चित्रकला म्हणल्यावर माझा कागद त्रिकोणी डोंगर,मराठीमध्ये चार हा अंक लिहिल्यावर तयार होणारे पक्षी,दोन डोंगरांच्या बेचक्यात शंकू पूर्ण करणारा सूर्य,त्या सूर्याच्या खालून सुरु होणारी नदी,डाव्याबाजूला घर,घराच्या दारातून नदीला समांतर असलेली नागमोडी पायवाट आणि घराच्या उजव्या बाजूला घरापेक्षा उंच असणाऱ्या आणि कदाचित वर काढलेल्या डोंगरालाही स्पर्शून जाईल असे डेरेदार झाड अशा गोष्टींनी पूर्ण होतो.या पलीकडे माझी चित्रकला गेलेली नाही.
एखादा चित्रकार आपल्यासमोर एखादे चित्र साकारतोय हे पहायची संधी फारशी मिळाली नाही.काकाला व्यक्तिचित्र काढताना पहिले आहे पण डोळ्यासमोर असलेल्या प्रत्यक्ष देखाव्याचे तंतोतंत रेखाटन होत असताना पाहण्याची हि माझी पहिलीच वेळ.
झाडाच्या सावलीत आपला स्टॅन्ड मांडून त्यावर कॅनव्हास व्यवस्थित ठेवून रंगाचे शिंतोडे उडले तरी कपड्यांना हानी होणार नाही याची खबरदारी म्हणून गळ्यात लटकविलेले ऍप्रन अशा थाटात त्या काकू समोरचा निसर्ग रंगामध्ये कैद करत होत्या.साधारण दुपारी दोन ते सायंकाळी सहा या चार तासात समोरच्या छोटेखानी पुलाची मुद्रा व्यवस्थित आपल्या कॅनव्हास वर रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न पूर्णत्वाला नेत होत्या.
पुलावरून शेकडो पर्यटक ये-जा करत होते,मधेच थांबून फोटो काढत होते,वाऱ्याच्या अलगद लाटेबरोबर असंख्य 'मोहब्बते' ची पाने सांडत होती पण याचा किंचीतसाही परिणाम काकुंवर झाला नाही आणि पर्यायाने त्या चित्रावरही.
पानांच्या रंगछटेप्रमाणे रंगलेला कॅनव्हास पाहणे डोळ्याला खूपच सुसह्य होते.डोळ्यसमोर उलगडलेले चित्र पाहताना काकूही प्रचंड समाधानी दिसत होत्या.त्यांचे अभिनंदन करून आणि हा फोटो घेऊन पुढे सरकलो.
त्या चित्राचे पुढे काय होईल किव्वा काय झाले याची मला कल्पना नाही पण माझ्या हातातल्या कॅमेऱ्यापेक्षा आज काकूंच्या हातातल्या ब्रशचे कौतुक जास्त वाटले.कॅमेरा काय आणि ब्रश काय दोन्ही कलेच्या पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी.पण कधी घंटेचा आवाज कानाला छान वाटतो तर कधी टाळाचा.हा हि त्यातलाच भाग आपण मात्र आरती चालू ठेवायची
Central Park | New York | Nov 2017
No comments:
Post a Comment