रेकॉर्ड्स,ट्रॉफ़ीस,फिनिशर,कॅप्टन कुल किव्वा 'धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल' या आणि अश्या असंख्य क्रिकेटच्या सोनेरी क्षणांनी सुवर्णलंकीत असलेल्या एम एस बद्दल आदर आहेच यात तिळमात्र शंका नाही.पण काल झालेल्या आय पी एलच्या अंतिम सामन्यानंतर हा आदर अजूनच वाढला.किंबहुना आदर वाटावा कि अचंबा वाटावा असा तो प्रसंग होता.साठ दिवस चालू असलेल्या आणि जगातील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेल्या तुल्यबळ आणि मानाच्या स्पर्धेच्या विजेतेपदाचा करंडक सहज उचलून त्याच्या पुढच्या क्षणाला तो करंडक दुसऱ्याकडे सोपवून त्या जल्लोषातून बाहेर पडत आपल्या लाडक्या मुलीला आकाशात उडणारे फटाके आणि झिरमिळ्या दाखवणारा एम एस कुठल्या जगातला आहे हा प्रश्न मला राहून राहून वाटत होता.
त्याच्या क्रिकेट करियर बद्दल किव्वा त्याच्या आकडेवारीवर मी बोलत नाहीये.एक माणूस म्हणून पण इतका तटस्थ आणि प्रसिद्धी परामुख स्वभाव वयपरत्वे वाढत जातो का ? नक्कीच नाही.हि दैवी देणगी आहे कि कमावलेली स्थितप्रज्ञता देवचं जाणे.कारण दोघांमध्ये पत्त्यांमधील सात-आठ खेळत असताना सुद्धा जरी आपण जिंकलो तरी मिरवायची सवय आपल्याला असतेच.मग इतके मोठे बक्षीस मिरवायचे तर सोडाच पण कॅमेऱ्यासमोर उंचवायची तसदीही न घेता जो मनुष्य तो सोनेरी करंडक आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवून आकाशात उडणाऱ्या कागदी झिरमिळ्यांसोबत आपल्या तीन वर्षाच्या मुली सोबत रमतो त्याचे वर्णन कसे करावे ?
लाखो लोकांसमोर मिरवायची संधी धुडकारून त्या संपूर्ण कोलाहलाच्या पाठीमागे आपल्या चिमुरडी सोबत उभे राहून आणि पुढे सुरु असलेल्या त्या जल्लोषाची जराशीही फिकीर न करता या तीन वर्षाच्या ट्रॉफीला ते फटाक्यांनी गच्च भरलेले अरबी समुद्रावरचे आभाळ दाखवणारा एम एस क्षणभर का होईना निरपेक्ष साधू समान भासत होता.
विजयी कर्णधारापेक्षा काल एक प्रेमळ बाप म्हणून मुलीचे हास्य जपणारा एम एस वेगळाच आनंद देऊन गेला.काल चेन्नईने उचलेल्या कपापेक्षा हा क्षण जास्त स्मरणात राहिला एवढे मात्र नक्की.प्रसंग अगदी किरकोळ आहे पण अशाच लहान गोष्टी जास्त आनंद देतात यावर मी पुन्हा एकदा ठाम होत चाललो आहे.
हृषिकेश पांडकर