रविवारी सकाळी साधारण नऊ साडेनऊच्या आसपास पसरलेले कोवळे ऊन.ऊन असूनही किंचित जाणवणारा गारवा.चतुर्थीला दगडूशेठ गणपतीच्या मंदिरासमोर जशी नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते ना अगदी तशीच इथे पहायला मिळत होती.सकाळी आरती आणि पूजेदरम्यान केलेल्या 'होमा'मधून निघणारा गाभाऱ्याभोवतीचा परिसर व्यापणारा तो धूर.नमस्कार करताना गुणगुणला जाणारा तो जपाचा पुसटसा आवाज.फुलायचा बेतात असलेला साकुरा आणि गोल फिरणाऱ्या घंटेचा होणार नाजूक घंटानाद.प्रसन्न वातावरण.
देवधर्म आणि पर्यटन या दोघांची सांगड घालणारे शिस्तबद्ध लोक आपापल्या फिरण्यात व्यग्र होते.निरभ्र आकाश आणि लक्ख सूर्यप्रकाशामुळे शेजारी असलेला 'टोकियो स्काय ट्री' स्पष्ट दिसत होता. टोकियो मधील 'आसाकुसा' या भागात असलेले 'आसाकुसा मंदिर' हे येथील सर्वात प्राचीन बौद्ध मंदिर.याच आवारात एक भव्य पाच मजली पॅगोडा आहे जो 'शिन्तो श्राईन' या नावाने ओळखला जातो.मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी 'कामिनारी मोन' नावाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत यावे लागते.
मंदिर किव्वा एखादी धार्मिक वस्तू म्हणल्यावर तिचे पावित्र्य,शांतता आणि स्वच्छता या तीनही गोष्टी सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात.या तीनही गोष्टींची एकत्रित पूर्तता इथे होताना दिसते.भव्य आवार असल्यामुळे चालत फिरण्याची मजा वेगळीच आहे.आवारातील प्रत्येक ठिकाणावरून 'शिन्तो श्राईन' पाहता येते.आणि अशाच एका ठिकाणावरून टिपलेला हे 'टोकियो स्काय ट्री' चे दृश्य.एकाच नजरेत उलगडणारे राष्ट्राचे पैलू देशाची जडणघडण स्पष्ट करतात.आर्थिक सुबत्ता,तांत्रिक प्रगती,वैज्ञानिक प्रबळता असूनही संस्कृती,परंपरा आणि कला यांची श्रीमंती तितक्याच कौशल्याने जपणारा हा उगवत्या सूर्याच्या देश.
कमी उंची आणि कमरेतून काटकोनात वाकणाऱ्या लोकांच्या देशाची हि नवलाई पाहताना मान मात्र कायमच उंच करावी लागते एवढे निश्चित.
Senso-ji | Tokyo,Japan | Jan 2017
No comments:
Post a Comment