Wednesday, January 30, 2019

Grand Place

 प्रत्येक राज्यात एक असा भाग असतोच जिथे सांस्कृतिक आणि राजकीय अशा दोन्ही गोष्टींची सांगड घालणाऱ्या इमारती जवळ जवळ उभ्या असतात.कदाचित यातील काही इमारती जुन्या असतील तर काही नवनिर्मित.काही जुन्या सांस्कृतिक इमारती कालांतराने सरकारी कचेऱ्यांमध्ये बदलतात.तर काही संग्रहालये म्हणून नावारूपास येतात.आणि राज्याच्या अशा भागातून पायी फेरफटका मारण्याची संधी मिळाली तर कदापि चुकवू नये. थोडक्यात सांगायचं तर पुण्यातील पेठांचा भाग.


 

हीच संधी मला मिळाली ती पहिल्या महायुद्धाचे घाव झेललेल्या ब्रुसेल शहराच्या अशाच एका ऐतिहासिक आणि राजकीय महत्व असलेल्या भागात तीन चार तास घालविण्याची.याच भागात दोन्ही महायुद्धाचा साक्षीदार असलेली आणि खऱ्या अर्थाने ग्रँड असलेली ही 'रॉयल ग्रँड प्लेस'.यालाच ग्रँड स्क्वेअर असेही म्हटले जाते.

येथील इमारती या वास्तुशात्रीय भव्यता आणि कलात्मक शैली यांच्या यशस्वी मिश्रणाचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणून का गणल्या जातात ते समजते.आणि हीच जागा ब्रुसेल शहराच्या संस्कृती आणि समाजाची ओळख सांगत राहते.या संपूर्ण चौकाची आणि त्यातील विविध इमारतींची बांधणी बाराव्या शतकात केलेली आहे अशी माहिती समजते.मात्र महायुद्धाच्या हल्ल्यात बऱ्याच इमारतींची पुनर्बांधणी किव्वा डागडुजी झालेली आहे.तरी देखील बांधणीत असलेले गॉथिक आणि बरोक चे गुणधर्म अजूनही तितक्याच सहजतेने पहायला मिळतात.

या चौकोनी जागेत नानाविध इमारती डोळ्यासमोर दिसतात.या चौकाचा आकार सुमारे २२५ फूट x ३६० फूट इतका असून.मधील जागा संपूर्ण रिकामी आहे आणि बाकीच्या चारही बाजूंना इमारती उभ्या आहेत.त्यातीलच एक हि फोटोतील इमारत.

हि इमारत आहे ती ब्रुसेल शहराच्या संग्रहालयाची.डोळे दीपावे असे कोरीव स्थापत्य आणि अचंबा वाटावा इतकी भव्यता.खोलात जाऊन इतिहास वाचावा इतका मी अभ्यासू नक्कीच नाही.पण प्रवासी या नात्याने घेता येईल तितकी माहिती आणि अर्थात फोटो घेऊनच तिथून काढता पाय घेतला.

बेल्जियम भेटीची संधी मिळाल्यास हि जागा अजिबात चुकवू नका.दर दोन वर्षांनी ऑगस्टच्या महिन्यात इथे संपूर्ण चौकात फुलांचा गालिचा अंथरला जातो तो नजारा देखील विलोभनीय असणारच यात शंका नाही.पण बिना गालिच्याचा हा राजबिंडा चौक प्रत्येक लवणाऱ्या पापणीसोबत नेत्रसुखाचे चोचले यथासांग पुरवतो एवढे मात्र नक्की.

हृषिकेश पांडकर

३०.०१.२०१९

The future of architecture is culture 🙂

Grand Place,Brussels | Belgium

 

No comments:

Post a Comment