कबूल केली. यानंतर बाजीरावांनी 'बंगेश' ला व्यवस्थित गाफील ठेवून शेवटी त्याला शरण येण्यास भाग पाडले.

ही गोष्ट भन्साळी भाऊंनी मोठ्या पडद्यावर दाखवलेली आहे. यात बंगेश खानाला गाफील ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शिंगांना मशाली लावलेले बैल विरुद्ध बाजूने सोडून बाजीरावांनी विरुद्ध दिशेने आपले काम तमाम केले असे दाखवलेले आहे. अर्थात मूळ कथा आणि हे कथानक यात फरक असेलच पण बंगेश ला दुसऱ्याच गोष्टीत गुंतवून ,गाफील ठेऊन त्याला पराभूत केले हा स्वच्छ इतिहास सर्वश्रुत आहे.

या झाल्या दोन भिन्न कालखंडातील दोन भिन्न गोष्टी.

गोष्ट तिसरी :

ही गोष्ट मुळीच जुनी नाही बरका..

या गोष्टीतही एक राजा आहे. ही गोष्ट अशाच एका राज्याची आहे जिथे संपूर्ण जनतेवर मोठं संकट आ वासून उभं ठाकलय. रयतेचा राजा मात्र या संकटाचा सामना करायचा सोडून त्यावर मार्ग काढायचा सोडून त्या पहिल्या दोन गोष्टींप्रमाणे बैलांच्या शिंगांना मशाली लावून जनतेची दिशाभूल करण्यात इतका व्यस्त झालाय की त्यात होरपाळणारी जनता त्याला दिसतच नाहीये बहुदा.

बरोबर ओळखलंत..

ती होरपळणारी जनता म्हणजे तुम्ही आम्हीच आहोत..आणि हे शिंगांना मशाली लावलेले बैल म्हणजे रिया,कंगना, राजकारण,सुशांतसिंग,सीबीआय इत्यादी.

ज्यांचा खरच पाठलाग करायचा आहे किव्वा बंदोबस्त करायचा आहे तो कोव्हीड, ते शिक्षण,ते आरोग्य ,ती अर्थव्यवस्था, ती बेरोजगारी आणि त्या सर्व विस्कटलेल्या गोष्टी तश्याच भिजत पडून आहेत. आपण पळतोय बैलांच्या मागे..शिंगांच्या मशालीचे दिवे पाहून..

तीनही गोष्टीतल्या पात्रांची तुलना होणे दुरापास्तच आहे पण दिशाभूल करण्याच्या तंत्रात आणि त्या फासात सहज अडकणाऱ्या बिनडोक बाबींची तुलना नक्की होऊ शकते.

असो...तर यातून तरी धडा घेऊयात..टीव्ही,विविध माध्यमे यातून बेफाम सुटलेल्या फसव्या बैलांना बळी न पडता आपल्या खऱ्या ध्येयावर आणि गरजेवर लक्ष ठेऊयात कदाचित हे संकट परतवून सुरळीत आयुष्याचा पुनःश्च श्रीगणेशा त्यानेच लवकर साध्य होऊ शकतो..

...बाकी सुज्ञ रयतेला वेगळे सांगणे ते काय !

हृषिकेश पांडकर

१५.०९.२०२०

 

Wednesday, September 9, 2020

जनहित मे जारी

 गुढीपाडवा आला...शांतीत गेला..

राखीपौर्णिमा आली ..शांततेत गेली..

स्वातंत्र्यदिन आला..शांततेत गेला..

एवढंच काय..गणपती आले..तेही शांततेत गेले..

आता मात्र हद्द झाली या सय्यमची..

आज खुद्द कंगना आलीये..काय बिशाद आहे या कोरोनाची..आमच्या मराठी बाण्याला शह देण्याची..आमची मराठी अस्मिता दडपण्याची..?


 

'नमस्कार कोविड-19 के अनलॉक की प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है...ऐसे में अपने घरों से बाहर तभी निकलें जब बहुत आवश्यक हो'

घ्या आता या पेक्षा 'बहुत आवश्यक काम कोणते असू शकेल ? आत्ता घराबाहेर जर पडलो नाही तर कसे चालेल ? करोना काय आज आहे उद्या नाही पण 'कंगना मुंबईत येतीये' या सारखा सोनियाचा दिनू तो कुठला ? म्हणूनच आम्ही बाहेर पडलोय जरा पाय मोकळे करायला..

'सार्वजनिक स्थानों पर कम से कम दो गज या छह मीटर की दूरी रखें..'

तुम्ही शंभर सांगाल हो पण एअरपोर्ट हे सार्वजनिक ठिकाणी थोडीच आहे ?

'फेस कवर या मास्क पहनते समय ध्यान रखें कि मुंह और नाक अच्छी तरह से ढ़कें रहें'

आम्ही काय गुन्हा केलाय की आम्ही तोंड लपवू..तोंड तर ती कंगना लपवेल.तोंड झाकले तर गर्दीत गौरवोद्गार कोण काढेल मला सांगा.. आणि नाक का झाकायचे आम्ही..या महाराष्ट्रात मोकळा श्वास घ्यायला आम्हाला रोखणारे तुम्ही कोण ?

खांसी बुखार या सांस लेने संबंधी समस्या होने पर तुरंत राज्य हेल्पलाइन या राष्ट्रीय हेल्पलाइन 1075 पर संपर्क करें...भारत सरकार द्वारा जनहित में जारी।

हे असल्या खांसी, बुखार भिकार आजारांना आम्ही भीक घालत नसतोय.. आणि राहता राहिला हेल्पलाईन चा प्रश्न तर 'एक बात कान खोल कर सुनलो..इसके बारे मे तो हम WHO की भी नहीं सूनते ये 'राष्ट्रीय हेल्पलाइन' किस झाड की पत्ती है भाई..? आणि तसही हे 'जनहित मे जारी' आहे..

जनहित आणि आमचा काय संबंध तुम्हीच सांगा आता...

हृषिकेश पांडकर

०९.०९.२०२०