Monday, March 4, 2019

रामेश्वर मंदिर

 कोकण म्हटल्यावर डोळ्यसमोर येते ती पोफळीची रांगेने असणारी आणि आभाळाशी स्पर्धा करणारी उंच झाडे,घरामागची टुमदार वाडी,ती पार करून गेल्यावर अंगावर येणार सिंधुसागर आणि लाल मातीचे रस्ते. पांढरेशुभ्र उकडीचे मोदक आणि खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा खाऱ्या पाण्याचा मासा, दमट हवेत घशाखाली अलगद सरकणारी किंचितशी आंबट सोलकढी आणि आंबा फणसापासून ते काजू कोकम पर्यंत जिभेचे चोचले झेलणारी अनेकविध फळे.


 

वर नमूद केलेला कोकणाचा अनुभव कोणालाच नवीन नसावा.हे आणि यापेक्षा वेगळं कोकण पाहण्याचा प्रयत्न या वेळी केला.नागाव किनाऱ्यापासून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर चौल हे गाव आहे.या गावात असलेले रामेश्वर मंदिर हे कदाचित तितकेसे प्रसिद्ध नाही मात्र ऐतिहासिक महत्व असलेले आहे. चौल गावात एकूण ३६५ मंदिरे बांधली गेली. वर्षाचे ३६५ दिवस म्हणून ३६५ मंदिरे असे काहीसे हे गणित आहे अशी माहिती कानावर येते. त्या ३६५ मधील शिल्लक आणि प्रार्थनीय अवस्थेत असलेले हे शिवालय.

आवार भव्य नसले तर शांत आणि नेटके आहे.नेहमीप्रमाणे मुख्य प्रवेशापाशी नंदी विराजमान आहे.मंदिराला एकूण ३ कुंड आहेत.पर्जन्य कुंड,अग्नी कुंड आणि वायू कुंड.हेमाडपंथी धाटणीची बांधणी येथे पहायला मिळते.

नागाव किव्वा अलिबाग ला कधी गेलात तर हे छोटेसे मंदिर नक्की बघा.खूप भव्य किव्वा प्रसिद्ध यापैकी एकही गोष्ट यात नाही पण एक ऐतिहासिक आणि रमणीय वास्तू म्हणून नक्कीच प्रेक्षणीय आहे.त्यातही जर सूर्यास्तानंतर जाण्याची संधी मिळाली तर अजिबात सोडू नका कारण लोहगोलाच्या अनुपस्थितीत तेलाच्या दिव्यांनी नटलेली दीपमाळ डोळ्याचे पारणे फेडेल एवढे मात्र नक्की.मी गेलो ती वेळ टळटळीत दुपारची होती त्यामुळे दीपमाळेकडे डोळे वर करून बघायची माझी हिम्मत झाली नाही.पण साधारण सकाळी उन्ह चढायच्या आधी किव्वा संध्याकाळच्या सावल्या लांबल्यानंतर मंदिराला भेट द्या नक्कीच आनंददायी अनुभव असेल.बाकी 'येवा कोकण अपलोच असा' हे आहेच.

महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा !!!

हृषिकेश पांडकर

०४.०३.२०१९

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Rameshwar Temple | Chaul-Revdanda | Kokan 2019

 

No comments:

Post a Comment