Tuesday, March 19, 2019

रेवदंडा

 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांच्या अस्तित्वाची स्थापत्यरूपी साक्ष देणारा हा 'रेवदंडा' किल्ला. किल्ला कसला... कालानुरूप दुभंगलेले फक्त अवशेष.अथांग अरबी सागराच्या लाटांना थोपवून धरणारी अभेद्य तटबंदी आणि किल्ला असण्याची खात्री पटविणारा हा चार मजली मनोरा.या खेरीज अस्ताव्यस्त पडलेल्या मोजून तीन तोफा आणि पोफळीच्या झाडांना जणू टेकून उभे राहण्यास शिल्लक राहिलेल्या भग्न भिंती.


 

हमरस्त्यालगतच्या लाल मातीच्या पायवाटेने आत गेल्यावर दिसणारी हि बांधणी.पोर्तुगीज कॅप्टन 'सूज' याने १५२४ मध्ये बांधून पूर्ण केलेला हा 'रेवदंडा' किल्ला.कालांतराने मराठ्यांनी काबीज केला आणि सरतेशेवटी इंग्रजांनी यावर युनियन जॅक फडकावला तो १८१८ साली.रेवदंड्याची अजून एक ओळख म्हणजे पहिला रशियन प्रवासी भारतात याच किनाऱ्यावरून आत आला.

किल्ल्यातून इतिहास उलगडावा वगरे असे इथे काहीच शिल्लक नाही.या उंच मनोऱ्याच्या मध्ये असलेले उघडे झरोके दिवसभर उन्हाच्या तिरप्या किरणांची रांगोळी बनवत असतात.मनोऱ्याच्या मधोमध उभे राहिल्यावर सध्या तिथे वास्तव्यास असलेल्या कबुतरांच्या गळ्यातून निघणारा आवाज घुमत असतो.मधेच एखादे कबुतर उडते त्याची फडफड आणि भरतीच्या वेळी येणार लाटांचा आवाज. हे दोन आवाज सोडले तर बाकी सगळे निपचित.

किल्ल्याचा परिसर मोठा असला तरी आता लोकांच्या पोफळीच्या वाड्या या आवारात बेमालूम मिसळल्या आहेत.किल्ल्याच्या आवारात प्रवेश केल्यावर किनाऱ्याची तटबंदी आणि हा मनोरा याच्या मध्ये एक प्री-वेडिंग फोटो शूट चालू होते.पंधरा मिनिटे तिथे रेंगाळून मी निघालो.'किल्ला' हि संकल्पना मनात ठेवून पहायला जाणार असाल तर इथे निराशा पदरी येण्याची दाट शक्यता आहे.पण तटबंदीवर उभे राहून एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला हे भग्नावशेष पहायला मजा येते.सूर्यास्ताच्या किव्वा सूर्योदयाच्या वेळेला हा मनोरा आणि इतर भग्नावशेष ज्यांना कॅमेऱ्यात टिपायचे असतील त्यांनी मात्र नक्की ती वेळ साधून जा.

एखाद्या मराठी भयपटासाठी हि वास्तू कधीच कशी चित्रित झाली नाही याचे आश्चर्य व्यक्त करत मी किल्ल्याची वेस ओलांडली.कधी नागाव,अलिबाग किव्वा काशीद या ठिकाणी आलात तर अर्धा तास काढून इथे येऊन जा माझं म्हणणं पटेल कदाचित…

हृषिकेश पांडकर

१९.०३.२०१९

 

No comments:

Post a Comment